Tuesday, November 24, 2020

इंद्रिये आणि नाश | Senses and Destruction

 


आचार्य वर्णन करतात –

शब्दादिभिः पञ्चभिरेव पञ्च पञ्चत्वमापुः स्वगुणेन बद्धाः |

कुरङगमातङगपतङगमीनभृङगा नरः पञ्चभिरञ्चितः किम् ||       (विवेकचूडामणि)

हरिण, हत्ती, पतंग, मीन आणि भ्रमर यांच्यामध्ये एकेक इंद्रिये प्रबळ असल्यामुळे त्यांचा क्रमाने शब्दादि एकेका विषयाशी संबंध येऊन त्यांचा सर्वनाश होतो.  मनुष्यामध्ये ही पाचही इंद्रिये प्रबळ असल्यामुळे त्याचा सर्वनाश होईल, यात आश्चर्य ते कसले ?  

 

१) हरिण – हरिण हे अतिशय चपळ आहे.  त्याला पकडण्यासाठी पारधी सुंदर ध्वनि निर्माण करतो.  हरिणामध्ये श्रवणेंद्रिये अत्यंत प्रबळ असल्यामुळे ते शब्दाला आकर्षित होते.  त्या शब्दाच्या दिशेने धावते आणि स्वतःहून पारध्याच्या जाळ्यात सापडते.  

२) हत्ती – हत्तीमध्ये स्पर्शेन्द्रिये अत्यंत प्रबळ असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी हत्तीणीला समोर आणले जाते.  हत्तीणीच्या स्पर्शाच्या इच्छेने तो तिच्याजवळ येऊन पकडला जातो.  

३) पतंग – पतंग हा रूपाला, रंगाला आकर्षित होतो.  त्यामुळे अग्नीच्या लालभडक ज्वालांमध्ये तो स्वभक्ष्य समजून झेप घेतो आणि क्षणार्धात भस्मसात होतो.  त्याच्यामध्ये दर्शनेंद्रिय अत्यंत प्रबळ आहे.  

४) भ्रमर – भ्रमरामध्ये घ्राणेंद्रिये प्रबळ असल्यामुळे कमलपुष्पामधील रस चाखताना तो वेळ-काळाचे भान विसरतो.  सूर्यास्ताला कमळ मिटल्यामुळे त्यामध्येच अडकून गुदमरून तो मरण पावतो.  

५) मीन – माशामध्ये रसनेन्द्रिये प्रबळ असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी गळाला भक्ष्य लावले जाते.  खाण्याच्या आमिषाने मासा गळाजवळ येऊन नाश पावतो.  

 

अशा प्रकारे या प्राण्यांच्यामध्ये फक्त एकच इंद्रिय प्रबळ असूनही त्यांचा नाश होतो.  परंतु मनुष्यामध्ये तर ही पाचही इंद्रिये अत्यंत बलशाली, सामर्थ्यसंपन्न आहेत.  कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राणेंद्रिय ही पाचही प्रबळ असल्यामुळे मनुष्याला एकाच वेळी हे सर्व उपभोग हवे असतात.  हीच आपल्या जीवनामधील रस्सीखेच आहे.  मनुष्य इंद्रियांच्या पूर्ण आहारी जाऊन गुलाम होतो. काय करावे व काय करू नये हे इंद्रियेच ठरवितात.  ही इंद्रियेच मनाला विषयांच्याकडे खेचून नेतात आणि मनुष्याचा नाश करतात.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Tuesday, November 17, 2020

संसार म्हणजे काय ? | Meaning of “Sansaar”

 


सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाने त्या त्या प्रमाणे कर्म घडतात आणि मनुष्याला त्या कर्माप्रमाणेच फळ प्राप्त होते.  याप्रमाणेच तीन गुण, त्यांचे कार्य आणि फळ यांच्या समूहालाच ‘संसार’ असे म्हणतात.  संसार म्हणजे गृहस्थाश्रम नव्हे.  संसार हा प्रत्यक्ष बाहेर नसून आपल्या मनामध्येच आहे.

 

चित्तमेव हि संसारः तत्प्रयत्नेन शोधयेत् |

यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेतत्सनातनम् ||

आपले चित्त म्हणजेच संसार होय, कारण चित्तामधील प्रत्येक वृत्तीशी मर्त्य जीव तादात्म्य पावतो.  चित्तामध्ये जी जी वृत्ति निर्माण होईल, त्यानुरूप मनुष्याची प्रवृत्ति दिसते.  मनुष्य त्या गुणांच्या आहारी जातो.  मनामध्ये कर्तृत्वादि अहंकार निर्माण करून अनेक कर्मे करतो आणि भोक्तृत्व बुद्धीमुळे मी सुखी-मी दु:खी या कल्पना करवून घेतो.  मनानेच मनामध्ये हा रागद्वेषात्मक, सुखदु:खात्मक संसार निर्माण करतो.  श्रुति म्हणते – मनःस्पंदितम् इति |  हा सर्व संसार मनानेच कल्पित केलेला आहे.

 

भगवान गौडपादाचार्य म्हणतात – हे सर्व चराचरात्मक, द्वैतात्मक, दृश्य विश्व मनानेच निर्माण केलेले आहे.  मन आहे तोपर्यंतच संसार आहे.  ज्यावेळी मन अमनीभावाला प्राप्त होते, मनाचा लय होतो त्यावेळी या द्वैतप्रपंचाचाही निरास होतो.  

 

म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाला उपदेश करतात – निस्त्रैगुण्यो भवार्जुन | (गीता अ. २-४५)

हे अर्जुना ! हा सर्व संसार त्रिगुणात्मक असल्यामुळे हे तीन गुण जीवाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळे संकल्प निर्माण करून त्याला कर्म-कर्मफळाच्या दुष्ट चक्रामध्ये बद्ध करतात.  म्हणून तू या त्रिगुणांच्याही अतीत हो.  म्हणजेच त्रिगुणांच्या आहारी जाऊ नकोस.  इंद्रियांच्यावर, मनावर संयमन करून त्यांना धर्माचरणामध्ये, ईश्वरचिंतनामध्ये रममाण करावे.  दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष करावा.  जीवन जगत असताना अंतरिक दृष्टि बदलावी.  हीच अंतरंग साधना आहे.  मनानेच मनामध्ये प्रयत्न करावेत आणि मनोकल्पित संसाराचा निरास करण्याचा प्रयत्न करावा.  

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Tuesday, November 10, 2020

धर्मयुक्त कामना | Elevation of Desires

 



आचार्य सांगतात -

विवाहो न विलासार्थः प्रजार्थः एव केवलः |

तेजो बुद्धिः बलध्वंसो विलासात् प्रभवेत् खलु ||

अत एव परित्यज्य विलासं मोहकारणम् |

संनियम्येन्द्रियग्रामं विचारेण सुखी भवेत् ||

 

विवाह हा केवळ शारीरिक स्वैर, उच्छृंखल उपभोगासाठी नसून फक्त प्रजोत्पत्तीसाठी आहे.  परंतु इंद्रियांच्यावर संयमन न ठेवता, कामनेने प्रेरित होऊन मनुष्य त्या उपभोगामध्ये रममाण झाला तर त्याचे तेज, बुद्धि व बल यांचा ध्वंस होतो.  त्याच्या ज्ञानाचा नाश होतो.  सर्व दैवीगुण, सद्गुण नष्ट होतात.  तो पशूपेक्षाही अधम वृत्तीने स्वैराचारामध्ये प्रवृत्त होऊन स्वतःचा नाश करवून घेतो.  म्हणून शास्त्रकार सर्व जीवांना आदेश देतात की, रतिसुख हेच मोहाचे कारण असल्यामुळे त्याचा त्याग करून आत्मसंतुष्टता प्राप्त करून घ्यावी, कारण हे सर्व उपभोग दु:खालाच कारण आहेत.

 

म्हणून भगवान सर्व साधकांना कळवळून सांगतात की, या धर्मविरुद्ध असणाऱ्या राजसिक व तामसिक कामाचा त्याग करावा.  इंद्रियांच्यावर संयमन करावे.  आपल्या नित्यनैमित्तिक, वेदविहित कर्मांचे सातत्याने दीर्घकाळ अनुष्ठान करावे.  धर्मानुष्ठान, सदाचार, ईश्वरपूजन, सेवा, त्याग यामध्येच जीवन व्यतीत करावे.  आपला आहार-विहार, कर्म सात्त्विक करावे.  उपभोगही सात्त्विक घ्यावेत.  त्यामुळे आपोआपच मनावरही नियमन होऊन मन अत्यंत शुद्ध, सत्त्वगुणप्रधान, क्षोभरहित, विक्षेपरहित, द्वंद्वरहित, भोगवासनारहित होईल.  असे मनच निरतिशय आनंद म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी साहाय्यकारी साधन होईल.

 

म्हणजेच धर्माला अनुकूल असणारा जो काम आहे तोच इंद्रियांच्यावर संयमन, दमन करणारा आहे.  तोच शमदमादिषट्कसंपत्तीचे साधन होऊन सद्गुणांची जोपासना करतो.  तोच काम मनुष्याला धर्मामिमुख करून विवेकवैराग्यादिगुण देतो.  तोच काम मनुष्याला शेवटी आत्मसुख, आत्मशांति देऊन मनुष्याचे जीवन पूर्ण, तृप्त, संतुष्ट करतो.  मनुष्यांच्यामध्ये असणारा हा धर्मयुक्त ‘काम’ हे माझे परमात्म्याचेच स्वरूप आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ





Tuesday, November 3, 2020

ब्रह्मचारी व्रत – शास्त्राचा गाभा | Celibacy – The Crux of Knowledge

 



जिज्ञासु साधकाने प्रथम इंद्रियसंयमन करणे अत्यंत आवश्यक आहे.  यासाठीच शास्त्रामध्ये ब्रह्मचारी व्रताचे अनुष्ठान सांगितलेले आहे.  शास्त्रकार म्हणतात - शारीरिक उपभोग ही जरी स्वाभाविक इच्छा असेल तरी परस्त्रीचा त्याग करून स्वस्त्रीचा उपभोग घेण्यातच तृप्ति करणे योग्य आहे.  हा उपभोग केवळ शरीराच्या सुखासाठी नसून प्रजोत्पत्तीसाठी आहे हे लक्षात ठेवावे.  तसेच तो उपभोग योग्य वेळी, योग्य काळी घेणे हेच गृहस्थाश्रमी लोकांसाठी ब्रह्मचारी व्रत आहे.  

 

शास्त्रामध्ये स्वैर, अनियंत्रित स्त्रीउपभोगाचे खंडन केलेले आहे.  त्यामुळे हे ब्रह्मचारी व्रत गृहस्थाश्रमी लोकांनी पालन करावे, कारण जो ब्रह्मचर्यव्रतामध्ये स्थिर आहे तोच धर्म आहे.  ब्रह्मचर्यव्रतामध्ये दृढ असणारे खरे तपस् आहे.  ब्रह्मचारी व्रतापेक्षा अन्य कोणतेही श्रेष्ठ, खडतर, कठीण तप नाही.  असे हे ब्रह्मचर्य धर्माचे अत्युत्तम साधन आहे.  ब्रह्मचारी व्रत म्हणजेच नियमित जीवन होय.  

 

या ब्रह्मचारी व्रताचे पालन करण्यासाठी आपला आहार-विहार संयमित केला पाहिजे.  रजोगुणतमोगुणाचा प्रभाव कमी करून सत्त्वगुणाचा उत्कर्ष केला पाहिजे.  यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता आहे.  आहार हे जीवनाचे सार आहे.  शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण करण्यासाठी आहाराची आवश्यकता आहे आणि यापेक्षा महत्वाचे म्हणजे आहारापासून शुक्रबीजाची निर्मिती होते.  म्हणुनच गर्भधारणेच्यावेळी शुद्ध, सात्त्विक आहार घ्यावा.  त्यामुळे गर्भावरही चांगले संस्कार होतात.  

 

आहाराचे सार असणाऱ्या या शुक्रबीजाचे रक्षण करावे, कारण या वीर्याच्या क्षयाने मनुष्य अनेक रोगांनी ग्रस्त होतो.  म्हणून मनुष्य जितका भोगी तितक्या अधिक प्रमाणात रोगी असतो.  वीर्य व मन यांचे प्रयत्नाने रक्षण करावे.  जोपर्यंत शरीरामध्ये असणारे वीर्य स्थिर, संयमित, क्षयरहित असते, तोपर्यंत मनुष्याला रोगापासून, व्याधींच्यापासून भय नसते, कारण ‘वीर्य’ ही एक शक्ति आहे.  म्हणून ब्रह्मचारी व्रताचे अनुसरण करून या वीर्याचे रक्षण करावे.  ब्रह्मचारी व्रत हाच सर्व शास्त्राचा गाभा, सार आहे.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ