Monday, May 27, 2024

अविचारामधून संसार | Manifestation is Illogical

 



हे रामा !  या विश्वाची निर्मिती अविचारामधून झालेली आहे. भीति, शोक, मोह यांनी युक्त असणारा हा संसार खरे तर रज्जुवरील सर्पाप्रमाणे अस्तित्वातच नाही.  परंतु तरीही अनुभवायला येत असेल तर त्याचे अविचार हेच एकमेव कारण आहे.  जसे दोरीचे अज्ञान असल्यामुळे मनुष्य दिसणाऱ्या सापामध्ये विचार न करताच तो साप खरा आहे, असे गृहीत धरतो.  त्यामुळे अविचारामधून सर्प निर्माण होतो.  तसेच आज आपणास अनुभवायला येणारा हा संसार, सुख-दुःखे, यातना यामध्ये विचार न केल्यामुळे संसाराची उत्पत्ति होते.  संसार सत्य भासतो.

 

या सर्वांना वास्तविक सत्ता नसून भासात्मक असणारी मनाच्या कल्पनेची सत्ता आहे.  जोपर्यंत मन आहे तोपर्यंत संसार आहे.  मनाचा लय झाला की, संसाराचा सुद्धा आपोआप लय होतो.  जसे गाढ निद्रावस्थेमध्ये मन लय पावल्यामुळे आपल्याला सुखदुःखादि संसाराचा लेशमात्रही अनुभव येत नाही.  परंतु मन जागृत झाल्यानंतर पुन्हा संसाराचा अनुभव येतो.  म्हणून संसाराचा नाश करावयाचा असेल तर मनामध्येच विचार करून शोध घेतला पाहिजे.

 

जसजसे आपण या मनाचा विचार करतो, तसतसे मनही नाहीसे होते.  कारण मन सुद्धा निर्मित कार्य असून नाशवान आहे.  'मन' ही एक वृत्ति किंवा कल्पना आहे.  जे मन आपल्याला अनेक विकार निर्माण करून त्रस्त करते, आयुष्यभर नाचविते, त्या मनाला साधकाने प्रश्न विचारावा की, हे मन आले कोठून ?  मनाचे उगमस्थान कोणते आहे ?  ही सर्व सुख-दुःखे, नैराश्य, उद्विग्नता, विक्षेप हे सर्व कोठून निर्माण झाले ?  याचा शोध घेत घेत आपण सखोल विचार करायला लागतो तर हे सर्व जादूसारखे नाहीसे होते.  संसाराचे, या कल्पनांचे अस्तित्व संपते. मन, सुखदुःखादि अनुभव, शोक-मोह या सर्व भ्रमाचा निरास होतो आणि या सर्वांचे अधिष्ठान असणारे आत्मचैतन्यस्वरूप फक्त शिल्लक राहते.

 

जन्मानुजनमे वर्धन केलेल्या संसाराचा नाश क्षणार्धात विचाररूपी शस्त्राने करता येतो.  म्हणून हे राघवा !  मायेपासून संरक्षण करण्यासाठी विचार हे एकमेव साधन आहे.  शास्त्रकार मायेची व्याख्या करतात - विचारं न सहते इति माया |  जिला विचार सहन होत नाही, म्हणजे विचारापुढे जिचे अस्तित्व टिकत नाही, तिला 'माया' असे म्हणतात.  म्हणून संसाररूपी निर्माण केलेली दीर्घ कल्पना, हा संसारवेताळ विचारानेच नष्ट होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, May 21, 2024

मिथ्या जगताबद्दलची एक कथा | A Story About Futile World

 



वसिष्ठ रामायणामध्ये एक सुंदर कथा आहे.  कुलगुरू वसिष्ठ प्रभू श्रीरामांच्या राजदरबारामध्ये रोज प्रबोधन करण्यासाठी येत असत.  रोज – ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या |  असा उपदेश करीत.  रोज तोच तोच उपदेश ऐकून श्रीरामाला कंटाळा येतो.  एक दिवस प्रभू श्रीराम आपल्याच गुरूंच्या ज्ञानाची परीक्षा पाहण्याचे ठरवितात.  त्याप्रमाणे नियोजन करतात.  एक दिवस वसिष्ठ मुनी ज्या मार्गाने राजदरबारामध्ये येत, त्या मार्गाने त्यांच्या मागे एक पिसाळलेला हत्ती सोडला जातो.  तो हत्ती पाहताच वसिष्ठ मुनी घाबरतात.  जीव मुठीत धरून पाळतात आणि धापा टाकीत राजदरबारामध्ये प्रवेश करतात.  त्यांना तसे पाहून श्रीराम त्यांच्या घाबरण्याचे व पळण्याचे कारण विचारतात.  वसिष्ठ मुनी घडलेला वृत्तांत प्रभू श्रीरामाला कथन करतात.  यावर श्रीराम वसिष्ठ मुनींनाच शंका विचारतात की, “अहो !  तुम्ही जर मला रोज उपदेश करता की, हे सर्व मिथ्या आहे.  असे असताना मिथ्या असणाऱ्या हत्तीला तुम्ही कसे काय घाबरलात ?

 

हा प्रश्न ऐकल्याबरोबर वसिष्ठ मुनींना जे समजायचे ते समजते.  रामाला वाटत असते की, हे सगळे शाब्दिक ज्ञान आहे.  परंतु वसिष्ठ मुनी रामाला उपदेश देतात – “अरे बाळा !  हे श्रीरामा !  मी जे ज्ञान तुला सांगितले, ते तू अर्धवट ऐकलेस.  हे सर्व मिथ्याच आहे.  तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्ती मिथ्या आहे, हत्तीचे धावणे, माहूत, इतकेच नव्हे, तर मिथ्या हत्तीला घाबरलेला वसिष्ठही तितकाच मिथ्या आहे.  त्याचे घाबरणेही मिथ्या आहे आणि त्याहीपेक्षा मिथ्या हत्तीला, मिथ्या गुरूंच्यावर सोडणारा राम सुद्धा तितकाच मिथ्यास्वरूप आहे.

 

याठिकाणीच कथा संपते.  या कथेमधून फार मोठे तत्त्व सांगितलेले आहे.  शास्त्र समजणे, शास्त्राची दृष्टि समजणे खरोखरच फार अवघड आहे.  शास्त्र समजण्यासाठी तितकेच परिपक्व मन हवे.  सर्वच ब्रह्मस्वरूप आहे आणि सर्वच मिथ्या आहे, ही दोन्हीही वाक्ये एकाच अधिकरणामध्ये वापरली जातात.  फक्त एकाचा बाध केलेला आहे आणि एकाची सत्ता सिद्ध केलेली आहे.  विश्वाचा बाध केला आणि त्याच ठिकाणी त्याच अधिकरणामध्ये ब्रह्मस्वरूपाची सिद्धि केली.  ब्रह्म हेच पारमार्थिक सत्य आहे.  त्याव्यतिरिक्त अन्य सर्व मिथ्या, अनृत आहे.


 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ




Monday, May 13, 2024

ब्रह्माजींचे स्वप्न | The Dream Of Brahmaji

 




ज्याप्रमाणे आकाशामध्ये अनेक आकार भासतात किंवा मनाने कल्पना करून एखाद्या मनुष्याची आकृती दिसते, त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा देह सुद्धा भासमान होतो.  परंतु ब्रह्मदेवाचा देह भासत असला तरी तो वस्तुतः निर्माण झालेला नसून तो पृथ्व्यादि पंचमहाभूतांनी रहित असतो.  म्हणजेच पृथ्वी वगैरेदि पंचमहाभूतांचा काहीच संबंध नसूनही केवळ संकल्पाने ब्रह्मदेवाचा आकार भासमान होतो.

 

हे दृश्य विश्व म्हणजे आकाशामधून जणु काही स्फुरण पावलेले विविध आकार आहेत.  ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मनामध्ये अनेक संकल्प करतो.  त्याला अनेक कल्पना स्फुरतात आणि तो त्या कल्पनांच्यामधून सृष्टि निर्माण करतो.  प्रत्येक मनुष्य आपल्या मनामध्ये स्वतःचे असे मनोविश्व निर्माण करतो.  तो स्वतःच त्या विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता होतो.  असा तो मनुष्य जणु काही त्याच्या मनोसृष्टीचा ब्रह्मदेव असतो.

 

मग एक सामान्य मनुष्य कल्पनेमधून सृष्टि निर्माण करीत असेल तर ब्रह्माजीच्या कल्पनेमधून ही सृष्टि निर्माण होते, यात काय आश्चर्य ?  मनोविश्व तयार करीत असताना मनुष्य जणु काही स्वयंभू ब्रह्माजीसारखा दिसतो.  हा जीव कल्पना रंगवून जशी आपली एक सृष्टि तयार करतो, तशीच ब्रह्मदेवाने ही सृष्टि अत्यंत निर्मल अशा मायारहित, निर्गुण, निर्विशेष आकाशात केली आहे.

 

आकाशात अचानक मोत्यांचा हार दिसावा, इतक्या सहजतेने या सृष्टीची निर्मिती झाली आहे.  किंवा आपल्या कल्पनेमध्ये, स्वप्नामध्ये एखादी नगरी दिसावी, त्याचप्रमाणे पृथ्व्यादि पंचमहाभूते आणि ब्रह्मदेवाचा आकार या विश्वात निर्माण झाला.  थोडक्यात, हे दिसणारे विश्व आणि आपण स्वतः सुद्धा सर्व ब्रह्माजीची कल्पना आहे.  किंवा ब्रह्माजीला पडलेले स्वप्न म्हणजेच ही सृष्टि आहे.  ही सृष्टि स्वप्नवत् असून केवळ संकल्पामधून निर्माण झाली आहे.  त्यामुळे ही सृष्टि ब्रह्माजीने निर्माण करताना बाहेरून कोणतीही सामग्री आणली नाही.  फक्त संकल्प केला - सोSकामयत |  आणि तो बहुरूपाला प्राप्त झाला.  ही सृष्टि म्हणजे ब्रह्माजीचा केवळ संकल्प किंवा स्वप्न आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ



Monday, May 6, 2024

समता, तुष्टि, यश | Equality, Satisfaction, Success

 



समता – समचित्तता |  भगवान म्हणतात –

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ |                    (गीता अ. २-३८)

जीवनामध्ये इष्ट-अनिष्ट, प्रिय-अप्रिय, अपेक्षित-अनपेक्षित, चांगला-वाईट कोणताही प्रसंग आला की, हर्ष-विषादामुळे सतत हेलकावे निर्माण होतात.  काही वेळेला मन उचंबळून येते तर कधी ते निराश होते.  म्हणून अभ्यासाने मन हर्ष-विषादयुक्त होऊ न देता संतुलित ठेवणे म्हणजे समता होय.

 

समतेचा दुसरा अर्थ – सर्वत्र समदर्शनं इति समता |  सम हा शब्द उच्च-नीच, उत्कर्ष-अपकर्ष, तर-तमरहित असलेले ब्रह्मस्वरूप निर्देशित करतो.  ते सर्वांच्यामध्ये पाहाणे म्हणजेच समता होय.  म्हणून म्हटले आहे –

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि |

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ||                   (गीता अ. ५-१८)

विद्या व विनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रे आणि चांडाळ या सर्वांच्यामध्ये ज्ञानी पुरुष समदृष्टि ठेवणारे असतात.  यामुळे आपोआपच भेदबुद्धि निरास होते.

 

तुष्टि – तुष्टि म्हणजे संतोष.  किंवा जे काही प्रारब्धानुसार मिळते त्यामध्ये समाधान वृत्ति असणे.  हे समाधान बाह्य प्राप्तीवर अवलंबून नसते.  तर ती अंतःकरणाची अवस्था आहे.  या वृत्तीमध्ये विषयांच्याबद्दल हव्यास, तृष्णा नसते.  व्याकुळता नसते.  त्यामुळे – यत् अल्पं तत् बहुः |  अगदी थोडे मिळाले तरीही ते पुष्कळ आहे.  अशी संतोषकारक वृत्ति असते.  ही अवस्था केव्हा येते – स्वानंदानुभवः संतोषः इति |  आत्मन्येवात्मना तुष्टः |  स्वतःच्याच स्वरूपाचा आनंद अनुभवते.  त्यावेळी ते पूर्ण संतुष्ट होते.  त्या अवस्थेमध्ये कशाचीही इच्छा नसते.  अपेक्षाही नसते.  ती स्वानुभूतीची अवस्था म्हणजे संतोष होय.

 

यश – धर्मनिमित्ता कीर्तिः |  तडजोड न करता सातत्याने धर्मानुष्ठान करून सदाचार, सत्कर्म, चारित्र्यसंपन्न राहून प्राप्त केलेली कीर्ति म्हणजेच खरे यश आहे.  ते यश चिरंतन टिकणारे आहे.  अन्य सर्व यश तात्कालिक असून नाहीसे होणारे आहे.  म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात –

सदाचार हा थोर सांडू नये तो |  जनी तोचि तो मानवी धान्य होतो ||          (मनोबोध)

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ