Tuesday, September 27, 2016

इंजिन बंद करणे ! | Turning Off the Engine !


न बाणो वेगे अक्षीणे स्वयं पतति, क्षीणे च वेगे स्वयमेव पतति |  तथा प्रारब्धं कर्मापि |   ज्याप्रमाणे गतिमान असणाऱ्या बाणावर कोणीही नियमन करू शकत नाही.  जोपर्यंत गति आहे तोपर्यंत तो त्याला गति दिलेल्या दिशेनच तसाच ‘सूं सूं’ करीत जातो आणि गति संपल्यानंतर आपोआपच खाली पडतो.  त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते.

त्याप्रमाणे शरीराला प्रारब्धाने गति आणि दिशा दिलेली आहे. त्यात कोणताही बदल करता येणार नाही.  तो मनुष्याचा पुरुषार्थ नाही.  पुरुषार्थ जर असेल तर, तो म्हणजे शरीररूपी गाडीचे इंजिन बंद करणे !  अज्ञानी मनुष्य या इंजिनमध्ये सतत स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक विषयरूपी वासनांचे पेट्रोल भरत असतो आणि त्यामुळे तो सतत अव्याहतपणे जन्मामागून जन्म घेत राहातो.

याउलट विवेकी पुरुष अखंड निष्काम सेवेने चित्तशुद्धि करून घेतो.  गुरूंच्या कृपेने आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त करून सर्व वासनांचे कारण असणाऱ्या अज्ञानाचा ध्वंस करतो.  संसारगाडीचे इंजिनच बंद करतो.  परंतु इंजिन बंद केले तरीही बंद करण्यापूर्वी दिलेल्या गतीमुळे गाडी काही काळ पुढे जात राहाते, व गति संपल्यावर आपोआपच थांबते.

त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने जरी संसाराचे कारण अज्ञान ध्वंस झाले, तरी प्रारब्धाने गति दिल्यामुळे ज्ञानानंतरही शरीर तसेच राहाते आणि प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर देहपातानंतर तो निरुपाधिक ब्रह्मस्वरूप होतो.  श्रुति म्हणते – ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति |  त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

Tuesday, September 20, 2016

वासनांचा क्षय कसा करायचा? | How to Reduce Stored Desires?


‘वासना’ म्हणजे काय ?  मागचा पुढचा सारासार विचार न करता सहज स्वाभाविक उत्स्फूर्त निर्माण होणाऱ्या दंभदर्पादि वृत्तींचे जे कारण ते म्हणजे चित्तामध्ये असलेले संस्कार होत.  या संस्कारांनाच ‘वासना’ म्हणतात.

ज्यावेळी बुद्धि सावधान, दक्ष असते त्यावेळी सारासार विवेक जाणीवपूर्वक केला जातो.  त्यामुळे चित्तामध्ये सुप्त असलेल्या कामक्रोधादि वृत्ति व्यक्त होत नाहीत.  सावधानता आणि विवेकयुक्त बुद्धि कामक्रोधादि वृत्तींना व्यक्त होऊ देत नाही.  परंतु बुद्धीतील विवेक, अंतरिक जाणीव आणि सावधानता कमी होते, त्यावेळी पूर्वाभ्यासाने संस्काररूपाने चित्तामध्ये संग्रहित केलेल्या सुप्त वासना उफाळून वर येतात आणि कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींच्या रूपाने व्यक्त होतात.  यामुळे चित्तामध्ये विक्षेप, क्षोभ, संताप निर्माण होऊन निदिध्यासनेमध्ये प्रतिबंध निर्माण करतात.  म्हणून साधकाने या आसुरी वासनांचा क्षय करण्याचा सतत अभ्यास केला पाहिजे.  म्हणजेच ‘मनोनाश’ केला पाहिजे.

म्हणून साधकाने चित्ताची उपशमा करण्यासाठी प्रथम दंभदर्पादि वृत्तींचे कारण म्हणजेच आसुरी वासनांचा क्षय केला पाहिजे.  आसुरी वासनांचा क्षय म्हणजेच दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष केला पाहिजे.  विवेकाच्या साहाय्याने अमानित्वादि दैवी गुणांचा उत्कर्ष होऊन ते आत्मसात होतात त्यावेळी बाह्य विषयांच्या सान्निध्याने अंतःकरणामध्ये कामक्रोधादि, दंभदर्पादि वृत्तींचा विकार निर्माण होत नाही.  म्हणजेच मन रागद्वेषरहित, कामक्रोधादिवृत्तिरहित होते.

जसे अग्नीमध्ये टाकलेले इंधन भस्मसात झाल्यानंतर अग्नीची उष्णता, दाह कमी होऊन तो शांत होतो व अग्नीची उपशमा होते, तसे अनेक जन्मामध्ये केलेल्या अमानित्वादि दैवी गुणांच्या अभ्यासाच्या संस्काराने चित्तामध्ये असलेल्या दंभदर्पादि सुप्त आसुरी वासनांचा क्षय होऊन चित्त शांत होते. चित्ताची उपशमा होते.  असे मन निदिध्यासानेसाठी योग्य आणि अनुकूल होते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012




- हरी ॐ