Tuesday, December 5, 2023

तीन प्रकारच्या शंका | Three Types of Doubts

 प्रामुख्याने शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या शंका किंवा संशय सांगितले जातात.  प्रमाणशंका, प्रमेयशंका आणि प्रमाशंका.  जे लौकिक आणि मूर्ख अज्ञानी लोक आहेत, त्यांना मरेपर्यंत सारख्याच क्षणाक्षणाला शंका निर्माण होतात.  त्यांचे मन सतत संशययुक्त असते.  स्वतःच्या बुद्धीला शास्त्र समजत नाही, कारण वेदांतशास्त्र हे बुद्धीच्याही अतीत आहे.  त्यामुळे असा मनुष्य वेदांतशास्त्राबद्दलच शंका घेतो.  त्याला हे शास्त्र अत्यंत रुक्ष, बोजड, अवघड वाटते.  त्याला त्या वेदांतशास्त्रामध्ये काही रस वाटत नाही, कारण त्याने कधी समजून घ्यायचा प्रयत्नच केलेला नसतो.  आपली बुद्धि अत्यंत प्राकृत आणि स्थूल आहे.  यत् दृष्टं तत् सत्यम् |  जे जे डोळ्यांना दिसते, तेच फक्त सत्य अशी सवय लागल्यामुळे मनावर तेच संस्कार झालेले आहेत.  मनुष्य स्वतःचे म्हणणे सोडायला कधीही तयार नसतो.

 

दुसरी शंका म्हणजे प्रमेयविषयक शंका होय.  प्रमेय म्हणजेच या शास्त्रामाधून प्रतिपादित केलेला जो ज्ञेय विषय आत्मा, याबद्दलच अनेक शंका आहेत.  आत्मा अस्ति न वा |  आत्मा खरोखरच आहे की नाही ?  वर्षानुवर्षे आत्मस्वरूपाचे ज्ञान घेतात आणि आत्म्याच्या अस्तित्वाबद्दलच शंका विचारतात.  अशा लोकांना कधीही शांति, समाधान प्राप्त होत नाही.  

भगवान म्हणतात – संशयात्मा विनश्यति |              (गीता अ. ४-४०)

संशयी पुरुषाचा नाश होतो.  त्याला आत, अंतरंगामध्ये स्थिरता, शांति आणि समाधान मिळत नाही.  याचे कारण श्रद्धेचा अभाव आहे.

 

आणि तिसरी शंका म्हणजेच प्रमाविषयक शंका होय.  प्रमा म्हणजेच ज्ञान.  साधकाला आत्मज्ञानाविषयीच शंका निर्माण होतात.  “खरोखरच या ज्ञानाने मला मोक्ष मिळेल का ?  या ज्ञानाचे फळ निरतिशय आनंदाची प्राप्ति मला होईल का ?  या ज्ञानामध्ये इतके सामर्थ्य आहे का ?”  अशा शंका निर्माण होतात.  परंतु शास्त्रकार सांगतात – आत्मज्ञान हे स्वतःच फलस्वरूप आहे.  हे ज्ञान श्रवण करीत असतानाच त्याचा अनुभव येतो.  मन जर शुद्ध, परिपक्व, रागद्वेषरहित असेल, एकाग्र, तल्लीन, तन्मय जर असेल, तर ज्ञानाची अनुभूति श्रवण करतानाच आली पाहिजे, इतके या ज्ञानाचे सामर्थ्य आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मार्च २००७   
- Reference: "
Mundakopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007


- हरी ॐ
Tuesday, November 28, 2023

मला मोक्ष कसा मिळेल ? | How Will I Get Liberation ?

 ज्यावेळी श्रद्धावान मनुष्य मोक्षाचा उपाय काय ?  मला मोक्ष कसा मिळेल ?  त्यासाठी मी काय करावे ?  असा गांभीर्याने विचार करेल, एखादा विषय मिळविण्यासाठी मनुष्य अस्वस्थ होतो तसा ज्यावेळी मुक्तिसाठी मनुष्य साधनप्रवृत्त होईल, त्यावेळी हे रामा !  त्या तीव्र मुमुक्षूला लवकरात लवकर मोक्ष मिळण्याची शक्यता आहे.  म्हणजेच मोक्षासाठी मोक्षाची तीव्र तळमळ वाटली पाहिजे.  यामधून वसिष्ठ मुनींनी मुमुक्षुत्व हे साधन सूचित केले आहे.

 

कोणत्याही गोष्टीसाठी तळमळ किंवा ध्यास निर्माण झाला पाहिजे.  व्यवहारामध्ये सुद्धा उत्तुंग यश मिळवायचे असेल तर मनुष्य त्या ध्येयाने झपाटला पाहिजे.  त्याचे सर्व आचरण ध्येयानुकूल पाहिजे.  आपल्या ध्येयाव्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टी गौण होऊन त्या सर्वांचे महत्व कमी झाले पाहिजे.  रात्रंदिवस ध्येयाने प्रेरित होऊन मनुष्य ज्यावेळी अत्यंत दक्ष राहून विवेकाने ध्येयानुकूल प्रयत्नांच्यामध्ये प्रवृत्त होईल, त्यावेळी ध्येय त्या मनुष्यापासून दूर राहत नाही.  शीघ्रातिशीघ्र मनुष्य आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो.

 

तसेच मोक्षाच्या बाबतीत आहे.  सर्व ज्ञानी महात्मे व संतांचे चरित्र पाहिले तर दिसते की, ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने त्यांचे संपूर्ण जीवन तपोमय, ज्ञानमय व तेजस्वी बनले होते.  सर्वांनी साधनेमध्ये व कठोर तपश्चर्येमध्ये स्वतःला झोकून दिले होते.  सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय ईश्वरप्राप्ति होत नाही.  हे त्यांनी आपल्या जीवनामधून प्रत्यक्ष दाखवून दिले होते.  साधकांनी ज्ञानी पुरुषांची अशी चरित्रे समोर ठेऊन आत्मप्राप्तीच्या साधनेमध्ये प्रवृत्त व्हावे.


 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ
Tuesday, November 21, 2023

ईश्वराभिमुख वैदिक कर्मे | Divine Vaidik Actions

 सर्व वैदिक कर्मांच्या अनुष्ठानाने चित्तशुद्धि प्राप्त होऊन क्रमाने जीव ईश्वरस्वरूपाला प्राप्त होतात.  म्हणून प्रत्येक जीवाने वैदिक कर्मांचे अनुष्ठान केले पाहिजे.  ही कर्मे ईश्वराभिमुख करून ईश्वरस्वरूपापर्यंत नेणारी आहेत.

 

अहं यज्ञःयज्ञ म्हणजे स्मार्त कर्म.  स्मृतींनी प्रतिपादित केलेली कार्ये म्हणजे स्मार्त कर्मे होय.  यांनाच काही वेळेला धार्मिक कर्मे असे म्हटले जाते.

 

अहं स्वधापितरांना श्राद्धादि कर्मामध्ये पिंडरूपाने दिलेल्या अन्नाला स्वधा म्हणतात.  पितृयज्ञ केवळ शारीरिक कर्म नसून त्यामागे श्रद्धा आणि प्रेमाचा भाव आहे.  त्यामुळे हेही कर्म चित्तशुद्धीचे साधन होते.

 

अहं औषधम्औषध तसेच व्रीहियवादि सर्व प्रकारचे अन्न माझेच स्वरूप आहे.  भगवान म्हणतात त्याप्रमाणे चतुर्विध अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे.  म्हणून वेदामध्ये म्हटले आहे – अन्नं ब्रह्मेति व्यजानात् |  अन्नं न निन्द्यात् |  तत् व्रतम् |  अन्न हे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे अन्नाची कधीही निंदा, तिरस्कार करू नये.  ते शुद्ध वृत्तीने खावे.  अन्नानेच मनुष्याच्या मनाची जडण-घडण होत असते.  शुद्ध आणि प्रसन्न वृत्तीने खाण्यामध्ये अंतरिक सुख आणि आनंद आहे.  विश्वामधील सर्व प्राणिमात्रांचे पोषण, वर्धन आणि रक्षण करणारे अन्न असल्यामुळे उपभोग म्हणून न खाता परमेश्वरस्वरूप आहे असे जाणून आदरयुक्त भावाने खावे.  ही सुद्धा एक साधना आहे.  स्वधा म्हणजे सर्व प्राणीमात्र जे अन्न खातात ते व्याधींचे नाश करणारे औषध होय, असाही अर्थ घ्यावा.

 

अहं मंत्रःपितृयज्ञ किंवा देवतायज्ञामध्ये ज्याच्या साहाय्याने हवन करतात, ते मंत्र माझे स्वरूप आहे.  मंत्रांच्या साहाय्याने हवन करून देवांना प्रसन्न करून मनुष्य आपली इच्छा पूर्ण करू शकतो.  देवतांना संतुष्ट करून त्यांची कृपा प्राप्त करता येते.  म्हणून मंत्र हे माझे स्वरूप आहे.

 

तसेच यज्ञामध्ये हवन केले जाते ते तूप आणि ज्याच्यामध्ये हवन केले जाते, तो अग्नि सुद्धा माझे स्वरूप आहे.  थोडक्यात यज्ञामधील अग्नि, हवन करण्यासाठी असलेली सामग्री, मंत्र आणि कर्म सुद्धा माझे स्वरूप आहे.  सर्व ब्रह्मस्वरूप आहे हा भाव ठेवावा.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ
Tuesday, November 14, 2023

नास्तिकांना मार्गदर्शन | Guidance for Non-Believers

 संसारग्रस्त मनुष्याला सतत दुःखांचाच अनुभव येत असल्यामुळे त्याच्या मनामध्ये आनंदस्वरूपाच्या अस्तित्वाबद्दलच शंका निर्माण होईल.  खरोखरच ते परमपद आहे का ?  असा प्रश्न निर्माण होतो.  म्हणून येथे वसिष्ठ मुनि सांगतात की, ज्याच्या मनामध्ये तत्त्वाच्या अस्तित्वाबद्दल शंका आहे, त्याने त्यामध्ये प्रयत्नपूर्वक विचार करावा.  तत्त्व किंवा आत्मस्वरूप नाहीच, असे म्हणणे अत्यंत घातक असून त्यामुळे स्वतःचेच अस्तित्व नाकारण्यासारखे आहे.

 

श्रुति म्हणते - असन्नेव स भवति असद् ब्रह्मेति चेत् वेद |  (तैत्ति. उप.)  जो ब्रह्मस्वरूपाला असत्  म्हणजे नाही असे म्हणतो, तो स्वतःच असत् होतो.  म्हणजे तो स्वतःच स्वतःचे अस्तित्व अमान्य करतो.  कारण तत्त्व हे स्वतःचे पारमार्थिक स्वरूप आहे.  तसेच तत्त्वाचे अस्तित्व नाकारण्यासाठी सुद्धा माझ्या - तत्त्वाच्या सत्तेची आवश्यकता आहे.  म्हणूनच सत्तेचा - अस्तित्वाचा म्हणजे सत् तत्त्वाचा कोणीही निरास करू शकत नाही.  वसिष्ठ मुनि सांगतात की, नास्तिक मनुष्याने याप्रमाणे तत्त्वामध्ये विचार करावा.

 

याशिवाय असणारे जे आस्तिक लोक आहेत म्हणजे आत्मचैतन्यस्वरूपाच्या, ईश्वराच्या अस्तित्वावर ज्यांचा विश्वास आहे, जे बुद्धीने तत्त्वाचे अस्तित्व जाणतात, अशा श्रद्धावान विवेकी साधकांनी त्यापुढे साधना करून, तत्त्वाचे विशेष ज्ञान प्राप्त करून या भवसागरमधून पार व्हावे.  कारण श्रद्धा हेच ज्ञानाचे साधन आहे.  याप्रमाणे दृढ श्रद्धा निर्माण झाल्यानंतरच तत्त्वाचे ज्ञान होऊन त्यामध्ये निष्ठा प्राप्त होते आणि साधक क्रमाने या अज्ञानकल्पित संसारामधून मुक्त होतो.

 

जो जेथे ज्या पायरीवर आहे, तेथून त्याने क्रमाने आपल्या जीवनाचा विकास करावा.  हाच उद्देश आहे.  नास्तिक लोकांनी, केवळ दिसत नाही म्हणून ईश्वर नाही, आत्मचैतन्य नाही, असे म्हणण्यापेक्षा बुद्धीने थोडा सखोल विचार करावा.  कारण विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्याला दिसत नाहीत, तरीही त्या अस्तित्वामध्ये आहेत.  म्हणून नास्तिक बुद्धिवादी लोकांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारण्यापेक्षा त्यामध्ये विचार करावा आणि आस्तिक श्रद्धावान लोकांनी गुरुमुखामधून वेदांतशास्त्राचे श्रवण करावे.  त्यानंतर त्यापुढील मननादि साधनेमध्ये प्रवृत्त होऊन ज्ञान, ज्ञाननिष्ठा व तत्त्वाची साक्षात् अनुभूति प्राप्त करावी.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ
Tuesday, November 7, 2023

भक्ति व ज्ञान पूरक आहेत | Devotion Supplements Knowledge

 आस्तिक्य बुद्धीतून निर्माण झालेल्या श्रद्धेमधून प्रेम किंवा भक्ति निर्माण होते.  प्रेमामुळे ईश्वराचे अधिक ज्ञान होते.  ईश्वराचे स्वरूप, कल्याणगुण, माहात्म्य समजते.  ईश्वराचे कर्तुम्-अकर्तुम् स्वरूप हे जितके समजते तितक्या प्रमाणात स्वतःचा अहंकार, दर्प कमी होतो.  भक्त अधिक नम्र, विनयशील होतो.  प्रेमाचा अधिक उत्कर्ष होतो.  त्यामुळे ज्ञान अधिक वृद्धिंगत होते.  म्हणजेच ज्ञान आणि भक्ति एकाच वेळेला वर्धन होतात.  ते दोन्हीही पूरक आहेत.  तुल्य आहेत.  म्हणून काही आचार्य म्हणतात ज्ञान आणि भक्ति परस्पर आश्रित आहेत.  श्रवणामधून भक्ति निर्माण होते.

 

भक्तिशिवाय ज्ञान असेल तर ते ज्ञान मनुष्यामध्ये अहंकार, दंभ, दर्प वाढविते.  मनुष्य स्वतःला फार मोठा विद्वान समजतो आणि अन्य सर्व कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो.  त्याच्या मनाला ज्ञानाचे फळ, शांति, तृप्ति मिळत नाही.  उलट ते ज्ञान दुःखाला, द्वंद्वाला कारण होते.  म्हणून श्रद्धेशिवाय ज्ञानाला पूर्णता येत नाही.  पक्वता येत नाही.

 

तसेच प्रेम किंवा भक्ति ज्ञानरहित असेल तर ते प्रेम फक्त भावनांचा उद्रेक होईल.  ती फक्त उचंबळून येणारी एक उर्मी असेल.  भक्तीला विवेकाची बैठक नसल्यामुळे समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे त्या प्रेमाला भरती येऊन एका क्षणाला परमोच्च अवस्थेला नेईल आणि दुसऱ्या क्षणी ओहोटीमुळे प्रेम विरून जाईल.  त्यामुळे याप्रकारचे प्रेम सातत्याने टिकत नाही.

 

म्हणून भक्तीला विवेकाची साथ आवश्यक आहे.  विवेकयुक्त भक्तिच पक्व होऊन परमप्रेमस्वरूपावस्थेला प्राप्त होते.  यासाठी सर्व संत डोळस भक्ति असावी असे म्हणतात.  थोडक्यात ज्ञानाला भक्तीची आणि भक्तीला ज्ञानाची सांगड हवी.  त्याशिवाय साध्य प्राप्त होणार नाही.


 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006


- हरी ॐ
Tuesday, October 31, 2023

घृणास्पद अज्ञानाची अवस्था | Despicable State of Ignorance

 रामा ! या अज्ञानाचे काय वर्णन करावे ?  रामा !  चांडाळाच्या वस्तीमधून हातात घाणेरडे गलिच्छ भिक्षापात्र घेऊन फिरणे एक वेळ बरे !  परंतु अज्ञानामध्ये राहणे, ही त्यापेक्षाही भयंकर अवस्था आहे.  येथे चांडाळ हाच मुळात अपवित्र !  त्याची वस्ती सुद्धा अस्वच्छ !  त्यामधून आपल्या हातात गलिच्छ भिक्षापात्र घेणे व तेथे आपण भिकारी म्हणून जाणे, भिक्षा मागणे आणि त्या चांडाळाने दिलेली भिक्षा खाऊन त्यावर उपजीविका करणे, या सर्वच गोष्टींची कल्पना करणे सुद्धा किळसवाणे आहे.  आपण आपल्या जीवनात या भयंकर गोष्टींची कल्पना सुद्धा करू शकत नाही.

 

परंतु वसिष्ठ मुनि येथे सांगतात की, अज्ञानावस्थेत राहणे यापेक्षाही भयंकर आहे.  कारण अज्ञानाने मनुष्य नाशवंत विषयांच्यामध्ये आसक्त होऊन पशूंच्याप्रमाणे स्वैर उपभोग घेतो.  व्यभिचारी होतो.  जन्मानुजन्मे भोगांच्यामध्ये लोळूनही मनुष्याची तृप्ति होत नाही.  त्याच-त्याच इंद्रियभोगांच्यामध्ये मनुष्य एखाद्या किड्याप्रमाणे पुन्हा पुन्हा प्रवृत्त होतो.  रामा !  या मूर्खपणाला काय म्हणावे ?

 

अज्ञानामधील जीवन अत्यंत भयंकर आहे.  जसे एखादा मनुष्य गडद अंधारामध्ये बसावा आणि त्याने आपल्याच डोक्यावरून गोधडी पांघरून घ्यावी आणि म्हणावे की, "वा ऽऽ काय छान वाटते आहे !"  तसेच अज्ञानी मनुष्य अज्ञानामधून जन्माला येतो, अज्ञानामध्येच जगतो व तेथेच मरतो आणि एवढे करून स्वतःला कृतार्थ समजतो.  हा मूर्खपणाचा कळस आहे.  अज्ञानामुळे मनुष्याला ज्ञानाची, प्रकाशाची पुसटशी सुद्धा जाणीव होत नाही.  त्याला रत्नासारखे मौल्यवान मनुष्यशरीर मिळूनही ते कवडीमोल करून तो स्वतःची प्रतारणा करून, केवळ खाण्यात आणि झोपण्यात व्यर्थ जीवन घालवितो.  हे रामा !  असे भोगासक्त व निकृष्ट पशुतुल्य जीवन जगण्यापेक्षा एखाद्या वेळी चांडाळाच्या घाणेरड्या वस्तीत जाऊन भीक मागण्याची वेळ आली तरी ठीक आहे !

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ
Tuesday, October 24, 2023

संसाराची दलदल | The Swamp Of Illusion

 प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्येच निरतिशय आनंदस्वरूप परमात्मा निवास करीत असेल तरी दुर्दैवाने सर्व जीव स्वस्वरूपाचा शुद्ध आनंद न अनुभवता फक्त दुःखकारक संसाराचाच अनुभव घेतात.  याला कारण स्वस्वरूपावर आलेले अज्ञान आणि अज्ञानजन्यकार्याचे आवरण होय.  ज्याप्रमाणे गाईच्या सडामध्ये अमृततुल्य दूध असते;  परंतु त्याच सडावर बसलेली गोचीड अमृततुल्य दूध न पिता रक्तच शोषत असते.  प्रकाशस्वरूप असलेल्या सूर्यावर आवृत्त झालेल्या कृष्णवर्णीय ढगाच्यामुळे सूर्य काळवंडलेला, तेजोहीन दिसतो.  तो ढगाच्या मागे असूनही त्याच्या स्वरूपाने अनुभवायला येत नाही.

 

त्याचप्रमाणे स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे नित्य, शाश्वत, निरतिशय सच्चिदानंद स्वरूपाची विस्मृति होते.  नित्य काय ?  आणि अनित्य काय ?  हे कळत नाही.  या अविवेकामुळे सर्व जीव देहाशी तादात्म्य होतात.  यामधून त्यांच्या अंतःकरणामध्ये अनात्मस्वरूपाच्या विषयांच्याच उपभोगण्याच्या कामना निर्माण होतात.  खरे पाहाता त्यांची निरतिशय आनंद मिळावा हीच मूलभूत कामना असते;  परंतु निरतिशय आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न करता विषयभोगाची इच्छा करतात.  विषयभोगामधून ते निरतिशय आनंद मिळविण्याची इच्छा करतात.  परंतु सर्व विषय उपभोग घेऊनही त्यांना आयुष्यामध्ये कधीही आनंद मिळत नाही.  त्यांच्या सर्व कामना व्यर्थ, निष्फळच होतात.

 

येथे शंका येईल की आनंदस्वरूप परमात्म्याची इच्छा निर्माण न होता विषयांच्या इच्छा का निर्माण होतात ?  याचे उत्तर भगवान देतात – त्या सर्व अविवेकी लोकांनी राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचा आश्रय घेतलेला असतो.  त्यांचे कोणतेही कर्म निःस्वार्थ, निष्काम आणि उदात्त भावाने नसल्यामुळे सर्व कर्मे व्यर्थच असल्यासारखी आहेत.  सकाम ज्ञानाने फक्त कामना आणि कर्मफळाची वासना अधिक वृद्धिंगत होते.  म्हणून त्यांचे सर्व ज्ञान निष्फळ झाल्यासारखे होते.  रजोगुण आणि तमोगुणात्मक अविद्या मायेच्या प्राधान्यामुळे रज आणि तमोविकारांच्या आहारी जाऊन प्रकृतीचे गुलाम होतात आणि अधःपतित होतात.  ते संसारामध्येच संपूर्ण अडकतात.  यामुळे मी परमात्मा त्याच्या हृदयामध्ये निवास करून सुद्धा ते मला जाणत नाहीत.  ते मला प्राप्त न होता संसाराला प्राप्त होतात.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ