Sunday, December 29, 2019

विद्यारंभी मंगलाचरण | Making an Auspicious Beginning




व्यवहारामध्ये छोटे कार्य जरी असेल, तरी परमेश्वराचे आवाहन केले जाते.  गाडीचालक सुद्धा प्रथम गाडीच्या चक्राला नमस्कार करतो, उदबत्ती लावतो, म्हणजेच परमेश्वराचे आवाहन करतो.  किंवा कोणत्याही दुकानामध्ये दुकानदार प्रथम उदबत्ती ओवाळतो.  या सर्व कृतींच्या मागे परमेश्वराबद्दलची श्रद्धा आणि सुसंस्कार आहेत.  “हे भगवंता ! मी जे काही आज करेन, ते माझे कर्तृत्व नाही.  याच्यामागे तुझे आशीर्वाद, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आवश्यक आहे.  तरच जीवनात मी काही मिळवू शकेन.  साधे आज झोपून मी उद्या उठत असेन तर ही सुद्धा तुझीच कृपा आहे.”  हाच श्रद्धावान मनुष्याचा भाव असतो.  

आपल्या जीवनामध्ये भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.  व्यावहारिक जीवनामध्ये तर आहेच.  परंतु त्याहीपेक्षा साधकाच्या, शिष्याच्या, भक्ताच्या जीवनामध्ये परमेश्वराचे स्थान सर्वोच्च आहे.  ईश्वराच्या अनुग्रहानेच अंतःकरणामध्ये ज्ञानजिज्ञासा उदयाला येते.  या आध्यात्मिक ज्ञानामध्ये सुद्धा जिज्ञासु साधक परमेश्वराला प्रसन्न करवून घेण्यासाठीच, त्याचे आशीर्वाद, कृपा, अनुग्रह प्राप्त करण्यासाठीच परमेश्वराची अनन्य भावाने प्रार्थना करतो.  हीच मनाची खरी सुसंस्कृतता आहे.  ही ज्ञानसाधना अखंडपणाने, सातत्याने होण्यासाठी साधकाला भगवंताचे आशीर्वाद आवश्यक आहेत.  

साधकाच्या मनामध्ये ज्ञानजिज्ञासा उत्पन्न होणे, साधना करण्यासाठी अनुकूल असणारे मनुष्यशरीर प्राप्त होणे, सद्गुरूंची प्राप्ति होणे, शास्त्राचे श्रवण करायला मिळणे ही सर्व त्या भगवंताचीच अनंत व अपार कृपा आहे.  ही कृपा डोळ्यांना दिसत नाही तर विचाराने, बुद्धीने अंतःकरणामध्ये अनुभवायला येते.  यासाठीच परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी साधक याठिकाणी उपनिषदाचे अध्ययन करण्यापूर्वी मंगलाचरण करतो.  

विद्येचा आरंभ करणे हा जीवनामधील सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो.  विद्यारंभ करण्यापूर्वी गुरु आणि शिष्य दोघे मिळून मंगलाचरण करतात, भगवंताचे आवाहन करतात, कारण गुरु जरी आज शिकवीत असतील, तरी ते गुरु सुद्धा एके काळी शिष्य होते.  ते सुद्धा आपल्या गुरूंच्या, शास्त्राच्या प्रति आदर दर्शविण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मंगलाचरण करून स्वतःच्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ

Tuesday, December 24, 2019

उपनिषद – निश्चयात्मक ज्ञान | Upanishad – Definitive Knowledge




उपनिषद् ठामपणाने सांगते की, या ज्ञानाचे फळ हे निश्चयात्मक मिळालेच पाहिजे.  उपनिषद् सम्यक् आणि यथार्थ ज्ञान देते.  सम्यक् ज्ञान म्हणजेच संशयविपर्ययरहित ज्ञान होय.  दोरी आणि साप दोन्ही दिसल्यावर – तेथे नक्की दोरी आहे की साप आहे ?  ही शंका, गोंधळ असणे याला म्हणतात ‘संशय’.  दोरीवर साप दिसणे याला ‘विपर्यय’ म्हणतात.  याप्रकारे संशय आणि विपर्यय हे दोन्हीही नसणे म्हणजेच संशयविपर्ययरहित ‘सम्यक्’ ज्ञान होय.  यानंतर यथार्थ ज्ञान म्हणजे काय ?  ते सांगतात –
अर्थम् अनुसृत्य यद् ज्ञानं तत् यथार्थज्ञानम् |
जे ज्ञान अर्थाला म्हणजेच विषयाला अनुसरून असते, त्याला ‘यथार्थ’ ज्ञान असे म्हणतात.  

समजा, गुलाबाचे फूल असेल तर ज्ञान गुलाबाच्या फुलाप्रमाणे झाले पाहिजे.  का बरे ?  कारण ज्ञान हे वस्तूवर अवलंबून आहे.  पाहणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून नाही.  जर मला गुलाबाचे फूल दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा गुलाबाचेच फूल दिसले पाहिजे.  एखादा विद्वान असेल व एखादा मूर्ख असेल, तरी दोघांना ही एकच ज्ञान होईल.  एखादा बुद्धिमान मनुष्य काहीतरी वेगळे सांगायचे म्हणून “ते जास्वंदीचे फूल आहे” असे म्हटला तर तो विद्वान नाही, मूर्ख आहे.  कारण – ज्ञानं न पुरुषतंत्रत्वात् |  

यावरून ज्ञान हे ज्ञात्याच्या इच्छेवर अवलंबून नाही.  वक्त्याच्या, श्रोत्याच्या इच्छेवर अजिबात अवलंबून नाही.  म्हणून शास्त्र तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला मान्य होवो किंवा न होवो, शास्त्र हे वस्तुवर अवलंबून आहे.  शास्त्र इतके निश्चयात्मक आहे, निर्णयात्मक आहे की, जगामध्ये कोणीही शास्त्राचे खंडन करू शकत नाही.  प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी तो सुद्धा शास्त्राचे खंडन करू शकणार नाही.  म्हणून शास्त्राची फक्त दृष्टि समजली पाहिजे.  शास्त्राला मनुष्याच्या बुद्धीप्रमाणे मर्यादा नाहीत.  राग-द्वेष, आवड-नावड शास्त्रामध्ये येऊ शकत नाही, कारण शास्त्र हे अपौरुषेय आहे.  म्हणून ‘नि’ या उपसर्गातून सूचित केले की, उपनिषद् हे प्रमाणभूत निश्चयात्मक ज्ञान घेण्याचे साधन आहे.  



- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ


Wednesday, December 18, 2019

मायेची प्रबलता | The Power of ‘Maya’ – Illusion





शास्त्रकार मायेची व्याख्या करतात – अघटितघटना पटीयसी माया |  जे अशक्य आहे, ते शक्य करण्याची शक्ति मायेमध्ये आहे.  जसे जादुगार जादूचे प्रयोग करीत असताना प्रेक्षकांना जे नाही ते काढून दाखवितो व जे खरोखरच आहे, ते डोळ्यांना दिसत नाही.  तशीच मायेची अलौकिक शक्ति आहे.  मायाच विश्वनिर्मिती करते.  मायाच सर्व जीवांची निर्मिती करून जीवांना जन्मानुजन्मे आपल्या चक्रामध्ये बद्ध करते.  

पुराणामध्ये खूप सुंदर गोष्ट आहे.  नारदमहर्षि एकदा भगवंतांना मायेविषयी प्रश्न विचारतात. “माया ही अलौकिक, अनाकलनीय, दुस्तर आहे.  मोठमोठे ज्ञानी लोकही मायामोहीत होतात.  मी तर आपला अनन्य भक्त आहे.  त्यामुळे मला माया कधी दिसलीच नाही. पण मला मायेचे स्वरूप समजावून घेण्याची इच्छा आहे.”  यावर भगवान गूढ हसतात.  

एकदा नारदमहर्षि एका नदीमधून पाणी आणण्यास जातात.  पाण्याचा स्पर्श होताक्षणीच त्यांना एकदम सुंदर स्त्रीरूप प्राप्त होते.  तिथे समोर एक सुरूप राजा त्या स्त्रीरूप नारदांना दिसतो.  दोघांचा विवाह होतो.  संसार प्रारंभ होतो.  सर्वसामान्य संसारी माणसाप्रमाणेच त्यांना मुले होतात.  संसार वाढतो.  स्त्रीरूपामधील नारदमहर्षि सर्व गृहोचित कर्मे करण्यात गढून जातात.  पती-मुले-आप्त-भोग-नातू या सर्वांच्यामध्ये आसक्त होऊन रममाण होतात.  यामध्ये किती वर्षांचा काळ लोटला, हेही समजत नाही.  एकदा अचानक त्या राजाच्या राज्यावर शत्रू आक्रमण करतात.  राजाचा पराभव होतो.  राजाची सर्व मुले युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त होतात.  त्यांचे क्रियाकर्म करण्यासाठी स्त्रीरूपातील नारदमुनि त्याच नदीच्या काठी येतात.  पाण्याचा स्पर्श होतो.  तत्क्षणी नारदांना पुन्हा पूर्ववत् पुरुषाचे, नारदमुनींचे रूप प्राप्त होते.  इथेच कथा संपते.  

हा सर्व प्रकार पाहून नारदांना आश्चर्य वाटते.  समोर भगवान उभे असतात.  नारदमहर्षि प्रश्न विचारतात – प्रभो !  हे सर्व काय आहे ?  भगवान हसून उत्तर देतात, “नारदा !  ही सर्व माया आहे.  हा सर्व मायेचा प्रभाव आहे.”  नारदांना समजायचे ते समजते.  म्हणुनच आचार्य आदेश देतात – ब्रह्मपदं त्वं प्रविश विदित्वा |  हे मूढबुद्धि मनुष्या !  हे सर्व मायाजन्य, मायाकार्य, अनित्य आहे, असे जाणून तू ब्रह्मस्वरूपामध्ये प्रवेश कर.  बाह्य, मायिक विषयांच्या आसक्तीमधून तू पूर्णतः निवृत्त हो, याचे कारण मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, December 10, 2019

संतत्व काय असते ? | What is Sainthood ?




भगवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात –
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थमनोगतान् |
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ||                   (गीता अ. २-५५) 

हे अर्जुना !  जेव्हा अंतःकरणामधील सर्व कामनांचा, वासनांचा निःशेष त्याग होऊन तो पुरुष स्वतःच स्वतःच्या स्वरूपाने स्वतःमध्येच पूर्ण तृप्त, संतुष्ट होतो.  त्याच्या मनामध्ये एकही वासना शिल्लक राहत नाही, तोच स्थितप्रज्ञ पुरुष, ज्ञानी पुरुष आहे.  त्यालाच संत असे म्हणावे.  

म्हणून संत ही अंतरंगाची परमोच्च अवस्था आहे.  संत किंवा गुरु बनता येत नाही.  संत जन्मालाच यावे लागतात.  संत ही वृत्ति उदयाला यावी लागते.  घरदार सोडणे सोपे आहे.  अनेक तरुण मुले-मुली आश्रमात येतात.  सांगतात – खूप अध्यात्माची आवड आहे हो !  घर सोडले, आई-वडिलांना सोडले, नोकरी सोडली, आता आम्हाला अध्यात्म करायचे आहे.  त्यांना वाटते की, वेष बदलला, कपडे बदलले, कपाळाला गंध लावले, एक भजन म्हणून नाचलो, की आपण आध्यात्मिक झालो, साधु झालो.  परंतु ही चुकीची समजूत आहे.  संतत्व म्हणजेच सर्व कामनांचा त्याग, प्रखर वैराग्य.  संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज सांगतात –
संतत्व नाही कवित्वात | संतत्व नाही विद्वत्तेत |
संतत्व नाही मठात | तेथे स्वानुभव पाहिजे ||                  (श्री गजाननविजय)

संत ही अंतरंगाची अवस्था आहे.  त्यासाठी मन खूप विशाल व शुद्ध झाले पाहिजे.  संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सांगतात – देव पाहावयासी गेलो देव होऊनिया ठेलो ||  देव-ईश्वर शोधण्यासाठी मी प्रयत्न केला.  देवाला पाहण्याचा प्रयत्न केला.  परंतु देव पाहता-पाहता मी स्वतःच देवस्वरूप झालो.  देवस्वरूप यथार्थ जाणणे म्हणजे स्वतःच देवस्वरूप होणे होय.  साधकाला ईश्वराच्या व गुरूंच्या कृपेने यथार्थ व सम्यक् ज्ञानाची प्राप्ति होऊन ज्ञानाची साक्षात् अनुभूति येते.  त्याला सर्वच ठिकाणी परमेश्वराची सत्ता, अस्तित्व याची जाणीव होते.  


- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015




- हरी ॐ



Tuesday, December 3, 2019

सत्संगाचे परिणाम | Effects of Satsang



सत्संगामध्ये गेल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल होतो.  आपले बहिरंगाचे आचार बदलतात.  चांगले-वाईट, धर्म-अधर्म, नीति-अनीति, पाप-पुण्य यांचे स्पष्ट ज्ञान झाल्यामुळे मनुष्य अधर्मापासून, दुष्टाचारापासून निवृत्त होतो.  तो धर्माचरणाचे, सदाचाराचे जीवन जगू लागतो.  त्याचे विचारही बदलतात.  आपण चांगले वागावे, आपले जीवन चांगले व्हावे, असे त्याला मनापासून वाटते.  त्यामुळे त्याच्या मनामध्ये लगेचच चांगले बदल होतात.  मनामधील विषयांचा, विषयवासनांचा प्रभाव कमी-कमी होतो.  मनामध्ये वैराग्याची वृत्ति उदयाला येते.  मन भोगांसाठी व्याकूळ होत नाही.  इंद्रिय सुद्धा काही प्रमाणात संयमित होतात.  

मनामधील काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सरादि विकार कमी होऊन मन अधिक शुद्ध, सात्त्विक, अंतर्मुख होते.  या मनामध्ये श्रद्धा, सेवा, त्याग, समर्पण, भक्ति, अमानित्वादि दैवी गुणांचा उदय होतो.  मनुष्याचे जीवन धर्मपरायण, ईश्वरपरायण होते.  त्याचवेळी तो खऱ्या अर्थाने साधक होतो.  गुरूंनी उपदेश केलेल्या अनेक साधना तो साधक मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने व निष्ठेने करू लागतो.  

खरे तर पूर्वी सुद्धा आपण पूजा-अर्चनादि करतच होतो.  परंतु ते सर्व यंत्रवत्, करायचे म्हणून करत होतो.  मात्र सत्संगामध्ये गेल्यानंतर श्रावणामधून ईश्वराच्या सगुण-निर्गुण स्वरूपाचे ज्ञान होते.  त्यामुळे ईश्वराच्या सगुण रूपाची गोडी वाटायला लागते.  पूजेमध्ये प्रेमाचा, भक्तीचा भाव जागृत होतो.  मग पूजादि कर्मांच्यामध्ये आनंद वाटतो.  त्यामुळे पूजा-जप-जाप्य-व्रतवैकल्य-उपवास-उपासना-तपश्चर्या-नामस्मरण या सर्व साधनांच्यामध्ये सातत्य निर्माण होते.  श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्तीचे वर्णन केले आहे.  साधकाने गुरुमुखातून ईश्वराचे स्वरूप श्रवण करावे.  कीर्तन, स्मरण, चरणसेवा, अर्चना, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व सर्वात शेवटी स्वतःमधील अहंकार ईश्वरचरणी पूर्णतः समर्पण करणे, अशा या साधना आहेत.  

सत्संगाच्या प्रभावामुळे, गुरूंच्या आशीर्वादामुळे साधक या सर्व साधना सातत्याने करतो.  त्याच्या मनामधून मोहाची निवृत्ति होते.  विषयांचे व भोगांचे पूर्वीइतके आकर्षण राहत नाही.  ईश्वरावरील व गुरूंच्यावरील श्रद्धा दृढ व नितांत होते.  साधक गुरूंना ईश्वरस्वरूपच मानून गुरुसेवा करतो.  गुरुसेवा हेच त्याचे जीवन होते.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हेच ज्ञान, गुरु हीच सेवा, गुरु हीच साधना, असे त्याचे जीवन गुरुमय होते.  

- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ


Tuesday, November 26, 2019

सत्संग म्हणजे नेमके काय? | What Exactly is ‘Satsang’?



सत्संग म्हणजे नेमके काय ?  साधु कुणाला म्हणावे ?  संत कुणाला म्हणावे ?  साधूंना कसे ओळखावे ?  कारण समाजामध्ये तर अनेक माणसे आहेत.  साधूंचा वेष घेतलेली अनेक माणसे दिसतात.  मग केवळ बाह्य वेषावरून भगवे कपडे, पांढरे कपडे किंवा रुद्राक्षांच्या माळा यावरून त्याला साधु समजावे का ?  कलियुगामध्ये पाखंडी, ढोंगी, लोकांनी या साधुवेषाचा आश्रय घेऊन साधूंच्या वस्त्राचा अक्षरशः अपमान केला आहे.  ‘साधु’ या शब्दालाच बदनाम केले आहे.  त्यामुळे समाजाचा ‘साधु’ या शब्दाकडे पाहाण्याचाच दृष्टीकोन बदलला आहे.  यासाठीच ‘साधु’ म्हणजे कोण हे प्रथम समजावून घेतले पाहिजे.

वेदांच्यामध्ये ‘संत’ शब्दाची व्याख्या केली आहे.
अस्ति ब्रह्मेति चेत् वेद सन्तमेनं ततो विदुरिति           (तैत्ति. उप.)
जो जो या विश्वामध्ये “ईश्वर आहे” असे निश्चितपणे जाणतो, ज्याची सत्स्वरूप असणाऱ्या ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे, त्याला ‘संत’ असे म्हणावे.  म्हणून संत म्हणजे बाह्य वेष नव्हे, संत आपल्याला बहिरंगाने दिसत नाहीत.  आपण डोळ्याने माणसे पाहू शकतो.  हा चांगला माणूस, हा वाईट माणूस असे म्हणू शकतो.  परंतु हा संत असे डोळ्याने पाहू शकत नाही.  तर आपल्याला अंतःकरणामध्ये त्याच्या संतत्वाची, साधुत्वाची प्रचीति येते.  मनामध्ये अनुभव येतो.  महापुरुषांमधील दिव्यत्व, अलौकिकत्व हे डोळ्यांना दिसत नाही.  शरीराने किंवा इंद्रियांनी अनुभवता येत नाही.  तर शुद्ध अंतःकरणामध्ये त्याची प्रचीति येते.

ज्यावेळी आपल्याला एखाद्या स्थानामध्ये खऱ्या साधुत्वाची प्रचीति येते, तेव्हा त्या स्थानाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धेचा भाव उदयाला येतो.  तिथेच आपण नतमस्तक होतो.  आपली बुद्धि तिथे विनयशील, शरणागत होते.  त्याचवेळी आपल्या जीवनामध्ये ते गुरूस्थान बनते.

यामुळे गुरु ही एक व्यक्ति नाही, गुरु हे एक मर्त्य शरीर नाही, गुरु हे नातेही नाही किंवा गुरु हा समाजातील अन्य माणसाप्रमाणे एक माणूस नाही.  तर गुरु हा अंतःकरणामध्ये उदयाला आलेला भाव आहे.  जीवनामध्ये असा गुरुभाव उदयाला येणे अत्यंत दुर्लभ आहे व गुरु मिळणे ही दुर्लभ आहे. 
  

- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, November 19, 2019

तुमचा परिचय काय? | Introduce Yourself




खरे तर “मी काय आहे ?”  हे मला चांगले माहीत असते.  “तुम्ही कोण आहात ?”  असा प्रश्न विचारल्या नंतर आपण आपले नाव सांगतो, गाव सांगतो, पत्ता सांगतो, जास्तीत जास्त धर्म, जात, पंथ, वर्ण, आश्रम, लिंग सांगतो. याच्या व्यतिरिक्त आणखी दोन चार पदव्या सांगतो.  “मी पी.एच.डी. आहे.” एखादा म्हणेल की, “मी डबल पी.एच.डी. आहे. मी भारतरत्न आहे.”  मी नात्याच्या अनुषंगाने काही वेळेला उत्तर देईन की, “मी आई आहे किंवा वडिल आहे.”  

जर आपल्याला एक क्षणभर सांगितले की, “बाह्य कशाचाही आधार न घेता तुम्ही कोण आहात ?  हे सांगा.”  यावर आपल्याला काहीही उत्तर देता येत नाही.  त्यावेळी समजते की, अजूनपर्यंत कधीही मी ‘मी’ चा विचारच केलेला नाही.  मी म्हणजे कोण ?  माझे खरे स्वरूप काय ?  याविषयी ज्ञान देणारी विद्या म्हणजे उपनिषद् होय.  साधकाला उपनिषद् विचारप्रवृत्त करते.  आचार्य शिष्याला प्रश्न विचारतात – “ तू कोण आहेस ?  तू कोठून आलास ?  हे विश्व काय आहे ?  हे विश्व कोठून निर्माण झाले ?”  हा विचार कर.  

बुद्धिमान मनुष्य – ‘मी’ कोण आहे ?  याचा स्वतःच विचार करू लागेल.  परंतु तो तासन् तास, वर्षानुवर्षे, जन्मानुजन्मे ‘मी’ चा जरी विचार करीत राहिला तरी त्याला ‘मी’ चे यथार्थ स्वरूप समजणे शक्य नाही, कारण आचार्य सांगतात –
पण्डितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणं न कुर्यात् |           (शांकरभाष्य)   
एखादा पंडित, विद्वान मनुष्य असेल, तरी त्याने सुद्धा ब्रह्माचा शोध स्वतंत्रपणे घेऊ नये.  स्वबुद्धिप्रमाण ठेवून केलेला शोध व्यर्थ ठरतो.

संत कबीर म्हणतात – लहर ढूंढे लहर को कपड़ा ढूंढे सूत | जीव ढूंढे ब्रह्म को तीनों ऊत के ऊत ||
 जर कापड सुताला शोधत असेल, लाट पाण्याला शोधत असेल, तसाच जर मी ‘मी’ ला स्वतंत्रपणे शोधायला लागलो तर जन्मभर मला शोध लागणार नाही.  

म्हणून हा ‘मी’ चा शोध घेण्यासाठी “तू उप म्हणजे जवळ जा.”  कोणाच्या जवळ ?  तर ज्यांना ‘मी’ चे स्वरूप यथार्थ समजलेले आहे, अशा श्रेष्ठ पुरुषांजवळ जा.  ते आत्मस्वरूप जाणण्यासाठी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंच्याकडेच गेले पाहिजे.  


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ


Tuesday, November 12, 2019

अत्यंत समीप कोण आहे? | Who is the Nearest?




अत्यंत समीप असणाऱ्या विषयाचे ज्ञान जर उपनिषद् देत असेल तर मग मला सर्वात अधिक जवळ कोण आहे ?  आपल्या जवळ अनेक विषय आहेत.  कधी कधी आपल्याला विश्व सुद्धा जवळ वाटते.  विश्वामध्ये अनेक खंड आहेत.  त्यामध्ये आशिया खंड आपल्या आणखी जवळ, त्याच्यामध्येही भारत देश आपल्याला जवळ, त्याच्यामध्ये सुद्धा आपले स्वतःचे महाराष्ट्र राज्य जवळ, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले शहर, शहरामध्येही आपले घर जवळ, घरामध्ये माणसे जवळ, त्यापेक्षा माझी वस्त्रे आणखी जवळ, वस्त्रांच्या अनुषंगाने शरीर जवळ, शरीराच्या अनुषंगाने इंद्रिये, नंतर प्राण, नंतर मन, नंतर बुद्धि, नंतर चित्त, नंतर अहंकार माझ्या अगदी जवळ आहे.  

त्याच्यानंतर माझ्या अत्यंत जवळ कोण ?  फक्त ‘मी’ माझ्या अत्यंत जवळ आहे, कारण ‘मी’ आणि ‘मी’ यांच्यामध्ये अजिबात – तसूभर सुद्धा अंतर नाही.  म्हणून ‘मी’ मीच्या अत्यंत जवळ आहे आणि त्या अनुषंगाने अन्य सर्व विषय माझ्यापासून अत्यंत दूर आहेत.  

म्हणून व्यवहारामध्ये दूर आणि जवळ हे सापेक्षित शब्द आहेत.  एका वस्तूच्या अनुषंगाने एखादी वस्तु जवळ होते, परंतु तीच वस्तु दुसरी वस्तु मध्ये आल्यामुळे ज्या वस्तूला मी एका क्षणापूर्वी जवळ म्हटले होते, तीच वस्तु दुसऱ्याच क्षणी दूर होते.  याप्रकारे क्रमाने मीमांसा केली तर समजते की, माझ्या सर्वात जवळ फक्त ‘मी’ आहे आणि उपनिषद् दूरच्या वस्तूचे ज्ञान देत नाही.  

‘मी’ शिवाय जे जे काही जगामध्ये आहे, त्याचे ज्ञान द्यायची गरजच नाही.  त्याचे ज्ञान देणारी अन्य भरपूर शास्त्रे आहेत.  अॅनॉटॉमी, फिजीऑलॉजी, सायकॉलॉजी, वगैरे वगैरे.  परंतु उपनिषद् या शब्दामधील ‘उप’ या उपसर्गामधून सूचित होते की, उपनिषद् हे अन्य ज्ञान देत नसून ‘मी’चे ज्ञान देते.  म्हणून उपनिषद् ही सर्वश्रेष्ठ असणारी विद्या आहे.


- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ