Tuesday, November 26, 2024

दृष्टा व दृश्य यांचे परस्पर पोषण | Inter-Nourishment Of Seer And Seen

 




श्रीवसिष्ठ मुनि या दोन श्लोकांच्यामधून पुन्हा एकदा द्रष्टा व दृश्य यांचा निरास करतात.  या जगात पाहणारा द्रष्टा असतो, त्यावेळेस समोर दृश्य असतेच आणि समोर दृश्य दिसत असेल तर त्याला पाहणारा द्रष्टा असतोच.  म्हणजे द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांना पूरक असणारे घटक आहेत आणि तेच एकमेकांचे पोषण करीत असतात.  द्रष्टा हा दृश्याचे वर्धन करीत असतो.  म्हणून पाहणारा द्रष्टा 'मी' जितके विषय मला पाहता येतील, तितके विषय मी पाहत असतो.  पाहता पाहता डोळे थकले, अगदी मिटायला लागले, तरी द्रष्ट्याचे पाहणे काही संपत नाही.  त्याचप्रमाणे दृश्य सुद्धा द्रष्ट्याचे म्हणजेच द्रष्ट्रूत्वाचे पोषण करीत असते.  दृश्य विषय या द्रष्टा असणाऱ्या जीवाला आकर्षित करतात.

 

याप्रमाणे द्रष्टा व दृश्य यांचे वर्धन होऊन जीव मात्र द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये अडकतो.  द्रष्टा दृश्याला जिवंत ठेवतो आणि दृश्य द्रष्ट्याला जिवंत ठेवते.  जसे दोन चोर असतील तर ते एकमेकांना सावरतात.  कारण त्यामधील एक फुटला तर दुसऱ्याचे सुद्धा पितळ उघडे पडणार, हे दोघांनाही माहीत असते.  म्हणून ते दोघेही एकीने राहतात.  एकाचे अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून असते.

 

त्याचप्रमाणे हा सर्व संसार द्रष्टा आणि दृश्य या दोघांच्यावर चाललेला आहे.  जोपर्यंत हे दोघे एकत्र आहेत आणि एकमेकांचे पोषण करीत आहेत, तोपर्यंत जीवाचा संसार जन्मानुजन्मे अखंडपणे चालू राहतो.  द्रष्टा असणारा मी नानाविध दृश्य विषयांना पाहत राहतो.  कामना निर्माण करतो आणि दृश्य विषय या जीवांना आकर्षित करून वर्षानुवर्षे दर्शनादि त्रिपुटीच्या व्यवहारामध्ये बद्ध करतात.

 

मात्र रामा !  द्रष्टा आणि दृश्य यातील एकाचा जरी अभाव झाला तरी आपोआपच दोघांचाही अभाव होतो.  दृश्याचा निरास केला काय किंवा जीवामधील द्रष्ट्रूत्वाचा निरास केला काय, यांपैकी काहीही केले तरी जीवाच्या संसाराचा निरास होऊन एकच अखंड सत्स्वरूप शिल्लक राहते.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, November 19, 2024

मयि बुद्धिं निवेशय | Invest Your Intellect in Me

 




मयि बुद्धिं निवेशय |  जी अंतःकरणाची वृत्ति वस्तूच्या स्वरूपाचा निश्चितपणे, संशयविपर्यरहित निर्णय घेते अशा निश्चयात्मक वृत्तीलाच बुद्धि असे म्हणतात.  अशी बुद्धि परमेश्वरामध्ये स्थिर करावी.  म्हणजेच या बुद्धीच्या साहाय्याने सतत परमेश्वराचेच अनुसंधान करावे.

 

येथे भगवान साधकांना अंतरंग साधनेचा उपदेश देत आहेत.  बाह्य कोणतीही कर्मप्रधान, शरीरप्रधान साधना न सांगता मन आणि बुद्धीलाच येथे साधना दिलेली आहे.  याप्रकारे मनाने व बुद्धीने परमेश्वराचे अखंड चिंतन केल्यामुळे काय फळ मिळते ?  भगवान स्वतःच दुसऱ्या चरणामध्ये सांगतात – निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः |  मन आणि बुद्धि परमेश्वरामध्ये ठेवल्यामुळे मनामधील इतर विषयवृत्तींचा निरास होईल.  अंतःकरणामधील भोगवासनांचा प्रभाव कमी होऊन वृत्ति अत्यंत शुद्ध, सात्त्विक होईल.  यामुळे तो भक्त माझ्या स्वरूपामध्येच निवास करेल.

 

याचा अर्थ अंतःकरणशुद्धि झाल्यामुळे या साधकाला गुरुप्राप्ति होऊन श्रवणादि साधनेच्या साहाय्याने आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ति होईल.  देहात्मबुद्धि गळून पडेल आणि तो साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर, दृढ होईल.  किंवा, दुसरा अर्थ – हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो ज्ञानी पुरुष प्रारब्धाप्रमाणे जीवन जगेल.  प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर म्हणजेच देहपातानंतर त्याला विदेहकैवल्यावस्था प्राप्त होईल.  तो निर्विशेष परब्रह्मस्वरूपामध्येच निवास करेल.  पुन्हा या जन्ममृत्युयुक्त संसारात येणार नाही.  यामध्ये कोणताही संदेह नाही.

 

म्हणून अर्जुना !  तू तुझे मन व बुद्धि माझ्यामध्ये ठेव.  मोक्षप्राप्तीसाठी तू माझाच आश्रय घे.  अत्यंत श्रद्धेने, भक्तीने तू माझी उपासना कर.  त्यामुळे तुला चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने गुरुप्राप्ति, ज्ञानप्राप्ति आणि मोक्षप्राप्ति होईल.  यामध्ये कोणतीही शंका घेऊ नकोस.  निःसंशय होऊन ही श्रेष्ठ असणारी अंतरंग साधना तू कर.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, November 12, 2024

तत्त्वविश्रांति | Philosophical Rejuvenation

 



विचाराने तत्त्वाचे ज्ञान प्राप्त होते.  तत्त्वाच्या ज्ञानाने मनुष्याला विश्रांति मिळते.  तत्त्वविश्रांतीने मन शांत होऊन सर्व दुःखांचा पूर्णतः क्षय होतो.  वसिष्ठ मुनि येथे अतिशय सुंदर, असा दुःखनाशाचा क्रम सांगतात.  आपल्या सर्व दुःखांचा नाश व्हावयाचा असेल तर सर्वप्रथम विचार आवश्यक आहे.  मनुष्याला खरी विश्रांति हवी असेल तर त्याचे शारीरिक-मानसिक ताणतणाव पूर्णतः दूर झाले पाहिजेत.  विश्रांति घेण्यासाठी आपण शरीराने सर्व कर्मे थांबवितो आणि शांत बसतो.  त्यानंतर एक सुंदर झोप घेतो.  खूप थकल्यानंतर एक चांगली झोप झाली की, आपण पुन्हा एकदम ताजेतवाने होतो.  विश्रांतीमुळे आपले मन पुन्हा आनंदी व प्रसन्न होते.

 

तसेच रामा !  मनुष्याच्या मनाला खऱ्या अर्थाने विश्रांति हवी असेल, तर तात्पुरता उपाय करून उपयोग नाही.  मनुष्य सगळ्यात जास्त थकत असेल तर तो अविचाराने !  म्हणून संसारी माणूस कायम थकलेला असतो.  थोडेसे काम केले, दोन माणसांचा स्वयंपाक केला, ऑफिसमध्ये जाऊन आले की, थकतो.  शरीराने थकणे ही मोठी समस्या नाही.  परंतु अविचारी मनुष्याचे शरीर तर थकतेच, पण त्याबरोबर मनही थकते.  काहीही न करता तो तासन् तास आळशीपणाने बसून राहतो.

 

अविचार हे थकण्याचे मुख्य कारण आहे.  म्हणून जरी आपण म्हणालो की, "मी विचार करून करून थकलो", त्यावेळी तो विचार नसून सगळा अविचारच केलेला असतो.  अविचारामधून रागद्वेष, स्वार्थ, कामुकता, कामक्रोधादि विकार निर्माण होऊन ते मनुष्याला थकवितात.  एका अविचारामधून दुसरा अविचार, तिसरा अविचार, असे अविचार दृढ होत जातात.  म्हणून वसिष्ठ मुनि सिद्ध करतात की, या जगात युगानुयुगे चाललेला सर्व व्यवहार म्हणजे अविचार आहे.

 

परंतु रामा !  विचार मात्र एका क्षणामध्ये होतो. एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, हे एका क्षणात कोणत्याही मनुष्याला समजू शकते.  विवेकी पुरुषाला क्षणार्धात योग्य गोष्टीचे ज्ञान झाले की तो त्यामध्ये प्रवृत्त होतो.  मनामध्ये द्वंद्व, विकल्प, विकार निर्माण न झाल्यामुळे त्याचे मन शांत असते.  त्यामुळे त्याला तत्त्वविश्रांतीचा लाभ होतो.  याप्रकारे विचाराने, क्रमाक्रमाने त्याच्या सर्व दुःखांचा क्षय होतो.  विचार साधकाला तत्त्वाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन जातो.  म्हणून रामा !  विचार हे खूप महत्त्वाचे साधन आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, November 5, 2024

आचार्योपासना | Worshipping Guru

 



साधकाने गुरुंचा शब्द प्रमाण मानावा.  साधकाच्या जीवनामध्ये दोनच गोष्टी आहेत – एक गुरु आणि दुसरे शास्त्र होय.  तिसरी वस्तूच त्याच्या विश्वामध्ये नाही.  गुरु हीच साधना, गुरु हीच सेवा, गुरु हीच उपासना असे गुरुमय जीवन झाले पाहिजे.  यालाच भगवान गीतेमध्ये ‘आचार्योपासना’ असे म्हणतात.  गुरुशिष्यांची अनेक उदाहरणे आहेत. श्रीसमर्थ आणि कल्याण असतील, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद असतील.  यामध्ये पाहिले तर समजते की, शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुंच्याबद्दल नितांत श्रद्धा व प्रेम हवे.  त्याच्यासाठी गुरूंचा शब्द हाच शेवटचा शब्द आहे. तोच गुरुमय जीवन जगू शकतो.

 

जगद्गुरु आद्य शंकराचार्य फार सुंदर सांगतात –

भावाद्वैतं सदा कुर्यात् क्रियाद्वैतं न कर्हिचित् |  अद्वैतं त्रिषु लोकेषु नाद्वैतं गुरुणा सह ||

शिष्य ज्ञानी झाला, त्याला थोडेफार शास्त्र समजू लागले तरी सुद्धा गुरूंच्या समोर शिष्य हा शिष्यच आहे.  शिष्याने हा नम्रभाव कधीही सोडू नये. आपल्या संतांनी लिहून ठेवले आहे – पायीची वहाण पायी बरी |  चप्पल फार सुंदर आहे, परंतु पायामध्येच तिचे स्थान आहे.  याप्रमाणेच शिष्याने व्यवहार करीत असताना कधीही आपली पायरी, आपली मर्यादा उल्लंघन करू नये.  त्याने कधीही गुरूंशी तुलना करू नये.  गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये कधीही व्यवहार येऊ नये.  याचे कारण गुरुभाव नष्ट झाला तर शिष्य कधीही गुरुंच्याकडून अध्ययन करू शकत नाही.  परंतु जर शिष्य गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला, नम्र झाला, गुरूंच्याबद्दल एक उदात्त भाव निर्माण केला, गुरूंच्याबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, अनन्य भक्ति निर्माण झाली, तर त्या श्रद्धेच्या सामर्थ्यानेच व गुरूंच्या असीम करुणेने शिष्याचा उद्धार होतो.

 

श्रुति म्हणते –

यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ |

तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ||      (श्वेत. उप. ६-२३)

जशी परमेश्वरावर अनन्य भक्ति असते, त्याप्रमाणेच गुरूंच्यामध्ये भक्तीचा भाव निर्माण झाला, तर त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये श्रुतींचे गूढार्थ व तत्वार्थ प्रकट होतात, त्याला ज्ञानाचा अनुभव येतो, त्याचे जीवन कृतकृत्य, पूर्ण होऊन आनंदाने भरून जाते.  तो या संसारामधून मुक्त होतो.

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, October 29, 2024

मनाचा आणि दृश्याचा निरास | Dismissal Of Mind And Creation

 




मनाने ठरविले तर आत्मज्ञानाच्या श्रवणाने अशी एक अवस्था येते की, मन हे मन राहतच नाही.  तर ते केवलस्वरूप, शांतस्वरूप परब्रह्मामध्येच लय पावते.  मन चैतन्यस्वरूपामध्ये लय पावणे म्हणजे वृत्ति लय पावणे होय आणि वृत्ति लय पावणे म्हणजेच दृश्याचा निरास होणे होय.  याप्रकारे दृश्याचा निरास होण्यालाच ज्ञाते लोक 'मोक्ष' असे म्हणतात.

 

थोडक्यात जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत मनाच्या सर्व क्रिया, व्यापार चालतात.  परंतु ज्ञानाने दृश्याचाच अभाव झाला की, मग मात्र मनही शिल्लक राहत नाही.  ज्याप्रमाणे वाऱ्यापासून संरक्षण केलेली दिव्याची ज्योत अतिशय शांतपणे तेवत राहते, त्याचप्रमाणे दृश्यरहित झालेले चित्त शांतस्वरूप परब्रह्मामध्ये लीन होते.  मनाचे मनपण संपते.  राहते ते चैतन्यस्वरूप !

 

म्हणून संसाराचा निरास करावयाचा म्हणजे फार काहीतरी मोठे करायचे असे नाही, तर फक्त जेथून हा संसार उत्पन्न झाला त्या मनाचाच प्रथम निरास केला पाहिजे.  प्रत्यक्ष संसाराचा निरास करणे शक्य नाही.  कारण संसारामध्ये तर अनंत, अगणित दृश्य विषय आहेत.  आपण कशा-कशाचा म्हणून निरास करणार ?  एका दृश्याचा निरास केला तरी दुसरे हजार दृश्य विषय समोर उभे राहतात.  म्हणूनच येथे श्रीवसिष्ठांनी युक्ति सांगितली आहे.  साधकाने दृश्याच्या मागे न लागता आपल्या मनाचाच शोध घ्यावा.  मनानेच मनाच्या साहाय्याने मनाचा निरास करावा.  मनाचा निरास केला की, आपोआपच मनोनिर्मित दृश्याचा निरास होतो.

 

मनाचा निरास करणे म्हणजे मनामधील अहंकार-ममकार-कर्तृत्व-भोक्तृत्व या सर्वांचा निरास करणे होय.  या अज्ञानप्रत्ययांचा निरास झाला की, मग साधक मुक्त होतो.  तीच मोक्षाची केवलस्थिति आहे.  मात्र यासाठी प्रथम मनाचे स्वरूप समजावून घ्यावे.  तसेच हे दृश्य विश्व मनोकाल्पित आहे, हे जाणावे आणि नंतरच ज्ञानाने, विचाराने, शास्त्रचिंतनाने, मनाच्या साहाय्याने मनाचा शोध घेऊन मनाचा निरास करावा.  त्यावेळी मन आपोआपच त्याच्या अधिष्ठानामध्ये म्हणजे चैतन्यामध्ये लय पावते.  दृश्य असणारे जग आणि द्रष्टा असणारे मन नाहीसे होते.  राहते ते केवल चैतन्यस्वरूप !  मन एकदा त्या स्थितीपर्यंत पोहोचले की, जीव हा जीव न राहता स्वतःच परब्रह्म स्वरूप होतो.  तो निर्वाणपदापर्यंत पोहोचतो.  हेच या ज्ञानाचे परमोच्च फळ आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ



Tuesday, October 22, 2024

मय्येव मन आधत्स्व | Base Your Mind on Me

 



आज आपले मन बाह्य विषयांच्यामध्ये आणि उपभोगांच्यामध्येच रममाण झालेले आहे.  मन म्हणजेच वृत्ति होय.  म्हणून मनामध्ये सतत अनेक प्रकारच्या विषयांच्याच वृत्ति येतात.  अखंड रात्रंदिवस विषयांचेच चिंतन चालू आहे.  इतकेच नव्हे तर मनामध्ये अनेक द्वन्द्व, विकल्प, शंका तसेच कामक्रोधादि, रागद्वेषादि विकारांनीच मन व्याप्त झालेले आहे.  या बहिर्मुख, विषयासक्त मनाला प्रथम निवृत्त केले पाहिजे.  हे मन निवृत्त केल्यानंतर मन कोठे ठेवावे ?  भगवान म्हणतात - मय्येव मन आधत्स्व |  माझ्यामध्ये – परमेश्वरामध्येच हे संकल्प-विकल्पयुक्त असणारे मन ठेवावे.  परंतु त्यासाठी प्रथम परमेश्वराच्या सत्तेची जाणीव झाली पाहिजे.  त्याचवेळी परमेश्वराविषयी मनामध्ये श्रद्धा, अस्तिक्यबुद्धि निर्माण होईल.  परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ असून सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी असल्यामुळे तोच कर्तुं-अकर्तुं आहे.  त्याच्याच सत्तेमुळे सर्व विश्वालाही सत्ता प्राप्त होते.

 

व्यवहारामध्ये आपण कार्यकारण संबंध मानतो.  जसे सर्व अलंकारांचे कारण सुवर्ण आहे, घटांचे कारण मृत्तिका आहे.  त्याचप्रमाणे या जगताचेही उत्पत्तिस्थितिलयकारण परब्रह्मस्वरूप आहे.  तेच सर्व विश्वामध्ये सत्तास्वरूपाने अखंडपणे अंतर्बाह्य व्याप्त झालेले आहे.  हीच कार्यकारण मीमांसा समजावून घेतली तर आपोआपच मनामधील सर्व शंका, संशय दूर होतील.  परमेश्वर खरोखरच आहे की नाही ?  अशा प्रकारचे विकल्पही संपतील.  त्याचवेळी ते मन संशयरहित होऊन परमेश्वरामध्ये एकाग्र होईल.

 

परमेश्वरामध्ये मन ठेवायचे म्हणजेच मनातील सर्व वृत्तींचा विषय परमेश्वर केला पाहिजे.  म्हणजे डोळ्यांना जरी बाह्य विषय दिसला तरी मनामध्ये मात्र सतत सगुण परमेश्वराचीच वृत्ति निर्माण करावी.  त्या वृत्तीमध्ये खंड पडू देऊ नये.  म्हणजेच तुपाच्या संतत धारेप्रमाणे अखंडपणे परमेश्वरस्वरूपाचीच वृत्ति निर्माण करण्याचा अभ्यास करावा.  किंवा दुसरा अर्थ – व्यवहारामध्ये आपल्याला सतत बाह्य विषयच दिसत असतात.  त्यावेळी त्या सर्व विषयांच्यामध्ये परमेश्वरस्वरूप पाहावे.  म्हणजेच त्यामध्ये परमेश्वराची अखंडपणे अनुस्यूत असणारी सत्ता पाहावी.  जे जे या विश्वामध्ये सुंदर आहे, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह, नक्षत्र, नद्या, पर्वत सर्व परमेश्वराचेच ऐश्वर्य, विभूति आहे, हे जाणून विश्वात्मक असणाऱ्या परमेश्वराचीच पूजा करावी.  यामुळे मनामध्ये विषयांच्या वृत्ति आल्या तरीही परमेश्वराचेच चिंतन होईल.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, October 15, 2024

विचार कसा करावा ? | Ideal Thinking Process

 




विचार कसा करावा ?  याचेही वर्णन वसिष्ठ मुनि करतात - कोहं कथमयं दोषः संसाराख्य उपागतः |  न्यायेनेति परामर्शो विचार इति कथ्यते ||  हे रामा !  साधकाने स्वतःलाच हे प्रश्न विचारावेत की, मी कोण आहे ?  हा संसाररूपी दोष कोठून निर्माण झाला ?  अशा प्रश्नांचा न्यायाच्या साहाय्याने शास्त्राधारे परामर्श करणे म्हणजेच 'विचार' होय.

 

प्रत्येक मनुष्याने जन्माला आल्याबरोबर 'मी' म्हणजेच शरीर अशी कल्पना करून घेतली.  त्यामुळे शरीराच्या गुणधर्मविकारांशी तादात्म्य पावून मनुष्य जन्ममृत्युयुक्त, सुखी-दुःखी व संसारी होतो.  म्हणून मनुष्याने 'मी' आलो कोठून ?  व 'मी' कोण आहे ?  याचा विचार करणे गरजेचे आहे.  व्यवहारामध्ये आपण एकमेकांना भेटल्यावर, तू कोण ?  तुझे नाव-गाव काय ?  तू कोठून आलास ?  असे प्रश्न विचारतो.  आपल्याला दुसऱ्याविषयी भयंकर उत्सुकता असते.  परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, मनुष्याने ही जिज्ञासा दुसऱ्याविषयी निर्माण न करता स्वतःविषयी निर्माण करावी.  'मी' कोण ?  माझे खरे स्वरूप काय आहे ?  हे सभोवती दिसणारे दृश्य विश्व काय आहे ?  माझ्याभोवती असणारे सगे-सोयरे, आप्त, पति-पत्नी, पुत्र-पौत्र या सर्वांचे स्वरूप काय आहे ?  याचा मनुष्याने अत्यंत युक्तियुक्त विचार करावा.  'मी' म्हणजे देह नाही.  कारण देह हा तर दृश्य, नाशवान असून 'मी' त्या देहाचा द्रष्टा आहे.  त्यामुळे 'मी' शरीर, इंद्रियादि संघातापासून नित्य भिन्न आहे.  माझ्याव्यतिरिक्त समोर दिसणारे दृश्य विश्व सुद्धा नाशवान असून मनोकाल्पित आहे.

 

इतकेच नव्हे तर मी माझे-माझे म्हणून निर्माण केलेली सर्व नाती सुद्धा तात्कालिक व काल्पनिक आहेत.  या जन्मापुरतीच मर्यादित आहेत.  जन्मल्यापासून मृत्युपर्यंत फक्त काही काळ यांचा संबंध आहे.  ज्यांना मी माझे-माझे म्हणतो, ते कोणीही माझे नाहीत.  पैशापुरते, सत्तेपुरते, उपभोगांच्यापुरतेच संबंध आहेत.  आपलीच माणसे आपला विश्वासघात करतात.  धनवान मनुष्याला तर स्वतःच्या पुत्रापासून सुद्धा भीति असते.  या जगात आपल्याशिवाय कोणाचेही काहीही अडत नाही.  साधकाने शास्त्राधारे या सर्व अनित्य संसाराचे अवलोकन करावे आणि त्यापासून विचाराने निवृत्त व्हावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ