Showing posts with label Conviction. Show all posts
Showing posts with label Conviction. Show all posts

Tuesday, June 5, 2018

तन्निष्ठ | Stability in Conviction




घरामध्ये नादमधूर संगीत चालू असताना जर बाहेरून कर्णकर्कश आवाज आला तर त्या आवाजाच्या प्रभावाने सुरेल संगीताचा ध्वनि लुप्त झाल्यासारखा वाटतो.  किंवा सुगंधी अगरबत्ती पेटविल्यानंतर तिचा सुगंध घरात दरवळतो.  परंतु दुर्गंधाच्या प्रभावाने सुगंध लुप्त झाल्यासारखा वाटतो.  

त्याचप्रमाणे समाधिअवस्थेमध्ये ‘अहं ब्रह्मास्मि’ ही वृत्ति निर्माण होते आणि त्यामुळे साधकाला निरतिशय आनंदाचा अनुभव येतो.  परंतु समाधिअवस्थेमधून बाहेर आल्यानंतर देहाच्या संगाने देहतादात्म्य निर्माण होऊन ‘मी’ देह आहे ही वृत्ति पुन्हा प्रबल होते.  त्यामुळे समाधिअवस्थेमधील ‘मी’ ब्रह्म आहे हे ज्ञान लुप्त झाल्यासारखे वाटते.  तसेच निरतिशय आनंदाची अनुभूति सुद्धा नाहीशी होते आणि पूर्ववत मी मर्त्य आहे, मी सुखीदुःखी आहे या वृत्ति निर्माण होतात.  याचा अर्थ साधक स्वस्वरूपामध्ये दृढ झालेला नाही.  म्हणून साधकाने निष्ठा प्राप्त करण्यासाठी ब्रह्माभ्यास करावा.  

यासाठी आचार्य सांगतात – तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनम् |   (तृप्तिदीप)
सतत ब्रह्माकार वृत्तीचा अभ्यास करावा.  एकांतामध्ये बसून सर्व वृत्तींचा निरास करून सजातीय ब्रह्माकार वृत्ति निर्माण करावी.  तसेच अन्य साधकांबरोबर ब्रह्मस्वरूपाची चर्चा करून शंका निरसन कराव्यात आणि अज्ञानी मनुष्याच्या संगतीमध्ये त्याला आत्मस्वरूपाचे प्रबोधन करावे.  या सर्व अभ्यासाने सतत ब्रह्माकार वृत्ति निर्माण होते व हळूहळू सर्व संशय, विपार्याय निरास होऊन वृत्ति दृढ होते.  

याप्रमाणे बुद्धीची आत्मस्वरूपामध्ये निश्चलता प्राप्त होते.  अशी ज्यांची दृढ वृत्ति झालेली आहे ते तन्निष्ठ झालेले आहेत असे म्हटले आहे. 
श्रुति म्हणते – यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः  |   (दृक्दृश्यविवेक)
ज्या ज्या विषयाकडे मन जाते तेथेच त्याची समाधि असते.  म्हणजेच विषय पाहात असताना सुद्धा तो स्वस्वरूपामध्ये स्थिर असतो.


  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ


Friday, January 1, 2016

निदिध्यासना | Contemplation



शास्त्रश्रवण व मनन ही साधना झाल्यावर निदिध्यासनेत ब्रह्मस्वरुपाबद्दल कोणत्याही प्रकारचे तार्किक विचारमंथन नाही किंवा आत्म्याची मीमांसा (Logical thinking and enquiry) नाही.  सत्, चित्, आनंद हे शब्द उच्चारल्याबरोबर थेट त्या शब्दाने निर्देशित केलेल्या तत्त्वाचे अंतिम सत्य पाहण्याचा अभ्यास निदिध्यासनेत करावा.

जसे ‘घट’ शब्द उच्चारल्याबरोबर, घट या शब्दावर आपण चिंतन करत नाही, तर तत्क्षणी त्या शब्दातून अभिप्रेत होणारा तो विषय किंवा अर्थ स्पष्टपणे डोळ्यासमोर उभा राहतो.  म्हणजे शब्द सत्य नाही तर शब्दाने प्रतिपादित केलेला विषय सत्य आहे.  विषय किंवा सत्य प्रकटीकरणासाठी शब्द हे साधन आहे.  घट हा शब्द उच्चारताच घटस्वरुपाची वृत्ति निर्माण होते.  त्याचप्रमाणे आत्म्याचे नित्यशुद्धबुद्धमुक्त हे जे स्वरूप शब्दात प्रकट केलेले आहे, त्या आत्मस्वरुपाची सजातीय वृत्ति सतत निर्माण करावी.

म्हणजेच See the Content of the word. The Content is the Truth.  ही ब्रह्मस्वरुपाची वृत्ति इतकी दृढ व स्थिर करावी की, ब्रह्मस्वरुप हा स्वभाव बनला पाहिजे.  ब्रह्मस्वरुपाची सहजस्वाभाविक अवस्था प्राप्त झाली पाहिजे. हिलाच ज्ञाननिष्ठा म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेला मराठीत ‘सहजसमाधि’ म्हणतात.  या ज्ञाननिष्ठेमुळे हा ज्ञानी कोणतीही शारीरिक, मानसिक क्रिया करो, त्याची तत्त्वाची म्हणजेच ब्रह्मस्वरूपाची दृष्टि सतत कायम असते.  उठता, बसता, खाता, पिता तो “मी स्वतः काहीच करत नाही” अशा वृत्तीने कर्म करतो.

या ब्रह्मनिष्ठेत ब्रह्मस्वरुपाच्या विस्मृतीचा पूर्ण अभाव असतो, कारण तो ज्ञानी ब्रह्मस्वरुप झालेला असतो.  म्हणूनच हा ब्रह्मविद् म्हणतो – ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे |  त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ||  या तत्त्ववेत्याचे मन अखंड चैतन्य, सच्चिदानन्दस्वरुपच पाहाते.  ही ज्ञाननिष्ठा प्राप्त होईपर्यंत मुमुक्षूने निदिध्यासना करावी.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005




- हरी ॐ

Monday, September 16, 2013

श्रीगणेश – मोह पाशांपासून मुक्ति I Shree Ganesh – Reliever from Bondages



आसक्ति मनुष्याला बद्ध करते.  हा मोहरूपी पाश आहे.  या मोहरूपी पाशामुळे विवेकबुद्धि भ्रष्ट होऊन मनुष्य अविवेकी होतो आणि अनेक प्रकारच्या मोहांना बळी पडतो.  भक्तांच्या या मोहरूपी पशांचा नाश करण्यासाठी श्रीगणेशाने हातात पाश धारण केलेला आहे.

विषयभोगतृष्णारूपी मोह तसेच स्रक्चंदनवनितादि यांनी निर्देशित केलेला मानसन्मान यश, कीर्ति, प्रतिष्ठा वगैरेंचा मोह, शारीरिक आणि इंद्रियोपभोग, सत्तेचा, धनाचा आणि स्त्रीचा या सर्व मोहांचा श्रीगणेश नाश करतो.

त्या भक्ताचे लक्ष पूर्ण विषयासक्त असते ते परमेश्वराकडे वळवितो.  त्याच्या मनात आस्तिक्य बुद्धि निर्माण करून परमेश्वराच्या पूजन, भजन, कीर्तनामध्ये प्रीति निर्माण करतो.  त्यामुळे तो परमेश्वराच्या कर्मानुष्ठानामध्ये प्रवृत्त होतो.  याचा परिणाम म्हणजे त्याची परमेश्वरामध्ये अधिक श्रद्धा, निष्ठा निर्माण होते.  त्यामाधुनच ईश्वराविषयीची तळमळ तीव्र होते.  त्याचे मन सहजपणे भजनपूजानामध्ये एकाग्र होते.  तन्मय होते.  म्हणजेच विषयांच्यामधून निवृत्त होऊन अंतर्मुख होतो.  त्यामध्ये त्याला खूप आनंद व समाधान मिळते.

परमेश्वराच्या कृपेने त्याच्या मनात सत्संगाची इच्छा निर्माण होते.  सत्संगाच्या दृढ संस्कारामुळे आणि आचार्यांनी केलेल्या शास्त्रोपदेशामुळे विचारप्रवृत्त होऊन विषयदोषदर्शनामुळे विषयांचे खरे स्वरूप – अनित्यत्वं, दुःखित्वं, बद्धत्वं आणि मिथ्यात्वं – समजते.

श्रीगणेश अज्ञानी जीवांच्याप्रमाणे पाशाने बद्ध नसून तो मुक्त आहे.  यामुळेच तो भक्तांचा पाश नष्ट करणारा आहे.  बंधनातून मुक्त करणारा आहे.  म्हणून गणपतिसहस्त्रनामात ‘पाशविमोचक’ असे गणपतीस संबोधिले आहे.


- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ

Thursday, September 12, 2013

विघ्नहर्ता - अनर्थकारी संसारापासून रक्षण I Protection from Disastrous World




श्रोतारम् | - ‘जो श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने तुझ्या स्वरूपाचे श्रवण करतो, त्या तुझ्या भक्ताचे रक्षण कर. साधकाच्या जीवनामध्ये विषयांना आणि व्यवहाराला खूप महत्व असते आणि अशा अनेक विषयांच्यामध्ये आध्यात्मिक साधनेची लुकलुकणारी इच्छा असते.  त्यामुळे सर्व व्यावहारिक कर्तव्य संपल्यानंतर श्रवणादि साधना करू असे त्याला वाटते.  तो श्रवणाला विशेष महत्व देत नाही.  यासाठी त्याला अंतरिक निश्चयाची आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे.

अनेक प्रकारचे आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक संकटे आणि दु:खे एकामागून एक सतत येत असतात.  त्यांच्या प्रचंड आघातामुळे शास्त्रावरील श्रद्धा, परमेश्वरावरील निष्ठा डळमळीत होते. आत्मविश्वास उडून जातो.  जीवनात नैराश्य आणि वैफल्य येते. साधनेमध्ये उत्साह राहत नाही. मनाची एकाग्रता भंग पावते.  अशा वेळी मनुष्य नास्तिकवादाकडे झुकण्याची शक्यता असते.  अशा भक्तांचे मानसिक नैराश्यातून, वैफाल्यामधून रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे रक्षण म्हणजेच संकटकाळामध्ये दु:खांच्या आघातामध्ये ज्यावेळी साधक एकाकी पडेल, त्यावेळी त्याच्या श्रद्धेचे रक्षण झाले पाहिजे.  त्याचा आत्मविश्वास आणि धैर्य न खचता, जिद्दीने आणि धैर्याने, निराश न होता दु:खाच्या प्रसंगाला तोंड देण्याची अंतरिक शक्ति असणे आवश्यक आहे.  म्हणून जीवनामध्ये श्रद्धा ही अशी शक्ति आहे की, ती साधकामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य ढळू न देता उत्साहाने, प्रखर, दुर्दम्य आत्मविश्वासाने साधनेमध्ये, जीवनामध्ये पुढे नेते आणि सतत प्रेरणा देते.

सर्व श्रोत्यांचे रक्षण म्हणजे अशुभ आणि अनर्थकारी संसारापासून रक्षण होय.  हे गणपते !  तूच त्यांना आत्मस्वरूपाचे पारमार्थिक ज्ञान देऊन अनादिअविद्येचा ध्वंस करून मोक्ष प्रदान कर.  तू भक्तांना तुझ्या स्वरूपाप्रमाणे बनव.  थोडक्यात तुझ्या भक्तांना पूर्ण कर, तुप्त कर.  हेच त्यांचे रक्षण आहे.
 

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010



- हरी ॐ
 

Wednesday, September 11, 2013

विघ्नहर्ता - प्रतिबंधांच्यापासून रक्षण I Protection from Barriers

अव त्वं माम् |
 
श्रीगणेशाचा उपासक सर्व संकटांच्यापासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे, कारण साधनेतील सर्व प्रतिबंध संकटांच्याप्रमाणेच असतात.  हे प्रतिबंध मनामध्ये साधनेच्या प्रतिकूल वृत्ति निर्माण करून सन्मार्गापासून परावृत्त करतात.  श्रद्धा व निष्ठा डळमळीत करतात.  त्यामुळे साधनेतील सातत्य नाहीसे होते.  म्हणून ही प्रार्थना आहे.  साधनेमध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध येतात
 
पहिला प्रतिबंधबाह्य विषय मोह निर्माण करतात.  त्यामुळे सारासार विवेक नाहीसा होऊन मनुष्यामध्ये विषयांची कामना निर्माण होते.  मन बहिर्मुख होते.  विषयाची व्याकुळता, विक्षेप निर्माण होतात.  मनाची अत्यंत तडफड होते आणि मनुष्य विषय उपभोगण्यासाठी वेडा होतो.
 
दुसरा प्रतिबंध – आपले शरीर व इंद्रिये.  इंद्रिये इतकी बलवान आहेत की, ती पुन्हा पुन्हा शरीराला अस्वस्थ करून व्याकूळ करतात.  पुन्हा पुन्हा वैषयिक उपभोगामध्ये प्रवृत्त करतात.
 
तिसरा प्रतिबंध – अनेक जन्मांच्यामध्ये मनावर झालेले विषयांचे संस्कार इतके प्रभावी असतात की, शास्त्राचे श्रवण, मनन करीत असताना, अनेक प्रसंगांच्या अनुषंगाने विषयांच्या वृत्ति पुन्हा पुन्हा मनामध्ये उफाळून येतात.  मन विक्षेपयुक्त, द्वन्द्वात्मक होऊन क्षुब्ध होते.  मनाचा तोल जातो.  विवेक नाहीसा होतो.  दैवीगुणसंपत्तीचा तात्कालिक नाश झाल्यासारखा दिसतो.
 
चवथा प्रतिबंध – अहंकार मनुष्याला कधीही संपूर्ण समर्पण होऊ देत नाही.  उपासना करताना किंवा ज्ञानसाधना करताना अहंकाराची सतत जाणीव होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.
 
म्हणून तत्त्वजिज्ञासु साधक, उपासक विघ्नहर्त्या श्रीगणेशाला या सर्व प्रतिबंधांच्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करीत आहे.  तसेच ज्ञाननिष्ठेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानवैराग्यप्राप्तीसाठी व अंतःकरणशुद्धीसाठी प्रार्थना करतो.

- "श्री गणपति अथर्वशीर्ष" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, पंचम आवृत्ति, अनंत चतुर्दशी २०१०
- Reference: "
Shree Ganapati Atharvashirsha" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 5th Edition, 2010
 
 
 
 
- हरी ॐ