Tuesday, April 25, 2023

बहिरंग-अंतरंग साधना – पूरकता | External-Internal Sadhana - Complementary

 




वस्तुसिद्धि विचारेण न किंचित् कर्मकोटीभिः |

पाकस्य वन्हिवत् ज्ञानं विना मोक्षो न सिध्यति ||               (विवेकचूडामणि)

आत्मवस्तूची प्राप्ति केवळ आत्मविचारानेच होते.  कोट्यवधी कर्मे करूनही आत्मप्राप्ति होत नाही.  जसे अग्नीशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही, तसे ज्ञानाशिवाय मोक्षप्राप्ति होणे केवळ अशक्य आहे.  म्हणूनच भगवान म्हणतात –

नाहं वेदैर्न तपसा न दानेन चेज्यया |

शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ||                      (गीता. अ. ११-५३)

हे अर्जुना !  केवळ वेदाध्ययन, तपश्चर्या, दानयज्ञादि कर्मे, यांच्या साहाय्याने माझे दर्शन शक्य नाही.  

 

या सर्व श्रुतिस्मृतींच्यावरून सिद्ध होते की, ज्ञान हेच मोक्षाचे साक्षात साधन आहे.  त्यामुळे बहिरंगाने केवळ गंगासागरावर गेलो, मोठमोठ्या तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली, दानधर्म केला तरीही अद्वैत ज्ञानाच्या दृष्टीशिवाय हे सर्व व्यर्थ आहे.  या सर्व साधना केवळ चित्ताच्या शुद्धीसाठी व एकाग्रतेसाठी सांगितलेल्या आहेत.  त्यामुळे साधकाने या सर्व बहिरंग साधना तर केल्याच पाहिजेत.  यांच्या साहाय्याने चित्त शुद्ध झाले, अंतरंग एकाग्र झाले की, मगच आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंना अनन्यभावाने शरण जावे.  त्यानंतरच श्रवणादि ज्ञानसाधना म्हणजेच अंतरंग साधना करावी.  तपादि बहिरंग साधना ही अंतरंग साधनेला पूरक व साहाय्यकारी साधना आहे.  म्हणून आचार्यांनी या साधनेचा इथे निषेध केलेला नाही किंवा साधकाने दानव्रतादि साधना करूच नये, असे कुठेही सांगितलेले नाही.  मात्र केवळ दानव्रतादि साधना साधकाला मोक्ष देऊ शकत नाहीत.

 

अद्वैत ज्ञानाशिवाय केवळ व्यावहारिक अन्य कार्मांप्रमाणेच या सर्व साधना साधक वर्षानुवर्षे यंत्रवत करीत राहिला, परंतु त्यामध्ये भक्तिभाव निर्माण झाला नाही, क्रमाने चित्तशुद्धि, स्थिर होऊन चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय झाला नाही तर शेकडो जन्मही मुक्ति मिळू शकत नाही.  म्हणूनच आचार्य इथे आदेश देतात – भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते |  हे मनुष्या !  आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तू गोविंदाला म्हणजेच गुरूंना अनन्य भक्तिभावाने शरण जा.  त्यांच्या चरणांशी बसूनच हे गुह्य ज्ञान प्राप्त करून घे.  हाच तुझा पुरुषार्थ आहे.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2015


- हरी ॐ



Tuesday, April 18, 2023

अधिकारी मार्गदर्शक | Authoritative Mentor

 



वसिष्ठ मुनि सांगतात की, ज्याला प्रश्न विचारावेत तो वक्ता प्रामाणिक असावा.  येथे प्रामाणिक म्हणजे ज्याला वेदांतशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान आहे, ज्याने या श्रेष्ठ गुरूपरंपरेमध्ये स्वतः अध्ययन केले आहे आणि ज्याने विज्ञानसहित म्हणजे अनुभवसहित ज्ञानाची प्राप्ति केली आहे, असाच वक्ता आवश्यक आहे.  असा वक्ता म्हणजे आपले गुरु होय.  न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः |  तत्त्वज्ञानात्परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः ||  (गुरुगीता)  गुरूपेक्षा अधिक श्रेष्ठ दुसरे तत्त्व नाही, गुरुसेवेपेक्षा दुसरी श्रेष्ठ तपश्चर्या नाही.  तत्त्वज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ या जगात दुसरे काहीही नाही.  म्हणून गुरु हे स्वतःच ज्ञानस्वरूप आहेत.  शिष्याच्या अंतःकरणामधील अज्ञान आणि अज्ञानापासून निर्माण झालेल्या भ्रामक कल्पना आत्मज्ञानाच्या साहाय्याने नष्ट करणे, हेच गुरूंचे कार्य आहे.  शिष्याला ज्ञान द्यावयाचे असेल तर प्रथम गुरूंना यथार्थ व निःसंशय ज्ञान असले पाहिजे.  तसेच या ज्ञानाचा अनुभव ही पाहिजे.

 

ज्याप्रमाणे एखाद्याने साखर खाल्ल्यावर साखर गोड आहे, असे म्हणणे आणि एखाद्याने साखर कधीच खाल्ली नसेल तरी साखर गोड आहे असे म्हणणे, यामध्येही दोन वाक्ये सारखी असतील तरी ती खूप भिन्न आहेत.  एका वाक्यात स्वानुभव आहे तर दुसरे वाक्य अनुभवरहित आहे.  अनुभवरहित वाक्याला कोणताही अर्थ उरत नाही.  कारण त्यावर कोणी शंका विचारली तर त्याला उत्तर देता येत नाही.  कारण ते वाक्य अनुभवाचे नसून पाठांतर केलेले असते.  मात्र ज्याने साखरेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल त्याच्यावर कोणी कितीही शंका उत्पन्न केल्या तरी त्याचे ज्ञान ठाम आणि निश्चयपूर्वक असते.

 

तसेच ज्ञानी पुरुषाला अनुभव असणे महत्त्वाचे आहे.  संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज सांगतात -  संतत्व नाही मठात ।  संतत्व नाही विद्वात्तेत ।  संतत्व नाही कवित्वात ।  तेथे स्वानुभव पाहिजे ।।  याप्रमाणे अशा अधिकारी गुरूंना प्रश्न विचारल्या नंतर त्यांची यथार्थ वचने शिष्याने ऐकावीत.  इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक शब्दाचे आणि आज्ञेचे तंतोतंत पालन करावे.  म्हणून साधकाने एक तर प्रश्न विचारू नयेत आणि विचारले तर मात्र ती आज्ञा शिरसावंद्य मानून पालन करावी.  परंतु जो गुरुआज्ञेचे उल्लंघन करतो, गुरूंच्या वचनाप्रमाणे वागत नाही, त्याच्यासारखा अधम आणि निकृष्ट दुसरा कोणी पुरुष या जगात नाही.  म्हणून सत्पुरुषांचे शब्द उल्लंघन करणारा मनुष्य या जगात अधमाधम मनुष्य आहे.

 


- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ



Tuesday, April 11, 2023

तपस्वी, ज्ञानी, कर्मठ, योगी | Penancer, Seeker, Orthodox, Self-Realized

 



तपसा कल्मषं हन्ति इति स्मरणात् |  तपाने पापांचा क्षय होतो.  तरी सुद्धा कोणतेही तप मर्यादित आणि अल्प फळ देणारे आहे.  याचे कारण जीवाने अनेक जन्मांच्यामध्ये अनेक पातके केलेली असल्यामुळे केवळ तापाच्या अनुष्ठानाने त्यांचा संपूर्ण नाश होत नाही.  विशिष्ट तप एखाद्या विशिष्ट पापाचा नाश करीत असल्यामुळे तपाचे फळ हे मर्यादित आहे.  केवळ तपाने सर्व पापांचे कारण अज्ञान आणि भोगवासना नष्ट होत नाही.  त्यामुळे ब्रह्मज्ञानी यतीला मिळणारे अमर्याद फळ स्वस्वरूपाची आत्मतृप्ति आणि निरतिशय शांति प्राप्त होत नाही.

 

तपस्वी अनेक प्रकारचे तपानुष्ठान करून संसारांतर्गतच राहातो.  तो तपस्वी असूनही संसारीच आहे.  तसेच कोणतेही तप हे अज्ञानजन्यच असल्यामुळे द्वैतदृष्टि किंवा भेदाची दृष्टि नाश होत नाही.  द्वैतात् हि भयं भवति |  उदरमंतरं कुरुते अथ तस्य भयं भवति |  - यत्किंचित भेदबुद्धि सुद्धा संसाराला कारण आहे.  याउलट स्वस्वरूपामध्ये स्थिर झालेला यति अज्ञानध्वंस करून परमपावन करणारी परमोच्च अद्वैताची दृष्टि प्राप्त करतो.  आत्मवित् शोकं तरति |  - आत्मज्ञानी शोकसागराला पार करतो.  म्हणून ब्रह्मज्ञानी यति तपस्वी पुरुषापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे.

 

ज्ञानिऽभ्योपि मतोऽधिकः |  सम्यक ज्ञान प्राप्त केलेला यति ज्ञानीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे.  येथे ज्ञानी याचा अर्थ ज्याने शास्त्रअध्ययन केलेले आहे आणि त्यामधून त्याला फक्त शब्दबोध झालेला आहे, परंतु सम्यक ज्ञानाची दृष्टि प्राप्त झालेली नाही.  याउलट यति म्हणजे तत्त्वार्थ जाणून सम्यक ज्ञानाची अभेद दृष्टि प्राप्त केलेला जीवनमुक्त पुरुष आहे.

 

कर्मिभ्यश्चाधिको योगी |  – कर्मठ पुरुषाहूनही योगी श्रेष्ठ आहे.  कर्मठ मनुष्य नित्यनिरंतर अग्निहोत्रादि वैदिक कर्मांच्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त झालेला असतो.  त्याची वेदावर व वेदोक्त कर्मावरच श्रद्धा, निष्ठा असते.  त्याचे लक्ष फक्त ऐहिक आणि पारलौकिक फळांवरच असते.  याप्रकारची कूपमंडुक, मर्यादित दृष्टि असते.  तसेच त्याची ती द्वैताची दृष्टि असून अज्ञानांतर्गतच आहे.  तो कर्म-कर्मफळाच्या संसारामध्ये बद्ध झालेला आहे.  याउलट ब्रह्मज्ञानी सर्व कर्म-कर्मफळामधून निवृत्त झालेला, अज्ञानध्वंस करून अद्वैताची सम्यक दृष्टि प्राप्त झालेला असल्यामुळे संसारातील कर्म करूनही तो बद्ध होत नाही.  तो आत्मतृप्त आणि संतुष्ट, कृतकृत्य पुरुष आहे.  या सर्व कारणांमुळे तपस्वी, ज्ञानी आणि कर्मठ पुरुषांहून सम्यक ज्ञानवान योगी श्रेष्ठ आहे.


 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ




Tuesday, April 4, 2023

अनाधिकारी मार्गदर्शक | Unauthorized Mentor



 

अध्यात्माविषयी प्रश्न कोणाला विचारावेत ?  याचे सुद्धा शास्त्र आहे.  मनात प्रश्न निर्माण झाला आणि समोर कोणीही थोडेफार तत्त्वाचे शाब्दिक ज्ञान असणारा विद्वान असला तर त्याला जाऊन विचारणे हे अयोग्य आहे.  अशा कोणालाही विचारले तर त्याचे उत्तर मिळू शकत नाही आणि उत्तर मिळालेच तर ते उत्तर योग्य असेलच, असे सांगता येत नाही.  कदाचित अशा मनुष्याला शास्त्राचे थोडे फार शाब्दिक ज्ञान असेल, कोठून तरी अर्धवट श्रवण केले असेल, परंतु त्याला शास्त्राची दृष्टि असेलच असे सांगता येत नाही.  त्यामुळे तो तत्त्वज्ञ मनुष्य शास्त्रवचनांचा अर्थ स्वतःच्या मर्यादित बुद्धिप्रमाणे व त्याच्यावर झालेल्या संस्कारांच्याप्रमाणे लावत असतो.  त्यामध्ये त्याच्या मनामधील दोषही समाविष्ट होतात.  त्यामुळेच अशा मनुष्याची वचने निंदनीय आणि अग्राह्य असतात.

 

ज्याने कधीच स्वतःच्या गुरूंच्या चरणांशी बसून विधिवत् आत्मविद्या ग्रहण केली नसेल, शास्त्रांचे चिंतन-मनन केले नसेल, तपश्चर्या केली नसेल आणि त्याला गुरूंनी आज्ञा दिली नसेल तर तो कधीही शास्त्रोपदेश करण्यास अधिकारी ठरत नाही.  म्हणून भगवान व्यासांच्या पीठावर कोणी बसावे ?  कोणी ज्ञान द्यावे ?  ब्रह्मविद्येच्या वक्त्याने काय बोलावे आणि काय बोलू नये ?  याचे शिष्टाचार आणि नियम आहेत.  व्यासपीठावर बसल्यावर वक्त्याचे आपल्या प्रत्येक शब्दावर नियंत्रण हवे आणि प्रत्येक शब्दामागे अनुभव हवा.  तरच तो वक्ता श्रोत्याच्या मनावर परिणाम करू शकतो.

 

परंतु याउलट वक्ता योग्य नसेल, अतत्त्वज्ञ असेल, तो अग्राह्य विधाने करीत असेल अशा निंद्य वक्त्याला जो प्रश्न विचारतो त्याच्यासारखा दुसरा मूर्ख माणूस जगात नाही.  म्हणजेच आध्यात्मिक प्रश्न अधिकारी गुरूंच्याशिवाय अन्य कोणालाही विचारू नयेत.  हाच येथे अभिप्राय आहे.

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ