Monday, December 30, 2013

खरा संन्यासी | True Sanyaasi


संन्यासी अनेक प्रकारचे आहेत –

१. काही साधक आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने संन्यस्त वृत्तीने जगतात.  ते जिज्ञासु संन्यासी असल्याने त्यांना ‘विविदिशा संन्यासी’ म्हणतात.

२. काही साधक, मुमुक्षु शास्त्राच्या श्रवणमननाची साधना करून त्यामधून उदयाला आलेले ज्ञान यथार्थ, सम्यक आणि संशयविपर्ययरहित करण्यासाठी, म्हणजेच ज्ञाननिष्ठा प्राप्त करून स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होण्यासाठी शास्त्रविहित सर्व श्रौत व स्मार्त कर्मांचा त्याग करून संन्यास ग्रहण करतात.  हा संन्यास, निदिध्यासना म्हणजेच ब्रह्माभ्यास करण्यासाठी ग्रहण केलेला असतो.

३. काही संन्यासी ब्रह्मनिष्ठ होऊन स्वतःच साक्षात ब्रह्मस्वरूप झालेले आहेत.  भगवान त्यांचे वर्णन अनेक श्लोकांच्यामधून करतात - 
             सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
             नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्  || (गीता अ. ५-१३)
सर्व कर्मांचा मनाने त्याग करून नवद्वारयुक्त शरीरामध्ये स्वतः काहीही न करता किंवा दुसऱ्यांच्याकडून कर्म न करविता अनायासाने आपल्या स्वस्वरूपामध्ये राहातो.

             विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि |
             शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः || (गीता अ. ५-१८)
विद्या व विनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा तसेच चंडाल या सर्व प्राणिमात्रांच्यामध्ये असे विद्वान, ब्रह्मज्ञानी संन्यासी समदृष्टीने पाहतात.

             यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति |
             तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति || (गीता अ. -३०)
जो पुरुष सर्व भूतांच्यामध्ये सर्वांचे आत्मस्वरूप असणाऱ्या मला - वासुदेवाला पाहतो आणि सर्व भूतांना माझ्यामध्ये – वासुदेवामध्ये पाहतो, त्याला ‘मी’ दूर नाही किंवा तो मला दूर नाही.  म्हणजेच ‘तो आणि ‘मी’ एकच आहे.

 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


 

- हरी ॐ

Tuesday, December 24, 2013

ज्ञानप्राप्तीचे प्रमाण | Evidence of Knowledge


कोणतेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता आहे.  प्रमाकरणं प्रमाणम् | प्रमा म्हणजे ज्ञान.  करण म्हणजे साधन.  ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजे प्रमाण.  विश्वातील दृश्य विषयांच्या दर्शनासाठी डोळे, ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, रसास्वादासाठी जिव्हा आणि सुगंधासाठी घ्राणेंद्रिये यांची आवश्यकता आहे.  म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या अनुभूतीसाठी कर्ण, त्वचा, डोळे, जिव्हा व घ्राणेंद्रिये ही पंचेंद्रिये प्रमाण आहेत, कारण प्रमाणाशिवाय प्रमा म्हणजे ज्ञान होऊ शकत नाही.

पंचेंन्द्रियांद्वारे बाह्य विश्वातील दृश्य विषयांचेच ज्ञान देण्यासाठी प्रमाण आहेत.  परंतु आत्मा हा शब्द स्पर्शाप्रमाणे किंवा घटपटाप्रमाणे विश्वातील विषय नाही.  त्यामुळे आत्मा इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही.  आत्मा हा इंद्रियअगोचर आहे.  इंद्रियांच्या कक्षेपलीकडे आहे.  तो इंद्रियांचा आत्मा आहे.  त्याच्या अस्तित्वाने इंद्रियांना अस्तित्व आणि चेतना मिळते आणि ती आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यान्वित होतात.  म्हणून पंचज्ञानेंद्रिये आत्मज्ञान देण्यासाठी असमर्थ आहेत.

तसेच सुखदुःखाप्रमाणे आत्मा मनाचा विषय नाही, कारण तो मनाचाही आत्मा आहे.  त्याच्या अस्तित्वामुळे मनाला चेतना मिळते आणि मन त्याच्या व्यापारामध्ये कार्यान्वित होते.  म्हणून आत्मा मनालाही अगोचर आहे.  थोडक्यात व्यावहारिक ज्ञान देणारी सर्व प्रमाणे आत्म्याचे ज्ञान देण्यास असमर्थ ठरतात.  मग आत्मज्ञानासाठी कोणते प्रमाण आहे? शास्त्रकार सांगतात – वेदान्तो नाम उपनिषद प्रमाणम् |

वेदान्त म्हणजे उपनिषदे आत्मस्वरूपाचे ज्ञान देण्यासाठी प्रमाण आहेत.  ज्याप्रमाणे आपले मुख पाहण्यासाठी दर्पणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आत्म्याचे स्वरूप पाहण्यासाठी वेदांतशास्त्र म्हणजे उपनिषदे दर्पणाप्रमाणे आहेत; कारण सर्व उपनिषदे आपले अज्ञान दूर करून शुद्ध आत्मस्वरूप प्रकट करतात.  साधकाला सच्चिदानंदाची प्राप्ति करून देऊन तृप्त, संतुष्ट करतात.  म्हणून साधकाने, जिज्ञासूने वेदांतशास्त्राचाच आश्रय घ्यावा.

 
- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010- हरी ॐ

Wednesday, December 18, 2013

ज्ञान आणि मोक्ष | Knowledge and Liberation


 

अज्ञानामुळे मन कल्पित सुखदुःखांचा संसार निर्माण करून त्यात अडकते आणि पुन्हा ते स्वस्वरूपाकडे जाण्याची धडपड करते.  हा जीवाचा संसार अज्ञान-निर्मित असल्यामुळे संसार-निवृत्ति म्हणजेच अज्ञान-निवृत्ति होय – म्हणजेच ज्ञानप्राप्ति म्हणजेच मोक्षप्राप्ति होय.

मनानेच अज्ञानाने कल्पना करून स्वतःला मर्यादा घालून घेतल्या आहेत. या सर्व मर्यादा मानसिकच आहेत.  म्हणून मी बद्ध आहे, मर्त्य आहे, सुखी-दुःखी आहे.  या सर्व कल्पनाच आहेत.  वास्तवात ही बंधने नाहीतच. म्हणून या अज्ञानकल्पित बंधनांच्यामधून सुटणे म्हणजेच मोक्ष होय.  अज्ञानकल्पना संपली की, सर्व सुखदुःख, पापपुण्य, जन्ममरण हे सर्व संपलेच असे समजावे.  मरण कल्पनेशी थांबे अर्थ जाण त्याचा |

श्रुति म्हणते – मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः |
विषयासक्त अज्ञानी मन बंधनाला, संसाराला कारण होते व निर्विषय मन मोक्षाला साधनीभूत होते.  अज्ञान हे मोक्षप्राप्तीतील अडसर तर ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे, कारण ज्ञान हेच अज्ञानाच्या विरोधी असल्यामुळे ज्ञानानेच अज्ञानाचा नाश होतो.

ज्याप्रमाणे – पाकस्य वन्हिवत् ज्ञानं विना मोक्षो न सिध्यति |
धान्य, भाजी, भांडी, मसाले – सर्व असूनही अग्नीशिवाय पाकसिद्धि होत नाही.  पाकसिध्दीसाठी अग्नि हेच प्रमुख साधन आहे.  त्याचप्रमाणे साधक अनेक प्रकारची साधना करीत असला, कर्म, योग, भक्ति, सेवा, अनेक प्रकारचे तप इ., तरी ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ति नाही.  म्हणून शास्त्रामध्ये जरी अनेक प्रकारच्या साधना दिल्या तरी मुख्य जर साधना असेल तर फक्त ज्ञानसाधना आहे.  

भगवान म्हणतात – न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |
या विश्वामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही.  

 

- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010- हरी ॐ

Tuesday, December 10, 2013

सेवा वृत्ती | Attitude of Dedicationप्रत्येक कर्म मनुष्याला सुखदुःखांचे अनुभव देऊन कर्म-कर्मफलामध्येच बद्ध करते.  तरी तेच कर्म त्यामागील भाव (Attitude) बदलून केले तर रागद्वेषांचा पगडा आणि त्याचे मनावर होणारे सुखदुःखांचे परिणाम कमी होतात.  म्हणजेच कोणत्याही चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये मन शांत, स्थिर व प्रसन्न राहाते.

यासाठी प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करावे –
ईश्वरार्पितं नेच्छया कृतम् |  चित्तशोधकं मुक्तिसाधकम् ||

कर्मफलाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराला अर्पण केलेले कर्म चित्त शुद्ध होण्यासाठी साधन होते आणि शुद्ध चित्त मोक्षप्राप्तीसाठी साधनीभूत होते.  म्हणून प्रत्येक कर्म परमेश्वराला, कर्मफलाची अपेक्षा न ठेवता अर्पण करावे.  मग परमेश्वराला कर्म अर्पण करणे म्हणजे काय? आणि ते अर्पण कसे करावे?

उदा. एखादा सेल्समन मॅनेजरने दिलेल्या आज्ञेप्रमाणे काम करतो.  गिऱ्हाईकाला आपल्या कंपनीच्या मालाचे महत्व पटवून देऊन कंपनी कशी चांगली आहे हे समजावून सांगतो.  तसेच मनाने आपल्या कंपनीची भरभराट कशी होईल, ती कशी वाढेल याचाच विचार करीत असतो.  म्हणजेच तो शारीरिक, वाचिक व मानसिक कर्म कंपनीसाठीच करीत असतो. यालाच सेवाबुद्धि किंवा समर्पण बुद्धि म्हणतात.

या सेवावृत्तीमुळे अनेक फायदे होतात.  स्वतःचा अहंकार किंवा ‘मी करतो’ ही कर्तृत्वभावना कमी होते. दुसऱ्यासाठी काम करण्याची सेवावृत्ति वाढते.  त्यामुळे मनाची तन्मयता, एकाग्रता वाढते आणि मालकासाठीच काम करीत असल्यामुळे कर्मफलाची अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणारा अपेक्षाभंग, निराशा वगैरे कमी होतात.  याप्रमाणे कर्म करीत असताना प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण करून सेवावृत्तीने जगावे.


- "साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010


- हरी ॐ

Tuesday, December 3, 2013

शरीर आणि मी | Body and “I”

 
शरीराच्या सान्निध्यामुळे जरी आपण म्हणतो शरीर माझे आहे तरी शरीर अनेक अवयवांनी बनलेला एक समूह किंवा संघात आहे.  उदा. ‘घर’ म्हणजे केवळ दारे, खिडक्या किंवा भिंती नाहीत.  तर दारे, खिडक्या, चार भिंती, जमीन, छत वगैरे सगळ्या एकत्र असलेल्या समूहाला ‘घर’ म्हटले जाते.  तसेच शरीर हे हात, पाय, छाती, पोट, मान, डोके, नाक, कान वगैरे अनेक अवयवांनी एकत्र येऊन निर्माण झालेला संघात आहे.
 
घर हा संघात जड आणि अचेतन आहे.  त्यामुळे कोणताही संघात हा संघातासाठी नसून तो चेतन जिवंत व्यक्तीसाठी असतो की, जो त्या संघातापासून भिन्न आहे.  म्हणून जरी घर आपल्या मालकीचे असले तरी आपण त्यापासून भिन्न आहोत.  त्यामुळे आपल्याला घरात येण्यास आणि बाहेर जाण्यास संपूर्ण स्वातंत्र्य आहे.
 
वरीलप्रमाणेच शरीर सुद्धा संघात असल्यामुळे ते जड व अचेतन आहे आणि ते स्वतःकरिता नसून ‘माझ्या’ साठी आहे.  म्हणजेच घराचा जसा मालक, तसा मी शरीराचा मालक आहे.  मी शरीरासाठी नसून शरीर माझ्यासाठी आहे. यामुळे शरीर ‘मी’ नाही.  तद्वतच शरीरामध्ये राहणारा ‘मी’ शरीरापासून भिन्न आहे.
 
अचेतन किंवा जड वस्तू स्वतः कार्य करू शकत नाही. जर कार्य करीत आहे असे दिसत असेल तर निश्चितपणे त्यामागे सचेतन शक्ति असणे आवश्यक आहे.  उदा. मोटार स्वतः रस्त्यावरून अॅक्सीडेंट न करता चालत नाही.  जर चालत असेल तर अनुमानाने समजते की, तिच्यामागे कोणीतरी चेतन बुद्धिवान मनुष्य आहे.
 
शरीर हे जड असूनही जर जिवंत आणि सतत कार्यान्वित होत असेल तर त्यामागे चेतनशक्ति असणे आवश्यक आहे की, जिच्या अस्तित्वामुळे शरीराला चेतना प्राप्त होऊन शरीर जिवंत दिसते आणि कार्य करते.  म्हणजेच शरीरात ‘मी’ सचेतन पुरुष हा शरीरापासून भिन्न आहे.
 
"साधना आणि साध्य" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  सप्तम आवृत्ति, २०१०    
- Reference:  "Sadhana Ani Sadhya" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 7th Edition, 2010
 
 
 
                                                             - हरी ॐ