Wednesday, April 29, 2026

उपमान आणि उपमेय | Reference and the Compared

 



हे रामा ! व्यवहारामध्ये आपणास दृष्टांत व दार्ष्टांत हे स्पष्टपणे समजतात.  कारण व्यवहारमधील दृष्टांतामध्ये उपमान आणि उपमेय या दोन्हीही वस्तु दृश्य व निर्मित कार्य आहेत.  व्यवहारामध्ये आपण ज्या वस्तूला उपमा देतो, ती उपमेय वस्तु निर्मित असून नाशवान आहे.  तसेच ज्याची उपमा देतो, ती वस्तु सुद्धा निर्मित व नाशवानच आहे.  त्या दोन्हींनाही निर्मितीचे कारण असून विश्वामधील सर्व उपमान व उपमेय वस्तु या कार्य आहेत.  म्हणून कशाचीही कशालाही उपमा दिली तरी, ज्याची उपमा द्यायची तेही अनित्य व ज्याला उपमा द्यायची, तो पदार्थही अनित्यच आहे.  परंतु या सर्वांच्यामध्ये परब्रह्मस्वरूप मात्र अपवाद आहे.  परब्रह्मस्वरूपाला कशाची उपमा द्यायची हा प्रश्नच आहे.  कारण उपमेय असणारे परब्रह्मस्वरूप निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक असून नित्य स्वरूपाचे आहे आणि विश्वामधील सर्व उपमा या तर अनित्य आहेत.

 

म्हणून हे रामा !  तुला दृष्टांत देताना मलाही माहीत आहे की, परब्रह्मस्वरूप हे नित्य आहे आणि त्या नित्य वस्तूचे ज्ञान देण्यासाठी मी अनित्य वस्तूच्या दृष्टांताचा आधार घेणार आहे.  असे असूनही रामा !  तुला परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी दृष्टांत देणे आवश्यक आहे.  म्हणून मी तुला जे जे दृष्टांत देईन ते सर्व ऐकताना ते सर्व दृष्टांत, उदाहरणे, सर्व उपमा या एकदेशीय आहेत, हे तू सतत लक्षात ठेव.  त्यामुळे दृष्टांतामधील काही विशिष्ट भागच दार्ष्टांतामध्ये लागू पडतो.  तेवढा भागच घ्यावा आणि दृष्टांतामधील उरलेल्या भागाचा त्याग करावा.

 

उदा. घट व मातीचा दृष्टांत शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे.  घट मातीमधून निर्माण होतो.  मातीमध्ये अस्तित्वामध्ये असतो व नंतर मातीमध्येच लय पावतो.  घटाला उत्पत्ति-स्थिति-लय आहे.  परंतु माती मात्र उत्पत्तिस्थितिलयरहित आहे.  म्हणून शास्त्रकार सिद्ध करतात की, घट हा अनित्य असून माती ही नित्य आहे.  रामा !  हा जरी दृष्टांत असेल तरी येथे केवळ घटाच्या दृष्टीने माती नित्य आहे, हे सांगण्यापुरतेच हा दृष्टांत दिलेला आहे.  वस्तुतः माती सुद्धा विश्वामधील निर्मित पदार्थ असल्यामुळे माती सुद्धा अनित्य आहे.  त्यामुळे हा दृष्टांत योग्य नाही, असा बुद्धिवाद कोणीही करू नये.  तर येथे दृष्टांतामधील योग्य अंश ग्रहण करून मातीच्या अनित्यत्वाच्या अंशाचा त्याग करावा आणि घटाच्या दृष्टीने माती या तत्त्वाचे जे नित्यत्व सांगितले तेवढेच सार या घट-मातीच्या दृष्टांतामधून ग्रहण करावे.  हा दृष्टांत केवळ तत्त्वाचे नित्यत्व समजण्यासाठी आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, April 21, 2026

तिरस्कार आणि ज्ञानी पुरुष | Hatred and The Self-Realized

 



जसे भिंतीवर किंवा कॅनव्हासवर हुबेहुब निसर्गाचे चित्र काढले, तर त्या चित्रामध्ये जड असणारा दगड असेल, तेथेच एखादा सचेतन, सजीव उडणारा पक्षी असेल.  ते चित्र पाहत असताना चित्रामधील पक्षी हा सजीव दिसतो आणि दगड हा दगडासारखा निर्जीव दिसतो.  पण वस्तुतः दगड जितका मिथ्या आहे, तितकाच पक्षी सुद्धा मिथ्या आहे.  सर्वच मिथ्या आहे.  नदी, पाणी मिथ्या आहे.  फक्त त्याच्यामागे असणारे अधिष्ठान, भिंत किंवा कॅनव्हासचे कापड, हे अधिष्ठान फक्त एक सत्य आहे.  ही दृष्टि प्राप्त झाली तर तो ज्ञानी पुरुष कोणाचाही तिरस्कार करीत नाही.

 

व्यवहारामध्ये अज्ञानी पुरुष सतत द्वेष किंवा तिरस्कार करतो.  याचे महत्वाचे कारण अज्ञानी पुरुषामध्ये भेद किंवा द्वैत दृष्टि आहे.  द्वेष किंवा तिरस्कार हा एकमेकांपासून भिन्न असणाऱ्या दोन वस्तूंमध्ये किंवा व्यक्तींमध्येच होऊ शकतो.  द्वेष करण्यासाठी माझ्यापासून भिन्न कोणीतरी हवे.  परंतु ज्ञानी पुरुष स्वतःव्यतिरिक्त म्हणजेच आत्मस्वरूपाव्यतिरिक्त भिन्न काहीही पाहत नाही.  त्यामुळे तो कोणाचा द्वेष करणार ?  द्वेष करण्यासाठी त्याला दुसरा विषय किंवा व्यक्ति उपलब्धच होत नाही.  अन्यवस्त्वन्तरअभावात् |

 

जो खरा ज्ञानी आहे, ज्याला खऱ्या अर्थाने ज्ञानदृष्टि प्राप्त झालेली आहे, तो कोणाचाही तिरस्कार करीत नाही.  मग यामधून श्रुतीला काय बरे अभिप्रेत आहे ?  तिरस्कार न करणे म्हणजेच सर्वांच्यावर प्रेम करणे होय.  ज्ञानी पुरुष सर्वांच्यावर प्रेम करतो.  तो कोणालाही तुच्छ लेखत नाही.  नम्रता, विनयशीलता हेच ज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे.  जर उन्मत्तपणा, अविनय असेल तर त्याला ‘ज्ञानी’ म्हणताच येणार नाही.  जो ज्ञानाने परिपक्व, प्रगल्भ झाला आहे, तो कधीही दुसऱ्याचा तिरस्कार करीत नाही.  दुसऱ्याची निंदा, नालस्ती, अपमान करीत नाही.  तो ज्ञानाने आपोआपच नतमस्तक, नम्र नम्र होत जातो.

 

खरे ज्ञान साधकाला नतमस्तक व्हायला लावते.  वृक्षाला फळे आल्यानंतर वृक्ष खाली वाकतात.  पाणी भरलेले मेघ खाली येतात.  समृद्धीने सर्वांशी नम्रतेने वागणे हा सत्पुरुषांचा स्वभावाच आहे.

 

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, April 14, 2026

संकल्परहित आत्मचैतन्यस्वरूप | Self-Conscious Non-Resolution

 



हे राघवा !  हे संसाररूपी अरण्य असून त्यामध्ये मनोरूपी बीजापासून सप्तलोकरूपी पल्लव उत्पन्न होतात व त्यांच्यावर शुभाशुभरूपी सुखदुःखात्मक फळे येतात.  म्हणजे भूः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्यं हे सात लोक व त्या लोकांच्यामध्ये प्राप्त होणारी चांगली-वाईट सुखदुःखात्मक फळे या सर्वांचे कारण मन आहे.  या सर्वांच्यापासून मुक्त व्हावयाचे असेल, तर राघवा ! प्रथम संकल्पांचा त्याग कर.  संकल्पांचा त्याग केलास तर तुला सर्व सिद्धि देणारे संकल्परहित साम्राज्य प्राप्त होईल.

 

म्हणून संकल्परहित आत्मचैतन्यस्वरूप साम्राज्यामधील सिंहासनावर आरूढ वाहावयाचे असेल तर तू संकल्पांचा निःशेष त्याग कर.  अग्नीची धग पूर्णतः नाहीशी करावयाची असेल तर त्या अग्नीमधून जळत असणारी लाकडे पूर्णतः बाहेर काढली पाहिजेत.  त्याचप्रमाणे ज्याला ब्रह्मपद प्राप्त करावयाचे आहे, त्याने आपल्या मनातून कामना - संकल्परुपी इंधन बाहेर काढले पाहिजे.  तरच संकल्परहित झालेले ते मन हळूहळू शांत होऊ शकेल आणि त्या मनामध्ये निरतिशय आनंदाचा अनुभव येईल.

 

जोपर्यंत मन संकल्परहित होत नाही, तोपर्यंत या चिदाकाशामध्ये अज्ञानी जीवाला नानाविध असणारी असंख्य ब्रह्माण्डे भिन्न-भिन्न रूपाने दिसतच राहतात.  अशा या मनानेच जणु काही आपल्या संकल्परुपी ऐश्वर्याने कोट्यावधी ब्रह्माण्डे उत्पन्न करून स्वतःच स्वतःवर शोकमोहादि अनर्थपरंपरा ओढवून घेतली आहे.  मनानेच संसार उत्पन्न करून जीव त्या संसारामध्ये बद्ध झाला आहे.  हे राघवा !  यावर आता एकच उपाय आहे, तू या संकल्पांचा त्याग कर.  मनामधील आसक्ति दूर कर.  आत्मतृप्तिरूपी ऐश्वर्याने या मनावर विजय मिळव.  राघवा !  संकल्प हे खरे ऐश्वर्य नसून आत्मतृप्ति हेच खरे ऐश्वर्य आहे.  म्हणून संतोष हा परमगुण आहे.  आत्मतृप्त पुरुष अनासक्त मनाने आपल्या मनावर विजय मिळवतो.

 

याप्रमाणे जे चित्त संकल्परहित झाले आहे, अशा परमपावन तसेच अत्यंत समबुद्धीने युक्त असणाऱ्या, शांत झालेल्या, अहं-ममकारादि भावना निरास झालेल्या चित्तामध्येच आत्मज्ञान उदयाला येते.  हे राघवा !  याप्रमाणे ज्ञानाने सर्व दृश्याचा तसेच जन्म, मृत्यु वगैरेदि कल्पनांचा, अहं-मम प्रत्ययांचा निरास झाला की, जे अज, नित्य, शाश्वत, चिरंतन, निर्विशेष, निरतिशय पद शिल्लक राहते, ते श्रेष्ठ पद तुला प्राप्त होवो !  

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, April 7, 2026

जरा यातना | The Pain of Degradation

 



जन्म, मृत्यु, जरा, व्याधि यांच्यामध्ये दुःख आणि दोष पाहावेत, कारण त्याशिवाय मन त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही.  हे दोष कसे पाहावेत ?  यावर आचार्य सुंदर वर्णन करतात -

 

जरा म्हणजे वार्धक्यावस्था होय.  जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत एक प्रकारचा जोष, उमेद, उत्साह असतो.  परंतु जसजसे वय वाढते, आयुष्याची संध्याकाळ येते, मनुष्य वार्धक्यावस्थेला येऊन पोहोचतो त्यावेळी इंद्रियांची शक्ति, सामर्थ्य कमी होऊन इंद्रिये शिथिल होतात.  इंद्रियांच्या व्यापारामध्ये मंदपणा येतो.  बधिरता येते.  स्पष्ट ऐकू येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही, स्पष्ट दिसत नाही.  शरीर कंप पावते.  उठताना, बसताना, चालताना तोल जातो.  सर्व शरीर वार्धक्याने बलहीन होते.  शरीर व इंद्रियांच्यावर संयमन राहात नाही.  मनुष्य पूर्णतः परावलंबी होतो.  स्वतःचे स्वतःला काहीच करता येत नाही.  टवटवीत, तजेलदार शरीर निस्तेज होते.  चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.  शरीराचे सौंदर्य नाहीसे होऊन विद्रूपता येते.  आचार्य जरावस्थेचे खूप सुंदर वर्णन करतात - सर्व शरीर गलितगात्र होते.  बुद्धि भ्रष्ट होते.  मुख दंतरहित होते.  हातामध्ये काठी येते.  तरीही मनुष्याच्या आशा, अपेक्षा, वासना संपत नाहीत.

 

यामुळे अन्य लोक अपमान, तिरस्कार करतात.  ज्या घरात आपण स्वाभिमानाने जगलो, त्याच घरात आपण पोरके होतो.  स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी ।  अशी आपली अवस्था होते.  ज्यांना आपण जन्म दिला, आयुष्यभर खस्ता खाऊन लहानाचे मोठे केले, ती आपली मुले, आपले रक्ताचे नातेवाईक आपल्याशी त्रयस्थासारखे वागतात.  आपलीच आपल्या घरात अडचण होते.  आपली स्वतःचीच मुले आपल्याला वृद्धाश्रमामध्ये ठेवतात.  म्हणूनच सद्य समाजामध्ये कुटुंबसंस्था विस्कळीत झालेली आहे.  आपली मुले आपल्या मृत्यूची वाट पाहतात.  आपण पूर्णतः परावलंबी, पराधीन होतो.  आपल्यासाठी कोणालाही वेळ नसतो.  प्रेम, जिव्हाळा, आपुलकी संपते.  सर्वजण आपल्यापासून शरीराने व मनानेही दुरावतात.

 

त्याचबरोबर वार्धक्य आले की, सतत मृत्यूची भीति निर्माण होते.  या भूतलावरील आपले अस्तित्व संपत आलेले आहे, या कल्पनेनेच मनुष्य निराश, दुःखी होतो.  गतकाळाचे सतत स्मरण होऊन मनुष्य अत्यंत उद्विग्न होतो.  याप्रमाणे 'जरावस्था' अत्यंत दुःखदायक व दोषयुक्त आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ