Monday, May 29, 2023

मोक्षद्वाराचे द्वारपाल | Gatekeepers Of Liberation

 



हे रामा !  शम, विचार, संतोष आणि सत्संग हे चार मोक्षद्वाराचे द्वारपाल असल्यामुळे साधकाने या चार साधनांचे अनुसरण करावे.  चार जमले नाहीत तर तीन साधने अनुसरण करावीत.  तीन नाही जमले तर दोन साधनांचे अनुसरण करावे.  त्यामुळे राजमंदिराप्रमाणेच ही साधने म्हणजे हे द्वारपाल मोक्षरूपी राजगृहाचा दरवाजा आपल्यासाठी उघडून देतात.  हे जमले नाही तर निदान या चारपैकी एका साधनाचे तरी मनापासून अनुसरण करावे.  प्राणपणाने साधना करावी.  कारण यांपैकी एक साधन आत्मसात झाले तरी आपोआपच चारही साधने आपल्याला वश होतात.

 

वसिष्ठ मुनि येथे मोक्षागृहामध्ये प्रवेश कसा करावा, हे आपल्याला सांगतात.  जसे कोणत्याही घराला किंवा राजमंदिराला दरवाजा असतो.  दरवाजामधील द्वारपाल अनुकूल झाले तरच आपल्याला आत प्रवेश करता येतो.  तसेच जणू काही मोक्षरूपी हे राजमंदिर आहे.  त्यामुळे त्यामध्ये प्रवेश करावयाचा असेल तर द्वारपालांची अनुकूलता आवश्यक आहे.

 

मोक्षागृहाच्या दाराशी शम, संतोष, विचार आणि सत्संग असे चार द्वारपाल आहेत.  साधकाने हे चारही गुण प्राप्त करावेत.  ते नाही जमले तर त्यांपैकी निदान तीन किंवा दोन गुण तरी आत्मसात करावेत.  तेही जमले नाही तर यांपैकी एका गुणाचा तरी पूर्ण आश्रय घ्यावा.  या चारपैकी कोणताही एक गुण जरी आत्मसात झाला तरी साधकाला चारही गुण वश होतात.

 

म्हणजेच जेथे शम आहे तेथे आपोआपच विचार, संतोष व सत्संगाची प्राप्ति होते.  जेथे विवेक असेल तेथेच मन शांत व तृप्त होऊन सत्संग प्राप्त होतो.  जेथे तृप्ती आहे तेथेच मन शांत व विवेकशील बनून ते मन सत्संगामध्ये रममाण होते आणि सत्संगामध्ये मन शांत, विवेकशील व तृप्त होते.  म्हणून साधकाने यांपैकी एक तरी गुण प्रयत्नपूर्वक आत्मसात करावा.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Monday, May 22, 2023

ईश्वर-विमुख आणि ईश्वराभिमुख | Away From And Towards Eeshwar

 



साधन विचार करताना आपल्याला जाणून घेतले पाहिजे की जीवनामध्ये ४ गोष्टी आम्हाला ईश्वर-विमुख करतात.

१) छळ-कपट, चोरी, व्यभिचारामध्ये रस निर्माण झाला तर मनुष्य ईश्वरविमुख होऊन संसाराभिमुख होतो.

२) मनाची चंचलता - प्रयत्न करूनही भगवंतामध्ये मन स्थिर, एकाग्र होत नाही.

३) अभिमान - संसारातील अनेक विषयांच्या आश्रयाने अनेक प्रकारचा अभिमान निर्माण होतो.  धन, परिवार, विद्या, बुद्धि, अधिकार, बल, यश, कीर्ति, वर्ण, आश्रम, धर्म, सौंदर्य, कुल, त्याग, दान, राष्ट्र, समाज, सुंदर स्त्रीचा अभिमान.

४) ईश्वराच्या स्वरूपाचे अज्ञान.

 

ईश्वरविमुख करणाऱ्या चार कारणांचे निराकरण करून ईश्वराभिमुख होण्यासाठी साधनांचा विचार केला पाहिजे.

१)  अधर्माचरणामध्ये असलेला रस निवृत्त करण्यासाठी धर्माचरण केले पाहिजे. धर्माचरणाने जितका पापाचा क्षय होईल त्याप्रमाणात हळूहळू परमेश्वरामध्ये रस वाढेल.

२) राग द्वेष नाहीसे करण्यासाठी भगवंतावर, गुरुंच्यावर प्रेम करावे आणि निःस्वार्थ, निष्काम सेवा करावी.  मनाच्या कल्पनेचा विलास थांबविण्यासाठी योगाची साधना किंवा उपासना करावी.

३) संसारातील अनेक गोष्टींचा अभिमान नाहीसा करण्यासाठी आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीकडे पाहू नये.  त्यामुळे अभिमान वाढतो. आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ व्यक्ति पाहिल्यामुळे अभिमान खाली येतो.  या विश्वात निरतिशय, सर्वश्रेष्ठ असा अनंतकोटीब्रह्माण्डनायक परमेश्वर आहे.  त्याचे गुण, धन, यश, कीर्ति, सत्ता, सामर्थ्य, ईशनशीलत्व वगैरे पाहावे.

४) ईश्वराच्या स्वरूपाचे अज्ञान नाहीसे करून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्संग करावा.  सत्संगामध्ये परमेश्वराचे गुणमाहात्म्य, विभूति, लीला, क्रीडा, सौंदर्य, माधुर्य, उदारता, दया वगैरे स्वरूपाचे ज्ञान होईल.  यामुळे परमेश्वरामध्ये आपली रुचि वाढेल.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ




Tuesday, May 16, 2023

शास्त्रामधील प्रश्नोत्तरे | Question-Answers In Shaastra




प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारल्यावर वक्त्याने सुद्धा लगेचच उत्तर ना देता त्या प्रश्नावर विचार केला पाहिजे.  तो प्रश्न योग्य आहे का ?  त्याला शास्त्रप्रमाणाचा काही आधार आहे का ?  तसेच त्या प्रश्नामागील शब्द हे अर्थाला, विषयाला अनुसरून आहेत का ?  याचा विचार करणे आवश्यक आहे.  याचा विचार न करता उतावीळपणे उत्तर दिले तर तो वक्ता मूर्खच समजावा.  कारण शास्त्राविषयी बोलताना प्रत्येक शब्दाचा अर्थ हा लागलाच पाहिजे.

 

आपण जे शास्त्र बोलतो त्यामध्ये प्रत्येक शब्दाचे काहीतरी प्रयोजन आहे.  शास्त्र हे मनाच्या करमणुकीसाठी सांगितले जात नाही.  तसेच शास्त्र बोलताना त्यामध्ये स्वतःच्या मतांची काही भर घालू नये किंवा शास्त्रामधील एखादा भाग वगळू नये.  जसे शास्त्र आहे, त्याच पद्धतीने सांगितले गेले पाहिजे.  कोणाला आवडो किंवा न आवडो, कोणाच्या बुद्धीला पटो किंवा न पटो, वक्त्याने निरपेक्षपणाने शास्त्रार्थ सांगावा.  बोलताना प्रत्येक शब्दाला प्रमाण असावे.  शास्त्र म्हणजे कोणीतरी सांगितलेल्या काल्पनिक गोष्टी नाहीत, तर मनुष्यजीवनाचे गुह्य ज्ञान आहे.  आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व आचार्यांनी आपल्या पूर्वीच्या आचार्यांना आणि शास्त्रालाच प्रमाण मानले आहे.

 

म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी - भाष्यकाराते वाट पुसतु ।  असे म्हणून भाष्यकारांना म्हणजे आदि शंकराचार्यांना प्रमाण मानले.  श्रीमद्भागवतावर टीका लिहिताना संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी - श्रीधराते वाट पुसतु ।  असे म्हणून आदि शंकराचार्यांचे शिष्य श्रीधराचार्यांनाच प्रमाण मानले.  स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आदि शंकराचार्यांची वचने प्रमाण मानली.  आदि शंकराचार्यांनी भगवान वेदव्यास आणि आदिगुरु वसिष्ठ मुनींची वचने प्रमाणभूत मानली.

 

याप्रमाणे वक्त्याच्या बोलण्याला योग्य प्रमाण आवश्यक आहे.  मात्र जो वक्ता भावनेच्या आवेगामध्ये किंवा श्रोत्यांना बरे वाटावे म्हणून असंबद्ध आणि प्रमाणरहित बोलतो, तसेच जो विचार न करतातच प्रश्नांची उत्तरे देतो, तो अत्यंत मूढ आहे.  असे ज्ञानी लोक म्हणतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ



Tuesday, May 9, 2023

परमात्मा-जगाचा संबंध | Supreme Being – World Relationship

 



निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विशेष, निर्विकार, नित्य शाश्वत चैतन्यस्वरूपाने सगुण, साकार, सावयव, जड, अनृत विश्वाला व्याप्त करून प्रकाशमान केलेले असेल, तर परमात्म्याचा आणि जगाचा काय संबंध आहे ?  कारण परब्रह्म प्रकाशक आहे आणि विश्व प्रकाश्य आहे.  त्यामुळे प्रकाशक आणि प्रकाश्य वस्तू नित्य भिन्न असतात, हा सर्वांचा लोकप्रसिद्ध अनुभव आहे.  त्याचप्रमाणे विश्व सुद्धा परब्रह्मापासून भिन्न आहे का ?  त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ?  भगवान उत्तर देतात – मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः |

 

आचार्यांनी दृष्टांत दिलेला आहे.  तरंग किंवा लाट पाहाताना दोन गोष्टी दिसतात.  एक पाण्याची सत्ता आणि दुसरी नामरूपात्मक लाट किंवा तरंग.  मग त्या नामरूपाचे स्वरूप काय आहे ?  जर अत्यंत जवळून पाहिले तर लाटेमध्ये अंतर्बाह्य फक्त पाणीच आहे.  त्यामुळे आपण लाटेला स्पर्श करीत नाही, तर फक्त पाण्यालाच स्पर्श करतो.  जेथे पाहातो तेथे पाणीच आहे.  फक्त पाणी वरती आल्यानंतर दिसणारे एक रूप दुसऱ्या रूपापासून भिन्न करण्यासाठी आम्ही नावे देतो.  हा तरंग, हा बुडबुडा, ही लाट वगैरे.  म्हणजेच ही सर्व नाम आणि रूपे पाण्यामध्ये दिसणारा भास आहे.  म्हणून ती सर्व नामरूपे मिथ्या आहेत.  मिथ्या याचा अर्थ ज्यांना स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, तर ती दुसऱ्याच्या सत्तेवर अवलंबून आहेत.  ज्यावेळी आपण म्हणतो लाट आहे, तेव्हा “पाणी आहे, म्हणून लाट आहे” असा अर्थ आहे.  परंतु लाट नाही तरीही पाणी आहेच.  त्यामुळे एकही लाट पाण्याच्या सत्तेपासून दूर नाही, भिन्न नाही किंवा बाहेरही नाही.

 

याप्रमाणे दार्ष्ट्रांतामध्ये पाहिले तर पाणीस्थानीय निर्विशेष, निर्विकार, निरुपाधिक प्रत्यगात्मस्वरूपाने असलेले सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आणि त्याव्यतिरिक्त अव्यक्तापासून स्थूलापर्यंत अनुभवाला येणारी तरंग-बुडबुडे स्थानीय सर्व भूतमात्रे आहेत.  त्यावेळी भगवान म्हणू शकतील की हे अर्जुना !  तुझ्यासहित सर्व भूतमात्रे माझ्या – परमात्म्याच्या प्रत्यगात्मस्वरूपाच्या सत्तेमुळे सत्तावान होऊन माझ्याच पारमार्थिक सत्तेमध्ये म्हणजेच सच्चिदानंदस्वरूपामध्ये अस्तित्वात आहेत.  त्यांना स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, तर त्यांना मिळालेली माझीच परमात्म्याची सत्ता आहे.  “मी आहे” हे म्हणण्यासाठी सुद्धा माझी आत्मचैतन्याची सत्ता आवश्यक आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, May 2, 2023

अधिकारी श्रोता | Authorized Listener

 



मागील श्लोकात वसिष्ठ मुनींनी कोणत्या वक्त्याला प्रश्न विचारू नयेत, हे सांगितले.  आता या श्लोकामध्ये उत्कृष्ट, योग्य वक्त्याने म्हणजे गुरूंनी हे ज्ञान कोणाला द्यावे व कोणाला देऊ नये ?  हे सांगितले आहे.  ज्या साधकामध्ये पूर्वी सांगितलेली वाक्ये आणि त्यांच्यानंतर सांगितलेली वाक्ये, या भिन्न-भिन्न वाक्यांची योग्य संगति लावण्याचे सामर्थ्य आहे, अशाच बुद्धिमान आणि योग्य साधकाला गुरूंनी हे ज्ञान द्यावे.  मात्र पशुधर्माने वागणाऱ्या अधम पुरुषाला हे ज्ञान देऊ नये.

 

शास्त्राचे श्रवण करीत असताना साधकाला वाक्यांचे संदर्भ लावता आले पाहिजेत.  काही वेळेस साधक शास्त्राची विधाने कोठेही, कशीही, कोणत्याही संदर्भात वापरतात.  हे अत्यंत अयोग्य आहे.  शास्त्रविधानांचे अर्थ स्वतःला सोईस्कर न लावता शास्त्राचे तात्पर्य समजले पाहिजे.  त्यासाठीच कोणते वाक्य कोणत्या संदर्भात योजिले आहे, याचे आकलन झाले पाहिजे.  म्हणून तो परिपक्व, शुद्ध मनाने शास्त्रार्थ समजावून घेतो, त्यामध्ये उगाचच तर्क-कुतर्क करीत बसत नाही तर शास्त्राचा अभिप्राय लक्षात घेऊन त्याप्रमाणे जो अनुसरण करतो, त्यालाच गुरूंनी शास्त्राचा उपदेश करावा.

 

मात्र जे पशुधर्माने वागतात, म्हणजेच ज्यांच्या अंतःकरणामध्ये कामक्रोधादि विकार असून जे अधार्मिक आणि पापाचारी आहेत अशा अनाधिकारी, अधम लोकांना मात्र ही गुह्य ब्रह्मविद्या मात्र कदापि देऊ नये.  अशा निकृष्ट मनुष्याशी संभाषण देखील करू नये.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019

- हरी ॐ