Showing posts with label Illusion. Show all posts
Showing posts with label Illusion. Show all posts

Tuesday, August 6, 2024

अधिष्ठान आणि त्यावरील भ्रम | Substratum And Superficial Illusion

 



श्रीवसिष्ठ मुनि येथे आणखी सखोल विचार सांगतात.  ब्रह्माजी हा कारण नाही आणि विश्व हे कार्यही नाही.  त्यामुळे ब्रह्माजीमधून विश्व निर्माण झाले, असे म्हणणे केवळ औपचारिक आहे.  मग हे सगळे दिसते ते काय आहे ?  श्रीवसिष्ठ मुनि सांगतात - यद्रुक् एव परं ब्रह्म तादृक् एव जगत् त्रयम् |  हे रामा ! संपूर्ण त्रैलोक्य हे परब्रह्मस्वरूप आहे.  म्हणून "विश्व मिथ्या आहे" असे म्हणणे म्हणजेच "विश्व परब्रह्मस्वरूप आहे" असे म्हणणे होय.

 

हे आपण दृष्टांतावरून समजावून घेऊ.  जसे पाण्यामधून लाट निर्माण होते.  पाणी हे कारण व लाट हे कार्य आहे.  असे जरी असले तरी ज्यावेळेस आपण पाण्याच्या दृष्टीने पाहतो, त्यावेळी लाट नाहीच.  फक्त पाणीच आहे.  म्हणून वस्तुतः पाणी हे कारण नाही व लाट हे कार्यही नाही.  वस्तुतः पाण्यामधून काहीही निर्माण झाले नाही.  निर्माण होतच असेल तर तो केवळ लाटेचा भास आहे.  पाण्यामधून लाट निर्माण झाली, असे म्हणणे म्हणजे वाचेचा केवळ उपचार आहे.  म्हणून लाट हा केवळ भ्रम आहे.

 

मग दिसते ते काय आहे ?  दिसते ते केवळ पाणी आहे !  म्हणून लाट नाही, असे म्हणणे म्हणजे लाट पाणीस्वरूप म्हणणे असे होय.  काहीच नाही, असे म्हणणे म्हणजे अधिष्ठानाची सत्ता मान्य करणे होय.  कारण अभावाला सुद्धा सत्ता आहे. अभावाचे ज्ञान होण्यासाठी सत्तेचीच आवश्यकता आहे.  म्हणून जग मिथ्या आहे, असे म्हणणे म्हणजे जग ब्रह्मस्वरूप आहे, असे म्हणण्यासारखे आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ–




Tuesday, October 24, 2023

संसाराची दलदल | The Swamp Of Illusion

 



प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्येच निरतिशय आनंदस्वरूप परमात्मा निवास करीत असेल तरी दुर्दैवाने सर्व जीव स्वस्वरूपाचा शुद्ध आनंद न अनुभवता फक्त दुःखकारक संसाराचाच अनुभव घेतात.  याला कारण स्वस्वरूपावर आलेले अज्ञान आणि अज्ञानजन्यकार्याचे आवरण होय.  ज्याप्रमाणे गाईच्या सडामध्ये अमृततुल्य दूध असते;  परंतु त्याच सडावर बसलेली गोचीड अमृततुल्य दूध न पिता रक्तच शोषत असते.  प्रकाशस्वरूप असलेल्या सूर्यावर आवृत्त झालेल्या कृष्णवर्णीय ढगाच्यामुळे सूर्य काळवंडलेला, तेजोहीन दिसतो.  तो ढगाच्या मागे असूनही त्याच्या स्वरूपाने अनुभवायला येत नाही.

 

त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नित्य, शाश्वत, निरतिशय सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृति होते.  नित्य काय ?  आणि अनित्य काय ?  हे कळत नाही.  या अविवेकामुळे सर्व जीव देहाशी तादात्म्य होतात.  यामधून त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्मस्वरूपाच्या विषयांच्याच उपभोगण्याच्या कामना निर्माण होतात.  खरे पाहाता त्यांची निरतिशय आनंद मिळावा हीच मूलभूत कामना असते;  परंतु निरतिशय आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न करता विषयभोगाची इच्छा करतात.  विषयभोगामधून ते निरतिशय आनंद मिळविण्याची इच्छा करतात.  परंतु सर्व विषय उपभोग घेऊनही त्यांना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळत नाही.  त्यांच्या सर्व कामना व्यर्थ, निष्फळच होतात.

 

येथे शंका येईल की आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न होता विषयांच्या इच्छा का निर्माण होतात ?  याचे उत्तर भगवान देतात – त्या सर्व अविवेकी लोकांनी राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो.  त्यांचे कोणतेही कर्म निःस्वार्थ, निष्काम आणि उदात्त भावाने नसल्यामुळे सर्व कर्मे व्यर्थच असल्यासारखी आहेत.  सकाम ज्ञानाने फक्त कामना आणि कर्मफळाची वासना अधिक वृद्धिंगत होते.  म्हणून त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ झाल्यासारखे होते.  रजोगुण आणि तमोगुणात्मक अविद्या मायेच्या प्राधान्यामुळे रज आणि तमोविकारांच्या आहारी जाऊन प्रकृतीचे गुलाम होतात आणि अधःपतित होतात.  ते संसारामध्येच संपूर्ण अडकतात.  यामुळे मी परमात्मा त्याच्या हृदयामध्ये निवास करून सुद्धा ते मला जाणत नाहीत.  ते मला प्राप्त न होता संसाराला प्राप्त होतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–




Monday, July 18, 2022

विश्वनिर्मिती – माया प्रतिबिंबरूपेण | Creation – Source-Reflection Illusion

 



येथे आचार्य शब्द वापरतात – मायाप्रतिबिंबरूपेण |  बिंब-प्रतिबिंबवत् इति |  विश्वनिर्मिती ही बिंब आणि प्रतिबिंब याप्रमाणे होते.  बिंबस्थानीय सूर्याचे पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते.  या दृष्टांताचा अभ्यास केला, मीमांसा केली की समजते की, बिंबस्थानीय सूर्य हा एक आहे.  सूर्य स्वतःच्या स्वरूपाने स्वयंप्रकाशस्वरूप असून तो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो.  दुसरा भाग – जोपर्यंत त्याला उपाधि मिळत नाही, तोपर्यंत त्याचे प्रतिबिंब पडत नाही आणि अनेक बादल्या ठेवल्या, भांडी ठेवली की, त्याचे प्रतिबिंब पडते.  बादली, भांडे, नदी, समुद्र, तळे, डबके, या सर्व उपाधींच्यामध्ये प्रतिबिंब पडते.

 

बादली ही एक बाहेरची स्थूल उपाधि आहे.  परंतु केवळ रिकाम्या बादलीमध्ये प्रतिबिंब पडत नाही, तर त्या बादलीमध्ये पाणी पाहिजे.  ज्यावेळी भांडयामध्ये पाणी घातले जाते, तेव्हा ते पाणी त्या त्या उपाधीचा आकार घेते.  नंतरच त्या पाण्यामध्ये बिंबस्थानीय सूर्याचे प्रतिबिंब पडते.  याठिकाणी उपाधि ही कोणाला आहे ?  बिंबाला उपाधि नाही, तर प्रतिबिंबाला उपाधि प्राप्त होऊ शकते.  उपाधि मिळाल्यानंतरच बिंबाचे प्रतिबिंब पडते.

 

नंतर ते प्रतिबिंब त्या उपाधीने मर्यादित, परिच्छिन्न होते.  बादलीचे आकार बदलतात, त्याप्रमाणे प्रतिबिंबांचे आकार सुद्धा बदलतात, म्हणजेच आकारमान, measurements बदलतात.  बादलीमधील पाणी जसजसे विकारयुक्त होईल, तसतसे प्रतिबिंब सुद्धा विकारी, अस्थिर होते.  बादलीमधील पाण्याचा रंग बदलला की, प्रतिबिंबांचा सुद्धा रंग बदलतो.  बादली उचलली आणि एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत हलविली की, प्रतिबिंब सुद्धा आपोआप त्या बादलीबरोबर जणु काही जाते.  म्हणजेच जसजशी उपाधि बदलते, तसतसे प्रतिबिंब सुद्धा बदलते, कारण प्रतिबिंब हे त्या उपाधीशी तादात्म्य पावलेले आहे.

 

म्हणून जोपर्यंत उपाधि आहे, तोपर्यंत प्रतिबिंब असते आणि बादलीमधील पाणी ओतून दिले, की आपण म्हणतो – “प्रतिबिंब गेले”.  वस्तुतः प्रतिबिंब कोठे गेले ?  याचा सूक्ष्म विचार केला, तर समजते की, प्रतिबिंब कोठे आले ही नाही आणि गेलेही नाही.  ‘आले’ हाही औपचारिक शब्द आहे आणि ‘गेले’ हाही औपचारिक शब्द आहे.  उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब आले आणि उपाधीच्या दृष्टीने प्रतिबिंब गेले.


 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ–




Tuesday, March 15, 2022

भासाचे मूळ | The Root of Illusion

 



शंका: दर्पण-नगरी दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे आरशामध्ये नगरी भासमान आहे.  याचाच अर्थ दर्पणामध्ये नगरीचा भास होण्यासाठी आरशाच्या बाहेर नगरीची सत्ता असणे आवश्यक आहे.  त्याशिवाय भास होणार नाही.  म्हणजेच दर्पणाच्या बाहेर नगरीची स्वतंत्र सत्ता आहे.  त्यावरून आपोआपच दोन सत्ता मानल्या पाहिजेत.  १) आरशाची सत्ता आणि २) नगरीची सत्ता.  याचप्रमाणे ब्रह्म अद्वय, अखंड, निर्विशेष वगैरे स्वरूपाचे आहे, हे कबूल.  परंतु त्याच परब्रह्मामध्ये द्रष्टादृश्यदर्शनात्मक विश्वाचा भास होत असेल, तर ब्रह्माशिवाय जगताची स्वतंत्र सत्ता मानली पाहिजे.  त्याशिवाय ब्रह्मामध्ये जगदाभास निर्माण होणारच नाही.  म्हणजेच - ब्रह्म सत्य आहे.  परंतु जगदपि सत्यम् |  हेच सिद्ध होते.

 

परंतु ही शंका श्रुतिसंमत नाही.  याचे कारण रज्जूच्या दृष्टीने सर्प नाहीच.  रज्जूने कधीच सर्प निर्माण केलेला नसल्यामुळे सर्पाचा सुद्धा भास नाही.  मग रज्जूमध्ये सर्पाचा भास कोण पाहातो ?  जो रज्जू पाहात नाही तोच अज्ञानी पुरुष सर्प पाहातो.  त्याच्या दृष्टीने सर्प आभासात्मक नसून सत्य आहे.  म्हणूनच तो साप, साप असे ओरडतो.  त्याला फक्त सर्पच दिसतो.  रज्जू कधीच दिसत नाही.  बाकीचे लोक सर्प पाहण्यासाठी येतात तेव्हा त्या सर्वांना तेथे रज्जूच दिसतो.  मग हा सर्प आहे कोठे ?  तो सर्प बाहेर नसून केवळ सर्पभ्रमिष्ट पुरुषाच्या बुद्धीमध्ये झालेला भास आहे.  तो आहे आतच परंतु दिसतो मात्र बाहेर.

 

थोडक्यात सर्पाचा भास अज्ञानावस्थेमध्येच अनुभवाला येतो.  रज्जुज्ञानामध्ये प्रचीतीला येत नाही.  त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये झालेला विश्वाचा भास हा अज्ञानावस्थेमध्येच आहे.  परब्रह्माच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने पाहिले तर विश्व नाहीच.  फक्त अखंड, अद्वय परब्रह्मच आहे.  ब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव, निर्विकार, निरुपाधिक असल्यामुळे परब्रह्माने विश्वाची निर्मितीच केलेली नसल्यामुळे विश्वाचा भास होईलच कसा ?  त्यामुळे परब्रह्माव्यतिरिक्त विश्वाचे स्वतंत्र अस्तित्व सुद्धा कसे असेल ?  यामुळे ही शंकाच योग्य नाही.  नव्हे, ही शंका विश्वाला सत्यत्व देऊन निर्माण केलेली आहे.  म्हणून ही शंका अज्ञानावस्थेमध्ये आहे.  ज्ञानावस्थेमध्ये नाही.  जर विश्व दिसत असेल तर ते कोण पाहातो ?  अज्ञानीच आपल्या बुद्धीमध्ये पाहातो.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ–




Tuesday, December 8, 2020

मायेचे आवरण व विक्षेपशक्ति | Veiling and Distortion by Maya

 



मायेला दोन प्रकारच्या शक्ति आहेत –

 

१) आवरणशक्ति – यामुळे स्वस्वरूपावर अज्ञानाचे आवरण येऊन, असूनही त्याची प्रचीति येत नाही.  अस्ति किन्तु न भाति |  जसे गडद अंधारात वस्तु असूनही दिसत नाही.  त्याचप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराचे स्वस्वरूपावर आवरण आलेले आहे.  भगवान म्हणतात -

धूमेनाव्रियते वन्हिः यथादर्शो मलेन च |

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ||          (गीता अ. ३-३८)

ज्याप्रमाणे अग्नि धुराने झाकला जातो, आरसा धुळीने आणि गर्भ वारेने आवृत्त होतो, त्याप्रमाणे मायाशक्तीने स्वस्वरूपला आवृत्त केलेले आहे.  

 

२) विक्षेपशक्ति – यामुळे एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा भास होतो.  यालाच अन्यथाग्रहण अथवा विपरीतग्रहण असे म्हटले जाते.  जसे रज्जूच्या ठिकाणी रज्जू न दिसता सर्पाची प्रचीति येते.  त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची प्रचीति न येता दृश्य शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे देहात्मबुद्धि निर्माण होऊन अहं कर्ता, अहं भोक्ता, अहं सुखी, अहं दुःखी, अहं जन्ममृत्युयुक्तः, अहं ब्राह्मणः, अहं वैश्यः या कल्पना निर्माण होतात.  ‘अहं’ भोवतीच्या या सर्व कल्पना मायेमुळेच उदयाला येतात.  वर्णाश्रम, धर्म, जात, सत्ता, संपत्ति, यश, प्रतिष्ठा, सौंदर्य या सर्वांचाच अभिमान वाटतो.  यालाच विपरीत दर्शन असे म्हणतात.  

 

मायेमुळे, अज्ञानामुळे या अहंकाराचे सतत पोषण होते; परंतु हीच माया जीवनात असे काही आघात करते की, त्यामुळे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे असणाऱ्या या सर्व कल्पनांचा चक्काचूर होतो.  अहंकाराला तडा जातो.  फुगा खूप फुगविल्यावर जसा फुटतो तसेच अहंकार खूप वर्धन पावला तर त्याचा ही नाश होतो.  जीवनात अनेक संकटे, प्रतिबंध येतात.  मनावर आघात होतात.  हा मायेचाच खेळ आहे.  त्याचवेळी मनुष्य नम्र, विनयशील, अगतिक होतो.  त्याची परमेश्वरावर श्रद्धा निर्माण होते.  त्यामुळे जीवनामध्ये संकटे अथवा प्रतिकूल परिस्थिति येणे ही मायेची कृपाच आहे, कारण सर्व सुरळीत, व्यवस्थित चालले असेल तर आपल्याला परमेश्वराची आठवण येत नाही.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ–





Sunday, June 28, 2020

अपरा प्रकृति | Inferior Existence




अष्टधा प्रकृतीमधुनच या नानाविविध विश्वाची निर्मिति होते.  सूक्ष्म पंचमहाभूते, मन, बुद्धि, अहंकार यांनी युक्त असणारी अशी ही अष्टधा अपरा प्रकृति परमेश्वराच्या परा शक्तीपासून भिन्न स्वरूपाची आहे.  अपरा म्हणजेच निकृष्ट स्वरूपाची आहे.  अपरा प्रकृति ही निकृष्ट स्वरूपाची का आहे ?  आचार्य याचे उत्तर देतात –

१) अनृतत्वात् – अपरा प्रकृति ही निर्मित असल्यामुळे सतत विकारयुक्त असून मिथ्या स्वरूपाची आहे.
२) जडत्वात् – ही प्रकृति अचेतन आहे.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.
३) दुःखात्मकत्वात् – ही प्रकृति दुःखस्वरूप आहे.  म्हणूनच या विश्वामध्ये, विषयांच्यामध्ये सुखाची अनुभूति येत नाही.  इंद्रियांच्या माध्यमातून घेतलेले सर्व विषयांचे उपभोगही दुःखालाच कारण होतात.  दुःख दोन प्रकाराने होते.  प्रियवियोगेन – प्रिय विषयांच्या वियोगाने आणि अप्रियसंयोगेन – अप्रिय विषयांच्या संयोगानेही दुःखप्राप्ति होते.  
४) अशुद्धत्वात् – ही अपरा प्रकृति रजोगुण व तमोगुणाच्या प्रभावाने युक्त असल्यामुळेच तिला अशुद्ध अथवा मलिन प्रकृति असे म्हणतात.  
५) पुरुषाधीनत्वात् – ही अपरा प्रकृति जड, अचेतन असल्यामुळे तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही.  ती स्वतःहून कार्यान्वित होऊ शकत नाही.  म्हणून सत्तास्फूर्तीसाठी ती पुरुषावर अवलंबून आहे.  म्हणजे परमात्म्याच्या चेतानात्मक प्रकृतीवर अवलंबून आहे.  
६) वेद्यत्वात् – अशी ही प्रकृति वेद्य म्हणजेच दृश्य, इंद्रियगोचर आहे.  मनाच्या, बुद्धीच्या साहाय्याने तिचे स्वरूप जाणता येते.
७) ज्ञानेन निवर्त्यत्वात् – ही अपरा प्रकृति आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे मिथ्या, जड, दुःखात्मक, अशुद्ध, पुरुषाधीन असेल तरीही ती दृश्य, वेद्य असल्यामुळे तिचे ज्ञान घेता येते.  

ही अपरा प्रकृति बुद्धीवर अज्ञानाचे आवरण घालून जीवाला बहिर्मुख, विषयासक्त करते आणि क्रमाने जीवाचे अधःपतन करते.  ती संसारवर्धन करून जीवाला स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवते.  जीवांना मोहीत करून कठपुतली बाहुल्यांच्याप्रमाणे जन्मानुजन्मे नाचविते.



- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ–


Tuesday, March 31, 2020

मायेच्या अतीत | Beyond Illusion




पारमार्थिक स्वरूपाचे, तत्त्वाचे चिंतन करणारे जे तत्त्वचिंतक लोक आहेत, त्यांची बुद्धि केवळ दृश्याचाच विचार न करता, दृश्याच्याही अतीत असणाऱ्या तत्त्वाचे चिंतन करणारी असते.  हे चराचर विश्व व मोहक, आकर्षक विषय डोळ्यांना सत्य दिसत असतील तरी ते सर्व मायेमधून निर्माण झालेले आहेत, याचे ज्ञान या तत्त्वचिंतकांना असते.  

जसे टी. व्ही. वर आपण एखादा चित्रपट किंवा नाटक पाहत असू, त्यामध्ये भयंकर प्रसंग घडला, तरी आपण काही खरे-खरे दुःखी होत नाही.  कारण हे सर्व नाटक असल्यामुळे सर्व खोटेच आहे, हे आपणास माहीत असते.  त्याचप्रमाणे विवेकी पुरुष, तत्त्वचिंतक या मायिक सृष्टीच्या चिंतनामध्ये आदर दाखवीत नाही.  म्हणजेच “हे सर्व मायिक आहे,”  असे जाणल्यामुळे तो या दृश्य प्रपंचाला विशेष महत्त्व देत नाही.  तत्त्वचिंतक या जगताच्या बाबतीत अंतरंगाने तटस्थ व उदासीन राहतो.  

तसेच मायावी जादुगार जसा आकाशात दोरी टाकतो, त्याचप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था म्हणजेच मायेचा विस्तार आहे.  या तीनही अवस्था मायिक, कल्पित, मिथ्या आहेत.  तसेच या तीन अवस्थांच्यामध्ये आरूढ होणाऱ्या विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यापेक्षाही खरा मायावी हा भिन्न स्वरूपाचा आहे.  ज्याप्रमाणे दोरी टाकणारा मायावी, त्या दोरीवर चढणारा, युद्ध करणारा, क्षणात जमिनीवर तर क्षणात आकाशात दिसणारा, अशा पुरुषांच्यापेक्षाही सर्व माया रचून, मायेला नियंत्रित करणारा पारमार्थिक मायावी खरा जादुगार हा भिन्नच असतो.  तो नित्य एकाच ठिकाणी जमिनीवरच स्थित राहून या विविध प्रकारच्या माया रचतो, नाटक रचतो.  

त्याचप्रमाणे जागृत-स्वप्न-सुषुप्ति या अवस्था, या सर्व माया रचणारा मायावी, परमात्मा या अवस्थांच्यापासून व विश्व-तैजस-प्राज्ञ यांच्यापासून सुद्धा अत्यंत विलक्षण स्वरूपाचा आहे.  तो परमात्मा म्हणजेच ‘तुरीय’ नावाचे पारमार्थिक तत्त्व आहे.  असे हे जे तीन अवस्था व तीन आत्म्यांच्याही अतीत असणारे पारमार्थिक ‘तुरीय’ नावाचे तत्त्व आहे, त्या तत्त्वाच्या चिंतनामध्येच मुमुक्षु साधकांची प्रवृत्ति असते.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०१६
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ–


Wednesday, December 18, 2019

मायेची प्रबलता | The Power of ‘Maya’ – Illusion





शास्त्रकार मायेची व्याख्या करतात – अघटितघटना पटीयसी माया |  जे अशक्य आहे, ते शक्य करण्याची शक्ति मायेमध्ये आहे.  जसे जादुगार जादूचे प्रयोग करीत असताना प्रेक्षकांना जे नाही ते काढून दाखवितो व जे खरोखरच आहे, ते डोळ्यांना दिसत नाही.  तशीच मायेची अलौकिक शक्ति आहे.  मायाच विश्वनिर्मिती करते.  मायाच सर्व जीवांची निर्मिती करून जीवांना जन्मानुजन्मे आपल्या चक्रामध्ये बद्ध करते.  

पुराणामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे.  नारदमहर्षि एकदा भगवंतांना मायेविषयी प्रश्न विचारतात. “माया ही अलौकिक, अनाकलनीय, दुस्तर आहे.  मोठमोठे ज्ञानी लोकही मायामोहीत होतात.  मी तर आपला अनन्य भक्त आहे.  त्यामुळे मला माया कधी दिसलीच नाही. पण मला मायेचे स्वरूप समजावून घेण्याची इच्छा आहे.”  यावर भगवान गूढ हसतात.  

एकदा नारदमहर्षि एका नदीमधून पाणी आणण्यास जातात.  पाण्याचा स्पर्श होताक्षणीच त्यांना एकदम सुंदर स्त्रीरूप प्राप्त होते.  तिथे समोर एक सुरूप राजा त्या स्त्रीरूप नारदांना दिसतो.  दोघांचा विवाह होतो.  संसार प्रारंभ होतो.  सर्वसामान्य संसारी माणसाप्रमाणेच त्यांना मुले होतात.  संसार वाढतो.  स्त्रीरूपामधील नारदमहर्षि सर्व गृहोचित कर्मे करण्यात गढून जातात.  पती-मुले-आप्त-भोग-नातू या सर्वांच्यामध्ये आसक्त होऊन रममाण होतात.  यामध्ये किती वर्षांचा काळ लोटला, हेही समजत नाही.  एकदा अचानक त्या राजाच्या राज्यावर शत्रू आक्रमण करतात.  राजाचा पराभव होतो.  राजाची सर्व मुले युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त होतात.  त्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी स्त्रीरूपातील नारदमुनि त्याच नदीच्या काठी येतात.  पाण्याचा स्पर्श होतो.  तत्क्षणी नारदांना पुन्हा पूर्ववत् पुरुषाचे, नारदमुनींचे रूप प्राप्त होते.  इथेच कथा संपते.  

हा सर्व प्रकार पाहून नारदांना आश्चर्य वाटते.  समोर भगवान उभे असतात.  नारदमहर्षि प्रश्न विचारतात – प्रभो !  हे सर्व काय आहे ?  भगवान हसून उत्तर देतात, “नारदा !  ही सर्व माया आहे.  हा सर्व मायेचा प्रभाव आहे.”  नारदांना समजायचे ते समजते.  म्हणुनच आचार्य आदेश देतात – ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा |  हे मूढबुद्धि मनुष्या !  हे सर्व मायाजन्य, मायाकार्य, अनित्य आहे, असे जाणून तू ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश कर.  बाह्य, मायिक विषयांच्या आसक्तीमधून तू पूर्णतः निवृत्त हो, याचे कारण मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ–