Showing posts with label Vedas. Show all posts
Showing posts with label Vedas. Show all posts

Tuesday, March 1, 2022

वेद शिकण्याचा सर्वाधिकार | Universal Right to Learn Vedas

 



ब्रह्मज्ञान हे कोणत्याही जातीवर, पंथावर, वर्णावर, धर्मावर अवलंबून नाही.  ज्ञानामध्ये धर्मभेद, पंथभेद, जातिभेद, वर्णभेद नाहीत.  सर्व धर्म-पंथ-जाति-वर्ण यामधील दैवीगुणसंपन्न असणाऱ्या प्रत्येक सुसंस्कृत, अधिकारी व्यक्तीस वेदांचा अधिकार आहे.  भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला चातुर्वर्ण्याचा अर्थ समजावून न घेतल्यामुळे पुष्कळ वेळेला वर्णभेदाचा दोष काही बुद्धिमान लोक वेदांना, गीतेला देतात.  भगवान म्हणतात –  

           

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः |                (गीता अ. ४-१३)

 

ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र हे चार वर्ण केवळ जन्माने ठरत नसून त्या त्या व्यक्तीच्या सात्त्विक-राजसिक-तामसिक गुणांच्या प्रमाणानुसार व ती ती व्यक्ति करीत असलेल्या कर्मानुसार ठरत असतात.  त्यामुळे एखादी जन्माने शूद्र असणारी व्यक्ति जर अत्यंत सात्त्विक असेल तर ती गुणाने ब्राह्मण ठरते.  तसेच, एखादी जन्माने ब्राह्मण असणारी व्यक्ति अत्यंत तामसिक असेल तर ती गुणाने शूद्र ठरते.  यामुळे जो मनुष्य साधनचतुष्टयसंपन्न असेल तो मग कोणत्याही जातीचा-धर्माचा-वर्णाचा-आश्रमाचा अथवा कोणत्याही वयाचा असो, तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी साधक आहे.  येथे राजपुत्र हा कुमार अवस्थेत म्हणजेच अत्यंत तरुण होता.  याचा अर्थच ज्ञान हे शरीराच्या कोणत्याही बाह्य स्थितीवर अथवा वयावर अवलंबून नसते.  भगवान म्हणतात –  

 

            स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम् ||      (गीता अ. ९-३२)

 

स्त्री असेल, वैश्य किंवा शूद्र असेल, कोणालाही निरतिशय मोक्षगति प्राप्त होते.  म्हणून ब्राह्मण म्हणजे केवळ जन्माने ब्राह्मण नव्हे.  तर आचार्य व्याख्या करतात – ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः |  जो ब्रह्मस्वरूप जाणतो तोच ब्राह्मण होय.  किंवा – ब्रह्म ज्ञातुं इच्छति इति ब्रह्मणः |  जो ब्रह्मस्वरूप जाणण्याची इच्छा करतो, तो ब्राह्मण होय.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, December 15, 2015

महावाक्यांचा विचार | Analysis of Great Vedanta Principles


सर्व वेदांचे सार सांगणारी जी महावाक्ये आहेत त्यात जीवब्राह्मैक्याचे ज्ञान प्रकट केले आहे.  त्यांच्या अर्थाचा सखोल व सर्वांगीण विचार करावा.  या महावाक्यांनाच अखंडबोधार्थ वाक्य म्हणतात.  महावाक्ये आत्म्याचे अद्वैत स्वरूपाचे ज्ञान देतात.  यासाठी जे वाक्य संपूर्ण द्वैताचा निरास करून अखंडबोधार्थ ज्ञान देते, अशा महावाक्यांचा विचार साधकाने करावा.

उपनिषदातील अत्यंत प्रसिद्ध अशी चार महावाक्ये पुढीलप्रमाणे आहेत – १. प्रज्ञानं ब्रह्म |  २. अयमात्मा ब्रह्म |  ३. तत्त्वमसि |  ४. अहं ब्रह्मास्मि |  या चार महावाक्यांमध्ये मुख्यतः ‘तत्त्वमसि |’ या उपदेशपर महावाक्याचा विचार पुढील प्रमाणे करावा.  १. तत्द विचार, २. त्वं पद विचार, ३. असि पद विचार.  साधकाने मुख्यतः दोन पदांचाच विचार करावा.  १. ‘मी’ म्हणजे हा जीव,  २. ‘मी’ ला निर्माण करणारा व विश्व निर्माण करणारा – विश्वाचा कर्ता – परमेश्वर.

त्वम् पदाने जीव कोण आहे ?  जीवाचे स्वरूप काय आहे ?  जीवाला कोणत्या कारणास्तव संसार प्राप्त झाला ?  त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यु या कल्पना व अनुभव कोठून व कसे निर्माण झाले ?  ‘मी’ च्या उपाधीचा विचार टाकून देऊन त्याच्याही पलीकडे असणारा शुद्ध, निर्भेळ ‘मी’ कोण आहे ?  या प्रश्नांचा साधकाने साकल्याने विचार करावा.

तसेच ‘तत्’दवाचक जगत्उत्पत्तिस्थितिलयकर्ता,  सर्वशक्तिमान, सर्वज्ञ परमेश्वराचा विचार केल्यावर, ईश्वर हा स्वस्वरूपाने कोण आहे ?  याचा विचार करावा.  ईश्वराच्या सर्व उपाधींच्या व गुणधर्मांच्या पलीकडे असणारी त्याची शुद्ध, निरुपाधिक सत्ता विचारात घ्यावी.

‘तत्’ आणि ‘त्वम्’ या दोघांचे स्वरूप एकच आहे.  या सच्चिदानंद स्वरूपाच्या किंवा स्वस्वरूपाच्या दृष्टीने ‘असि’ पदाचा विचार करून हे ऐक्य जाणावे.  ही एकत्वाची, अखंडत्वाची संशयविपर्ययरहित दृष्टि किंवा हे ज्ञान ‘असि’ पदाने, श्रुतींच्या साहाय्याने गुरुमुखातून श्रवणाने प्राप्त करावे.

- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005



- हरी ॐ

Tuesday, August 12, 2014

ईश्वर आणि जीव | God and Mortal Being



आज स्थूल दृष्टीला जे अनेक भेद दिसतात, ते सर्व मायिक भेद आहेत.  मायेमुळेच अनेक प्रकारच्या उपाधि, जीव निर्माण होतात. जीव – जगत् – ईश्वर हे ही उपाधिजन्य भेद आहेत.  मायाउपाधिमध्ये जीव आणि ईश्वर हे आत्मचैतन्याची पडलेली प्रतिबिंबे आहेत.  
 
शुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘ईश्वर’ होय आणि अशुद्धसत्त्वप्रधानमायाउपाधिउपहितचैतन्य म्हणजेच ‘जीव’ होय

त्रिगुणात्मक मायाच जीव – जगत् – ईश्वर हे भेद निर्माण करून जीवाच्या बुद्धीवर आवरण घालून जन्मानुजन्मे या संसारचक्रामध्येच बद्ध करते.  मायाच जन्मानुजन्मे जीवाला खेळविते.  आपल्या अवतीभोवती दुसरे जीव निर्माण करते.  शब्द-स्पर्शादि विषय निर्माण करते.  जीवाला आसक्त करून बद्ध करते.  याप्रमाणे एकच चैतन्य अनेक झाल्यासारखे भासते.  

जसे, एकच बिंब आपण जितक्या बादल्यांमध्ये पाणी ठेवू तितकी प्रतिबिंबे पडल्यामुळे अनेक झाल्यासारखे भासते.  परंतु वस्तुतः बादली, पाणी, प्रतिबिंब सर्वच मिथ्या असून बिंबस्थानीय सूर्यच फक्त सत्य आहे.  तसेच, एकच चैतन्य सर्व उपाधींच्यामध्ये अनुस्यूत आहे.  मायिक उपाधीमुळेच ईश्वर-जीव, नियामक-नियम्य हा भेद निर्माण होतो.  त्यामुळेच ईश्वर सर्वांना व्याप्त करतो, ही व्यापनक्रियाही अध्यस्त आहे, उपाधीच्या दृष्टीने आहे.

भगवान गीतेत म्हणतात – “ मी माझ्या अव्यक्त स्वरूपाने सर्वांना व्याप्त केलेले आहे.  सर्व भूतमात्रे माझ्यामध्ये आहेत, परंतु मी मात्र त्या कशामाध्येही नाही.  अर्जुना !  माझ्यामध्येच सर्व भूतमात्रे आहेत आणि हे सर्व माझे ऐश्वर्य तू पाहा. ”



- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Monday, September 16, 2013

श्रीगणेश – मोह पाशांपासून मुक्ति I Shree Ganesh – Reliever from Bondages



आसक्ति मनुष्याला बद्ध करते.  हा मोहरूपी पाश आहे.  या मोहरूपी पाशामुळे विवेकबुद्धि भ्रष्ट होऊन मनुष्य अविवेकी होतो आणि अनेक प्रकारच्या मोहांना बळी पडतो.  भक्तांच्या या मोहरूपी पशांचा नाश करण्यासाठी श्रीगणेशाने हातात पाश धारण केलेला आहे.

विषयभोगतृष्णारूपी मोह तसेच स्रक्चंदनवनितादि यांनी निर्देशित केलेला मानसन्मान यश, कीर्ति, प्रतिष्ठा वगैरेंचा मोह, शारीरिक आणि इंद्रियोपभोग, सत्तेचा, धनाचा आणि स्त्रीचा या सर्व मोहांचा श्रीगणेश नाश करतो.

त्या भक्ताचे लक्ष पूर्ण विषयासक्त असते ते परमेश्वराकडे वळवितो.  त्याच्या मनात आस्तिक्य बुद्धि निर्माण करून परमेश्वराच्या पूजन, भजन, कीर्तनामध्ये प्रीति निर्माण करतो.  त्यामुळे तो परमेश्वराच्या कर्मानुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो.  याचा परिणाम म्हणजे त्याची परमेश्वरामध्ये अधिक श्रद्धा, निष्ठा निर्माण होते.  त्यामाधुनच ईश्वराविषयीची तळमळ तीव्र होते.  त्याचे मन सहजपणे भजनपूजानामध्ये एकाग्र होते.  तन्मय होते.  म्हणजेच विषयांच्यामधून निवृत्त होऊन अंतर्मुख होतो.  त्यामध्ये त्याला खूप आनंद व समाधान मिळते.

परमेश्वराच्या कृपेने त्याच्या मनात सत्संगाची इच्छा निर्माण होते.  सत्संगाच्या दृढ संस्कारामुळे आणि आचार्यांनी केलेल्या शास्त्रोपदेशामुळे विचारप्रवृत्त होऊन विषयदोषदर्शनामुळे विषयांचे खरे स्वरूप – अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं आणि मिथ्यात्वं – समजते.

श्रीगणेश अज्ञानी जीवांच्याप्रमाणे पाशाने बद्ध नसून तो मुक्त आहे.  यामुळेच तो भक्तांचा पाश नष्ट करणारा आहे.  बंधनातून मुक्त करणारा आहे.  म्हणून गणपतिसहस्त्रनामात ‘पाशविमोचक’ असे गणपतीस संबोधिले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

Sunday, September 15, 2013

श्रीगणेश – एकदन्त I Shree Ganesh – The Master of Illusion



एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि |
तन्नो दन्ती प्रचोदयात् |

आम्ही एकदन्ताला जाणतो.  त्या वक्रतुण्डाचे आम्ही ध्यान करतो.  तो एकदन्त आम्हाला प्रेरणा देवो.’

या गायत्री मंत्रामध्ये ‘एकदन्त’ शब्दामध्ये ‘एक’ शब्द मायावाचक असून ‘दन्त शब्द सत्तावाचक आहे.  या दोघांचा संयोग म्हणजे एकदन्त होय.  एक शब्दाने निर्देशित केलेल्या मायेचा सत्ताधीश म्हणजे मायाधीश किंवा मायाधिपति परमेश्वर होतो.  तो श्रीगणेशस्वरूप असून तो सगुण ब्रह्मस्वरूप आहे.  त्याला आम्ही जाणतो.

‘एक’ शब्द मायावाचक असून त्या मायेमधून सर्व ‘जगत’ उत्पन्न झालेले आहे.  ती माया भ्रान्तीला उत्पन्न करून मोह निर्माण करणारी आहे आणि नाना प्रकारच्या जगताच्या रूपाने खेळ-क्रीडा करणारी असून पूर्ण आहे.  म्हणून मायेचे पहिले कार्य विश्व निर्माण करणे व दुसरे कार्य जीवांच्या बुद्धीवर मोहाचे आवरण घालून अनेक प्रकारची भ्रान्ति निर्माण करणे होय.  ही भ्रान्ति अनंत अपार तऱ्हेने करून अगणित प्रकारे विश्वामध्ये क्रीडा करणारी आहे.

‘दन्त स्वरूप सत्तावाचक असून मायेचा स्वामी सत्ताधारण करणारा, मायेला स्वतःच्या अधीन ठेवणारा मायेचा चालक मायाधीश आहे.  तोच मायाधिपति प्रतिबिंबरूपाने मायेच्या उपाधीमुळे जीवरूपाला येतो आणि संसारी बनतो.  परंतु स्वतः मात्र मायेपासून अलिप्त राहून स्वस्वरूपाच्या स्वानन्द स्वरूपामध्ये रममाण असतो.

म्हणून जीव साक्षात परब्रह्मस्वरूप असूनही अज्ञानजन्य भ्रान्तिप्रत्ययामुळे जन्ममृत्यूरूपी संसारात अडकतो.  परंतु परब्रह्मस्वरूप मात्र जीवामध्ये कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्यस्वरूपाने असंसारी रूपाने राहाते.  अशा ‘एकदन्त’ मायाधिपति श्रीगणेशाला जाणणे हेच भक्ताचे कर्तव्य आहे.  तोच पुरुषार्थ आहे.

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010


- हरी ॐ
 

Friday, September 6, 2013

श्रद्धा – आम्ही परमेश्वर जाणतो | Faith - We know God



 श्रद्धा प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्यास शिकविते.  जीवन जगण्याची उमेद, उत्साह, धैर्य, आत्मविश्वास देते.  श्रद्धा मनुष्याला दुबळे बनवीत नाही.  काही लोक श्रद्धेलाच भोंगळ श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असे म्हणतात.  अशा लोकांना श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थच समजला नाही, असे म्हणावे लागेल.

शास्त्रामध्ये, वेदांच्यामध्ये गीतेमध्ये श्रद्धा हाच शब्द आहे.  कोठेही अंधश्रद्धा हा शब्दच नाही. अंधश्रद्धा हा चुकीचा शब्द आहे, कारण श्रद्धा कधीही अंध असू शकत नाही.  अंधश्रद्धेच्या ऐवजी त्यांनी अज्ञान हा शब्द वापरावा.  श्रद्धा ही श्राद्धाच आहे.  श्रद्धा हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे तो ज्ञानवाचक शब्द आहे.  परमेश्वराचे अस्तित्व बुद्धीने जाणणे म्हणजे श्रद्धा आहे.

म्हणूनच हिंदू धर्म आणि अन्य पंथ यांच्या मूळ तत्वप्रणालीमध्ये फार मोठा फरक आहे.  बाकीचे धर्म म्हणजे सांप्रदाय सांगतात की, आम्ही ईश्वरावर विश्वास ठेवतो.  In God we trust.  फक्त हिंदू धर्माचे तत्वज्ञानच, वेद, गीता, उपनिषदे परमेश्वरावर विश्वास ठेवा, असे सांगत नाहीत तर अगदी विज्ञानाच्या युक्तिवादाने परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करतात.  म्हणून हिंदू तत्वज्ञान सांगते – We not only believe in God, but we also know that there is God !

परमेश्वर ही एखादी कल्पना नाही, विषय नाही किंवा तुमच्या-आमच्यामधील एखादी मर्त्य व्यक्ति नाही.  परमेश्वर ही कोण्या एखाद्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना नाही आणि परमेश्वर ही अंधश्रद्धा तर मुळीच नाही.  परमेश्वर हे विश्वामधील त्रिकालाबाधित सत्य आहे.  परमेश्वर ही सत्ता आहे.  अस्तित्व आहे.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011


- हरी ॐ



Sunday, July 21, 2013

गुरुपौर्णिमा | Gurupournima




आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा, अर्थात गुरुपौर्णिमा होय. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या गुरु-शिष्य परंपरेला अतिशय महत्व आहे. या अत्यंत पवित्र दिनी भगवान वेदव्यासांचा जन्म झाल्यामुळे व्यासपौर्णिमा असे म्हणतात. भगवान व्यासांनी एक लाख मंत्रांचे विभाजन करून चार वेदांच्यामध्ये अत्यंत सूव्यवस्थितपणे संकलन केले.

वेद म्हणजेच विश्वामधील अखिल ज्ञानाचा सागर होय. गतकालापासून आजपर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये विज्ञान जे जे शोध लावीत आहे, त्या सर्वांचे स्पष्ट, शास्त्रशुद्ध व युक्तियुक्त ज्ञान वेदांच्यामध्ये आहे. हे अपौरुषेय ज्ञान आपल्यापर्यंत आणून भगवान व्यासांनी सर्व जगासमोर ज्ञानाचे भांडार खुले केलेले आहे. म्हणूनच भगवान व्यास हे संपूर्ण जगताच्या गुरुस्थानी आहेत. म्हणून व्यासपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

शिष्याने आपल्या गुरूंच्याप्रति शरणागत भाव व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शास्त्रकार गुरु या शब्दाची व्याख्या करतात –
गुकारो अन्धःकारः रुकारो तन्निवर्तकः इति गुरुः |

आपल्या अंतःकरणामधील अज्ञानाचा नाश करून गुरु ज्ञानज्योतीने शिष्याचे जीवन उजळवून टाकतात. अन्य सर्व भौतिक ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असणारे गुह्य आत्मज्ञान शिष्यास देऊन आत्मानुभूती घेण्यास त्याला पात्र बनवितात.

गुरु ही एक व्यक्ति किंवा एखादे शरीर नाही. तर गुरु हे तत्व आहे. गुरु हे साक्षात परब्रम्ह स्वरूप आहे. दीनांच्या उद्धारासाठी ते शरीर धारण करतात. मात्र उद्धार व्हावयाचा असेल तर गुरूंच्या चरणी नितांत श्रद्धा व एकनिष्ठ भक्ति हवी. आचार्य म्हणतात –
गुरुचरणाम्बुजनिर्भरभक्तः
संसारादचिराद्भव मुक्तः |
सेन्द्रियमानसनियमादेवम्
द्रक्ष्यसि निजहृदयस्यं देवम् || (भजगोविंदम्)

                                                             -  परमपूज्य माताजी स्थितप्रज्ञानंद सरस्वती

 
- हरी ॐ

Friday, January 25, 2013

कुंभमेळा २०१३ - भाग १ (Kumbha Mela 2013 - Part I)



- कुंभमहापर्व -

    संपूर्ण विश्वामधील सर्वात श्रेष्ठ, विराट, विशाल मेळावा म्हणजे 'कुंभमेळा' होय.  'कुंभ' म्हणजे घट.  'कुंभ' म्हणजेच ब्रह्मांड होय. ज्या ब्रह्मांडामध्ये सर्व जात-धर्म-वंश-पंथ-परंपरा-संप्रदाय इत्यादींचे लोक समाविष्ट होतात.  त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, वर्णाश्रमाचे, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, गृहस्थी-ब्रह्मचारी-वानप्रस्थी-संन्यासी असे सर्वच लोक समाविष्ट होतात.

    वेद सांगतात - धर्मो विश्वस्य जगत: प्रतिष्ठा | धर्माच्या सहाय्याने संपूर्ण विश्वाची प्रतिष्ठा होते.  धर्म हाच संपूर्ण विश्वाचा आधार आहे.  'धर्म' याचा अर्थ - हिंदू-मुस्लिम-ईसाई असा संकुचित नाही. तर धर्माची व्याख्या केली जाते - धर्मो धारयते प्रजा: |  जो सर्व प्राणिमात्रांना धारण करतो, त्यास धर्म असे म्हणतात.  प्रत्येक धर्माचे विशिष्ठ नियम, आचार, आदर्श असतात. बहिरांगाने सर्व धर्म भिन्न-भिन्न वाटत असतील तरी अखिल मानावजातीच्या दृष्टीने विचार केला तर समजते की, मनुष्याच्या जीवनाला परिपूर्णता देणे, हेच सर्व धर्मांचे अंतिम साध्य आहे.  स्वामी विदयारण्य एके ठिकाणी सांगतात -

अंत:पूर्ण: बही:पूर्ण: पुर्णकुम्भ इवार्णवे | (पंचदशी)

एखाद्या जलाशयातील पाण्याने भरलेला घट त्या पाण्यामध्येच बुडवला तर त्या घटाच्या आत, घटाच्या बाहेर, घटाच्या वर, घटाच्या खाली, घटाच्या सर्व बाजूंनी पाणीच असते. पाणी त्या घटाला अंतर्बाह्य व्याप्त करते. त्यालाच पूर्णकुंभ असे म्हणतात.  याप्रमाणेच मनुष्याला आपल्याच अंतरंगामधील आनंदसागराचा शोध लागला की, त्याचे जीवन पुर्णकुंभाप्रमाणे कृतार्थ व परिपूर्ण होते.  मानवी जीवनाला ही परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी हिंदू संस्कृतीच्या शिरोभागी असणाऱ्या तसेच सर्व ज्ञानाचा सागर असणाऱ्या वेदांच्यामधून ज्ञानसाधना सांगितलेली आहे. वेदांचा उपदेश समाजाच्या एखाद्या विशिष्ठ जातीधर्मापुरता मर्यादित नसून अखिल मानवजातीसाठी आहे.  म्हणूनच सर्व विश्वामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापन करावयाची असेल तर हिंदू धर्माची उदात्त व सर्वसमावेशक मुलतत्त्वे हीच जगाला दीपस्तंभाप्रमाणे अनंत काळपर्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही.

    या हिंदू धर्माचाच एक विशेष भाग म्हणजे हा विराट कुंभमेळा आहे.  अनेक धर्मांचे, पंथांचे लोक एकत्र येवून संपन्न होणारा हा एकमेव विराट मेळा आहे.  यामधील लोकांचे संघटन, विविध परंपरा, विविध भाषा, विविध वेशभूषा, आदी अनेक गोष्टी आपणास विविधतेतून एकतेचे दर्शन घडवतात. कुंभमेळा अतिशय प्राचीन काळापासून चालत आल्याची परंपरा आहे.  कुंभमेळ्याविषयी पुराणातील संदर्भ आपण पुढील भागामध्ये पाहू.

-  परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, २४ जानेवारी २०१३
-  By  P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 24 January 2013



'कुंभमेळा' या विषयावरील इतर लेख कुंभमेळा २०१३ - भाग २' आणि 'कुंभमेळा २०१३ - भाग ३' हेही आपणास आवडतील. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email  वरही कळवू शकता - धन्यवाद.
- हरी ॐ