Tuesday, July 27, 2021

परमात्म्याची उपासना | Worshipping the Supreme

 



संभूतीच्या, कार्यब्रह्माच्या उपासनेने साधकाला सिद्धि प्राप्त झाल्यामुळे ऐश्वर्यप्राप्ति होऊन त्याच्या अहंकाराचे वर्धन होते.  त्यामुळेच तो घोर अंधकारात प्रवेश करतो, म्हणजेच अधःपतित होतो.  कारणब्रह्माची उपासना ही प्रकृतिलयाची उपासना असल्यामुळे प्रकृति स्वतःच जड, अचेतन, अविद्यास्वरूप असल्यामुळे अशा अविद्येच्या उपासनेमुळे साधक अत्यंत घनघोर अशा अंधकारात प्रवेश करतो.  

 

म्हणून या दोन्हीही उपासना अविद्वान, अज्ञानी, कामुक पुरुषाला सांगितलेल्या आहेत.  जो विवेकी, ज्ञानी पुरुष आहे, तो कधीही जडत्वप्राप्तीसाठी उपासना करणार नाही.  मात्र अविद्वान, कामुक पुरुषच या अविद्याजन्य उपासनांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  वस्तुतः उपासकाला या उपासानांचे फळ प्रत्यक्ष प्रकृति देऊ शकत नाही, कारण प्रकृति ही स्वतःच जडस्वरूप आहे.  तसेच आणिमादि सिद्धि सुद्धा उपासकाला कोणतीही कुट्टीदेवता देऊ शकत नाही, कारण या देवताही कल्पित, अध्यस्त, अविद्याजन्य आहेत.  या सर्व उपासकांना प्रत्यक्ष परमेश्वरच फळ देत असतो.  

 

भगवान म्हणतात –

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति |

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ||

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते |

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ||

अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् |

देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ||       (गीता अ. ७–२१,२२,२३)

 

जो साधक ज्या देवतेवर श्रद्धा ठेवतो, त्याला ती अचल श्रद्धा मी परमात्माच प्रदान करतो.  त्या श्रद्धेने युक्त होऊन तो त्या त्या देवतेची उपासना करतो.  त्यामुळे त्याला जे जे फळ प्राप्त होते, ते फळही मी परमात्माच त्याला देतो.  परंतु हे सर्व फळ कर्मजन्य असल्यामुळे ते सर्व नाशवान, क्षणिक असते.  म्हणून मला – परमात्म्याला शरण येणारे लोक माझ्या परमात्मस्वरूपालाच प्राप्त होतात.  मात्र देवातांना भजणारे लोक देवतालोकाला प्राप्त होतात.

 


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, July 20, 2021

कारणब्रह्म उपासना आणि मुक्ति | Worship of Causal Brahma & Liberation

 



कारणब्रह्माच्या उपासनेने उपासक कार्याचा लय करतो.  त्यामुळे – दुःखअभावात् |  त्याला कोणत्याही प्रकारच्या दुःखांचा अनुभव येत नाही, कारण त्यावेळी त्याच्या मनाची पूर्णतः निर्विचार स्थिति, लयावस्था असते.  त्यामुळे या उपासनेने उपासक जास्तीत जास्त अव्यक्तावस्थेपर्यंत जाऊ शकतो.  इतकेच नव्हे, तर ब्रह्माजीच्या स्थानापर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो.  परंतु ही उपासना करीत असताना जर अधिकारित्व कमी पडले किंवा उपासनेमध्ये काही उणीव राहिली तर त्या सर्वश्रेष्ठ स्थानापासून च्युत होण्याचीच अधिक शक्यता असते.

 

समजा, आपण गृहीत धरले की, एखादा अत्यंत परमश्रेष्ठ उपासक दीर्घकाळ सातत्याने ही उपासना करून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचला, तरी सुद्धा त्याला दीर्घकाळ ब्रह्माजीबरोबर क्रममुक्ति मिळते.  परंतु इतका भयंकर असणारा काळ की, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, गणितही मांडू शकत नाही, इतका काळ कोणत्याही कारणाने च्युत न होता तो अत्यंत दृढ राहिला पाहिजे.  

 

परंतु ही गोष्ट खूप अशक्य कोटीतील वाटते, कारण आपल्या चित्ताचा स्वभावच सतत अधोगामी होण्याचा आहे.  शास्त्राच्या भाषेत सांगावयाचे झाले तर आपले चित्त सतत कार्यब्रह्मामध्येच रममाण होते.  म्हणजेच दृश्य, नामरूपात्मक विश्वामध्ये, विषयांच्यामध्येच आसक्त होते.  यामुळेच कारणब्रह्माची उपासना ही अत्यंत कठीण आहे.

 

म्हणूनच भाष्यकार येथे सूचित करतात की, या क्रममुक्तीच्या मार्गाने जाण्यापेक्षा, कारणब्रह्माची उपासना करण्यापेक्षा साधकाने कारणब्रह्माच्याही अतीत असणारे जे कार्य-कारणाचेही अधिष्ठान चैतन्यस्वरूप आहे, त्या चैतन्यस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मनापासून प्रयत्न केला, सातत्याने साधना केली तर याच जन्मामध्येयाचि देहि याचि डोळां |  त्या स्वरूपाची प्राप्ति होऊ शकते.  यालाच ‘सद्योमुक्ति’ असे म्हणतात.  किंवा यालाच ‘जीवनमुक्तावस्था’ असे म्हटले आहे.  ज्या क्षणी अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो, त्याचक्षणी युगपत् अविद्येचा ध्वंस होऊन अविद्येचे कार्य असणाऱ्या संपूर्ण संसाराचा ध्वंस होतो आणि जीव स्वतःच परब्रह्मस्वरूप, चैतन्यस्वरूप, आनंदस्वरूप होतो.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ




Tuesday, July 13, 2021

खऱ्या शिष्याची प्रतिक्षा | Anticipation of True Seeker

 



प्रत्येक गुरु खऱ्या शिष्याची वाट पाहत असतात.  गुरूंच्याकडे तसे अनेक शिष्य येतात, थोडीफार सेवा करतात, स्वतःच्या शरीराचे-मनाचे सर्व लाड पुरवून जमेल तशी साधना करतात.  थोडे श्रवण करून शाब्दिक ज्ञान गोळा करतात.  एवढे झाले की, वेश बदलतात.  चारदोन लोकांनी पायावर डोके ठेवले की, आपण कोणी मोठे गुरु आहोत, या आविर्भावात स्वतःच्याच मनामध्ये स्वतःचे एक वेगळे गुरुपदवीने भूषित असणारे काल्पनिक अस्तित्व निर्माण करतात.  त्यासाठी स्वतःभोवती संसार निर्माण करतात.  एका आश्रमातून दुसरा आश्रम अशी यात्रा चालू ठेवतात.

 

असे अध्यात्ममार्गामध्ये येणारे व जाणारे भरपूर असतात.  परंतु खरोखरच बाह्य सर्व प्रलोभनांना झुगारून देऊन ईश्वरप्राप्तीसाठी तळमळणारे, गुरूंच्याजवळ आत्मानुभूतीची याचना करणारे, ज्ञानप्राप्तीसाठी सर्वस्व अर्पण करणारे;  नव्हे करणारा, एखादाच दुर्मिळ शिष्य असतो.

 

महाराष्ट्रामध्ये अत्यंत थोर तपस्वी, सिद्ध पुरुष परमपूज्य श्री गुळवणी महाराज दर पौर्णिमेला दत्तक्षेत्र वाडी येथे जात असत.  हजारो भक्त आपल्या नाना प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्याकडे जात असत.  श्री गुळवणी महाराजांनी आपल्या जवळच्या शिष्याला आपले मनोगत सांगितले.  वर्षानुवर्षे आपल्याकडे हजारो लोक येतात.  स्वतःच्या समस्या सांगतात.  पैसा संपत्ति वगैरे सर्व बाह्य गोष्टी मागतात;  परंतु त्यांच्यामध्ये असा एकही मनुष्य मला मिळाला नाही की, ज्याने माझ्याकडील खरे ज्ञान, अनुभव, मागितला.  अशा एखाद्या शिष्याची मी प्रतीक्षा करतोय.

 

गुरु असा योग्य, अधिकारी शिष्य शोधीत असतात.  आपल्या खंद्यावरील ही ज्ञानगंगा केव्हा एकदा शिष्याच्या अंतःकरणात प्रवाहीत करतोय, असे त्यांना होऊन जाते.  सर्वच गुरूंना असा शिष्य मिळत नाही.  शिष्य अनेक मिळतात, परंतु ते त्या प्रतीचे नसतात.

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ




Tuesday, July 6, 2021

तर्काने आत्मप्राप्ति होत नाही | Logic Cannot Lead To Self-Realization


 

अभेद दृष्टीच्या आचार्यांनी उपदेश केल्यानंतर वेदान्तशास्त्रामधून प्रतिपादन केलेल्या आत्मस्वरूपाची बुद्धि केवळ तर्काने प्राप्त होत नाही.  केवळ स्वतःच्या बुद्धीने उहापोह विचार करून प्राप्त होत नाही.  इतकेच नव्हे, तर कोणत्याही तर्काने आत्मज्ञानाचे खंडनही करता येत नाही.  तार्किक लोकांना वेदान्तशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे केवळ स्वबुद्धीलाच प्रामाण्यत्व देऊन ते पोकळ बुद्धिवाद करतात.  त्यांच्या त्या निराधार बुद्धिवादाने किंवा तर्काने वेदशास्त्रजनित आत्मबुद्धीचा निरास होऊ शकत नाही, कारण ज्याचे खंडन करावयाचे ते वेदान्तशास्त्र त्यांना पूर्णपणे माहित नाही.  म्हणून स्वतःला बुद्धिवादी समजणाऱ्या लोकांना प्रथम अध्यात्म म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे.

 

सूक्ष्मातिसूक्ष्म असणाऱ्या आत्मस्वरूपाची प्राप्ति केवळ बुद्धीने, तर्काने होत नाही, कारण आत्मस्वरूप तर्काच्याही अतीत आहे.  वेदान्तशास्त्राचे खंडन तर्काच्या साहाय्याने करता येत नाही, कारण अनेक प्रकारचे तर्क आहेत, युक्तिवाद आहेत.  दोन तार्किक एकत्र आले की, एकजण दुसऱ्याच्या तर्काचे खंडन करतो, दुसरा तिसऱ्याचे खंडन करतो.  आत्मस्वरूपाविषयी अनेक मते, मतप्रणाली, वाद आहेत.  प्रत्येकजण माझेच कसे खरे आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.  या सर्व वादांच्यामधून आत्मवस्तूची सिद्धि होत नाही.  आचार्य म्हणतात – वादे वादे तत्त्वबोधः न जायते |  तर्क-वितर्क-कुतर्क करणाऱ्या लोकांना कधीही आत्मज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होत नाही.  त्यांना यथार्थ व सम्यक् ज्ञान प्राप्त होत नाही.

 

म्हणून पंडित, विद्वान पुरुषाने सुद्धा स्वतंत्रपणे, स्वबुद्धीला प्रमाण मानून ब्रह्मविचार करू नये.  स्वबुद्धीने कितीही तर्क केले, कल्पना केल्या, तौलनिक अभ्यास केला तरीही ज्ञानाची प्रगल्भता व स्पष्टता प्राप्त होत नाही.  स्वअभ्यासाने थोडेफार समजल्यासारखे वाटेल.  माहितीवजा ज्ञान मिळेल.  परंतु आत्म्याची माहिती म्हणजे आत्मज्ञान नव्हे.  आचार्यांच्या कृपेशिवाय, अनुग्रहाशिवाय आत्मज्ञान मिळणे अशक्य आहे.

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ