Tuesday, July 28, 2020

उपासनेची परीसमाप्ति | Culmination of Worship





आपण नाम उपासना, रूप उपासना आणि गुण उपासना पाहिली.  थोडक्यात उपासना म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याचे साधन होय.  आपण मागे व्याख्या केली होती –
उपासनं नाम यथा शास्त्रं उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन समीपम् उपगम्य तैलधारावत् समानप्रत्ययप्रवाहेण दीर्घकालं यत् आसनं तत् उपासनं आचक्षते |   उपासना म्हणजेच उपास्य विषयाची बरहुकुम वृत्ति निर्माण करणे.  दीर्घकाळ तेलाच्या धारेप्रमाणे सजातीय वृत्तिप्रवाह निर्माण करून स्थिर, स्वस्थ राहणे म्हणजे उपासना होय.  

शास्त्रकार एके ठिकाणी दृष्टांत देतात – ज्याप्रमाणे, धरणामध्ये पाण्याचा साठा केलेला असतो.  धरणाचे पाणी विशिष्ट पातळीपर्यंत आले की ते धरणाच्या दारांमधून सोडले जाते.  धरणाच्या खिडक्या उघडल्यानंतर ज्या आकाराची खिडकी असेल, बरोबर तोच आकार पाण्याला प्राप्त होतो.  तसेच उपासनेच्या साहाय्याने साधकाची वृत्ति परमेश्वर स्वरूपाची होते.  उपासनेने साधक ईश्वराच्या जवळ जातो.  त्याचे मन विषयांच्यापासून पूर्णतः निवृत्त होते.  तेच मन शुद्ध आणि एकाग्र होते.  Simple mind is the pure, mature mind.  Pure mind is single pointed mind.  त्याच मनामध्ये निस्तरंग, नीरव शांतीचा अनुभव येतो.  तो साधक स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्थ होतो.  अंतरंगामधून परिपूर्ण, कृतकृत्य होतो.  

त्यालाच अनुभूति येते –
आनंदाचे डोही आनंद तरंग | आनंदचि अंग आनंदाचे ||
साधक आणि आनंद दोन भिन्न न राहता साधक स्वतःच आनंदस्वरूप होतो.  यामध्येच उपासनेची परिसमाप्ति होते.  या अवस्थेमध्ये उपासना संपते.  उपासक आणि उपास्य देवता यांचाही निरास होतो.  सर्व साधना संपते.  राहते ते शांत चैतन्यस्वरूप !  ही अवस्था प्राप्त करणे हेच उपासनेचे प्रयोजन आहे.  यासाठीच प्रत्येक साधकाने क्रमाने नामउपासना, रूपउपासना आणि गुणउपासना करावी.      



- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011



- हरी ॐ

Tuesday, July 21, 2020

साधूंचे ज्ञान, धन, बल | Knowledge, Wealth, Power of Saints




साधु, सज्जन पुरुष ज्यावेळी विद्या प्राप्त करतात ती विद्या यश, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ति, सत्ता, मान, सन्मान मिळविण्यासाठी नसून केवळ तत्त्वजिज्ञासा पूर्ण करण्यासाठी असते.  या विद्येमुळे असुरीगुणसंपत्तीचा नाश होतो.  असत्प्रवृत्तींचा, अधर्मप्रवृत्तीचा नाश होतो.  ही विद्या त्या पुरुषाला योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, सत्-असत् याचे स्पष्ट ज्ञान देते.  

जे जे आपणासी ठावे |  ते ते दुसऱ्यासी सिकवावे |  
शहाणे करून सोडावे |  सकळ जन ||   (दासबोध)
हीच ज्ञानी पुरुषांची प्रवृत्ति असते.  म्हणून ज्ञान हेच त्या ज्ञानी पुरुषाचे सामर्थ्य, बल असते.  ज्ञान हीच त्याची संपत्ति, ज्ञान हेच त्याचे शस्त्र असते.  जीवनामध्ये कितीही मोठी संकटे, प्रतिबंध, आघात झाले तरीही ज्ञानाच्या सामर्थ्याने त्यामधून तो पार होतो, सर्व प्रसंगांना सामोरे जाण्यास तो सदैव सज्ज असतो.  हे सामर्थ्य विद्येचे आहे.  विद्येने सामर्थ्य प्राप्त होते.  हे सामर्थ्य क्षणिक नसून टिकणारे असते.  

सज्जनांचे धन हे उपभोगण्यासाठी नसून ते दानासाठी असते.  साधु पुरुष धनाचा उपयोग स्वतःचा स्वार्थ, कामनापूर्तीसाठी न करता त्या धनाचे गरिबांना दान करतात, कारण साधूंचे सर्व जीवन त्यागमयच असते.  इतकेच नव्हे तर सज्जन लोक आपल्या शारीरिक बळाचा वापर सुद्धा दुसऱ्यांच्या रक्षणासाठीच करतात.  

अशा प्रकारे साधु पुरुषांचे सर्व प्रकारचे बळ हे सात्त्विक, सत्त्वगुणप्रधान असल्यामुळे धर्मसंस्थापना, धर्माचा प्रचार, प्रसार, सद्गुणांची जोपासना यासाठीच त्याचा उपयोग होतो.  साधूंचे बळ हे कामरागविवर्जित असते.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998



- हरी ॐ


Tuesday, July 14, 2020

सूत्र व मणि | Thread and Beads




सामान्यतः स्थूल बुद्धीला निश्चितपणे सूत्र व मणि यामध्ये आधार-आधेय संबंधाने भेद दिसतो, कारण स्थूल बुद्धीचे, प्राकृत बुद्धीचे लोक कधीही सूक्ष्म विचार न करता जे डोळ्यांना दिसते तेच सत्य मानतात.

ज्याप्रमाणे आपण एखाद्या कापडावर विणतो.  त्या कापडावर डोंगर, सूर्य, पक्षी, वृक्ष, नदी, दगड, मंदिर इतकेच नव्हे तर या सर्वांना पाहाणारा एखादा माणूस, स्त्री, लहान मुलेही काढतो.  हे सर्व इतके हुबेहुब, सुंदर काढतो की, दिसताना माणूस जणु काही जिवंत दिसतो.  वृक्ष हालताना दिसतो.  मात्र दगड दगडासारखाच अचेतन वाटतो.  वास्तविक हे सर्व एकाच धाग्यामधून विणतो.  एकच धागा त्या सर्व भिन्न-भिन्न नामरूपांच्यामधून अनुस्यूत होतो.  एकाच धाग्यामध्ये अनेक नाम, रूप, एक चेतन, एक अचेतन निर्माण करतो.  डोळ्यांना या सर्वांच्यामध्ये भेद दिसतो.  परंतु बुद्धीला मात्र त्या सर्वांच्यामध्ये ओतप्रोत, अनुस्यूत जाणारा धागा दिसतो.  त्या धाग्याचे शेवटचे टोक ओढले की, आपोआपच सर्व दृश्य त्या धाग्यामध्येच विरून जाते.  त्याचप्रमाणे हे विश्वही परमेश्वरामध्येच अनुगत आहे.  

एखाद्या वस्त्रावर अनेक चेतन-अचेतन वस्तु काढल्या असतील तरी त्या सर्वांना वस्त्र हेच अधिष्ठान असते.  म्हणून त्या पटावरील चित्रांच्याप्रमाणेच ब्रह्माजीपासून स्तंबापर्यंत सर्व प्राणिमात्र तसेच सर्व जड पदार्थ सुद्धा परमात्मस्वरूपामध्येच आश्रित असतात.  समुद्र म्हणजे पाणी पाहिले तर त्या दृष्टीमध्ये लय, तरंग, फेस, बुडबुडे हे भेद दिसत नाहीत.  कारणाच्या दृष्टीमध्ये कार्याची, द्वैताची दृष्टि विरून जाते.  

या सर्व दृष्टांतांच्यामधून सिद्ध होते की, नामरूपादि हे सर्व कल्पित मिथ्या, भासात्मक भेद आहेत.  परंतु या सर्व कल्पित, मिथ्या, भासात्मक, नामरूपांचे अधिष्ठान मात्र एकच आहे.  त्यामुळे सूत्र व मणि यामध्ये वास्तविक रूपाने भेद नाही.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ


Tuesday, July 7, 2020

परा प्रकृति | Superior Existence




परा प्रकृति शुद्ध स्वरूपाची चेतानात्मक असून तीच अपरा प्रकृतीचे पोषण करून तिला सत्तास्फूर्ति प्रदान करते.  म्हणून ती श्रेष्ठ, उत्कृष्ठ आहे.  परमात्म्याने या अष्टधा प्रकृतीने युक्त असलेल्या सर्व नामरूपांच्यामध्ये, उपाधींच्यामध्ये जीवस्वरूपाने प्रवेश केला.  म्हणजेच ते सच्चिदानन्दस्वरूप परब्रह्म जीवस्वरूपाला, क्षेत्रस्वरूपाला प्राप्त झाले.  असा हा क्षेत्रज्ञस्वरूप असणारा जीव म्हणजेच परा प्रकृति होय.  
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी | नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् || (गीता अ. ५-१३)
सर्व कर्मांचा मनाने सन्यास घेऊन नवद्वाररूपी शरीरामध्ये अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहातो.  तो स्वतः काहीही करीत नाही आणि प्रकृतीलाही कर्मप्रवृत्त करीत नाही.  

अपरा प्रकृति                                परा प्रकृति
सूक्ष्म पंचमहाभूते, शरीर                अंतःकरण
जड, अचेतन                                सचेतन
रजोगुण व तमोगुणप्रधान               सत्त्वगुणप्रधान
अशुद्ध                                         शुद्ध
मलिनसत्त्वमाया                           शुद्धसत्त्वमाया
‘इदं’ प्रत्ययगोचर                         ‘अहं’ प्रत्ययगोचर
क्षेत्रस्वरूप                                   क्षेत्रज्ञस्वरूप
दृश्यस्वरूप                                  द्रष्टास्वरूप
नानात्व-अनेकत्व                           एकत्व

म्हणून अशी ही अत्यंत शुद्ध, सत्त्वगुणप्रधान चेतनात्मिक पराप्रकृति अपरा प्रकृतीला उपजीव्य आहे.  म्हणजेच परा प्रकृतीमुळे अपरा प्रकृतीमधून निर्माण झालेले हे विश्व धारण केले जाते.  ही चेतनात्मिक परा प्रकृति अपरा प्रकृतीच्या म्हणजेच उपाधींच्या आत अंतरंगामध्ये निवास करते आणि सर्व विश्वाला म्हणजे सर्व व्यापारांना धारण करते.  म्हणजेच पोषण, वर्धन, रक्षण करते.  परा प्रकृति अपरा प्रकृतीला सत्ता, स्फूर्ति तर देतेच आणि अपरा प्रकृतीचे पोषण, वर्धन व रक्षणही करते.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, खंड ४, प्रथमावृत्ति - मार्च १९९८
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, Volume 4, 1st Edition, March 1998


- हरी ॐ