Saturday, February 22, 2025

श्रुतींचाच आश्रय घ्यावा | Take Refuge In Shruti

 



आचार्य म्हणतात – वेदान्तो नाम उपनिषत् प्रमाणम् |           (वेदान्तसार)

वेदान्त, उपनिषदे हेच आत्मज्ञानाचे प्रमाण आहे.  प्रत्येक मनुष्याला जीवन जगत असताना शास्त्र हेच प्रमाण, आधार व आश्रय आहे.  वेदान्तशास्त्र, त्यामधील विचारच मनुष्याला तारून नेतात.  मनुष्याचे व्यावहारिक जीवन असो वा आध्यात्मिक जीवन, साधना असो, त्यामध्ये शास्त्राचे विचार मनुष्याला हे श्रुति शिकविते.  साधनेमध्ये जेथे जेथे साधक अडखळेल, त्याचे मन सैरभैर होईल, अनेक मते त्याच्यासमोर येतील, त्यावेळी श्रुतिमाताच साधकाला योग्य मार्ग दाखविते.  कारण श्रुति ही निरपेक्ष आहे.  म्हणून साधकाने श्रुतींचाच आश्रय घ्यावा हे एक कारण !

 

दुसरे कारण म्हणजे, कोणत्याही वस्तूचे, विषयाचे ज्ञान घ्यावयाचे असेल तर ते ज्ञानन पुरुषतन्त्रत्वात् |  पुरुषाच्या, ज्ञान घेणाऱ्याच्या मतावर, कल्पनांच्यावर अवलंबून नसते.  म्हणून शास्त्राध्ययन करताना मला काय वाटते, याला महत्व नाही.  हे माझे मत आहे, हा वाक्यप्रयोगच अयोग्य आहे.  कारण – ज्ञानं वस्तुतन्त्रत्वात् |  ज्ञान हे ज्ञेय वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असते.  ज्ञानासाठी यथार्थ व सम्यक् हे दोन शब्द वापरले जातात.

१) यथार्थ – अर्थं ज्ञेयविषयं अनुसृत्य यत् प्रवर्तते तत् यथार्थज्ञानम् |  जे ज्ञेय विषयाला अनुसरून, विषयाबरहुकुम ज्ञान असते, त्यास यथार्थ ज्ञान असे म्हणतात.

२) सम्यक् – संशयविपर्यरहितं ज्ञानम् |  ज्या ज्ञानामध्ये संशय, शंका नाहीत व विपर्यय म्हणजे जे विपरीत ज्ञान नाही, त्यास सम्यक ज्ञान असे म्हणतात.

 

वेदान्तशास्त्राचे ज्ञान हे यथार्थ व सम्यक् असल्यामुळे साधकांनी, मुमुक्षूंनी वेदान्तशास्त्राचाच आदर करावा.  वेदान्तज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त झाल्याशिवाय अन्य मते – वाद याविषयी श्रवण देखील करू नये.  त्यामध्ये आयुष्याचा व्यर्थ वेळ घालवू नये.

 

 

- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ




Tuesday, February 18, 2025

शास्त्रांचे परमशास्त्र - महारामायण | Supreme Science - Maha Ramayan

 




"आत्मज्ञानाच्या प्रबोधनासाठी जे शास्त्रांचेही परमशास्त्र आहे, जे शुभकारक, पुण्यकारक आहे, ते प्रधान शास्त्र म्हणजेच 'महारामायण' नावाचे श्रेष्ठ शास्त्र आहे.  तेच सर्व इतिहासांच्यामध्ये सारभूत शास्त्र आहे."  येथे श्रीवसिष्ठ मुनि महारामायणाचा म्हणजे योगवासिष्ठाचा उल्लेख 'सत्शस्त्र' म्हणून करतात आणि सांगतात की, "हे रामा !  जे वेद-उपनिषदांच्यामधून सांगितले, तेच सर्व सार मी तुला या ग्रंथामधून सांगितले आहे.  म्हणूनच हे महारामायण आहे."

 

"हे राघवा !  श्रीवाल्मीकि ऋषींनी रामायण सांगितले. त्यामध्ये सर्व जीवांना पावन करणारे तुझे चरित्र आहे.  परंतु त्यानंतर सांगितलेले महारामायण म्हणजे तुझा आणि माझा संवाद म्हणजेच हे योगवासिष्ठ आहे.  खरे तर योगवासिष्ठ हा रामायणाचाच भाग आहे.  तुझे चरित्र म्हणजे रामायण आणि तुझा व माझा ज्ञानसंवाद हे तर महारामायण आहे.  हे महारामायण सर्व इतिहासांच्यामध्ये श्रेष्ठ व सारभूत आहे."

 

"म्हणून रामा !  योगवासिष्ठ हा ग्रंथ कपोलकल्पित शास्त्र किंवा कल्पना करून रंगविलेले शास्त्र नाही तर हा प्रत्यक्ष घडून गेलेला वृत्तांत - इतिहास आहे.  यामध्ये मी तुला पुढे अनेक आख्यायिका सांगेन.  पण अन्य कथांच्याप्रमाणे या कथा ऐकून तू सोडून देऊ नकोस.  या योगवासिष्ठामध्ये ज्या कथा मी सांगेन, त्या ऐकताना श्रोत्यांच्या मनामध्ये एकेक ज्ञानवृत्ति निर्माण होते.  म्हणून रामा !  मी तुला सांगत असणारे हे शास्त्र, हा योगवासिष्ठ ग्रंथ म्हणजे सर्व इतिहासांचे सुद्धा सार आहे. त्यामुळे हे शास्त्र श्रवण केले की, मनुष्याला जीवन्मुक्ति म्हणजे अक्षय सुखाची प्राप्ति होते.  म्हणून हे अतिशय पावन शास्त्र आहे."

 

"हे रामा !  अन्य शास्त्र प्रथम श्रवण करावी लागतात, मग मनन करावे लागते, मग निदिध्यासना करावी लागते आणि मग ज्ञानप्राप्ति होते.  बरे, एवढे सर्व केल्यावर अनुभूति येईलच, याची शाश्वती नाही.  पण रामा !  मी जे सांगतो ते हे शास्त्र अगदीच शीघ्र फलदायी आहे.  ते ऐकलेस की, ऐकता-ऐकताच तुला अनुभूति येईल.  अक्षय जीवन्मुक्तावस्था प्राप्त होईल.  त्यासाठी तुला बाहेरून काहीही करण्याची आवश्यकता नाही.  कारण ती अनुभूति तुला स्वतःलाच तुझ्या आतच अनायासाने प्राप्त होईल.  याप्रमाणे हे सत्य शास्त्र सर्व पापांचा व संसाराचा नाश करणारे अतिशय पावन शास्त्र आहे."

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, February 11, 2025

अभ्यास-ज्ञान-ध्यान-कर्मफलत्याग | Practice-Knowledge-Reflection-Sacrifice

 




भगवान एकापेक्षा एक श्रेष्ठ, श्रेष्ठतर आणि श्रेष्ठतम असणारी साधने सांगतात.  शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या साधाना दिल्या आहेत.  त्यापैकी ‘अभ्यास’ ही एक साधना आहे.  अभ्यास म्हणजेच सर्व कर्मांचा संन्यास करून यम, नियम वगैरेदींच्या साहाय्याने श्रवण-मनन ही साधना करणे होय.  या साधनेमध्ये सर्वकर्मसंन्यास करणे, शमदमादि साधनसंपत्ति प्राप्त करणे इतकेच नव्हे, तर वेदान्तशास्त्राचे श्रवण-मननादि करणे यामध्ये खूप श्रम, कष्ट आहेत.  त्यामुळे या अभ्यासापेक्षा ‘ज्ञान’ श्रेष्ठ आहे.  ‘ज्ञान’ म्हणजेच श्रवणादि साधनेमधून उदयाला येणारे जीवब्रह्मैक्य ज्ञान होय.  म्हणजेच वरील सर्व कष्टप्रद साधना करण्यापेक्षा अद्वैत ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण ‘ज्ञान’ हेच मोक्षाचे साक्षात, प्रमुख साधन आहे.  ही शास्त्रप्रसिद्धि आहे.

 

यापुढे भगवान म्हणतात, “या जीवब्रह्मैक्य ज्ञानापेक्षा ‘ध्यान’ श्रेष्ठ आहे.  याचे कारण ज्ञान प्राप्त झाले तरीही या ज्ञानामध्ये अनेक प्रतिबंध आहेत.  पहिला प्रतिबंध म्हणजेच ‘विपरीत भावना’ होय.”  “अहं ब्रह्मास्मि” हे शाब्दिक ज्ञान झाल्यामुळे आत्मअज्ञानाचा निश्चित निरास होतो.  परंतु अजूनही त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त न झाल्यामुळे ते ज्ञान फलदायी होत नाही.  दुसरा प्रतिबंध म्हणजेच सूक्ष्म भोगवासना होय.  भोगवासना सतत ज्ञानसाधनेमध्ये कामक्रोधादि, रागद्वेषादि विकार पुन्हा पुन्हा निर्माण करून सतत प्रतिबंध निर्माण करते.  त्यामुळे असे हे ज्ञान केवळ शाब्दिक असून ज्ञाननिष्ठारहित, सप्रतिबंधक ज्ञान आहे.  या ज्ञानापेक्षा निश्चितच ‘ध्यान’ श्रेष्ठ आहे.

 

कर्मफळत्यागामध्ये कोणतेही कष्ट, परिश्रम नाहीत.  सर्व कर्मांचा त्याग करणे, यमनियमादि साधना करणे, शमदमादि गुणांचा अभ्यास करणे, श्रवणादि साधना करणे, विपरीत प्रत्ययांचा निरास करणे, मनाची स्थिरता करणे या कोणत्याही श्रमाची आवश्यकता नाही.  कर्मफळाच्या संकल्पाचा त्याग केल्यामुळे आपोआपच ज्यावेळी प्रत्यक्ष कर्मफळ प्राप्त होते, त्यावेळी प्रतिक्रिया न करता तो साधक प्रसादवृत्तीने त्याचा स्वीकार करतो.  यामुळे मनामधील रागद्वेष, हर्षविषाद वगैरेदि द्वन्द्वे नाहीशी होऊन त्याला त्याचवेळी सत्वर आनंदाचा, शांतीचा अनुभव येतो.  मन शुद्ध, सत्त्वगुणप्रधान झाल्यामुळे तेथेच आनंदाचा तात्काळ उत्कर्ष होतो.  यामुळे चित्तशुद्धिद्वारा ज्ञानप्राप्ति होऊन साधकाला क्रमाने मोक्षप्राप्ति होते.  म्हणून अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे, हे सिद्ध होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, February 4, 2025

सत्संगाचे फळ | Benefits Of Satsang

 




हे रामा !  सत्संगाचे फळ प्रत्यक्ष बहिरंगाने दिसत नाही.  सत्संगामध्ये गेल्यावर एखादी व्यावहारिक गोष्ट किंवा वस्तु मिळत नाही.  व्यवहारामध्ये अन्य अनेक संग आहेत.  त्यामधून मनुष्याला धन, सत्ता, प्रतिष्ठा वगैरेदि अनेक दृश्य वस्तु प्राप्त होतात.  ते व्यावहारिक फळ दुसऱ्यांना दाखविता येते.  परंतु सत्संगामध्ये गेल्यावर काय मिळते ?  असा प्रश्न आपल्यास कोणी विचारला तर आपण व्यावहारिक दृष्टीने त्याचे उत्तर देऊ शकत नाही.  कारण सत्संगाचे फळ डोळ्यांना दिसत नाही.  तेथे जाऊन एखादी पदवी किंवा प्रमाणपत्र मिळत नाही.  परंतु सत्संगाचा आपल्या मनावर मात्र खूप मोठा परिणाम होतो.  आपले जीवन अंतरबाह्य बदलते.  कदाचित एखादा नास्तिक मनुष्य असेल तर तो सत्संगाच्या प्रभावाने आस्तिक, श्रद्धावान सुद्धा होऊ शकतो.

 

सत्संगामध्ये गेल्यानंतर साधकामध्ये सर्वात पहिला फरक पडत असेल तर तो म्हणजे साधक विवेकाचा आश्रय घेतो.  आपण आयुष्यामध्ये कसे जगावे ?  कशाला किती महत्त्व द्यावे ?  धर्म काय ?  आणि अधर्म काय ?  आपल्या विचारांची दिशा काय असावी ?  असे सर्व ज्ञान साधकाला होते.  मगच जीवनामध्ये बदल होऊ लागतो.  सत्संगामधून प्राप्त झालेल्या या विवेकाचे साधक रक्षण करतो.  म्हणजेच गुरूंनी सांगितलेल्या शास्त्रदृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतो.  गुरु आपल्या जीवनाला अधिष्ठानरूप होतात.

 

जसजसे साधक सत्संगामध्ये जाईल, तसतसे त्याच्या मनामधील विषयासक्तीचा प्रभाव कमी कमी होतो.  सत्संगाची आवड निर्माण होते.  त्याला भोगांच्यामध्ये, विषयांच्यामध्ये रस वाटेनासा होतो.  गुरुमुखामधून शास्त्रश्रवणाची दृढ इच्छा मनामध्ये निर्माण होते.  सत्संगामध्ये गेल्यानंतर त्याला परमानंदाची प्राप्ति होते.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ