Showing posts with label GOD. Show all posts
Showing posts with label GOD. Show all posts

Tuesday, December 31, 2024

ईश्वराचे कृपामय स्वरूप | Generous Nature Of God

 



ईश्वराचे स्वरूप कृपामय आहे.  तो सर्व प्राणिमात्रांच्यावर कृपाच करतो.  मग तो महान असो किंवा यःकश्चित जीव असो.  तो सर्वांच्यावर सारखीच कृपा करीत असतो.  मग तो चांगला आनंदवर्धन करणारा प्रसंग असो, किंवा अनपेक्षित संकट, प्रतिकूल परिस्थिति आणि दुःख देणारा प्रसंग असो, निंदा, नालस्ती, अवहेलना असेल किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, जीवनामध्ये उत्कर्षाचे दिवस असतील किंवा विनाशाचे असतील.  त्या सर्व प्रसंगांच्यामध्ये परमेश्वराची कृपा ही आहेच.  सूर्याचे किरण हे सर्व विश्वाला भेदभाव न करता प्रकाशमान करतात. त्या प्रकाशाचा कोण, कसा उपयोग करेल हे माहीत नाही.  एखादा विधायक काम करेल तर दुसरा विघातक काम करेल.  एखादा धर्माचे रक्षण करेल दुसरा धर्मनाशाचा विचार करेल.  त्याच प्रकाशात एखादा माणसाचे जीवन वाचवील तर दुसरा जीव घेईल.  मग हा दोष कोणाचा ?  सूर्याच्या प्रकाशाचा की मनुष्याचा ?  सूर्याचे किरण सर्वांनाच एकसारखा प्रकाश देणारे, मार्गस्थ करणारे आहेत.  त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव दिसत नाही.

 

परमेश्वराने आपल्याला काय दिले नाही ?  सर्व विश्व फक्त मनुष्याच्या तैनातीलाच निर्माण झाले आहे असे म्हटले पाहिजे.  इतकेच नव्हे, तर मनुष्याला भावना आणि विचार करण्याची बुद्धि दिलेली आहे.  विश्वामध्ये अत्यंत दुर्मिळ असलेल्या तीन शक्ति - ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति - मनुष्याला दिलेल्या आहेत.  यांच्या साहाय्याने नानाविध विश्वाचे निरीक्षण करून अनेक विषयांचे ज्ञान संपादन करून तो ज्ञानसमृद्ध होतो.  ऐहिक उत्कर्षासाठी संकल्पशक्तीने भविष्याच्या इच्छा निर्माण करून त्या पूर्ण करण्यासाठी असामान्य कर्तृत्वशक्ति मनुष्याला दिलेली आहे.  थोडक्यात जीवनाचा सर्वांगीण विकास करावा, विश्व आणि विषयांच्या साहाय्याने मोहक, सुंदर जीवन तयार करावे, जीवनातील ऐहिक आनंद लुटावा.

 

याच्याही पलीकडे जाऊन विश्वाच्या मागे, जीवनाच्या मागे काही तत्त्व आहे का ?  याचा बुद्धीने शोध घ्यावा.  सर्व विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तसेच अदृश्य, अव्यक्त गूढ तत्त्वाचा शोध किंवा जीवनाचे गूढ रहस्य शोधून काढण्याचे सामर्थ्य मानवाला दिलेले आहे.  त्या तत्त्वाच्या अनुभूतीने मनुष्य मन आणि मनाच्या विकारांच्यावर विजय मिळवून जीवनाची पूर्णता, कृतकृत्यता मिळवू शकेल.  थोडक्यात परमेश्वराने मनुष्याला सर्व काही दिले आहे.  ही त्याची अनंत अपार कृपा आहे.  खरे पाहाता - अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने ।  अशी स्थिति आहे.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, October 8, 2024

ईश्वर खरच निष्ठुर आहे का ? | Is God Really Unkind ?

 



ईश्वरकृपा असताना जीवनात संकटे, प्रतिबंध, आपत्ति, कष्ट, दुःख, यातना कशा काय येतात ?  ज्याठिकाणी ईश्वरकृपा असेल तेथे आनंदच असला पाहिजे.  पण हे प्रत्यक्षात दिसत नाही.  त्यामुळे शंका येते की खरोखरच परमेश्वर कृपाळु, दयाळु आहे, का निष्ठूर आहे ?  अशी शंका घ्यावयाचे कारण नाही.  ज्याप्रमाणे चांगल्या, सुखाच्या प्रसंगामध्ये ईश्वरकृपा आहे, तशीच संकटकाळी दुःखाचे वेळी सुद्धा परमेश्वरकृपा आहेच.  ती पाहाण्याची आमच्या मनात ताकद नाही.  मनाची पक्वता नाही.  आपल्या मनाची दारे बंद आहेत.  कल्पनांच्या भराऱ्यामध्ये, राग-द्वेषांच्या जाळ्यामध्ये आपणच आपल्याला बद्ध केलेले आहे.

 

जर एखादा मुलगा म्हणाला की, माझ्या आईचे प्रेम नाही, तर ते किती अव्यवहार्य, अयुक्त आहे.  अशी कोणती माता असेल की जिने नऊ मास आपल्या उदरात मुलास वाढवून आपल्या रक्तातून त्याला अन्न, पाणी पुरवून त्याचे पोषण, वर्धन केले.  असह्य यातना सहन करून त्याला जग दाखविले.  एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षणाला ती मुलाच्याच कल्याणाचा विचार करते.  त्याची काळजी घेते.  तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला जपते.  अशा मुलाने जर आईचे माझ्यावर प्रेम नाही असे म्हटले तर ते योग्य आहे का ?  सुखदुःखाच्या अनेक प्रसंगात ती त्याच्या मदतीला धावून जाते.  स्वतःच्या प्रेमाने त्याला गोंजारते.  परंतु पुत्राच्या कमनशीबामुळे ते प्रेम तो बघू शकत नाही.  तिचे वात्सल्य तिच्या अंतापर्यंत कायम असते.  परंतु कल्पनेच्या विलासात रंगणाऱ्या त्या अभागी पुत्रास ते दिसत नाही.

 

एखादा डॉक्टर रोग्यावर उपचार करतो.  त्यावेळेस त्या रोग्याच्या यातना, दुःख त्याला समजतात.  रोगाची तीव्रता किती आहे हे जाणून त्याप्रमाणे तो उपचार करतो.  एखादा रोगी गळूमुळे वेदनेने तळमळत आहे.  त्याला असह्य यातना होत आहेत.  अशावेळी आपण जर म्हटले की काय डॉक्टर आहे पहा !  आधीच बिचारा असह्य वेदनेने तळमळत आहे आणि हा डॉक्टर आणखीन कापाकापी करून त्याला अधिकच यातना देत आहे.  तो डॉक्टर दुष्ट, निर्दयी, कसाई आहे.  असे म्हणणे योग्य होईल का ?  डॉक्टरची कृति बाहेरून जरी निर्दयपणाची वाटली तरीही त्याच्या मनात रोग्याविषयी निष्ठुरता नाही.  उलट त्याच्याबद्दल जिव्हाळा, प्रेमच आहे.  म्हणूनच तो रोग्याला वेदनामुक्त करण्याचा प्रयत्न करतो.  तसेच परमेश्वरकृपा असूनही दुर्दैवाने ती आपल्याला दिसत नाही.  तो किती दयाळु-कृपाळु आहे हे बघण्यासाठी मनाचे दरवाजे उघडले पाहिजेत.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, July 16, 2024

गुरुकृपा आणि परमेश्वर कृपा | Grace Of Guru And God

 




साधुमहात्मे हेच अनंताच्या यात्रेमध्ये आश्रय आहेत.  एकवेळ ईश्वराची कृपा नसली तरी चालेल परंतु महात्म्यांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.  गुरुनानक म्हणतात -  

गुरु गोविंद दोनु खड़े किसके लागू पाय |

बलिहारी गुरुदेव की गोविन्द दिये बताय ||

गुरु आणि परमेश्वर यांच्यामध्ये सद्गुरू हेच श्रेष्ठ आहेत, कारण परमेश्वर स्वतः आपले स्वरूप प्रकट करू शकत नाही.  तर ईश्वरनिष्ठ पुरुषच परमेश्वराचे स्वरूप उलगडून सांगतात.  आपल्या आतच परमेश्वराची प्रचीति करून देतात. आपलेच स्वतःचे स्वरूप हे परमेश्वरस्वरूप आहे हे प्रचीतीला आणून देतात.  याचाच अर्थ महात्मा हा परमेश्वरापासून भिन्न नसून साक्षात भूतलावर चालते बोलते परमेश्वर स्वरूप आहेत.  म्हणून त्यांची कृपा ही परमेश्वराची कृपा आहे.

 

अशा ईश्वरनिष्ठ लोकांची जर कृपा झाली, त्यांचा अनुग्रह मिळाला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही.  त्यांची जवळीक आपल्या मनात श्रद्धा निर्माण करून भक्तीचा भाव निर्माण करील.  ज्याप्रमाणे निर्धन मनुष्याला पैशाची गरज असेल तर त्याने श्रीमंत धनिकाकडे जावे.  तोच त्याची गरज पूर्ण करू शकेल.  हे जसे आपण व्यवहारात पाहातो त्याप्रमाणे आपल्या मनात जर ईश्वरप्रेम नसेल आणि ते प्राप्त करावयाचे असेल तर ते कोणाकडून प्राप्त करावे ?  ज्यांच्याजवळ परमेश्वराबद्दल निःसीम दृढ प्रेम आहे, जे ईश्वररूपामध्ये तल्लीन, तन्मय झालेले आहेत अशा ईश्वरनिष्ठ महात्म्यांच्याकडे गेले पाहिजे.

 

महापुरुषांच्यामध्ये परमेश्वराविषयी अनन्य, उत्कट निष्ठा आणि भक्ति असल्यामुळे त्यांच्या सान्निध्याने आपल्यामध्ये श्रद्धा, भक्ति, निष्ठा निर्माण होईल.  ते प्रेम परमेश्वर सुद्धा देऊ शकत नाही, कारण परमेश्वर सुद्धा प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले आहे.  म्हणून महापुरुषांची कृपा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

दुर्लभं त्रयमेवैतद्दैवानुग्रहहेतुकम् |  मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः ||       (विवेकचूडामणि)

या तीन अत्यंत दुर्लभ वस्तु परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होतात - मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांचा आश्रय !


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, January 16, 2024

परमेश्वरामध्ये पक्षपात नाही | No Bias in God

 



अग्नि ज्याप्रमाणे प्रत्येक काष्ठामध्ये अव्यक्त स्वरूपाने अनुस्यूत आहे;  परंतु आपल्याला त्याची प्रत्यक्ष प्रचीति येत नाही.  ती येण्यासाठी प्रयत्नाने अव्यक्त अग्नीला विशेष रूपाने व्यक्त केले पाहिजे.  लोणी ज्याप्रमाणे दुधामध्ये असूनही प्रचीतीला येत नाही, कारण ते अव्यक्त स्वरूपामध्ये असते.  ते व्यक्त करण्यासाठी मंथनाने दुधापासून भिन्न केले पाहिजे.  त्याचप्रमाणे परमात्मा सर्व भूतमात्रांच्यामध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे.  परंतु तो स्वतःहून व्यक्त होत नाही.  प्रचीतीला येत नाही.  त्यासाठी प्रत्येकाने पुरुषप्रयत्नाने स्वतःच्या अंतःकरणामध्ये विवेकाच्या साहाय्याने ते स्वरूप भिन्न केले पाहिजे.  त्याची साक्षात प्रचीति घेतली पाहिजे.  तोच प्रत्येक मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे.  अशा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी सहज उपलब्ध होतो.

 

श्रुति म्हणते – दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः |           (कठ. उप. १-३-१२)

सूक्ष्मदर्शी लोकच शुद्ध, एकाग्र आणि अंतर्मुख वृत्तीने परमात्मस्वरूप पाहातात.  सर्व लोक पाहू शकत नाहीत.  याचा अर्थ जे साधक चित्तशुद्धि करून विवेकाच्या साहाय्याने प्रयत्न करतात त्यांना सद्गुरूंच्या कृपेने मी उपलब्ध होतो.  मी जरी त्यांना प्राप्त व्हावयाचे नाही असे ठरविले तरी ते माझ्या हातात नाही, कारण मी त्यांच्या जवळच आहे.  मी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते स्वप्रयत्नाने माझ्या स्वरूपापर्यंत येऊन अभेद स्वरूपामध्ये माझ्यामध्ये राहतात.  ते माझ्यापासून भिन्न राहात नाहीत किंवा मी सुद्धा त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही.  आम्ही दोघेही एकरूप होतो.  थोडक्यात ज्ञानानेच अज्ञानजन्य द्वैताचा ध्वंस होऊन जीवाला मोक्षप्राप्ति होते.

 

यावरून सिद्ध होते की, परमेश्वरामध्ये पक्षपात नाही.  त्याला सर्वच प्रिय आहेत.  फक्त प्रत्येक जीवाने त्याचे स्वरूप प्राप्त करण्याची इच्छा केली पाहिजे आणि स्वतःचा उद्धार स्वतःच करून घेतला पाहिजे.  नाहीतर स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्याप्रमाणे पुरुषार्थच्युत होऊन तो संसारामध्ये अडकतो.  परमेश्वर काहीही करू शकत नाही.  म्हणून प्रत्येकाने ज्ञानप्राप्तीसाठी सर्व प्रयत्न करावेत हाच अभिप्राय आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, January 4, 2022

भगवत कथेचे महत्व | Effects of God's Laudation

 



कथा अनेक प्रकारच्या आहेत.  व्यावहारिक कथा, वैषयिक कथा, स्त्रीकथा, परमेश्वराच्या कथा.  व्यावहारिक आणि वैषयिक कथा मन वैषयिक करून कलुषित करतात, कामुकता निर्माण करतात.  मन बहिर्मुख करून विषयांचेच प्रेम वृद्धिंगत करतात आणि शेवटी मन विषयासक्त होते.  याउलट परमेश्वराच्या कथाश्रवणाने भक्तिरस निर्माण होऊन, मन शुद्ध, निर्मळ होते, सर्व कामुकता, विकारांचा ध्वंस होतो.  जर नित्य आनंद प्राप्त करावयाचा असेल तर भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात.  त्यामुळे भक्तिरस निर्माण होईल आणि आनंद मिळेल.

 

स्त्रिया विटानामिव साधुवार्ता |  ज्याप्रमाणे लंपट पुरुष स्त्रियांच्या हाव-भाव-विलासाची चर्चा करून थकत नाही, त्यामध्ये नित्य रस घेतो, काया-वाचा-मनसा त्याशिवाय अन्य दुसरा विषयच नसतो.  तो तहानभूक, वेळ सर्व विसरून जातो, त्यातच तो नित्य रसास्वाद घेतो.  त्याप्रमाणे भक्त भगवंताच्या कथा श्रवणामध्ये, चर्चेमध्ये रस घेतो, तो स्वतःला विसरून जातो, तहान भूक देश-काळ विसरतो.  तासन् तास ऐकूनही थकत नाही.  कंटाळत नाही.  त्याला श्रवणामध्ये नित्य नवीन रस मिळतो.

 

कथेमध्ये भगवंताचे चरित्र, कल्याणगुण, माहात्म्य, विभूति, अनेक प्रकारच्या लीला श्रवण केल्या जातात.  कथा श्रवण करण्यामुळे मनामध्ये त्या प्रकारचा भाव निर्माण होतो.  परमेश्वर हा कर्तुम्-अकर्तुम् असून त्याच्या सत्तेची जाणीव निर्माण होते.  तो विश्वनियामक असून सर्व जीवांचा रक्षणकर्ता आहे हे समजते.  श्रवणामधूनच नकळत परमेश्वराबद्दलचे प्रेम निर्माण होते.  कथा चित्ताची पकड घेते आणि भगवंताच्या कथेमध्ये मन सहजपणे तल्लीन होते.  विषयांचा विसर पडतो.  आपला अहंकार गळून पडतो.  यामधून भक्तीचा रस निर्माण होतो.  मन शुद्ध होते, अत्यानंदाचा अनुभव येतो.  हळूहळू भक्तीचा उत्कर्ष होऊन भक्त जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक कर्मामध्ये, प्रसंगामध्ये परमेश्वराची कृपा पाहातो.  परमेश्वराच्या सत्तेची अनुभूति घेतो.  सर्व विश्वातच त्याचे स्वरूप पाहातो.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ




Tuesday, September 14, 2021

अहंकारापासून रक्षण | God Protects from Ego

 



या कथानकामध्ये श्रुति सांगते की, देवासुर संग्रामामध्ये देवांचा विजय झाला.  व्यावहारिक दृष्टीने हा विजय देवांचा असेल तरी हा प्रत्यक्ष देवांचा विजय नव्हता, कारण देवांना प्राप्त झालेले बल, सामर्थ्य हे त्यांचे स्वतःचे नसून त्यांच्या उपाधीमध्ये संनिविष्ट असलेल्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, विश्वनियामक परमेश्वराचे ते सामर्थ्य होते.

 

परंतु देव सत्त्वगुणी असतील तरीही दुर्दैवाने त्यांच्यामध्ये अभिमान निर्माण झाला.  यामुळेच देव विचार करायला लागतात की, हा विजय आमचाच आहे.  हा विजय आमच्याच कर्तृत्वाने, सामर्थ्याने व पुरुषार्थाने मिळाला आहे.  यात ईश्वराची कृपा वगैरे काही नाही.  यामुळे देव या विजयाने धुंद, उन्मत्त झाले.  हा विजय व विजायामधून प्राप्त झालेले फळ म्हणजेच महिमा, विभूति आमचीच आहे, असा चुकीचा ग्रह त्यांनी केला.  त्यांच्यामध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व भाव निर्माण झाला.  अहंकार-ममकारादि प्रत्यय निर्माण झाले.

 

देवांच्या आत स्थित असणाऱ्या सर्वसाक्षी ईश्वराने देवांचा हा मिथ्या अभिमान तात्काळ जाणला.  त्यामुळे देवांच्यावरील करुणेने युक्त होऊन ब्रह्माने विचार केला की, देवांना निर्माण झालेल्या या व्यर्थ, मिथ्या अभिमानामुळे देवांचा देवपणा नष्ट होऊन दैवीगुणसंपत्तीचा ऱ्हास होईल.  देवांच्यामध्ये दैवीगुणांची जागा आसुरीगुण घेतील.  आसुरीगुणसंपत्तीचे प्राबल्य वाढल्यामुळे देव स्वतःच सतःच्या नाशाला कारण होतील.  म्हणजे असुरांच्याप्रमाणेच देवांचाही पराजय होईल.  जगाच्या सुस्थितीला आवश्यक असणारी दैवीगुणसंपत्ति नष्ट होईल व हळुहळू जगाचाच ऱ्हास होईल.  आपणच निर्माण केलेल्या या मानवजातीचा नाश होईल.

 

यामुळे ब्रह्माने ठरविले की, देवांच्यामधील अभिमान, मद हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाहीसा केलाच पाहिजे.  देवांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.  देवांनी पुन्हा देवांच्यासारखेच वागावे.  ईश्वरी परमोच्च सत्ता मान्य करून धर्माचरणात व्हावे.  म्हणून देवांना धडा शिकविण्यासाठी, त्यांचा अभिमान नष्ट करण्यासाठी, त्यांना पुन्हा देवत्वाच्या मार्गावर आणण्यासाठी परब्रह्म देवांच्यासमोर आपल्या योगमायेच्या साहाय्याने अचानकपणे अवतीर्ण झाले.

 

 

- "केनोपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१३
- Reference: "
Kenopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2013



- हरी ॐ





Wednesday, March 10, 2021

ईश्वर निर्मिती कशी करतो ? | How God Ideates?

 


ईश्वर विश्वामधील सर्व लौकिक व शास्त्रीय पदार्थांची निर्मिती करतो.  लौकिक पदार्थ म्हणजे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंधादि हे बाह्य पदार्थ होय व शास्त्रीय पदार्थ म्हणजे पापपुण्यादि फळे होय.  हे सर्व पदार्थ ईश्वराच्या अंतःकरणामध्ये अव्यक्तरूपाने, वासनारूपाने राहतात.  ईश्वर या पदार्थांना संकल्परूपाने आपल्या आताच ठेवतो.  नंतर ईश्वरच बहिश्चित्त होऊन या सर्व वासनारूप, अव्यक्त पदार्थांना व्यक्त करतो.

 

सर्व पदार्थ ईश्वराच्या चित्तामध्ये वासनारूपाने, अव्यक्तरूपाने राहतात.  त्यावेळी त्या पदार्थांचे नाम-रूपादि धर्म प्रत्यक्ष अनुभवायला येत नसल्यामुळे ते पदार्थ व्यवहारास अयोग्य असतात.  म्हणूनच त्यांना अव्यक्त असे म्हटले आहे.  नंतर ईश्वरच बाह्य विश्वामधील पृथ्वीसारखे स्थिर पदार्थ व विजेसारखे अस्थिर, क्षणिक पदार्थ कल्पित करतो.  म्हणजेच ईश्वर बहिर्मुख होऊन बाह्य, दृश्य, स्थूल, व्यवहारयोग्य असणाऱ्या अनंत पदार्थांची कल्पना करतो.

 

ज्याप्रमाणे एखादा कुंभार घटाची किंवा विणकर वस्त्राची निर्मिती करतो.  त्यावेळी प्रथम कुंभार किंवा विणकर अव्यक्त, अदृश्य, व्यवहार-अयोग्य असणाऱ्या घटपटाची कल्पना त्यांच्या अंतःकरणामध्ये करून नंतरच मग त्या अव्यक्त घटपटाला नामरूपांच्या साहाय्याने व्यक्त करतात.  त्याचप्रमाणे विश्वकर्ता ईश्वर सुद्धा पुढे निर्माण होणारे सर्व पदार्थ प्रथम आपल्या आतच कल्पित करतो.  मायेच्या साहाय्याने कल्पित कारून पाहतो व नंतरच बहिश्चित्त होऊन त्या पदार्थांना व्यक्त करतो.  त्यावेळी ते सर्व पदार्थ नामरूपांनी संपन्न झाल्यामुळे सर्वांची दृश्यरूपाने व भिन्न-भिन्न स्वरूपाने आपणास प्रचीति येते.


थोडक्यात, प्रथम अव्यक्त, अदृश्य रूपामध्ये असणारे पदार्थच ईश्वराच्या संकल्पाने व्यक्त होऊन दृश्य, स्थूल रूपाला प्राप्त होतात.  ईश्वरच केवळ संकल्पमात्राने अंतर्बाह्य सर्वच पदार्थांची कल्पना करतो.

 

 

- "माण्डूक्योपनिषत् या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ




Tuesday, December 22, 2020

अंतःकाळी परमेश्वराचे स्मरण | Remembering God at the End

 



जो यति अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करून देहत्याग करतो, तो परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होतो.  येथे या विधानाचा शाब्दिक अर्थ घेता येणार नाही.  अंतकाळी केवळ मुखाने ‘नारायण’ किंवा ‘श्रीराम’ वगैरे शब्द उच्चारणे म्हणजे परमेश्वराचे स्मरण होत नाही.  स्मरण करणे हे ओठांचे कार्य नाही तर मनाचे लक्षण आहे.  म्हणून स्मरण करतेवेळी ज्या विषयांचे आपण स्मरण करतो त्या विषयाची वृत्ति अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे.  तरच ते स्मरण होऊ शकते.

 

अज्ञात वस्तूचे कधीही स्मरण करता येत नाही.  जी वस्तु आयुष्यामध्ये कधीही अनुभवलेली नाही किंवा ज्या वस्तूचे ज्ञान नाही, अशा वस्तूचे स्मरण करता येत नाही.  अंतकाळी परमेश्वराचे नाम ओठावर आले म्हणजे मोक्ष मिळतो असे नाही, तर त्या नामाचा मनावर संस्कार व्हावा लागतो.  आत्यंतिक ओढ, निरतिशय प्रेम असल्याशिवाय कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची अगर विषयाची तळमळ मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही.

 

अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करण्यापूर्वी त्यापूर्वी जन्मभर अखंडपणे परमेश्वराबद्दल आत्यंतिक ओढ, निस्सीम प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे.  तरच अंतकाळी परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.  म्हणून परमेश्वर हाच शाश्वत, नित्य असून अन्य सर्व विषय अनित्य, नाशवान असल्यामुळे परमेश्वरावरच प्रेम करावे.  पूजन, भजन कीर्तन, सेवा यामधून जन्मभर परमेश्वराचे प्रेम, भक्ति उत्कर्षित करण्याचा अभ्यास करावा.  यासाठीच महात्म्यांचा किंवा ईश्वरनिष्ठ पुरुषांचा संग करावा.  या सर्वांचा परिपाक म्हणजे अन्य सर्व विषयांविषयी तुच्छ वृत्ति निर्माण होऊन परमेश्वराच्या स्वरूपाची वृत्ति दृढ व्हावयाला लागेल.  काया-वाचा-मनाने नित्य-निरंतर परमेश्वराचा ध्यास लागेल आणि अंतकाळी अनायासाने परमेश्वराचे स्मरण होऊ शकेल.

 

सद्गुरूंच्या कृपेने वेदान्तशास्त्राच्या उपदेशाचे एकाग्र चित्ताने श्रवण करावे आणि मननाने सर्व संशायांचा निरास करावा.  ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ ही वृत्ति दृढ करावी.  याचा परिपाक म्हणजे स्वस्वरूपाची सहज स्वाभाविक सुस्थिति प्राप्त होते.  असाच यति अंतकाळी अभेदरूपाने स्मरण करून शरीराचा त्याग करतो आणि माझ्या स्वरूपाला म्हणजेच निरुपाधिक, निर्विशेष ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो.  त्याला विदेहकैवल्य प्राप्त होते.

 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ