Tuesday, May 26, 2026

दृष्टांताचे सुयोग्य ग्रहण | Proper Interpretation of Parable

 



वस्तुतः ब्रह्माला कोणतेही कारण नाही आणि ब्रह्म हे सुद्धा कशाचेही कारण होऊ शकत नाही.  कारण ब्रह्माव्यतिरिक्त दुसरी वस्तुच अस्तित्वामध्ये नाही.  परंतु तरीही श्रुति ब्रह्मस्वरूपामध्ये जगत्कारणत्वाचा आरोप करतात.  याचे कारण साधकाला दृश्य जग माहीत आहे.  त्याच जगताच्या साहाय्याने जगताच्या अतीत असणाऱ्या परब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देता येते.  ते समजावे म्हणून सोने-अलंकाराचा दृष्टांत दिला आहे.  किंवा रज्जु-सर्पाच्या दृष्टांतामध्येही अज्ञानी पुरुषाला साप दिसतो.  म्हणून साप दोरीमधून निर्माण झाला असे विधान केले जाते.  परंतु दोरी हे सापाचे कारण होऊ शकत नाही.  कारण वस्तुतः साप निर्माण झालाच नाही.

 

म्हणून बुद्धिमान पुरुषाने दृष्टांताचे संपूर्ण ग्रहण करू नये किंवा दृष्टांताचा पूर्णतः त्यागही करू नये.  दृष्टांताबद्दल कोणताही कुतर्क करून गुरूंच्याबरोबर वाद घालू नये.  तर साधकाने दृष्टांत आणि दार्ष्टांत यामधील थोडेफार जे काही साधर्म्य आहे, त्याच्या साहाय्याने दार्ष्टांत समजावून घ्यावा आणि अन्य अंशाचा व कुतर्कांचा त्याग करावा.  दृष्टांत आणि दार्ष्टांत यामध्ये काही अंशीच साम्य असते.  त्यामध्ये पूर्णांशाने साम्य असू शकत नाही.  त्यामुळे पूर्ण दृष्टांताचा तेथे काही उपयोग नसतो.

 

जसे आपणास अंधकारामधील वस्तु पाहावयाच्या असतील तर आपण हातात दिवा घेतो.  दिवा हे प्रकाशाचे साधन आहे.  दिव्यातील वाट, तेल, वगैरेदि या साधनांचा प्रत्यक्ष अंधाराचा नाश करण्यासाठी काहीही उपयोग नसतो.  तसेच दार्ष्टांत समजण्यासाठी दृष्टांताचा फक्त काही भागच आवश्यक असतो.  असे असेल तरी आपल्याला वात, तेल यांसहित दिवा लागतो.  तसेच दृष्टांत आणि दार्ष्टांत यांच्यामध्ये अगदी अंशतः साम्य असेल तरी त्या दृष्टांताचा त्या दिव्याप्रमाणे ज्ञानासाठी निश्चितच उपयोग होतो.  साधकाला दृष्टांताच्या साहाय्याने वेदांच्यामधील - अहं ब्रह्मास्मि |  तत्त्वमसि |  प्रज्ञानं ब्रह्म |  अयमात्मा ब्रह्म |  या महावाक्यांच्यामधून जीवब्रह्मैक्यज्ञान प्राप्त होते.  साधकाने दृष्टांतापेक्षा आपले मन ज्ञानामध्ये ठेवावे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, May 19, 2026

काम-क्रोधादींपासून रक्षण | Defence Against Desire & Rage

 




मनुष्य म्हणतो की, विश्व बघण्यासाठी आहे. मग काहीही पाहिले तर त्यात काय पाप आहे ?  डोळ्यावर पट्टी बांधून फिरावयाचे का ?  बघावयास लागला की मनामध्ये विचार येतो की, "समोर आलेल्या व्यक्तीबरोबर दोन शब्द बोलण्यामध्ये काय दोष आहे ?"  कोणी भेटले तर दोन गोष्टी बोलणे हा शिष्टाचार आहे.  मन आणखी पुढे जाते आणि म्हणते त्यांच्याशी संबंध ठेवला म्हणून काय झाले ?  लोकांशी संबंध ठेवावयाचा नाही तर कोणाशी ठेवावयाचा ?  याप्रमाणे अनर्थ फुलत जातो आणि मनुष्याचे अधःपतन होते.  आपणच आपले मन क्षुब्ध, संतप्त, विक्षेपयुक्त करतो आणि मनाची शांति, स्थिरता, शुद्धता, संयमन नाहीसे करतो.  हे नाना तऱ्हेचे विचार, पूजा, जप, उपासना वगैरे साधना करताना आपला पिच्छा सोडत नाहीत.  नव्हे, मंत्रजपाच्या वृत्तीच्या ऐवजी अन्य सर्व विचार येत राहातात. हा फार मोठा प्रतिबंध आहे.  म्हणून साधकाने, भक्ताने अधिक सावधान, दक्ष राहिले पाहिजे की ज्यामुळे मनामध्ये पाप संकल्पाचा तरंगच उठणार नाही.

 

दद्यान्नावसरं किञ्चित् कामादीनाम् मनागपि |  कामक्रोधादींना कधीही मनामध्ये येण्याचा यत्किंचित् सुद्धा अवसर देता कामा नये.  इतकी सावधानता, दक्षता मनात सतत ठेवली पाहिजे.  म्हणून तर यमराज सर्व साधकांना आदेश देतात - अप्रमत्तः भव |  म्हणजेच - प्रमादं न कुर्यात् |  साधना करीत असताना साधकाने कोणत्याही प्रकारचा प्रमाद, निष्काळजीपणा, चालढकलपणा करू नये.  अत्यंत दक्ष आणि सावधान राहून मनातील सर्व वृत्तींचे निरीक्षण केले पाहिजे आणि पुसटसा सुद्धा विषयाचा संकल्प आणू देता कामा नये.  आला तर तेथेच काढून टाकण्याचा अभ्यास करावा.

 

आज आमची स्थिति अशी आहे की, आमच्या मनात काय विचार येतात, ते कोणत्या विषयाचे आहेत याची बिलकुल जाणीव नाही.  मन स्वैर, भरकटलेले, कल्पनाविलासामध्ये रमणारे आहे.  यामुळे आपण काय विचार करतो, काय बोलतो, कोठे बोलतो, कोणाला बोलतो याचा परिणाम काय होईल, काय करतो याची यत्किंचित् सुद्धा जाणीव नाही.  सुकाणु किंवा शीड नसलेल्या बोटीप्रमाणे मन मानेल तसे दिशाहीन, स्वैर, अनियंत्रित, उच्छ्रंखल जीवन आहे.  म्हणून येथे म्हटले आहे की कामादि संकल्पांना थोडीही अजाणतेने संधि देता कामा नये.  उलट साधकाने अत्यंत दक्ष राहून मनातील प्रत्येक वृत्तीचे निरीक्षण करावे.

 

- "नारदभक्तिसूत्र" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, एप्रिल २००६
- Reference: "
Narad Bhaktisutra" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, April 2006



- हरी ॐ



Tuesday, May 12, 2026

आत्मा, मन, संकल्प, मोक्ष | Self, Mind, Resolve, Liberation

 



हे राघवा !  जे विषयवृत्तिरहित आहे, जे सामान्यतेने सर्वव्यापी आहे, तेच अनिर्वचनीय असणारे तत्त्व म्हणजे आत्मा असून त्यालाच परमेश्वर असे म्हणतात.  आत्मस्वरूपामध्ये विषयवृत्ति, अविद्या, सर्व कल्पना, सर्व मर्यादा, सर्व शब्द यांचा अत्यंत अभाव आहे.  हे निष्पाप रामा !  ब्रह्मदेवापासून स्तंबापर्यंत गवत वगैरेदी हे सर्व जग, सदासर्वदा सर्वकाळी आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे अविद्या येथे कोठेही कधीही कशीही लेशमात्रही अस्तित्वात नाही.  हे संपूर्ण दृश्य जग निश्चितच ब्रह्म स्वरूप आहे.  ते नित्य चिद्घन, क्षतिरहित, अविनाशी आहे.  या स्वरूपामध्ये मन नावाची कोणतीही कल्पना मुळीच अस्तित्वात नाही.

 

नित्य, सर्वव्यापी, शुद्ध, चिन्मात्र, निरुपद्रवी, शांत, समभावाने युक्त असलेल्या निर्विकार आत्मस्वरूपामध्ये जी वृत्ति चैतन्याच्या स्वभावाच्या विरुद्ध असणाऱ्या विषयांची कल्पना करून विषयांच्या मागे धावते, अशा त्या अशुद्ध, म्लान वृत्तीलाच 'मन' असे म्हणतात.

 

खरे तर एक, अद्वय, सर्वव्यापी व शांत असणाऱ्या परमात्म्यामध्ये ही अविद्या अस्तित्वातच नसते.  तर ती केवळ संकल्प मात्राने उत्पन्न झाल्यासारखी वाटते.  हे रामा !  ही अविद्या संकल्पामधूनच उत्पन्न झालेली असल्यामुळे ती संकल्पानेच नष्टही होते.

 

हे रामा !  'मी ब्रह्मस्वरूप नाही' या अतिदृढ संकल्पामुळे मन बद्ध होते, तर 'हे सर्व ब्रह्मस्वरूपच आहे' या दृढ संकल्पामुळे मन मुक्त होते.  म्हणून बंधन व मोक्ष हे दोन्हीही संकल्पावरच अवलंबून आहेत.  संकल्प हेच परम बंधन असून संकल्पांचा त्याग म्हणजेच मुक्ती आहे.  म्हणून संकल्पांच्यावर विजय मिळवून साधकाने संकल्परहित होण्याचा प्रयत्न करावा.  हे राघवा !  याप्रमाणे तू संकल्पांच्यावर विजय मिळव व नंतर तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला जे करायचे ते तू कर !

 

 

- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ




Tuesday, May 5, 2026

आदर्श जीवनाचे सूत्र | Principle for Ideal Life

 



विश्वकर्त्या परमेश्वराच्या आज्ञेने प्रत्येक जीवाला कर्मफळ प्राप्त होत असते.  परमेश्वराची ही कर्तुं-अकर्तुं शक्ति मान्य करून साधकाने या विश्वाचा उपयोग आपल्या उत्कर्षासाठी, प्रगतीसाठी, साधनेसाठी करून घ्यावा.  (Make use of this world for your own sake.)  विश्वामध्ये ज्या चांगल्या गोष्टी दिसतात, त्या ग्रहण कराव्यात आणि वाईट गुण माझ्यामध्ये येऊ न देण्याचा अभ्यास करावा.  यामुळे सर्व विश्वच आपले गुरु होईल.  भगवान अवधूतांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते.  या विश्वामधील प्रत्येक व्यक्तिकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे.  म्हणून आयुष्यभर साधकाने 'विद्यार्थी' ही वृत्ति ठेवावी.  या विश्वामधून, निसर्गाकडून, डोंगर, नद्या, वृक्ष नव्हे विश्वनिर्मात्याने निर्माण केलेल्या कणाकणामधून शिकण्यासारखे अलौकिक गुण आहेत.  फक्त हे पाहण्याची दिव्य, शुद्ध दृष्टि मला हवी !

 

म्हणून जगताना उघडे डोळे ठेऊन जगावे.  नीरक्षीर न्यायाने वाईट गोष्टींचा त्याग करून चांगले गुण, दैवीगुण, धर्म, नीति, जीवनमूल्ये यांची जोपासना करावी.  भगवान एक आदर्श जीवन जगण्यासाठी खूप सुंदर सूत्र सांगतात -  

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |

निराशीनिर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ||                         (गीता अ. ३-३०)

भगवान अर्जुनाला सांगतात, "अर्जुना, तू सर्व कर्म मला अर्पण कर.  कर्म करीत असताना कर्मफळाची अपेक्षा करू नकोस.  कर्माच्या नियमाप्रमाणे जे फळ मिळेल ते आनंदाने, प्रसादबुद्धीने ग्रहण कर.  तू कोठेही आसक्त होऊ नकोस. कोठेही ममत्वभाव निर्माण करू नकोस."  

 

कर्म करायचे म्हणून करू नये.  तर मनापासून कर्म करावे.  त्या कर्मामधून आनंद प्राप्त होतो.  साधकाने कोणत्याही कर्माला निकृष्ट, तुच्छ मानू नये.  कोणतेही कर्म निकृष्ट अथवा उत्कृष्टही नाही.  कर्म हे कर्मच आहे.  संत तुकाराम महाराज म्हणतात -

कुणी निंदा कुणी वंदा ।  आमुचा हा स्वहिताचा धंदा ।।                (अभंगगाथा)

इतके आपले मन प्रगल्भ झाले पाहिजे.  हे परिपक्व मनच साधनेला योग्य, अनुकूल, अधिकारी होते.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ