Tuesday, December 25, 2018

अतिथि धर्माचे महत्व | Importance of Being Good Host




एखादा तपस्वी ब्राह्मण घरामध्ये आल्यानंतर जर त्याचा यथोचित आदरसत्कार झाला नाही तर गृहस्थाश्रमी पुरुषाला त्या ब्राह्मण अतिथीचे आशीर्वाद मिळण्याऐवजी उलट शापच मिळतात.  

ज्या गृहस्थाश्रमी पुरुषाच्या घरी ब्राह्मण अतिथी काहीही न खाता राहातो, त्या पुरुषाच्या सर्व कामना नष्ट होतात.  आशा म्हणजेच अज्ञात वस्तूच्या प्राप्तीची इच्छा आणि प्रतीक्षा म्हणजे ज्ञात वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होय.  सांगतं म्हणजे दृष्ट व अदृष्ट कामनांच्या अनुषंगाने मिळणारे फळ होय.  सूनृता म्हणजे प्रिय वाणीच्या निमित्ताने मिळणारे मानसन्मानादि फळ होय.  इष्ट म्हणजे यज्ञयागादि कर्मांच्यामधून मिळणारे फळ आणि पूर्त म्हणजे आरामादि म्हणजेच ऐहिक उत्कर्षामधून मिळणारे भौतिक फळ – ऐश्वर्य, अन्नधान्यादि सुबत्ता होय.  यानंतर पुत्र म्हणजे पुत्रपौत्रादि ही सुद्धा संपत्ति आहे.  पशू म्हणजेच स्थावरजंगमादि सुबत्ता होय.  

याप्रकारे ज्याच्या घरी अतिथिपूजन होत नाही, त्या पुरुषाची वर उद्धृत केलेली सर्व प्रकारची फळे नष्ट होतात.  तो मंदबुद्धीचाच पुरुष आहे.  म्हणून गृहस्थाश्रमी पुरुषाला आचारधर्म माहीत असणे अत्यंत आवश्यक आहेत.  तो मनुष्य आचार-विचार-उच्चाराने सुसंस्कारीत झाला पाहिजे.  कर्तव्य-अकर्तव्य, योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, विधि-निषेध याचे ज्ञान तर पाहिजेच; परंतु त्याप्रमाणे त्याने स्वतः प्रत्यक्ष त्या आचारसंहितेचे पालन सुद्धा केले पाहिजे.  

या आचारधर्मांचे पालन केले नाही तर प्रत्यवाय दोष निर्माण होऊन गृहस्थाश्रमी पुरुषाचे सर्व कामना, ऐश्वर्य नष्ट होईल.  म्हणून कोणत्याही प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये अतिथीची उपेक्षा करू नये.  अत्यंत दरिद्री, गरीब अवस्थेत देखील अतिथीचे यथाशक्ति स्वागत, आदरातिथ्य व पूजन करावे.


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011




- हरी ॐ



Tuesday, December 18, 2018

अधम शिष्याची प्रगति | Progress of a Dull Disciple





काही पुण्यकर्मांच्यामुळे अधम शिष्य शरीराने काही काळ गुरूंच्या सान्निध्यात येतो.  थोडीफार श्रद्धा असते.  आपल्या शरीराचे सर्व लाड पुरवून जमेल तशी सेवा करतो.  मात्र गुरूंच्या आज्ञेचे अनुसरण करत नाही.  आपल्या स्वतःच्याच कल्पनांच्या तरंगांच्यामध्ये जगतो.  गुरूंनी सांगूनही ऐकत नाही, याचे कारण एकच की, त्याला अजूनही गुरूंचे, शास्त्राचे महत्व समजलेले नाही.  गुरूंच्यावर नितांत श्रद्धा नाही.  श्रद्धेशिवाय समर्पण होऊच शकत नाही.  

श्रद्धावान असणाऱ्या जिज्ञासु साधकालाच सम्यक् व यथार्थ ज्ञानाची प्राप्ति होते.  मात्र साशंक श्रद्धा असेल तर तो साधक गुरूंना पूर्णतः शरण जाऊ शकत नाही.  त्याचे मन कधीही गुरूंच्यामध्ये स्थिर होत नाही.  गुरूंच्या चरणावर नतमस्तक होत नाही.  अहंकाराने स्वतःच्या कल्पनाविश्वामध्ये वावरतो.  त्याच्या मनात गुरु, शास्त्र, ज्ञान याला महत्व नसते.  त्यामुळे तो गुरूंचा शब्द मान्य करू शकत नाही.  तो गुरूंच्यासमोर नाही असे म्हणत नाही, परंतु गुरुआज्ञेचे अनुसरण सुद्धा करीत नाही.

यामुळे तो साधक साधनाही करीत नाही.  निष्काम सेवा, कर्मही करीत नाही.  करायचे म्हणून करतो.  मन मानेल तसे वागतो.  गुरूंनी सांगितलेले नियम त्यास बंधन वाटते.  असे मन काहीही ग्रहण करायला तयारच नसते.  अशा मनाला कधीही Learning mind म्हणत नाहीत.  Learning mind is a receiving mind and receiving mind is an attentive single-pointed mind.  

आता अधमाला मध्यम व मध्यमाला उत्तम शिष्य व्हावयाचे असेल तर स्वतःचे दोष काढले पाहिजेत, स्वतःच्या कल्पना दूर फेकून दिल्या पाहिजेत.  अपेक्षा कमी केल्या पाहिजेत.  गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन प्रार्थना केली पाहिजे की, हे गुरो !  मला काहीही समजत नाही.  मी आपणास शरण आलो आहे.  आपणच माझा उद्धार करावा.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011





- हरी ॐ

Tuesday, December 11, 2018

उत्तम-मध्यम-अधम शिष्य | Best-Medium-Dull Disciples




टीकाकार उत्तम-मध्यम-अधम शिष्यांचे वर्णन करतात – यथावसरं गुरोः इष्टं ज्ञात्वा शुश्रूषणे प्रव्रुत्तिः मुख्या |  आज्ञावशेन मध्यमा |  तदपरिपालनेन अधमा |  

जो वेळप्रसंग पाहून गुरूंना जे इष्ट, अभिप्रेत आहे, तशी सेवा करतो, त्यास उत्तम शिष्य म्हणतात.  यासाठी शिष्यामध्ये सावधानता हा गुण असला पाहिजे.  त्याचे मन गुरूंच्या मनाशी तन्मय, तल्लीन, तद्रूप झाले पाहिजे.

यानंतर, ज्याला स्वतःला काय करावे, ते समजत नाही, तो गुरूंच्याकडे जाऊन अत्यंत नम्रतेने गुरूंना आज्ञा विचारतो व गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने त्यांच्या आज्ञेचे अक्षरशः तंतोतंत पालन करतो.  सेवा करीत असताना त्याच्या मनामध्ये कधीही राग-द्वेष, स्वतःच्या कल्पना, अहंकार निर्माण होत नाही.  तो सर्व सेवा अतिशय मनापासून करतो.  कधीही गुरुआज्ञेचे उल्लंघन करीत नाही.  हा मध्यम प्रतीचा शिष्य होय.  

यानंतर, जो गुरूंनी आज्ञा देऊनही, अनेक वेळेला समजावून सांगूनही ऐकत नाही, करायचे म्हणून करतो, तो अधम शिष्य होय.  तो कामामध्ये दुर्लक्ष, टाळाटाळ, प्रमाद करतो.  मी किती मोठा आहे, माझ्यामुळे गुरूंचे सर्व कार्य चालले आहे, या आविर्भावात तो प्रत्यक्ष गुरूंनी दिलेल्या आज्ञांचे उल्लंघन करतो.  हा अधम शिष्य होय.  

साधकाच्या जीवनामध्ये गुरुस्थानाला अत्यंत महत्व आहे.  साधकाच्या मनाच्या अवस्थेवरच सर्वकाही अवलंबून आहे.  ज्याच्या अंतःकरणामध्ये ऐहिक व पारलौकिक विषयांच्याबद्दल तीव्र वैराग्य निर्माण होवून आत्मजिज्ञासा उदयाला आलेली आहे, तो ती जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंना शरण जातो.  गुरूंची काया-वाचा-मनसा सेवा करतो.  साधनकालात गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच साधना, उपासना, ध्यान, ज्ञान, जप, ईश्वर हे सर्व काही त्याच्यासाठी गुरूच असतात.  असे त्याचे जीवन गुरुमय होते.  असे गुरुमय मन झाल्याशिवाय अन्य सर्व साधना व्यर्थ आहेत.   


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ

Tuesday, December 4, 2018

भिक्षाटनाचे फायदे | Benefits of Alms



प्रत्येक मुमुक्षूने ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे आवश्यक आहे.  या व्रतामध्ये भिक्षाटन येते.  भिक्षाटन करून त्यामधूनच स्वतःचा उदरनिर्वाह करावा.  भिक्षा मागूनच अन्न का खावे ?  याला अनेक कारणे आहेत.  

अ. भिक्षाटनामध्ये दुसऱ्याकडे भिक्षा मागावयाची असते.  त्यामुळे प्रथम अहंकार खाली येतो.  दुसऱ्याच्या दारापुढे उभा राहून भिक्षा मागणे ही इतकी सोपी गोष्ट नाही.  

ब. भिक्षेमध्ये जे काही आपल्या पात्रात मिळेल ते स्वीकारावे लागते.  त्यामुळे आवड-नावड कमी होते.  पात्रामध्ये पडणारे अन्न काहीही असो, ते आनंदाने खावेच लागते, कारण त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असतो.  पात्रामध्ये येणाऱ्या अन्नाचा साधकाने प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकार करावा.   

क. भिक्षा मागत असताना अन्नाबरोबरच जननिंदा, अपमान, अवहेलना होते.  आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध आपल्याला ऐकावयाला लागते.  आपण सर्वसंगपरित्याग करून खूप मोठी साधना करीत आहोत या अहंकाराला तडा जातो.  अशाच प्रसंगांमध्ये तितिक्षा, सहनशीलता हे गुण आत्मसात करता येतात. 

ड. आपल्या मनामध्ये सतत आपण स्वीकारलेल्या मार्गाविषयी भीति असते.  लोक आपल्याला काय म्हणतील ?  लोक माझी चेष्टा करतील का ?  भिक्षा मागितल्यामुळे ही भीति कमी होवून मन निर्भय होते.  

इ. आपल्यामध्ये “आपल्या मालकीचे काहीतरी असावे” ही इच्छा असल्यामुळे सतत संग्रह, संचय करण्याची वृत्ति असते.  परंतु भिक्षाटनामुळे ही संग्रहवृत्ति नाहीशी होते.  यामुळे संग्रह केलेल्या विषयांच्या रक्षणाचीही भीति संपते.  चिंता संपते.  मन निर्भय होते.  

ई. अशाप्रकारे भिक्षा मागून आणल्यानंतर मी एकट्याने न खाता त्याचे समान भाग करून ती प्राणीमात्रांना, गुरूंना अर्पण करायची असते.  यामुळे मनामध्ये समर्पणवृत्ति निर्माण होते. 


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Friday, November 23, 2018

ब्रह्मचारी व्रत | Brahmachari Penance



प्रत्येक मुमुक्षूने ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे आवश्यक आहे.  या व्रतामध्ये तीन गोष्टी असतात.

१. ब्रह्मचर्य – सर्व इंद्रियांच्यावर संयमन करावे.  सर्व इंद्रियांची सहजस्वाभाविक प्रवृत्ति पाहिली तर ती बहिर्मुख, विषयाभिमुख आहे.  सर्व इंद्रिये अत्यंत स्वैर, उच्छृंखल असून बाह्य विषयांच्या उपभोगामध्येच रात्रंदिवस रममाण झालेली आहेत.  तसेच इंद्रियांच्यामध्ये स्वभावतःच रागद्वेष आहेत.  यामुळे सर्व इंद्रिये विषयांच्या आहारी जावून विषयलंपट झालेली आहेत.  साधकाने या स्वैर इंद्रियांच्यावर संयमन करून त्यांना विषयासक्तीमधून पूर्णपणे निवृत्त करावे.  यालाच ‘ब्रह्मचर्य’ असे म्हणतात.  ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच सर्व इंद्रिये व मन यांच्यावर संयमन करून नीतिनियम, आचार-विचार, आचारसंहितेने युक्त असलेले संयमित जीवन जगणे होय.  

२. गुरुशुश्रुषाब्रह्मचर्याश्रमामध्ये असताना अत्यंत श्रद्धेने व भक्तीने गुरूंची काया-वाचा-मनसा सेवा करावी.  गीतेमध्ये यालाच ‘आचार्योपासना’ असे म्हटलेले आहे.  साधकाच्या जीवनामध्ये ‘गुरु’ हेच सर्वश्रेष्ठ स्थान आहे.  तिथेच साधक पूर्णपणे नतमस्तक होतो.  त्यामुळे अहंकार नम्र होवून मनामधील रागद्वेषादि विकारही कमी-कमी होतात.  म्हणून साधना करीत असताना गुरुशुश्रुषा आवश्यक आहे.  

३. भिक्षाटन – भिक्षाटन करून त्यामधूनच स्वतःचा उदरनिर्वाह करावा.  भिक्षाटनामध्ये दुसऱ्याकडे भिक्षा मागावयाची असते.  त्यामुळे प्रथम अहंकार खाली येतो.  आवड-नावड कमी होते.  पात्रामध्ये पडणारे अन्न काहीही असो, ते आनंदाने खावेच लागते, कारण त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असतो.  भिक्षा मागत असताना अन्नाबरोबरच जननिंदा, अपमान, अवहेलना होते.  अशाच प्रसंगांमध्ये तितिक्षा, सहनशीलता हे गुण आत्मसात करता येतात.  भिक्षा मागितल्यामुळे “लोक माझी चेष्टा करतील का ?” ही भीति कमी होवून मन निर्भय होते.  भिक्षाटनामुळे संग्रहवृत्ति नाहीशी होते.  यामुळे संग्रह केलेल्या विषयांच्या रक्षणाचीही भीति संपते.  भिक्षा मागून आणल्यानंतर मी एकट्याने न खाता त्याचे समान भाग करून ती प्राणीमात्रांना, गुरूंना अर्पण करायची असते.  यामुळे मनामध्ये समर्पणवृत्ति निर्माण होते.  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, November 20, 2018

समदर्शी | Equi-Observer




यथार्थ व सम्यक ज्ञानाची दृष्टि प्राप्त झाल्यामुळे ज्ञानी पुरुष सर्व विश्वामध्ये एकत्व पाहतो.  मातीचे ढेकूळ, दगड, सोने हे सर्व समदृष्टीनेच पाहातो.  याठिकाणी मातीचे ढेकूळ हे अत्यंत निकृष्ट आहे.  त्यापेक्षा दगडाला थोडी किंमत आहे आणि दगडापेक्षाही सोने अत्यंत मौल्यवान आहे.  अशा सर्व निकृष्ट-उत्कृष्ट विषयांना ज्ञानी पुरुष समदृष्टीनेच पाहातो.  

याचा अर्थ डोळ्यांना त्याच्यामधील भिन्नत्व हे दिसणारच !  परंतु आपण बुद्धीने काही विषयांना महत्व दिलेले आहे आणि कल्पनेनेच वस्तूंचे मूल्य ठरविलेले आहे.  यामुळे मौल्यवान वस्तुंविषयी मनामध्ये आसक्ति निर्माण होवून निकृष्ट विषयांचा त्याग करण्याची प्रवृत्ति निर्माण होते.  म्हणून उत्कृष्ट व निकृष्ट या बुद्धीच्याच अज्ञाननिर्मित कल्पना आहेत.  परंतु ज्ञानी पुरुष मात्र सर्वच विषयांना समदृष्टीने पाहातो.  

याचा अर्थच तो कोणत्याही विषयाला फाजील महत्व देवून त्यामध्ये आसक्ति निर्माण करीत नाही.  अथवा एखाद्या विषयाचा तिरस्कार करून त्याला टाळण्याचाही प्रयत्न करीत नाही, कारण सर्व विश्वाकडे, सर्व विषयांच्याकडे तो ब्रह्मस्वरूपाच्या, एकत्वाच्या, अभेदत्वाच्या दृष्टीनेच पाहातो.  या दृष्टीमध्येच सर्व रागद्वेषांचा, द्वन्द्वांचा निरास होतो.  तो पुरुष ‘समदर्शी’ होतो.

शीत-उष्ण, सुख-दुःख, मान-अपमान, स्तुति-निंदा, तसेच आध्यात्मिकादि सर्व उपद्रवांच्यामध्ये कोणतेही चांगले-वाईट प्रसंग प्राप्त झाले असताना हा ब्रह्मज्ञानी पुरुष समदर्शी असतो.  ब्रह्मस्वरूपामध्येच त्याची बुद्धि स्थिर झाल्यामुळे त्याच्या मनात विषयांचे संकल्प, रागद्वेष वगैरेदि विकार निर्माण होत नाहीत.  कोणत्याही बाह्य विषयाचा, प्रसंगांचा त्याच्या मनावर परिणाम होत नाही.  तो हर्षविषादरहित, द्वन्द्वरहित होतो.  तो स्वस्वरूपामध्येच दृढ, स्थिर होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ


Tuesday, November 13, 2018

कार्यकारण संघातावर नियमन | Control on Causal Assembly




कार्यकारणसंघातरूपी अशुद्ध, कलुषित आत्म्यावर ज्या संस्कारयुक्त, विवेकी आत्म्याने जय मिळविलेला आहे, तो आत्मा स्वतःचा बंधु, मित्र होतो.  जय मिळविणे म्हणजे कार्यकारणसंघाताची, इंद्रियांची, मनाची जी सहजस्वाभाविक बहिर्मुख प्रवृत्ति आहे, त्यावर नियमन करणे होय आणि त्याच्या विरुद्ध, प्रतिकूल प्रवृत्ति मनामध्ये निर्माण करणे होय.  मग या कार्यकारणसंघातावर नियमन कसे करायचे, यावर आचार्य फार सुंदर सांगतात –

१. देहशरीर, डोके, मान हे एका सरळ रेषेत ठेवून देहप्रवृत्तीवर नियमन करावे.  
२. प्राणप्राणायामाच्या साहाय्याने आणि शांतीने प्राणावर संयमन करावे.  
३. इंद्रिये व मन – इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख, विषयासक्त असून कितीही उपभोगले तरीही अतृप्त, सतत वखवखलेली असतात.  त्यामुळे मनही अखंडपणे विषयांमध्येच रममाण, रत झालेले असते.  अशा इंद्रियांच्या व मनाच्या स्वैर, विषयाभिमुख प्रवृत्तीवर तीव्र वैराग्यवृत्तीने संयमन करावे.  
४. बुद्धि – बुद्धीची सुद्धा सतत बहिर्मुख प्रवृत्ति आहे.  विश्वाचा, बाह्य विषयांचाच सतत बुद्धि विचार करते.  बुद्धीच्या बहिर्मुख प्रवृत्तीवर नियंत्रण करण्यासाठी त्याच बुद्धीने सतत सत्-असत् चा विवेक करावा.  खरोखरच या विश्वामध्ये नित्य काय, अनित्य काय ?  याचा विचार करावा आणि जे असत् , अनित्य असेल त्याचा जाणीवपूर्वक त्याग करून सत् वस्तूचाच आश्रय घ्यावा.  यामधूनच आपोआप सर्व विषय अनित्य स्वरूपाचे आहेत, हे समजल्यानंतर नित्य, सत् वस्तु कोणती ?  तिचे स्वरूप काय आहे ?  ही जिज्ञासा निर्माण होईल.  मनामध्ये तीव्र तळमळ निर्माण होऊन, तीव्र मोक्षेच्छा व तीव्र वैराग्य उदयाला येईल.  मन, बुद्धि अंतर्मुख होईल.  अशा प्रकारे बुद्धिप्रवृत्तीवर नियमन करावे.  
५. अहंकार – ब्रह्मज्ञानाच्या अहं अकर्ता-अभोक्ता |  अहं सच्चिदानन्दस्वरूपः |  या अनुभूतीमध्येच अहंकार आपोआपच गळून पडतो.  

अशा प्रकारे ज्या पुरुषाने आपल्या देहेंद्रियादि कार्यकारणसंघातावर विजय मिळवून सर्वांना नियमित केलेले आहे, तो पुरुषच त्याच्या आत्म्याचा म्हणजेच स्वतःचा बंधु, मित्र होतो.  तो शोकमोहादि संसारापासून मुक्त होतो.  


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ