Tuesday, June 25, 2024

उदय-अस्त रहित ज्ञानवृत्ति | Unwavering Knowledge

 



ज्ञानी पुरुषाला कैवल्यप्राप्ति, निरतिशय पदाची प्राप्ति झाल्यानंतर त्याचे अंतःकरणही त्याच पदाचा आश्रय घेऊन आत्माकार होते.  ज्ञानी पुरुष स्वतःच आत्मचैतन्यस्वरूप होतो.  चैतन्यस्वरूप कोठून येतही नाही व  कोठे जातही नाही.  ते आकाशाप्रमाणे अंतर्बाहय सर्वांना व्यत्प्त करते.  म्हणून चैतन्याकार वृत्ति ही उदय-अस्तरहित आहे.  अज्ञानी मनुष्याने श्रवण केले तर शाब्दिक ज्ञान उदयाला येते आणि थोड्या वेळाने ती ज्ञानवृत्ति निघूनही जाते.  म्हणून या मार्गात प्रवचनकार भरपूर आहेत.  प्रवचनाच्या वेळेस त्यांची ज्ञानवृत्ति येते आणि दुसऱ्यांना उपदेश दिला की त्यांची ज्ञानवृत्ति निघून जाते.  असे हे ज्ञान येणारे आणि जाणारे असेल तर त्याला ज्ञान म्हणता येत नाही.

 

आत्मज्ञानी पुरुषामध्ये एकदा ही ज्ञानवृत्ति उदयाला आली की, त्याचे ज्ञान पुन्हा कधीही अस्त पावत नाही.  त्या ज्ञानामध्ये शंका, संशय, विकल्प राहत नाहीत. भयंकर मोठा प्रसंग आला तरीही ज्ञाननिष्ठ पुरुष ज्ञानापासून थोडाही विचलित होत नाही.  आभाळ कोसळले, सगळे जग बुडाले तरीही तो ज्ञानाच्या स्थितीमध्ये दृढ राहतो.  त्यासाठी विदेही जनकाचे उदाहरण प्रसिद्ध आहे.  जनक राजा म्हणतो - मिथिलायां प्रदीप्तायां न मे दहति किञ्चन |  सर्व मिथिला नगरी अग्नीने दग्ध झाली तरी माझे कधीही दग्ध होत नाही.  कारण मी या मिथिला नगरीपासून अत्यंत विलक्षण असून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप आहे.  'मी' आत्मा मात्र नित्य शाश्वत आहे.  अशा या परिपूर्ण ज्ञानाने ज्ञानी पुरुष विचलित होत नाही.

 

इतकेच नव्हे, तर ही ज्ञाननिष्ठा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जीवनमुक्त असणारा ज्ञानी पुरुष विदेही जनकाप्रमाणे बहिरंगाने सर्व क्रिया किंवा व्यवहार करताना दिसत असेल तरी वस्तुतः तो क्रियाशून्य असतो.  तो काही देत नाही, काही ग्रहण करीत नाही, कशाचा त्याग करीत नाही.  त्याच्या दृष्टीने शरीर शरीराचे काम करते, इंद्रिय इंद्रियांचे कार्य करतात.  असे समजून 'मी' आत्मचैतन्यस्वरूप अकर्ता-अभोक्ता आहे, असे त्याचे ज्ञान असते.  म्हणून सर्व क्रिया करूनही तो या सर्वांच्याकडे साक्षीभावाने पाहतो.  जसे प्रारब्ध आहे, तसतसे शरीर प्रारब्धावर सोपवून तो स्वतः मात्र स्वस्वरूपामध्ये स्थित होतो.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, June 18, 2024

साधकाची पुनर्जन्म गति | Seeker’s Progress Upon Rebirth

 



साधकाचा किंवा त्याने केलेल्या साधनेचा कधीही नाश होत नाही.  प्रारब्धक्षयाने वर्तमान शरीराचा जरी मृत्यु झाला तरी तो पुण्यात्मा जीव साधनेचे सर्व संस्कार घेऊन पुढच्या योनीमध्ये प्रवेश करतो.  तो कधीही दुर्गतीला जात नाही किंवा त्याचे अधःपतनही होत नाही.  साधनेच्या संस्कारांच्या प्रभावाने पुढच्या जन्मी सुद्धा त्याचे मन सत्त्वगुणप्रधानच होते.  कदाचित काही वेळेला एखाद्या पापकर्माच्या प्रभावाने त्याला अधोयोनी मिळाली म्हणजेच पशुपक्ष्यांचे शरीर मिळाले तरी चांगले संस्कार नष्ट होत नाहीत.

 

मागच्या जन्मी जर सत्त्वगुणांचे अनेक संस्कार झाले असतील तर या जन्मी कुत्र्याची अधोयोनी मिळाली तरीही तो कुत्रा अत्यंत सात्त्विक वातावरणामध्ये वाढेल.  एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये त्याला सत्संग मिळेल.  जिथे वेदघोष चालतील, जिथे प्रवचन, कीर्तन, भजन, सत्संग चालू आहे, अशा महात्म्यांच्या सान्निध्यात त्याला राहायला मिळेल.  त्यामुळे त्या योनीमध्ये सुद्धा जीवाचे अधःपतन होणार नाही हे सिद्ध होते.  कर्माचे भोग भोगले की, त्या जीवाला पुन्हा पुढची योनी मिळेल.

 

समजा, एखादा साधक साधना करीत असताना मृत झाला व त्याच्या अंतःकरणामध्ये काही विषयांच्या कामना असतील तर तो पुढच्या जन्मी अत्यंत चारित्र्यसंपन्न, शुद्ध, पवित्र व श्रीमंत आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  त्यामुळे त्याच्या कामना सहजच पूर्ण होतील व त्या पूर्ण झाल्या की, लगेचच त्याचे पूर्वजन्मींचे संस्कार जागृत होऊन तो सर्वसंगपरित्याग करेल व पुन्हा साधनेत प्रवृत्त होईल.

 

किंवा याउलट एखादा साधक प्रखर वैराग्यसंपन्न असेल, मनामध्ये कोणतीही कामना नसेल व त्याचा साधना करता-करता मृत्यु झाला तर पुढच्या जन्मी तो सदाचारसंपन्न, मात्र अत्यंत गरीब परंतु भक्तिसंपन्न आईवडिलांच्या पोटी जन्म घेईल.  काही काळ घरामध्ये राहील आणि अत्यंत लहान वयामध्ये त्याच्या अंतःकरणात पूर्वजन्मीचे साधनेचे संस्कार जागृत झाले की, तो घरादाराचा त्याग करून साधनेमध्ये प्रवृत्त होईल.  तो पुन्हा अत्यंत जोमाने व उत्साहाने तीव्र गतीने साधना करेल व मोक्षाची प्राप्ति करून घेईल.

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ




Tuesday, June 11, 2024

आत्मविस्मृतीचे पिशाच्च | The Ghost Of Self-Amnesia

 



दृढ असणाऱ्या आत्मविस्मृतीमुळे जीवाला आतिवाहिक देहच आधिभौतिक - स्थूल देहाच्या रूपाने एखाद्या पिशाच्चासारखा भासू लागतो.  "मी चैतन्यस्वरूप आहे", या आत्मस्वरूपाची त्याला दृढ विस्मृति होते.  त्यामुळे आधिभौतिक देहाची कल्पना एखाद्या पिशाच्चाप्रमाणे त्याच्या मागे लागते.  जन्मानुजन्मे ही स्थिति असल्यामुळे ही आत्मविस्मृति दृढ होत जाते.  जीव या दृश्याला व स्थूल देहालाच सत्य मानून शोकमोहयुक्त संसारामध्येच बद्ध होतो.

 

येथे श्रीवसिष्ठमुनि अत्यंत सूक्ष्म भाग सांगत आहेत.  अज्ञानी जीव स्वतःचा स्थूल देह पाहतो व त्याच्याशीच तादात्म्य पावतो.  "मी म्हणजेच देह", अशी दृढ कल्पना करतो.  स्थूल देहाचे गुणधर्म, विकार स्वतःवर आरोपित करतो.  त्यामुळे मर्यादित होऊन जन्ममृत्युयुक्त होतो.  त्याचे जीवन बहिर्मुख होते.

 

जसे भूताची कल्पना मनामध्ये निर्माण झाली की, ते नसलेले भूतही आपल्यामागे लागते.  "येथे भूत आहेच", अशी कल्पना दृढ झाली की, मनुष्य भयभीत होतो.  त्याचप्रमाणे - देहोSहम् |  "मी म्हणजे देह" ही कल्पना मनुष्याच्या मागे पिशाच्चाप्रमाणे लागते.  एकदा या देहाला सत्यत्व दिले की, मग अनेक समस्या निर्माण होतात.  त्या सर्व समस्या सत्य वाटू लागतात.  अशी ही देहात्मबुद्धि मनामध्ये निर्माण होते.  जोपर्यंत आत्मविस्मृति आहे, तोपर्यंत देह सत्य भासतो.

 

खरे तर जीवाला फक्त आतिवाहिक देहच आहे.  किंबहुना जीव म्हणजेच आतिवाहिक देह आहे.  परंतु जीवाला जोपर्यंत दृश्य सत्य वाटते तोपर्यंत आत्मविस्मृति असते.  त्यामुळे त्याला दृश्य असणारा स्थूल देहच सत्य वाटतो.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, June 4, 2024

सर्वश्रेष्ठ यज्ञ – जपयज्ञ | Most Superior – ‘Japa’ Offering

 



कोणतेही वैदिक, यज्ञयागादि कर्म करताना त्याच्या पूर्णतेसाठी अनेक घटक आवश्यक आहेत.  यजमान, पुरोहित, वेदमंत्र, हवनसामग्री, हवनासाठी आवश्यक साधने, अग्निकुंड, स्थान, देश, काल वगैरे हे सर्व घटक एकत्र झाल्यानंतरच यज्ञाची यथासांग पूर्णता होते.  परंतु त्यामध्ये असे अनेक घटक आहेत की, ते मनुष्याच्या हातामध्ये नाहीत.  अनेक त्रुटीमुळे प्रत्यवाय दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.  त्यामुळे इष्टफळ प्राप्त होण्याऐवजी प्रत्यवाय दोषांच्यामुळे अनिष्ट फळ मिळण्याची शक्यता अधिक असते.  अशा सर्व यज्ञांच्यामध्ये जपयज्ञ अधिक श्रेष्ठ आहे.  याचे कारण –

१) याठिकाणी जप हा यज्ञ आहे असे म्हटले तरीही तो प्रत्यक्ष बाह्य यज्ञाप्रमाणे कर्मप्रधान यज्ञ नाही.  त्याला कोणत्याही प्रकारची सामग्री आणि अन्य साधन, देश, काल, वगैरेची कशाचीही जरुरी नाही.  यामुळे अन्य यज्ञामध्ये येणाऱ्या त्रुटि आणि प्रत्यवाय दोषांचा प्रश्नच उद्भवत नाही.

२) जपयज्ञामध्ये शरीर आणि इंद्रियांचे सर्व व्यापार शांत होतात.  म्हणजेच इंद्रियांची पूर्णतः उपशमा होते.

३) तसेच जपयज्ञ हा पूर्णतः मानसिक व्यापार आहे.  यामध्ये एकाच प्रकारच्या मंत्राची पुन्हा पुन्हा आवृत्ति केली जाते.

४) यामुळे कोणताही प्रयत्न न करता सहजपणे मन बाह्य विषयांच्यापासून निवृत्त होऊन अंतर्मुख होते.  जितक्या प्रमाणामध्ये मन जपउपासनेमध्ये एकरूप होईल तितक्या प्रमाणामध्ये मनाची एकाग्रता, तल्लीनता, तन्मयता वाढते.  एकाच मंत्राची आवृत्ति असल्यामुळे मनाची चंचलता, मनाचे भरकटणे आपोआपच संपते आणि मनाची वृत्ति स्थिर होते.  तसेच विषयचिंतनाच्या अनुषंगाने निर्माण होणारे राग-द्वेष, कामक्रोधादि विकार यांचा प्रभाव कमी कमी होतो.  मन संकल्प-विकल्परहित होऊन अत्यंत शुद्ध, निर्मळ आणि शांत होते.  मनामधील विक्षेप आणि द्वन्द्व कमी होतात.  अशा मनामध्ये दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष होतो.  इतकेच नव्हे तर हाच जप साधकाला ध्यानावस्थेपर्यंत नेतो.  या सर्व करणासाठी इतर यज्ञांच्यापेक्षा जपयज्ञ अत्यंत श्रेष्ठ साधना आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ