Saturday, August 25, 2018

जीवनाच्या नाटकातून सुटका | Going Beyond ‘Play’ of Life



आपले जीवन हे एखाद्या नाटकाप्रमाणे आहे.  नाटकामध्ये अनेक प्रात्र असतात.  अनेक प्रकारचे प्रसंग असतात.  प्रत्येक पात्र आपली भूमिका चोख बजावते.  भूमिका संपली की, ते पात्र स्टेजवरून निघूनही जाते.  तसेच, जीवन ही एक रंगभूमी असून तिथे अखंडपणे हे नाटक म्हणजेच हा सर्व व्यवहार, प्रसंग चाललेले आहेत.  सर्वच नाटकी व कृत्रिम आहे.  पैशासाठी, ऐश्वर्यासाठी स्वार्थाने हपापलेली माणसे आपल्याजवळ काही काळ येतात व स्वार्थ पूर्ण झाला की, निघून जातात.  आपला त्याग करतात.

म्हणून मनुष्याने जीवनात मनाने दुसऱ्यावर अवलंबून राहू नये.  माणसांनी आपला त्याग करण्याआधी आपणच त्यांच्यामधील आसक्तीचा, ममत्वाचा मनाने त्याग करावा.  त्यातच खरा आनंद आहे.  काळाची पावले ओळखावीत.  जीवनात सतत सावध राहावे.  परमेश्वरालाच अनन्य भावाने शरण जावे.  हाच एकमात्र उपाय आहे.  
 ज्याप्रमाणे एखादी मारकी उधळलेली गाय असेल तर आपण तिला दाव्याने बांधतो व दाव्याची दोरी एका घट्ट खुंटीला बांधतो.  त्याचप्रमाणे आज आपले मन चंचल, अस्थिर, अस्वस्थ, असुरक्षिततेच्या भावनेने युक्त आहे.  ते मन आपल्याला शांत बसू देत नाही.  या मनाला शांत करण्यासाठी स्थिर खुंटी पाहिजे.  ती स्थिर खुंटी म्हणजेच परमेश्वर होय.  परमेश्वर हाच विश्वाचे व माझ्याही जीवनाचे अधिष्ठान आहे.  या परमेश्वरामध्ये मन समर्पित करावे.  परमेश्वराविषयी अन्तःकरणामध्ये भक्तीचा शुद्ध भाव निर्माण झाला की, आपोआपच मन शांत होते.  परमेश्वराचीच काया-वाचा-मनसा सेवा करावी.  हे करीत असताना बहिरंगाने व्यावहारिक जीवन एखाद्या नाटकाप्रमाणे जगावे.  आपली भूमिका, कर्तव्ये पार पाडावीत.  एकटे जगण्यासाठी मनाची तयारी करावी.  मन ईश्वराच्या स्मरणामध्येच तल्लीन, तन्मय व तद्रूप करावे.  

यामुळे कोणत्याही प्रसंगाने मन व्यथित होणार नाही.  समोर मृत्यु जरी दिसला तरी आपण आनंदाने सामोरे जाऊ शकू.  अशी मानसिकता, शक्ति व सामर्थ्य केवळ ईश्वराच्याच उपासनेने प्राप्त होते.  म्हणुनच आचार्य आदेश देतात - भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |   


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, August 21, 2018

नात्यांची अनित्यता | Impermanence of Relations




परिवारामध्ये स्वतःच्या कुटुंबामधील पति-पत्नी, मुले, नातेवाईक, सगेसोयरे, आप्त, बंधु-बांधव, मित्र असे सर्वचजण असतात.  यामधील काही रक्ताची नाती असतात, तर काही मनाने मानलेली नाती असतात.  मनुष्य या सर्वांना माझे-माझे म्हणून मनाने घट्ट पकडतो.  त्यांच्यामध्ये ममत्व निर्माण करतो. प्रेम, स्नेह, आसक्तीने बद्ध होतो.  ती माणसेही सतत जवळ, सान्निध्यात असतात.  आपल्याभोवती फिरतात.  मनुष्याच्या सर्व आज्ञा शिरसावंद्य मानतात.  

हा माझा परिवार आहे.  माझ्यासाठी हे सर्वजण काहीही करू शकतात.  अशा अनेक प्रकारच्या कल्पना मनुष्य करतो.  ममत्वामुळे मनुष्य या सर्वांच्यामध्ये बद्ध होतो.  परंतु हे कुठपर्यंत ?  जोपर्यंत मनुष्यामध्ये धन मिळविण्याची शक्ति आहे, तोपर्यंतच माणसे आपल्याभोवती फिरतात.  हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  जोपर्यंत आपल्याजवळ पैसा, ऐश्वर्य, सत्ता, प्रसिद्धि आहे व जोपर्यंत आपण लोकांच्या कामना पूर्ण करतोय, तोपर्यंतच सर्वजण आपल्याजवळ राहतात.  

परंतु जीवनात सतत चढ-उतार येतच असतात.  निसर्गनियमाप्रमाणे आपले शरीरही एकेका दिवसाने वृद्ध होत असते.  इंद्रियांच्यामधील शक्ति, कार्यक्षमता क्षीण होते.  बुद्धिची शक्ति सुद्धा कमी-कमी होते.  हे सत्य डावलता येत नाही.  आपले जीवन हळुहळू पूर्णतः परावलंबी होते.  अशा वेळी आपल्याभोवती असणारी माणसे आपल्यापासून हळुहळू दूर जायला लागतात.  काहीना काहीतरी निमित्त सांगून आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात.  घरामधील माणसे म्हणजे स्वतःची पत्नी असो, पुत्र असो, सर्वजण दोन दिवस, चार दिवस आपल्याजवळ बसतात.  नंतर सर्वजण कारणे सांगून निघून जातात.  

अशा प्रकारे माणसे आपला निरुपयोगी म्हणून त्याग करतात.  आपण आजारी पडलो, अत्यवस्थ झालो तर आपल्या प्रॅापर्टीसाठी मात्र आपल्याजवळ येतील.  विचारपूस करतील, काळजी घेण्याचे नाटक करतील.  परंतु जेव्हा त्यांना स्वतःचा लभ्यांश दिसत नाही, तेव्हा मात्र तीच जवळची माणसे आपल्याला सोडून जातात.  

  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ


Tuesday, August 14, 2018

मनुष्यजीवन आणि कमलपत्र | Human Life and Lotus Leaf




आचार्यांनी सुंदर दृष्टान्त दिला आहे.  कमळाचे फूल उगवले आहे.  त्या कमळाच्या पाकळीवर पाण्याचा एक थेंब आहे.  तो थेंब जेव्हा आपण दुरून पाहतो तेव्हा तो अतिशय सुंदर चकाकतो.  परंतु क्षणात एक वाऱ्याची छोटीशी झुळूक आली तरी तो थेंब खाली पडतो.  त्या थेंबाचे अस्तित्व इतके क्षणिक, अस्थिर व क्षणभंगुर आहे.  तसेच, त्या पाण्याच्या थेंबाला पाकळी – पान हे अधिष्ठान असते.  त्याचप्रमाणे आपले हे मानवी जीवन आहे. हे जीवन आपल्याला दिसताना अतिशय सुंदर दिसते.  विश्वामध्ये मनुष्याप्रमाणेच अनेक प्राणिमात्र आहेत.  परंतु त्या सर्वांच्यामध्ये मनुष्यजीवन हेच अतिशय श्रेष्ठ आहे, कारण फक्त मनुष्यामध्येच विवेकशक्ति आहे.  या सदसद्विवेकबुद्धीमुळे मनुष्यजीवनाला खऱ्या अर्थाने सौंदर्य प्राप्त झालेले आहे.  

मनुष्याजवळ अहर्निश विवेक जागृत असेल तर तो केवळ आकाशालाच गवसणी घालतो, असे नाही तर आकाशाच्याही अतीत, दृश्य विश्वाच्या अतीत, शरीराच्या अतीत असणाऱ्या शाश्वत, चिरंतन तत्त्वाची तो प्राप्ति करून घेतो.  म्हणूनच मनुष्याचे जीवन अत्यंत सुंदर व दुर्मिळ आहे.  हे सौंदर्य बहिरंगाचे नसून अंतरंगाचे, विवेकाचे सौंदर्य आहे.  मात्र असे असूनही मनुष्यजीवन दुसऱ्या बाजूला अत्यंत गतिमान, नदीच्या वेगवान प्रवाहाप्रमाणे अखंडपणे प्रवाहीत आहे.  एकेका क्षणाबरोबर, काळाच्या गतीबरोबर आपले जीवनही सतत पुढेपुढेच जात राहते.  काळच पाहता-पाहता अनपेक्षितपणाने कोणत्याही क्षणाला आपले अस्तित्व नष्ट करतो.  याचा विचार करायला पाहिजे.  

असे हे जीवन कमलपत्रावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे अतितरल, अतिचंचल, गतिमान, क्षणभंगुर तर आहेच.  याशिवाय आचार्य आणखी वर्णन करतात – मनुष्याचे शरीर अनेक भयंकर व्याधींनी ग्रस्त आहे व त्याचे अंतरंग अहंकार, ममकार, दंभ, दर्प, असूया, स्वार्थ, क्षोभ, संताप, चिंता, द्वेष, मत्सरादि विकारांनी ग्रस्त झालेले आहे.  जीवनाचे क्षणिकत्व समजावून घ्यावे व जेवढे काही आयुष्य मिळाले आहे, त्याचा सदुपयोग करून घ्यावा.  विकारांच्या आहारी जाऊन स्वतःच स्वतःचा नाश करवून घेण्यापेक्षा आपले जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करावा.  त्यासाठीच परमेश्वराला शरण जावे.  भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |  असे आचार्य इथे सांगतात.  


  
- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ

Tuesday, August 7, 2018

स्त्रीकडे पाहण्याची उदात्त दृष्टी | Perceiving a Woman


आचार्य आदेश देतात – हे मूढबुद्धि पुरुषा !  तू स्त्रियांच्या सौंदर्याला बळी पडू नकोस.  स्त्री हे सौंदर्याचे प्रतीक आहे.  परंतु बाहेरून कितीही सुंदर दिसले तरीही विवेकाने त्याची मीमांसा कर.  हे स्थूल शरीर म्हणजे अनेक कृमींचे, जंतूंचे संकुल आहे.  स्वभावतःच शरीर हे दुर्गंधी, अशुद्ध व अनित्य आहे.  शरीराला कितीही अत्तर लावले अथवा स्प्रे मारले तरी थोड्या वेळाने ते पुन्हा दुर्गंधीयुक्त होते.  म्हणून तरी आपण सतत स्नान करून शरीर स्वच्छ ठेवतो.  तसेच, स्थूल शरीराची निर्मितीच अशौचामधून झालेली आहे व या शरीराचा सर्वात मोठा दोष म्हणजे ते अनित्य आहे.  इतकेच नव्हे तर शरीर म्हणजे मलमूत्र यांचा साठा आहे.  

ज्या शरीरावर आसक्त होऊन मनुष्य इंद्रियभोगांच्या आहारी जातो, वर्षानुवर्ष नव्हे जन्मानुजन्म कामुक, भोगलंपट, स्त्रीलंपट होऊन स्वैर उपभोग घेतो, त्या मनुष्याने शरीराचे खरे स्वरूप जाणावे.  जीवनाचे वास्तव जाणावे.  स्त्रीचा उपभोग घेणे हेच जीवन नाही.  मूढ, अज्ञानी व कामुक लोकच स्त्रीमध्ये आसक्त होतात.  स्त्रीवेड्या लोकांच्यामधील पौरुषत्व, पुरुषार्थ क्षीण होत जातो.  

यासाठी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.  स्त्री ही समाजातील, विश्वामधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.  स्त्री ही अबला नाही.  स्त्री ही भोग्य किंवा शोभेची वस्तु नाही.  तर स्त्री हे शक्तीचे प्रतीक आहे.  स्त्रीमध्येच निर्माणशक्ति, धारणाशक्ति व संहारशक्ति आहे.  स्त्री हे तर आदिमायाशक्तीचे, जगज्जननीचे रूप आहे.  स्त्री ही मातृरूप आहे.  स्वतःच्या स्त्रीशिवाय विश्वामधील अन्य सर्व स्त्रिया म्हणजे आपल्या माता आहेत.  म्हणून ‘स्त्री’ हे स्थान सर्वांना वंदनीय, अत्यंत पवित्र व मातृतुल्य आहे.  

स्त्रीकडे पाहण्याची ही उदात्त दृष्टि ठेवली तर आपोआपच मनामधील सर्व काम-लोभ-मोह-कामुकता-भोगलालसा या वृत्ति गळून पडतात. मन मोहवश होत नाही.  विवेकामधुनच अन्तःकरणामध्ये वैराग्यवृत्ति उदयाला येते.  विवेकजन्य वैराग्यच खरे वैराग्य असून ते दीर्घकाळ टिकते.  ही विरक्तवृत्ति मनुष्याला वाममार्गापासून, दुराचारापासून, व्यभिचारापासून निवृत्त करते.  त्यामुळे मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य शुद्ध होते.  याच मनामध्ये शांतीचा, शुद्ध आनंदाचा अनुभव येतो. 


- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


हरी ॐ –