Tuesday, September 27, 2022

ज्ञान कर्माला निर्बीज करते | Knowledge Defangs Actions

 सम्यक ज्ञान कर्माला निर्बीज कसे करते ?  प्रत्येक कर्माचे कारण आहे विषयकामना किंवा तृष्णा !  त्याचे कारण विषयासक्ति ही आहे.  आणि विषयासक्तीचे कारण विषयभोगवासना आहे.  हेच सर्व कर्मांचे खरे सार आहे.  त्यामुळे भोगवासानेमधून संकल्प, संकल्पामधून कामना, कामानेमधून कर्म, कर्मामधून कर्मफळ आणि पुन्हा कर्मफळाच्या संस्कारामधून वासना निर्माण होते.  हे चक्र अव्याहतपणे सुरु असते.  आपणच आपल्या अहंकाराने अविचारामधून अनेक प्रकारच्या कल्पनांची वलये निर्माण करून बद्ध होतो.

 

उदा.  रेशमाचा किडा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःमधूनच रेशमाचा धागा निर्माण करीत असतो.  परंतु स्वतःच निर्माण केलेल्या रेशमाच्या धाग्यामध्ये अडकून गुदमरतो आणि तेच धागे त्याच्या मृत्यूला कारण होतात.  त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा आपण स्वतःच स्वतःबद्दल आणि परमेश्वराबद्दलही कल्पनांचे धागे निर्माण करून बद्ध होतो, गुदमरून जातो आणि मग कितीही प्रतत्न केला तरी त्यातून सुटत नाही.  पुनरपि जननं पुनरपि मरणं |  या उक्तीप्रमाणे अखंडपणे जन्ममृत्यूच्या सापळ्यात अडकतो.

 

हे कर्माचे बीज ज्ञानरूपी अग्नि दग्ध करतो.  विषयासक्तीचा निरास करून विषयभोगवासनेचा पूर्णतः नाश करतो.  इतकेच नव्हे, तर त्यामागील कर्तृत्व-भोक्तृत्व भावना आणि त्याचेही कारण असलेल्या अज्ञानाचा ध्वंस होतो.  उदा.  सर्पामध्ये जोपर्यंत विषारी दात आहेत तोपर्यंतच सापाची भीति वाटते.  परंतु एकदा का त्याचे विषारी दात काढले तर त्याच्यापासून आपल्याला भीति वाटत नाही.  सर्प असूनही नसल्यासारखा आहे.  त्याच्याबरोबर आपण खेळू शकतो, कारण त्याच्यामधील त्याचे विषारी दात काढून टाकलेले असतात.  त्याचप्रमाणे विषयभोगवासनेचा नाश केला की, कर्मामधील सर्व सत्त्व, त्याचे सामर्थ्य काढून टाकल्यासारखेच आहे.  कर्मामधील सर्व हवाच काढून घेतल्यासारखे आहे.  त्यामुळे कर्म करीत राहिला तरी ते कर्म जीवाला बद्ध करीत नाही.

 

याचप्रमाणे जीवनाचे खरे सत्त्व जाणून जीवनामधील सुख-दुःखांचे प्रसंग नाटकाप्रमाणेच आहेत असे समजून जीवन जगत राहावे.  म्हणजे कोणताच प्रश्न येणार नाही.  ठेविले अनंते तैसेचि राहावे | चित्ती असू द्यावे समाधान |  याप्रमाणे जीवन जगावे आणि जीवनातील खरा अंतरिक आनंद, शांति अनुभवावी.  मग दुःखाला कधी थाराच मिळणार नाही.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ
Tuesday, September 20, 2022

शास्त्रश्रवणातील दोन नियम | Two Rules Of Partaking Knowledge

 हे रामा !  शास्त्रश्रवण करताना तुला काही नियम पाळणे आवश्यक आहे.  कारण मी तुला हे भवरोगावरचे अत्यंत प्रभावी औषध देणार आहे.  औषध घेण्याबरोबरच पथ्येही पाळावी लागतात.  त्याप्रमाणेच आत्मज्ञान ग्रहण करताना साधकाला काही नियम, पथ्य पाळणे आवश्यक आहे.  अन्यथा ज्ञानरूपी दिव्य औषधीचा उपयोग होत नाही.

 

पहिले पथ्य असेल तर ते म्हणजे - इंद्रियसंयमन !  जन्मतःच आपली इंद्रिये अतिशय बलवान असून इंद्रियांना भयंकर सवयी लागलेल्या असतात.  त्यामुळे इंद्रिये पुन्हा-पुन्हा मनाला खेचून विषयांच्यामध्येच प्रवृत्त करतात.  म्हणून साधकाने सर्वप्रथम आपल्या इंद्रियांच्यावर पूर्णतः संयमन प्राप्त करावे.  आपण साधना कोणत्याही मार्गाने करीत असू तरी हे पथ्य पाळणे आवश्यक आहे.  ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग अशा कोणत्याही मार्गाने जायचे असेल तरी इंद्रियसंयमन आवश्यक आहे.

 

यानंतर दुसरी साधना म्हणजे आपल्या मनामधील व्यर्थ मनोरथ कमी करणे होय.  मनुष्य जीवनामधील मुख्य काम सोडून पुष्कळ वेळेला व्यर्थ गोष्टी करण्यामध्ये आयुष्याचा वेळ घालवितो.  म्हणून येथे वसिष्ठ मुद्दाम अवांतर म्हणजे व्यर्थ हा शब्द वापरतात.  पुष्कळ वेळेला मनुष्य अनेक ऐहिक आणि पारलौकिक इच्छा करतो.  त्या पूर्ण करण्यासाठी अनेक कर्मांच्यामध्ये रात्रंदिवस प्रवृत्त होतो.  मनुष्य याप्रमाणे एकदा मनोरथ करू लागला की, त्याला काळाचे भान राहत नाही.  म्हणूनच वसिष्ठ मुनि या सगळ्या इच्छांचा त्याग करून आपल्या मनावर नियमन करण्याची साधना देतात.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019- हरी ॐ


Tuesday, September 13, 2022

प्रेम कसे असावे ? | Example Of Ideal Affection

 ज्ञानमाहात्म्यव्यतिरिक्त केलेले प्रेम इंद्रियांची तृप्ति करण्यासाठी असते.  या प्रेमामध्ये फक्त स्वतःपुरताच किंवा स्वतःला सुख कसे होईल हाच विचार असतो.  दुसऱ्याच्या मनाचा - भावनेचा विचार केला जात नाही.  त्यामुळे दोघांनाही सुख मिळण्याची शक्यता कमीच असते.  उपभोगाच्या वृत्तीमुळे कामवासना पूर्ण होईपर्यंत त्यात संतुष्टता नसते.  ज्यावर आपण प्रेम करतो त्याचा नाश होतो.

 

उदाहरणार्थ फूल !  सुंदर, सुवासिक, अतिशय मनमोहक फूल बघितले की लगेच ते तोडण्याची वासना निर्माण होते.  ते उपभोगावेसे - म्हणजे डोक्यात घालावेसे वाटते.  वास घ्यावा असे वाटते आणि स्वतःच्या सुखासाठी आपण ते तोडतो.  प्रेमासाठी प्रेम नाही तर उपभोगासाठी प्रेम करतो.  कामवासनेचा भस्मासुर जागृत झाला की कामुक वृत्ति जागी होते.  मग ती फुलावरील असो, व्यक्तिवरील असो अगर प्रियतमावरील असो.  विषय भिन्न पण अविष्कार तोच !  मी उपभोगणार व सुखी होणार.  हे प्रेम, प्रेम नसून शुद्ध कामुकता आहे.

 

मग प्रेम कसे असावे ?  गोपींच्यासारखे प्रेम असावे.  त्या प्रेमाला मर्यादा नाही, तुलना नाही, भंगुरत्व नाही.  असे ते शिवम्-सुन्दरम् प्रेम होते.  त्या प्रेमात उपभोगाची स्वार्थी वृत्ति नव्हती.  तर प्रियतम श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याची वृत्ति होती.  सेवावृत्ति होती.  भगवंतासाठी जगावयाचे व त्याच्यासाठीच सर्व कर्म करावयाचे हा त्यांचा ध्यास होता.  त्यांच्या प्रेमात शुद्धता होती,  कामुकता नव्हती.  व्याकुळता, अगतिकता, शरणागति, त्याग होता.  श्रीकृष्णाला अनुकूल अशाच त्यांच्या वृत्ति होत्या.

 

गोपींचे प्रेम कामुक नसून निस्वार्थ, निष्काम, शुद्ध प्रेम होते.  हे प्रेम समर्पण भावामुळे निर्माण झालेले होते.  ते परमप्रेमस्वरूप होते.  म्हणूनच भगवान श्रीकृष्ण राधेची आणि गोपींची प्रशंसा करतात.  गोपींच्या सारखे प्रेम या त्रिखंडात नाही.  माहात्म्यज्ञान असेल तर प्रेम, भक्ति मिळेल आणि माहात्म्यज्ञान नसेल तर तेच प्रेम कामुक होईल.  मग भक्ति ज्ञानाच्या अधीन होईल.  भक्ति कनिष्ठ होईल आणि ज्ञान श्रेष्ठ होईल.  परंतु असे नाही.  उलट भक्ति माता आहे आणि ज्ञान-वैराग्य तिचे पुत्र आहेत.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006- हरी ॐTuesday, September 6, 2022

आत्मज्ञान घेण्यात चूक | Mistake in Self Knowledge Process

 श्री वसिष्ठ मुनि सांगतात, हे रामा !  ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान गुह्य आहे.  त्यासाठी पुरुषार्थाचा आश्रय घे.  कारण शुभ पुरुषार्थ हा नेहेमीच मोक्षप्राप्तीसाठी अनुकूल असतो.  येथे पुरुषार्थ म्हणजे केवळ शास्त्राचे श्रवण करणे नव्हे.  आपण वर्षानुवर्षे श्रवण करतो. परंतु बाह्य घटपटादि विषयांचे जसे ज्ञान घेतो तसेच आत्मज्ञानाचे सुद्धा ज्ञान घेतो.  "आमची दहा उपनिषदे झाली, गीता झाली."  याप्रमाणे विधाने करतो.

 

म्हणजेच आपण ज्ञेय ब्रह्माला घटपटाप्रमाणे दृश्य वस्तु समजतो.  वही-पुस्तक घेऊन, टिपणे काढून अगदी शाळेसारखा अभ्यास करतो.  काही वेळेस स्वतःच, तर काही वेळेस अनेक साधक एकत्र येऊन आत्म्याची चर्चा करतात.  श्रुति-स्मृति पाठ होतात. चर्चा, सत्संग सुंदर होतो.

 

परंतु सत्संग झाल्यावर ज्यावेळी पुन्हा आपण व्यवहार करतो, त्यावेळी स सच्चिदानंदस्वरूप आत्म्याशी आपला काही संबंधच नाही, असे आपण वागतो.  म्हणजेच अजुनही आत्म्याला एखादी वस्तु समजून आपण वस्तुनिष्ठ ज्ञान घेतो.  त्यामुळे याप्रमाणे कितीही उपनिषदे संपविली, ग्रंथ संपविले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.  आत्मज्ञान घेण्याची ही पद्धतच नाही.

 

म्हणून वसिष्ठ मुनि येथे - एकाग्रं चित्तं कुरु |  असा आदेश देतात.  रामा !  मी आता तुला जे सांगणार आहे ते तू मनोभावे ऐक !  काळजीपूर्वक शब्दन् शब्द एकाग्र चित्ताने श्रवण कर.  त्याच्या भावार्थाचे चिंतन कर.  तुझ्या अंतःकरणात उत्कट भाव निर्माण झाला तरच तुला हे ज्ञान समजेल.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019- हरी ॐ