Tuesday, March 26, 2024

प्रारब्धाचा पुरुषार्थासाठी उपयोग | Using Fate for Duty


मनुष्य जीवनामध्ये एका बाजूला आहे प्रारब्ध !  आणि दुसऱ्या बाजूला आहे पुरुषार्थ !  प्रारब्ध समोर आल्यानंतर ते टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे जे येईल त्याला आनंदाने सामोरे जाणे हाच मनुष्याचा खरा पुरुषार्थ आहे.  म्हणून मनुष्य विवेकाच्या साहाय्याने, इच्छाशक्तीने जे जे कर्तृत्व करतो ती सर्व कर्म म्हणजेच त्याने केलेला पुरुषार्थ आहे.

 

मनुष्यामध्ये मात्र जन्मतःच अत्यंत अलौकिक विवेकशक्ति असते.  या बुद्धीच्या साहाय्याने योग्य-अयोग्य, कर्तव्य-अकर्तव्य याचा योग्य निर्णय घेऊन मनुष्याला स्वतःच्या जीवनाचा विकास करता येतो.  म्हणून बहिरंगाने अन्य प्राण्यांच्याप्रमाणेच मनुष्याला शरीर, इंद्रिये जरी असतील, तरी विधात्याने त्यांना अत्यंत दुर्मिळ अशी असणारी विचारशक्ति प्रदान केलेली आहे.  या शक्तीमुळेच मनुष्याला प्रारब्धाबरोबरच पुरुषार्थ करण्याची एक संधी मिळालेली आहे.

 

मनुष्याने प्रारब्ध भोगत असताना पुरुषार्थ करावा.  प्रारब्ध व पुरुषार्थ हे एकमेकांच्या विरोधी नाहीत.  किंवा प्रारब्धामुळे पुरुषार्थ करता येत नाही असे नाही.  काही लोकांना जीवनामध्ये पुरुषार्थ जमला नाही तर ते लोक सगळा दोष स्वतःच्या प्रारब्धालाच देतात.  पण खरे तर प्रारब्ध आहे म्हणूनच पुरुषार्थ आहे.  आपल्या जीवनात संकटे येतात, सुखदुःखात्मक द्वन्द्वे येतात.  प्रतिकूल परिस्थिति येते, त्याचवेळी त्या प्रसंगांच्यामध्ये मन समतोल ठेवण्याचा पुरुषार्थ करता येतो.  त्यामुळे प्रारब्धाच्याच साहाय्याने आपण आपले जीवन उदात्त व उत्तुंग करू शकतो.

 

म्हणून कोणीही प्रारब्धाला दोष देऊ नये.  प्रारब्धावर विसंबूनही राहू नये.  तर उलट त्याच प्रारब्धाचा उपयोग करून मनुष्याने जीवनाकडे पाहण्याची दृष्टि बदलावी.  मन संतुलित ठेवणे, सहनशीलता किंवा तितिक्षा वाढविणे, प्रत्येक प्रसंगाकडे परीक्षा म्हणून पाहणे किंवा जीवनामध्ये जे काही येईल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून आनंदाने ग्रहण करणे, हाच मनुष्याचा पुरुषार्थ आहे.  यामुळे सिद्ध होते की, प्रारब्ध आहे म्हणूनच साधकाला साधना करता येते.  साधकाने जीवनभर अखंडपणे आचारधर्मांचे अनुष्ठान करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रवणादि साधनेमध्ये प्रवृत्त व्हावे.  हाच खरा पुरुषार्थ आहे.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ


Tuesday, March 19, 2024

साधकाने कधीही दुःखी होऊ नये | Seeker Should Never Grieve

 जो मनुष्य प्रामाणिकपणे शास्त्र श्रवण करतो, त्याच्याच अंतःकरणात ज्ञान उदयाला येते.  त्यावेळी हे विश्व काय आहे?  कोणाचे आहे?  कोठून निर्माण झाले?  उत्पत्ति व नाश कोणाचा होतो?  वर्धन कोण पावते?  याप्रकारच्या सर्व शंकांचा निरास होतो.

 

हे सर्व प्रश्न आत्म्याव्यतिरिक्त असणाऱ्या अनात्म्याविषयी आहेत.  वस्तुतः या प्रश्नांच्यामध्येच त्यांची उत्तरे सामावलेली आहेत.  प्रश्नांच्यामधून त्या प्रश्नांचाच निरास केला आहे.  विश्वाबद्दल प्रश्न विचारणे म्हणजे विश्वाचा निरास करण्यासारखे आहे.  कारण जे दृश्य आहे, त्याबद्दलच प्रश्न विचारता येतात आणि जे दृश्य आहे ते तर नियमाप्रमाणे नश्वर आहे.  यद् दृश्यं तत् नष्टं इति |  म्हणून ज्याबद्दल प्रश्न विचारले जातात, ते विश्वच मुळी दृश्य व नश्वर असल्यामुळे स्वप्नवत् अतिशय मिथ्या आहे.  परंतु मिथ्या असूनही जर आपल्या सर्वांना विश्व अनुभवायला येत असेल, डोळ्यांना दिसत असेल तर आपोआपच सिद्ध होते की, या भासमान विश्वाच्या मागे असणारे अधिष्ठान - परब्रह्मतत्त्व हेच एकमात्र सत्य आहे.  कारण अधिष्ठानाशिवाय भासमान वास्तूचा भास होऊ शकत नाही.

 

जसे - रज्जुसर्पवत् इति |  आपल्याला अंधुक प्रकाशात दोरीच्या अधिष्ठानावर सापाचा भास होतो.  सापाचा भास होण्यासाठी दोरीची सत्ता अत्यंत आवश्यक आहे.  दोरीशिवाय सापाचा भास होऊ शकत नाही.  अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तु अनुभवायला येत नाही.  हाच सिद्धांत आहे.  दोरीवर निर्माण झालेला साप सत्य वाटतो.  मग त्या सापापासून भीति वाटते.  परंतु तो साप, भीति हे सर्वच मिथ्या व कल्पित आहेत.  तसेच, हा संसारही त्या सापाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे संसारामधून निर्माण होणारी दुःखेही मिथ्याच आहेत.  संसार हा भातुकलीच्या खेळाप्रमाणे दोन घडीचा, विकारयुक्त, नाशवान, स्वप्नवत् मिथ्या आहे.  यामध्ये अनुभवायला येणारी सर्व सुख-दुःखे, प्रसंग हेही मिथ्या आहेत.  म्हणून खरे तर शास्त्र श्रवण करणाऱ्या साधकाने कधीही दुःखी होऊ नये.

 

इतकेच नव्हे, तर साधकाने "मी संसारमुक्त झालो" असे म्हणणेही व्यर्थ आहे.  दोरीवर दिसणाऱ्या सापाला "मी मारले" असे म्हणण्यासारखे ते हास्यास्पद आहे.  जो साप उत्पन्नच झाला नाही, त्याचा नाश तरी कसा करणार!  पण दिसत असेल तर तो साप उत्पन्न कसा झाला?  तसेच, ज्या संसाराची उत्पत्तीच झाली नाही, त्या संसाराचा नाश कसा करणार?  परंतु तरी सुद्धा संसार अनुभवायला येत असेल तर तो निर्माण झाला तरी कसा?  आणि कोठून?  शास्त्राच्या साहाय्याने याचा विचार होणे आवश्यक आहे.

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022


- हरी ॐ
Tuesday, March 12, 2024

ज्ञान आणि असंमोह | Infatuation-Proof Knowledge

 ज्ञान – आत्मादिपदार्थानाम् अवबोधः इति ज्ञानम् |  आत्मा आणि अनात्मा या दोघांचे यथार्थ स्वरूप जाणणे म्हणजेच ज्ञान होय.  सारासार विवेकबुद्धीने मनुष्य विश्वामध्ये सत्य काय ?  आणि असत्य काय ?  शाश्वत काय ?  आणि अशाश्वत काय ?  याचा शोध घ्यायला लागतो.  त्यावेळी त्याला समजते की, जे जे निर्माण झालेले आहेत ते सर्व विषय, स्थावर-जंगम, विश्व, देह वगैरे सर्वच नाशवान आहे.  अनित्य आहे.  याही पुढे विचार करायला लागतो त्यावेळी दिसते की, शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, हे सर्व विकारवान असून त्या सर्वांच्या मागे असलेले अधिष्ठान हेच चिरंतन, शाश्वत नित्य आहे.  तेच अंतिम सत्य आहे.  सत् आणि असत् हे समजणे म्हणजे पूर्ण ज्ञान नाही.  तर सर्व असत् पदार्थांचा त्याग करून फक्त सद्वस्तूचाच आश्रय घेतला पाहिजे आणि सद्वस्तूमध्येच निष्ठा प्राप्त करणे, हे खरे ज्ञान होय.

 

परंतु पुष्कळ वेळेला आपण पाहातो की, सत्य आणि असत्य जरी समजले तरी स्वार्थ, लोभ, कामना वगैरेंनी प्रेरित झाल्यामुळे मनुष्य जीवन जगताना सतत तडजोड करतो.  तो सत्याचा त्याग करतो आणि स्वार्थाचा आश्रय घेऊन अधर्माचे अनुसरण करतो.  म्हणून सत्य आणि असत्य समजणे म्हणजे खरे ज्ञान नसून असत्याचा त्याग करून सत्यामध्ये दृढ निष्ठा प्राप्त करणे म्हणजेच खरे ज्ञान होय.  या ज्ञानामुळे जीव-जगत-ईश्वर यामध्ये अज्ञानाने निर्माण केलेला कल्पित भेद तसेच द्वैत भाव संपूर्ण निरास होतो आणि अद्वैताची अनुभूति येते.

 

असंमोहः – विपरीत भावनानुदयः इति असंमोह |  मनुष्यामध्ये “अहं कर्ता”, “अहं भोक्ता”, “अहं सुखी”, “अहं दुःखी”, “अहं मर्त्य”, “अहं देहः” या सर्व विपरीत भावना आहेत.  या अज्ञानामधून निर्माण होतात.  ज्यावेळी साधक स्वस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त करतो त्यावेळी निश्चयात्मक ज्ञानाने विपरीत भावना निरास होते.  ती ज्ञानाची संशय-विपर्ययरहित अवस्था म्हणजेच असंमोह होय.  त्यानंतर पुन्हा त्याला मोह निर्माण होत नाही.  श्रुति म्हणते -

यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः |

तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ||                   (ईश. उप. ७)

ज्या स्वरूपामध्ये सर्व भूतमात्रे आत्मस्वरूपच होतात, अशा ज्ञानाने जो सर्वांच्यामध्ये एकत्व पाहातो त्याला कोणता मोह आणि कोणता शोक आहे ?  म्हणजेच तो शोकमोहरहित होतो.  तीच असंमोहाची अवस्था आहे.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ
Tuesday, March 5, 2024

विचार आणि वासना | Thinking - Dealing With Desires

 अंतःकरणामध्ये विकाराचा अभाव असेल तर मनामध्ये अनेक वासना प्रबल होतात.  एकामागून एक विषयकामना निर्माण होतात.  मनुष्य कामना पूर्ण करण्यासाठी त्याबरोबर वाहत जातो.  आयुष्यभर कामना पूर्ण करीत राहतो.  तेथे त्याचा विचार जागृत नाही.  मात्र विचारी मनुष्य वासना उत्पन्न झाल्यावर प्रथम विचार करेल की, ही वासना योग्य आहे की अयोग्य आहे ?  अयोग्य वासना असेल तर विचार मनुष्याला त्यापासून परावृत्त करेल.  शास्त्रश्रवणाचे संस्कार झाल्यामुळे त्यावेळी मनुष्याला शास्त्राचे स्मरण होईल.  आपण गुरुंच्याकडून काय ऐकले होते, याचे स्मरण होऊन मनुष्य शास्त्रनिषिद्ध कर्मांच्यापासून निवृत्त होईल.

 

वेद मनुष्याला अनेक विधि-निषेध देतात. मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, हे स्पष्टपणे सांगतात.  त्याच्या आधारेच मनुष्य विचार करू शकतो.  विचाराने योग्य कामना पूर्ण करणे आणि अयोग्य कामनेचा त्याग करणे हेच मनुष्याचे कर्तव्य आहे.  मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांच्यावर विचाराची मोहर लागली पाहिजे.  हेच विचाराचे कार्य आहे.

 

परंतु जेथे विचारच नसतो तेथे असंख्य वासना प्रबल होऊन वासनारूपी घनदाट अरण्य बनते.  जसे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याचे दर्शन होत नाही.  त्यावेळी अरण्यामध्ये जंगली वनस्पतींचे रान माजते.  त्याचप्रमाणे विचार नसेल तर संकटरूपी अरण्य घनदाट होते.  वाईट वासनांच्याजवळ संकटे लपून बसलेली असतात.  त्यामुळे मनुष्य त्या वासना पूर्ण करायला लागला की, त्याच्यावर संकटे कोसळतात.  म्हणून विचाररूपी धारदार शस्त्राने वासनारूपी किंवा संकटरूपी अरण्यामधील वाढलेल्या रानटी वृक्षांचा छेद केला पाहिजे.  त्यासाठी मनुष्याने विचाराने सावध-दक्ष राहिले पाहिजे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ