Monday, April 29, 2019

मनुष्यशरीराचे महत्व | Importance of Human Body




मनुष्य, विशेषतः विज्ञानयुगातील मानव विश्वामधील सर्व बाह्य गोष्टींचा विचार करण्यातच आयुष्य घालवितो.  परंतु त्याला स्वतःच्याच जीवनाचे महत्व समजत नाही.  सर्व वेद-उपनिषदे-गीता-पुराणे या सर्व ग्रंथांच्यामधून मनुष्यशरीराचे माहात्म्य वर्णन केलेले आहे.

मनुष्ययोनी ही कर्मभूमी असून अन्य सर्व भोगभूमी आहेत.  एखाद्या मनुष्याने खूप पुण्यसंचय करून देवलोकाची प्राप्ति केली तरीही तेथे पुरुषार्थ नाही.  जोपर्यंत पुण्यसंचय आहे, तोपर्यंत तेथील दिव्य भोग तो जीव भोगतो व पुण्यक्षयानंतर पुन्हा खाली येतो.  भोगत असताना त्याला स्वतंत्र पुरुषार्थ नाही.  तसेच मनुष्ययोनीपेक्षा निकृष्ठ योनीमधील जीव सुद्धा आपल्या नीच कर्मांनी अधोयोनीस प्राप्त होऊन तेथील निकृष्ठ फळे भोगतात.  तेथे त्यांना स्वतःचा पुरुषार्थ करता येत नाही.

मनुष्ययोनीमध्ये मनुष्य जरी आपल्या कर्मांची फळे प्रारब्धाच्या रूपाने भोगत असेल तरी दुसऱ्या बाजूला त्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे.  पुरुषार्थ व कर्तृत्व करण्याचे स्वातंत्र्य आहे.  याचे कारण मनुष्याला जन्मतःच इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति अशा तीन दुर्मिळ शक्ति दिलेल्या आहेत.  इतकेच नव्हे तर या तीनही शक्तींचा सदुपयोग करण्यासाठी सदसद्विवेकबुद्धि दिलेली आहे.  चांगले-वाईट, धर्म-अधर्म, नीति-अनीति, पाप-पुण्य हे सर्व ठरविण्याची शक्ति दिलेली आहे.  

मनुष्याला धर्म-अर्थ-काम-मोक्ष असे चार पुरुषार्थ दिलेले आहेत.  त्यापैकी अर्थ व काम ही सहजस्वाभाविक प्रवृत्ति आहे.  पैसा, ऐश्वर्य मिळविणे, अनेक कामना निर्माण करणे, प्रजोत्पत्ति करणे किंवा अन्न-वस्त्र-निवारा मिळविणे या सर्व सहज प्रवृत्ति आपल्याला पशूंच्यामध्येही दिसतात.  परंतु मनुष्याला मात्र धर्म व मोक्ष हे दोन जास्तीचे पुरुषार्थ दिलेले आहेत.  प्रत्येक मनुष्याने अधर्माचा त्याग करून धर्मपरायण जीवन जगावे.  सदाचार, सत्कर्म, आचारधर्म यांचे अनुष्ठान करावे.  इतकेच नव्हे, तर मनुष्यजीवनाचा अंतिम पुरुषार्थ म्हणजे मोक्षप्राप्ति आहे.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013




- हरी ॐ

Wednesday, April 24, 2019

निष्काम साधक | Desire-less Seekers




विश्वामध्ये सकाम लोकांच्या व्यतिरिक्त असणारे काही निष्काम साधक आहेत.  ज्यांच्या अंतःकरणामधून सर्व ऐहिक व पारलौकिक भोगांच्या इच्छा गळून पडलेल्या आहेत, त्यांना निष्काम साधक असे म्हणतात.  निष्काम साधक सर्व श्रौत-स्मार्त, वेदविहित, नित्य-नैमित्तिक कर्म तसेच अनेक प्रकारच्या देवता-उपासना सुद्धा करतात.  त्यामागे त्यांची कोणतीही कामना नसते.  तो साधक विवेकाने, सदसद्विवेकबुद्धीच्या साहाय्याने विषयांच्या, भोगांच्या मर्यादा जाणतो.  त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते.  

खरोखरच हे विश्व काय आहे ?  विश्वाचे, विषयांचे स्वरूप काय आहे ?  सर्व दृश्य विषय काळाच्या ओघात नाश पावतात, हे तो पाहतो.  रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनुभवतो.  याप्रमाणे विचार करीत गेले तर त्याला समजते की, सर्वच दृश्य प्रपंच नाशवान आहे.  मग त्याला प्रश्न पडतो की, सत्य काय आहे ?  तो सत्याचा शोधक होतो.  

बाह्य विश्वाप्रमाणेच तो स्वतःच्या जीवनाचाही विचार करू लागतो.  मी कोण ?  मी जन्माला का आलो ?  माझ्या जीवनाचे प्रयोजन काय आहे ?  माझ्या जीवनाचे साध्य काय ?  केवळ पैसा मिळविणे, मोठमोठ्या इमारती बांधणे, जगात नाव-प्रसिद्धि कमविणे, शाब्दिक ज्ञानाच्या पदव्या मिळविणे, प्रजोत्पादन करणे, प्रजेचे संगोपन करणे, येथेच्छ उपभोग घेणे हेच साध्य आहे की, यापेक्षा काही वेगळे साध्य आहे ?  

विचार करता-करता त्याला उत्तरही सापडते.  मनुष्याला फक्त सुख, शांति हवी आहे.  निरतिशय आनंदाची प्राप्ति करणे व सर्व दुःखांचा निरास करणे, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य आहे.  याची त्याला अंतरंगामधून तीव्र जाणीव होते.  तेव्हाच तो ‘साधक’ या संज्ञेस पात्र होतो.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


Tuesday, April 16, 2019

केनोपनिषदाचे महात्म्य | Significance of Kenopanishad




सामवेदामध्ये प्रामुख्याने छांदोग्योपनिषत् व केनोपनिषत् ही दोन मुख्य उपनिषदे अंतर्भूत होतात.  उपनिषदांच्यामध्ये मंत्रोपनिषत् व ब्रह्मणोपनिषत् असे दोन भाग पडतात.  मंत्रोपनिषदामध्ये मंत्रांच्यामधून अत्यंत कमी शब्दांच्यामधून ज्ञान सांगितले जाते.  तर ब्रह्मणोपनिषदामध्ये अधिक विस्ताराने ज्ञान प्रतिपादित केले जाते.  केनोपनिषत् हे सामवेदीय-तलवकारशाखांतर्गत ब्रह्मणोपनिषत् आहे.  

अन्य सर्व उपनिषदांपेक्षा ‘केनोपनिषदाचे’ अधिक विशेष महत्व आहे.  याचे कारण या उपनिषदावर भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्यांनी दोन भाष्ये लिहिली आहेत.  केनोपनिषदावर आचार्यांनी प्रथम पदभाष्य लिहिले.  एकाच ग्रंथावर, एकच सिद्धान्त प्रस्थापित करण्यासाठी एकाच आचार्यांनी दोन भाष्ये लिहिली, असे कोठेही आढळत नाही.  म्हणूनच याचे विशेष महत्व आहे.  पदभाष्यामध्ये मूळ मंत्रांची पदानुसार व्याख्या केलेली आहे आणि वाक्यभाष्यामध्ये श्रुतींचा निर्णय आचार्यांनी युक्तीच्या साहाय्याने प्रतिपादन केलेला आहे.  

शास्त्रकार सांगतात शास्त्रग्रंथ, ज्ञान हे अनंत, अपार, अमर्याद आहे.  परंतु शास्त्र जाणून ते आत्मसात करण्यासाठी मनुष्याचे आयुष्य मात्र अतिशय कमी आहे.  या अल्प आयुष्यामध्ये ज्ञानसाधना करीत असताना अनेक विघ्ने, संकटे व प्रतिबंध आहेत.  अशी परिस्थिति असताना साधकाला जर शास्त्रज्ञान प्राप्त करून शीघ्रातिशीघ्र ज्ञाननिष्ठा प्राप्त करावयाची असेल तर शास्त्रकार आदेश देतातकेने पश्य |  साधकाने केनोपनिषदाचे अध्ययन करावे.  या उपनिषदाच्या गूढार्थावर, तत्त्वार्थावर सतत चिंतन करून, निदिध्यासना करून उपनिषत् प्रतिपादित वेद्य जाणावे.  त्यामधील ज्ञान ग्रहण करून ज्ञानाची अनुभूति घ्यावी, कारण या उपनिषदामध्ये श्रुतीने शास्त्रनिर्णय अतिशय सुंदर पद्धतीने, सुलभ रीतीने घेऊन शास्त्राचे सार सांगितले आहे.  हे या उपनिषदाचे वैशिष्ठ्य आहे.  


- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ


Tuesday, April 9, 2019

नैसर्गिक मृत्यूचे वर्णन | Natural Death Process





मृत्यूच्या समयी मनामध्ये जो संकल्प असेल त्या संकल्पाने युक्त होऊन जीव इंद्रियांच्या सर्व शक्ति हळुहळू खेचून घेतो.  त्या सर्व शक्ति एकत्रित होऊन नंतर मुख्य प्राणात लीन होतात.  येथे आचार्य नैसर्गिक मृत्यूची स्थिति सांगतात.  जीव तेव्हा मुख्य प्राणवृत्तीनेच जिवंत राहतो.  त्यावेळी इंद्रियांच्या शक्ति मुख्य प्राणामध्ये लीन झाल्यामुळे इंद्रियांचे व्यापार शांत होतात.  त्यावेळी त्या व्यक्तीस डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही.  शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध या कशाचेही ज्ञान होत नाही.  गाढ सुषुप्तीप्रमाणे त्याची स्थिति असते.  इंद्रियांचे व्यापार व मनाच्याही सर्व वृत्ति क्रमाने लय पावतात.  फक्त प्राणवृत्ति राहते.

गाढ सुषुप्तीची अवस्था व मृत्यूच्या समयीची अवस्था अगदी समान आहे.  फक्त यामध्ये एकच फरक आहे – तो म्हणजे सुषुप्तिअवस्थेमध्ये शरीर गार पडत नाही.  शरीराचे तापमान योग्य प्रमाणात राखले जाते, कारण तेथे उदान वायू आहे.  मात्र मृत्युसमयी शरीर गार पडते, कारण त्यावेळी फक्त मुख्य प्राणवृत्तीच असते.  म्हणून त्यावेळी आपले सगेसोयरे नातेवाईक आपापसात बोलतात की, याचा श्वासोच्छवास जोरात चालू आहे, परंतु शरीर मात्र गार पडले आहे.  

याप्रमाणे मुख्य प्राणामध्ये सर्व शक्ति एकत्रित झाल्यामुळे तो प्राण तेजाने म्हणजेच उदानवायूने युक्त होतो.  शरीरामधील उदानवायू फक्त मृत्युसमयीच कार्यरत होतो.  मृत्युसमयी मुख्य प्राण उदानवायूसह शरीराचा अधिपति असणाऱ्या जीवात्म्याशी संयुक्त होतो.  जो जीव कर्मफळांचा भोक्ता आहे, अशा जीवाला त्याच्या कर्मानुसार तसेच मृत्युसमयीच्या संकल्पानुसार त्या त्या लोकाला घेऊन जातो.  अशा प्रकारे शरीराचा नैसर्गिक मृत्यु होतो.  

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः |
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ||        (गीता अ. १५ - ८) 
भगवान वर्णन करतात – वायु जसा गंधाच्या स्थानापासून गंधाचे ग्रहण करून घेऊन जातो, त्याचप्रमाणे जीवात्मा सुद्धा ज्या शरीराला सोडून जातो त्यातून मनासह इंद्रियांना घेऊन पुन्हा तो नवीन शरीर प्राप्त होते त्यामध्ये जाऊन तादात्म्य होतो.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012

- हरी ॐ

Tuesday, April 2, 2019

प्राण शरीरात प्रवेश कसा करतो ? | How Life-Breath Enters the Body ?





प्राण या शरीरात कसा प्रवेश करतो ?  याचे उत्तर श्रुति देते – मनोकृतेन |  प्राण हा शरीरामध्ये मनाच्या आकृतीने म्हणजेच मनाच्या वृत्तीरूपाने प्रवेश करतो.  मनाची वृत्ति म्हणजे मनाची कामना होय.  कामनेमधून कर्म निर्माण होते.  जीव अनेक प्रकारच्या इच्छा, संकल्प, कामना करतो व कामना पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  श्रुति पुढे सांगेल – पुण्येन पुण्यं इत्यादि |  पुण्यकर्माने पुण्यलोक प्राप्त होतो. तसेच – तदेव सह कर्मणा इति च श्रुत्यन्तरात् |  कर्मफळामध्ये आसक्त असलेला पुरुष आपल्या कर्मासहित कर्मानुरूप फळ प्राप्त करतो.  

यावरून सिद्ध होते की, प्राण हा शरीरात प्रवेश करीत असेल तर त्यास कारण कर्म आहे, कर्माला कारण कामना आहे व कामनेस कारण अविद्या आहे.  म्हणूनच यास अविद्याकामकर्मग्रंथि असे म्हटले जाते.  अविद्येमधून म्हणजेच स्वस्वरूपाच्या अज्ञानामधून कामना निर्माण होते, कामनेमधून कामनापूर्तीसाठी जीव अनेक प्रकारची कर्मे करतो, कर्म केले की, कर्मफळाची प्राप्ति होते.  कर्मफळामध्ये जीव आसक्त होतो.  पुन्हा त्यामधून कामना-कर्म-कर्मफळ असे अव्याहत चक्र चालू होते.  

भगवान म्हणतात – अहंकारविमूढात्मा कर्ताsहमिति मन्यते |      (गीता अ. ३ - २७)

अहंकाराने विमूढ झालेला पुरुष कर्माचा कर्ता होतो.  तोच कर्मफळास घेऊन अनेक कामना निर्माण करतो.  कामनेमधून चोदनाप्रवृत्ति निर्माण होऊन तो कर्मप्रवृत्त होतो.  याप्रकारे प्राण या संकल्पवृत्तिरूपाने शरीरामध्ये प्रवेश करतो.  प्राणाने शरीरात प्रवेश केला की, तो शरीरात आसक्त होतो.  शरीराच्या संसर्गामुळे प्राण शरीराशी तादात्म्य पावतो.  याप्रकारे प्राण शरीरामध्ये प्रवेश करतो.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ