Saturday, January 26, 2013

कुंभमेळा २०१३ - भाग २ - पुराणसंदर्भ (Kumbha Mela 2013 - Part II)- कुंभमहापर्व - 


    कुंभमेळ्याविषयी पुराणांच्यामध्ये एक कथा आहे. भगवान विष्णूंच्या आज्ञेने एकदा देव व आसुरांनी एकत्र येवून समुद्रमंथन केले.  त्यामधून १४ रत्ने प्राप्त झाली.  त्यामध्ये सर्वात शेवटी धन्वंतरी अमृत कलश घेवून आला.  तेंव्हा इंद्राचा पुत्र जयंत तो अमृत कलश घेवून पळाला.  आसुरांनी त्याचा पाठलाग केला.  इंद्रपुत्र जयंत व अमृत कलश या दोन्हींचेही रक्षण करण्यासाठी देव आसुरांच्या मागे गेले.  तेंव्हा घनघोर देवासुर संग्राम झाला.  देव व असुरांचे युद्ध बारा दिवस चालले होते.  देवासुर युद्धाच्या वेळी त्या अमृतकलशामधून पृथ्वीवर चार ठिकाणी अमृताचे थेंब सांडले.  त्यावेळी सूर्यसुद्धा अमृतकलशाच्या रक्षणासाठी देवांना मदत करीत होता.  त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले.  मोहिनीला पाहून देवासुरांनी युध्द थांबवले व अमृतकलश वाटण्यासाठी मोहिनीच्या हातात दिला गेला.  मोहिनीरुपधारी भगवान श्री विष्णूंनी धर्मराक्षणार्थ ते अमृत असुरांना न देता देवांना चतुराईने प्राशन करण्यास दिले.  त्यामुळे देव अमर झाले.

    देवासुर युध्द बारा दिवस चालले होते.  देवांचे बारा दिवस म्हणजे मनुष्याचे बारा दिवस होतात.  म्हणूनच प्रत्येक बारा वर्षांनी एकेका स्थानामध्ये कुंभमेळा भरतो.  हरिद्वार, प्रयागतीर्थ, नाशिक व उज्जैन या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडल्यामुळे तेथे कुंभमेळा भरतो.  यालाच पूर्णकुंभमेळा असेही म्हणतात.  हरिद्वार व प्रयाग येथे प्रत्येक सहा वर्षांनी अर्धकुंभमेळाही भरतो.    चार ठिकाणी पूर्णकुंभ योग खालीलप्रमाणे महत्त्वाचा मनाला जातो.

      १) हरिद्वार - बृहस्पतीचा योग कुंभ राशीमध्ये व सूर्याचा योग मेष राशीमध्ये
      २) प्रयाग - बृहस्पतीचा योग वृष राशीमध्ये व सूर्याचा योग मकर राशीमध्ये. हा अतिदुर्लभ योग असून त्रिवेणी स्नान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
      ३) उज्जैन - बृहस्पतीचा योग सिंह राशीमध्ये व सूर्याचा योग मेष राशीमध्ये
      ४) नाशिक - बृहस्पतीचा योग सिंह राशीमध्ये

याप्रकारे या चारही स्थानांमध्ये बारा वर्षानंतर एक महाकुंभपर्व असते.  कुंभमेळ्याचे शास्त्रामध्ये केलेले वर्णन आपण पुढील भागामध्ये पाहू.


-  परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, २४ जानेवारी २०१३
-  By  P.P. Swami Sthitapradnyanand  Saraswati, 24 January 2013

'कुंभमेळा' या विषयावरील इतर लेख 'कुंभमेळा २०१३ - भाग १' आणि 'कुंभमेळा २०१३ - भाग ३' हेही आपणास आवडतील. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email  वरही कळवू शकता - धन्यवाद.


- हरी ॐ

No comments:

Post a Comment