Tuesday, November 26, 2019

सत्संग म्हणजे नेमके काय? | What Exactly is ‘Satsang’?



सत्संग म्हणजे नेमके काय ?  साधु कुणाला म्हणावे ?  संत कुणाला म्हणावे ?  साधूंना कसे ओळखावे ?  कारण समाजामध्ये तर अनेक माणसे आहेत.  साधूंचा वेष घेतलेली अनेक माणसे दिसतात.  मग केवळ बाह्य वेषावरून भगवे कपडे, पांढरे कपडे किंवा रुद्राक्षांच्या माळा यावरून त्याला साधु समजावे का ?  कलियुगामध्ये पाखंडी, ढोंगी, लोकांनी या साधुवेषाचा आश्रय घेऊन साधूंच्या वस्त्राचा अक्षरशः अपमान केला आहे.  ‘साधु’ या शब्दालाच बदनाम केले आहे.  त्यामुळे समाजाचा ‘साधु’ या शब्दाकडे पाहाण्याचाच दृष्टीकोन बदलला आहे.  यासाठीच ‘साधु’ म्हणजे कोण हे प्रथम समजावून घेतले पाहिजे.

वेदांच्यामध्ये ‘संत’ शब्दाची व्याख्या केली आहे.
अस्ति ब्रह्मेति चेत् वेद सन्तमेनं ततो विदुरिति           (तैत्ति. उप.)
जो जो या विश्वामध्ये “ईश्वर आहे” असे निश्चितपणे जाणतो, ज्याची सत्स्वरूप असणाऱ्या ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, त्याला ‘संत’ असे म्हणावे.  म्हणून संत म्हणजे बाह्य वेष नव्हे, संत आपल्याला बहिरंगाने दिसत नाहीत.  आपण डोळ्याने माणसे पाहू शकतो.  हा चांगला माणूस, हा वाईट माणूस असे म्हणू शकतो.  परंतु हा संत असे डोळ्याने पाहू शकत नाही.  तर आपल्याला अंतःकरणामध्ये त्याच्या संतत्वाची, साधुत्वाची प्रचीति येते.  मनामध्ये अनुभव येतो.  महापुरुषांमधील दिव्यत्व, अलौकिकत्व हे डोळ्यांना दिसत नाही.  शरीराने किंवा इंद्रियांनी अनुभवता येत नाही.  तर शुद्ध अंतःकरणामध्ये त्याची प्रचीति येते.

ज्यावेळी आपल्याला एखाद्या स्थानामध्ये खऱ्या साधुत्वाची प्रचीति येते, तेव्हा त्या स्थानाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव उदयाला येतो.  तिथेच आपण नतमस्तक होतो.  आपली बुद्धि तिथे विनयशील, शरणागत होते.  त्याचवेळी आपल्या जीवनामध्ये ते गुरूस्थान बनते.

यामुळे गुरु ही एक व्यक्ति नाही, गुरु हे एक मर्त्य शरीर नाही, गुरु हे नातेही नाही किंवा गुरु हा समाजातील अन्य माणसाप्रमाणे एक माणूस नाही.  तर गुरु हा अंतःकरणामध्ये उदयाला आलेला भाव आहे.  जीवनामध्ये असा गुरुभाव उदयाला येणे अत्यंत दुर्लभ आहे व गुरु मिळणे ही दुर्लभ आहे. 
  

- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, November 19, 2019

तुमचा परिचय काय? | Introduce Yourself




खरे तर “मी काय आहे ?”  हे मला चांगले माहीत असते.  “तुम्ही कोण आहात ?”  असा प्रश्न विचारल्या नंतर आपण आपले नाव सांगतो, गाव सांगतो, पत्ता सांगतो, जास्तीत जास्त धर्म, जात, पंथ, वर्ण, आश्रम, लिंग सांगतो. याच्या व्यतिरिक्त आणखी दोन चार पदव्या सांगतो.  “मी पी.एच.डी. आहे.” एखादा म्हणेल की, “मी डबल पी.एच.डी. आहे. मी भारतरत्न आहे.”  मी नात्याच्या अनुषंगाने काही वेळेला उत्तर देईन की, “मी आई आहे किंवा वडिल आहे.”  

जर आपल्याला एक क्षणभर सांगितले की, “बाह्य कशाचाही आधार न घेता तुम्ही कोण आहात ?  हे सांगा.”  यावर आपल्याला काहीही उत्तर देता येत नाही.  त्यावेळी समजते की, अजूनपर्यंत कधीही मी ‘मी’ चा विचारच केलेला नाही.  मी म्हणजे कोण ?  माझे खरे स्वरूप काय ?  याविषयी ज्ञान देणारी विद्या म्हणजे उपनिषद् होय.  साधकाला उपनिषद् विचारप्रवृत्त करते.  आचार्य शिष्याला प्रश्न विचारतात – “ तू कोण आहेस ?  तू कोठून आलास ?  हे विश्व काय आहे ?  हे विश्व कोठून निर्माण झाले ?”  हा विचार कर.  

बुद्धिमान मनुष्य – ‘मी’ कोण आहे ?  याचा स्वतःच विचार करू लागेल.  परंतु तो तासन् तास, वर्षानुवर्षे, जन्मानुजन्मे ‘मी’ चा जरी विचार करीत राहिला तरी त्याला ‘मी’ चे यथार्थ स्वरूप समजणे शक्य नाही, कारण आचार्य सांगतात –
पण्डितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न कुर्यात् |           (शांकरभाष्य)   
एखादा पंडित, विद्वान मनुष्य असेल, तरी त्याने सुद्धा ब्रह्माचा शोध स्वतंत्रपणे घेऊ नये.  स्वबुद्धिप्रमाण ठेवून केलेला शोध व्यर्थ ठरतो.

संत कबीर म्हणतात – लहर ढूंढे लहर को कपड़ा ढूंढे सूत | जीव ढूंढे ब्रह्म को तीनों ऊत के ऊत ||
 जर कापड सुताला शोधत असेल, लाट पाण्याला शोधत असेल, तसाच जर मी ‘मी’ ला स्वतंत्रपणे शोधायला लागलो तर जन्मभर मला शोध लागणार नाही.  

म्हणून हा ‘मी’ चा शोध घेण्यासाठी “तू उप म्हणजे जवळ जा.”  कोणाच्या जवळ ?  तर ज्यांना ‘मी’ चे स्वरूप यथार्थ समजलेले आहे, अशा श्रेष्ठ पुरुषांजवळ जा.  ते आत्मस्वरूप जाणण्यासाठी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंच्याकडेच गेले पाहिजे.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ


Tuesday, November 12, 2019

अत्यंत समीप कोण आहे? | Who is the Nearest?




अत्यंत समीप असणाऱ्या विषयाचे ज्ञान जर उपनिषद् देत असेल तर मग मला सर्वात अधिक जवळ कोण आहे ?  आपल्या जवळ अनेक विषय आहेत.  कधी कधी आपल्याला विश्व सुद्धा जवळ वाटते.  विश्वामध्ये अनेक खंड आहेत.  त्यामध्ये आशिया खंड आपल्या आणखी जवळ, त्याच्यामध्येही भारत देश आपल्याला जवळ, त्याच्यामध्ये सुद्धा आपले स्वतःचे महाराष्ट्र राज्य जवळ, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले शहर, शहरामध्येही आपले घर जवळ, घरामध्ये माणसे जवळ, त्यापेक्षा माझी वस्त्रे आणखी जवळ, वस्त्रांच्या अनुषंगाने शरीर जवळ, शरीराच्या अनुषंगाने इंद्रिये, नंतर प्राण, नंतर मन, नंतर बुद्धि, नंतर चित्त, नंतर अहंकार माझ्या अगदी जवळ आहे.  

त्याच्यानंतर माझ्या अत्यंत जवळ कोण ?  फक्त ‘मी’ माझ्या अत्यंत जवळ आहे, कारण ‘मी’ आणि ‘मी’ यांच्यामध्ये अजिबात – तसूभर सुद्धा अंतर नाही.  म्हणून ‘मी’ मीच्या अत्यंत जवळ आहे आणि त्या अनुषंगाने अन्य सर्व विषय माझ्यापासून अत्यंत दूर आहेत.  

म्हणून व्यवहारामध्ये दूर आणि जवळ हे सापेक्षित शब्द आहेत.  एका वस्तूच्या अनुषंगाने एखादी वस्तु जवळ होते, परंतु तीच वस्तु दुसरी वस्तु मध्ये आल्यामुळे ज्या वस्तूला मी एका क्षणापूर्वी जवळ म्हटले होते, तीच वस्तु दुसऱ्याच क्षणी दूर होते.  याप्रकारे क्रमाने मीमांसा केली तर समजते की, माझ्या सर्वात जवळ फक्त ‘मी’ आहे आणि उपनिषद् दूरच्या वस्तूचे ज्ञान देत नाही.  

‘मी’ शिवाय जे जे काही जगामध्ये आहे, त्याचे ज्ञान द्यायची गरजच नाही.  त्याचे ज्ञान देणारी अन्य भरपूर शास्त्रे आहेत.  अॅनॉटॉमी, फिजीऑलॉजी, सायकॉलॉजी, वगैरे वगैरे.  परंतु उपनिषद् या शब्दामधील ‘उप’ या उपसर्गामधून सूचित होते की, उपनिषद् हे अन्य ज्ञान देत नसून ‘मी’चे ज्ञान देते.  म्हणून उपनिषद् ही सर्वश्रेष्ठ असणारी विद्या आहे.


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ


Tuesday, November 5, 2019

आत्मवस्तु कशी जाणावी ? | How to Know ‘Self’ ?




व्यवहारामध्ये घट, पट, वृक्ष वगैरेदि विषय दृश्य, स्थूल, इंद्रियगोचर आहेत.  त्यांचा रंग, रूप, नाम, गुण, धर्म, विकार, जाति वगैरेदि सर्वांचे मला ज्ञान प्राप्त होते.  परंतु आत्मा ही घटाप्रमाणे कोठेतरी विश्वामध्ये ठेवलेली वस्तु नाही, तर आत्मा ही पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्या कक्षेच्या अतीत असणारी अतींद्रिय वस्तु आहे.  

आत्मवस्तु ही अत्यंत सूक्ष्म आणि सर्वव्यापक आहे.  तसेच अन्य वस्तूंच्याप्रमाणे आत्म्याला नाम, रूप, रंग, जाति वगैरेदि विकार नाहीत.  म्हणूनच आपण आत्म्याचे ज्ञान बाह्य प्रमाणांच्या साहाय्याने घेऊ शकत नाही.  आधुनिक वैज्ञानिक युगात, एकविसाव्या शतकात नव्हे, अशी अनेक शतके आली आणि गेली, अनेक शोध लागले, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी सुद्धा आत्मा हा कधीही डोळ्यांचा, इंद्रियांचा इतकेच नव्हे, तर मनबुद्धीचा सुद्धा विषय होऊ शकत नाही.  ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, त्यांचा आपण मनाच्या साहाय्याने अनुभव घेतो.  म्हणून आपल्याला मनामध्ये सुखदुःखादि अनुभवायला येतात. काही वेळेला मी बुद्धीने अनुभवतो.  पण आत्मा हा बुद्धीचा विषय होऊ शकत नाही.  बुद्धीने कितीही लटपट केली, चार भिंतींच्यामध्ये दारे बंद करून आत्मविचार केला – “आत्मा कसा असेल ?”  कितीही बुद्धि चालविली तरी सुद्धा आत्म्याचे स्वरूप समजू शकत नाही.  

मग शंका निर्माण होईल की, या आत्म्याचे ज्ञान कसे प्राप्त करणार ?  अन् शक्यच नसेल तर विनाकारण कशाला प्रयत्न करावेत ?  अज्ञात आत्म्याचे ज्ञान कसे घेणार ?  तर त्यासाठी साधन एकच, ते म्हणजे – उपनिषत् प्रमाणम् |  जिज्ञासु साधकांना श्रुति सांगते की, उपनिषत्-वेदान्त हेच अत्यंत प्रमाणभूत शास्त्र आहे.  अतीन्द्रिय असणाऱ्या, इंद्रिय-मन-बुद्धीला अगोचर असणाऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करावयाचे असेल तर याठिकाणी शास्त्रकार, आचार्य किंवा श्रुति स्वतःच अन्य सर्व साधनांचा निरास करते आणि सिद्ध करते की, उपनिषत् हेच प्रमाणभूत शास्त्र आहे.  

ज्या ज्या ठिकाणी मनुष्याची बुद्धि येते, तेथे आपोआपच त्या ज्ञानामध्ये बुद्धीच्या मर्यादा, बुद्धीमध्ये असणारे राग-द्वेष, कलुषितता अंतर्भूत झाल्यामुळे त्या ज्ञानाला सुद्धा मर्यादा येतात.  परंतु वेद आणि वेदान्तशास्त्र हे अपौरुषेय असल्यामुळे मनुष्याच्या बुद्धीमधील दोष शास्त्रामध्ये येऊ शकत नाही.  म्हणून आत्मविद्येसाठी वेदान्तशास्त्र हेच एकमेव साधन आहे.


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ