Sunday, June 27, 2021

अपरिपक्व संन्यासाचे परिणाम | Effects of Immature Renunciation

 कर्मयोगाच्या अनुष्ठानाशिवाय पारमार्थिक संन्यास किंवा विद्वत्संन्यास प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे.  अपरिपक्व मनाने जर विषयांचा केवळ शरीराने त्याग केला तर तो त्याग सुखाला कारण न होता दुःखालाच कारण होतो.  शास्त्रश्रवण करीत असताना मनामधील रागद्वेष, पूर्वीचे संस्कार, कामक्रोधादि विकार उफाळून बाहेर येतात.  मग शास्त्रश्रवण राहते बाजूला आणि नको त्या विषयांच्यामध्ये मन अडकून राहते.  बाहेरच्या गोष्टींना महत्व दिले की, शास्त्राला दिलेले महत्व कमी होते.  मग साधकाच्या हातून प्रमाद घडू लागतात.  

 

परमपूज्य हरिहर तीर्थाजी महाराज याविषयी फार सुंदर सांगत असत.  त्यांच्या आश्रमात अनेक ब्रह्मचारी साधक होते.  एक दिवस महाराजजींच्याकडे एक साधक आला आणि म्हणाला की, “महाराजजी !  आजकल आश्रम में भोजन अच्छा नहीं बन रहा है |  आप रसोईघर में सूचना देंगे तो अच्छा होगा |”  महाराजजी त्याला फक्त “ठीक है |”  असे म्हणाले.  दोन दिवसांनी तो पुन्हा आला व म्हणाला – “महाराजजी, पहले तो भोजन थोडा ठीक था |  अभी और भी बिगड़ गया है |”  त्यावेळी महाराजजींनी त्या ब्रह्मचारी शिष्याला सांगितले की, “भगवन् !  यह आपका स्थान नहीं है |  अगर आपको रोज स्वादिष्ट भोजन पाना हो तो आप गृहस्थाश्रम स्वीकार कीजिए |  अच्छी लड़की के साथ ब्याह कीजिए और आराम से रहिये |”

 

याचा अर्थच साधक सर्वसंगपरित्याग करून आश्रमात राहिला तरी त्याचे मन कसे आहे, यावरच ज्ञान अवलंबून आहे.  आश्रमात इकडे काय चालले, तिकडे काय चालले ?  या आश्रमात काय आहे ?  त्या आश्रमात काय आहे ?  अशी स्थूल, प्राकृत, बहिर्मुख प्रवृत्ति असेल तर वर्षानुवर्षे साधक केवळ शरीराने आश्रमात राहील, वेष बदलेल.  परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये अनेक विषयांच्या कामना, भोगवासना थैमान घालतील.  एका बाजूला बहिरंगाने तो श्रवण करेल, सेवा करेल, परंतु त्या श्रवणाचे त्याला फळ प्राप्त होणार नाही.  थोडक्यात शास्त्र-उपदेश-गुरु यांचा दोष नाही.  तर जोपर्यंत मनामध्ये अन्य विषयांना महत्त्व दिलेले आहे, अंतःकरणामध्ये तीव्र वैराग्याचा उदय झालेला नाही तोपर्यंत श्रवणामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ
Tuesday, June 22, 2021

शास्त्र कोणासाठी आहे? | Is ‘Shaastra’ for You?

 शास्त्र हे निरपेक्ष आहे.  जसे आरशासमोर उभे राहिल्यानंतर आरसा आपल्याला आपले जसे रूप आहे तसेच दाखवितो.  मी आहे त्यापेक्षा सुंदरही दाखवीत नाही किंवा मी आहे, त्यापेक्षा कुरूपही दाखवीत नाही.  तसेच, शास्त्र आपणास आपले बहिरंग व अंतरंग जीवन जसे आहे तसे उलगडून दाखविते.  शास्त्रदर्पणामध्ये पाहून मग साधकाने स्वतःमधील अनावश्यक भाग काढून टाकला पाहिजे.  जे जे आपल्यामध्ये वाईट आहे, कुरूप आहे, ती सर्व आसुरीगुणसंपत्ति काढून टाकली पाहिजे.  इतकी सोपी गोष्ट आहे.

 

परंतु दुर्दैवाने गुरूंच्या मुखामधून ज्यावेळी साधक शास्त्राचे श्रवण करतो, त्यावेळी तो स्वतःच्या कल्पनांच्यामधून शास्त्र पाहतो, त्यामुळे त्यामधील बराचसा भाग अमान्य करतो हा एक भाग.  दुसरा भाग म्हणजे शास्त्रश्रवण करीत असताना ज्यावेळी काळजीपूर्वक ऐकल्यावर स्वतःमधील सर्व दोषच दिसायला लागतात, त्यावेळी मात्र तो सहन करू शकत नाही.  त्याला ते श्रवणही असह्य होते.  त्याचे मन स्वतःमधील दोषांना सामोरे जाऊ शकत नाही.  त्याचे मन शास्त्रश्रवणाने शांत होण्याऐवजी उलट अधिक अशांत, उद्विग्न, क्षुब्ध, तर काही वेळेला निराश, भकास होते.  त्यावेळी साधक स्वतःमधील दोष स्वीकार करून ते कमी करण्याऐवजी तो शास्त्राला, गुरूंना दोष देतो.  वाट्टेल तशा प्रतिक्रिया व्यक्त करतो.  खरोखरच, अशा लोकांसाठी शास्त्र लिहिलेलेच नाही.

 

हे शास्त्र कोणाला सांगितलेले आहे ?  आचार्य फार सुंदर सांगतात.  आचार्य म्हणतात –

तपोभिः क्षीणपापानां शान्तानां वीतरागिणाम् |

मुमुक्षूणामपेक्ष्योSयं आत्मबोधोSभिधीयते ||        (आत्मबोध)

ज्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या करून, इंद्रियमनावर संयमन करून आपली रागद्वेषात्मक कलुषितता क्षीण केली आहे, जे वीतरागी शांत, वैराग्यसंपन्न झालेले आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये तीव्र मुमुक्षुत्व उदयाला आलेले आहे, अशा उत्तम अधिकाऱ्यांच्यासाठी आत्मज्ञान सांगितलेले आहे.  आपल्या अंतःकरणामधील दोष कमी करून अंतःकरण अधिकाधिक शुद्ध करणे, हीच खरी साधना आहे.  ही अनेक जन्मांची साधना आहे.

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐTuesday, June 15, 2021

आत्मज्ञान आणि इतर ज्ञान | Self-Knowledge & Outward Knowledge

 बहुतांशी लोकांना आत्मस्वरूपाचे ज्ञान श्रवण करायलाच मिळत नाही.  आत्मज्ञानाचे श्रवण करावे, ही इच्छाच त्यांच्या मनामध्ये निर्माण होत नाही.  आत्मज्ञानाव्यतिरिक्त जे जे काही आहे, ते सर्व श्रवण करतात.  त्यामध्ये मन तल्लीन होते, कारण त्या श्रवणाने काहीतरी दृश्य फळ प्राप्त होते.  

 

आत्मज्ञानाव्यतिरिक्त असणाऱ्या अनात्म्याच्या ज्ञानाने कोणत्यातरी दृश्य फळाची प्राप्ति होते.  मग ते व्यावहारिक कोणतेही ज्ञान असो.  भौतिकशास्त्र असो, रसायन, जीव, गणित, खगोल, ज्योतिष, विज्ञान, मानस, अतींद्रिय मानस, संगणकज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान किंवा याव्यतिरिक्त असणाऱ्या ज्ञानशाखा असोत, कला असो, क्रीडा असो.  त्या सर्वांच्यामुळे मनुष्याला पैसा, संपत्ति, ऐश्वर्य, समृद्धी, भरभराट, यश, प्रतिष्ठा, कीर्ति, नावलौकिक, सत्ता, उपभोग या गोष्टी प्राप्त होतात.  वेगवेगळ्या पदव्या, पुरस्कार प्राप्त होतात.  म्हणून मनुष्य या सर्वांच्या मागे लागतो.  

 

याउलट, आत्मज्ञानाचे फळ मात्र दृश्य नाही.  वेदांच्यामध्ये कोठेही आत्मज्ञानाचे दृश्य, ऐहिक फळ सांगितलेले नाही.  ऐहिक भोग हे आत्मविद्येचे प्रयोजनच नाही.  मग यामधून काही मिळणारच नसेल तर मग विनाकारण का बरे आत्मज्ञान घेऊ ?  अशी वृत्ति निर्माण होते.  इतकेच नव्हे तर आत्मविद्येने सिद्धि, चमत्कार, एका क्षणात आत्मसाक्षात्कार असेही फळ प्राप्त होत नाही.  म्हणूनच सर्व लोक अध्यात्माच्या बहिरंगालाच भुलतात.  तथाकथित स्वतःला अध्यात्मवादी म्हणवून घेणारे लोक स्वार्थापोटी, प्रसिद्धीच्या इच्छेने अध्यात्माचा जो अवडंबर माजवितात त्यालाच समाजातील बहुतांशी लोक भुलून बळी पडतात व पारमार्थिक ज्ञानापासून, शास्त्रश्रवणापासून वंचित राहतात.  

 

अन्य व्यावहारिक ज्ञान घ्यावयाचे असेल तर तेथेही अर्जामध्ये पात्रता असा एक रकाना असतो.  त्याठिकाणी आपण आपले शिक्षण, पदवी, अनुभव वगैरे गोष्टी लिहितो.  पूर्वीच्या पात्रतेवरच पुढचे शिक्षण अवलंबून असते.  आध्यात्मिक ज्ञानामध्ये मात्र ज्ञान घेण्याचे साधन अंतःकरण आहे आणि ज्ञान होण्याचे स्थानही अंतःकरणच आहे.  त्यामुळे अंतःकरणाची पूर्वतयारी होणे आवश्यक आहे.  

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ
Tuesday, June 8, 2021

बुद्धीची खरी कसोटी | Real Test of Wisdom

 


श्रेयस् प्रेयस् हे दोन्हीही मार्ग अनुसरण करण्यामध्ये पुरुषाला इच्छास्वातंत्र्य आहे.  खरे तर बुद्धिमान मनुष्याने अधोगामी, अंधारमय, दुःखस्वरूप असणाऱ्या प्रेयस् मार्गाचा त्याग करून ऊर्ध्वगामी, प्रकाशमय मोक्षरूप श्रेयस् मार्गाचा स्वीकार करावयास हवा.  परंतु बहुतांशी लोक प्रेयस् मार्गालाच निवडतात.  असे का ?  मनुष्य चांगला मार्ग सोडून वाईट मार्गाच्यामागे का लागतो ?  

 

शास्त्रकार मनाची व्याख्या करतात – संकल्पविकल्पात्मकं मनः |  संकल्प-विकल्प निर्माण करणे, हेच मनाचे कार्य आहे.  परंतु काय योग्य व काय अयोग्य, हे ठरविण्याचे निर्णयस्वातंत्र्य बुद्धीला दिलेले आहे.  निश्चयात्मिका निर्णयात्मिका अंतःकरणवृत्ति: इति बुद्धिः |  जी जीवनामध्ये योग्यायोग्याचा विचार करून निर्णय घेते, त्या अंतःकरणवृत्तीला बुद्धि असे म्हणतात.  सदसद्विवेकबुद्धीच्या साहाय्याने योग्य निर्णय घेऊन मनुष्याने जीवनामध्ये अधर्माचा, अनीतीचा त्याग करून धर्मामध्ये, नीतीमध्ये प्रवृत्त झाले पाहिजे.  हेच बुद्धीचे खरे कार्य आहे.  

 

व्यवहारामध्ये आपणही बुद्धीचा उपयोग करतो.  आपल्याला खूप बुद्धि आहे असे आपणास वाटते.  बुद्धिवादाच्या मोठमोठ्या गप्पा आपण मारतो.  दोनचार शाब्दिक कोट्या केल्या, सलग दहा वाक्ये एका श्वासात बोलली की, अन्य लोकांनाही वाटते की, आपण बुद्धिमान आहोत.  परंतु आपण फक्त व्यवहारकुशलज्ञ आहोत.  संपूर्ण विश्वाचे ज्ञान घेतो.  कोणत्याही विषयावर तासन्तास उत्कृष्ट बोलतो; परंतु आचार्य येथे सांगतात की – साधनतः फलतः च मन्दबुद्धीनाम् |  साधन व फळ, म्हणजेच साध्य यांचा विचार करण्यामध्ये मात्र मनुष्य मंदबुद्धि आहे.  

 

आपल्या जीवनाचे खरे साध्य, ध्येय काय आहे ?  आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य साधन काय आहे, याचा विचार करण्याविषयी आपली बुद्धि मंद आहे.  यामुळेच मनुष्यासमोर श्रेयस् प्रेयस् हे दोन मार्ग एकत्र होऊन, मिश्रित स्वरूपाने येतात.  म्हणूनच तेथेच खरी मनुष्याची परीक्षा आहे.  पुरुषार्थ आहे.  दोन भिन्न मार्ग स्पष्टपणे समोर आले तर निवडणे सोपे आहे.  तेथे विशेष बुद्धि चालविण्याची गरज नाही.  परंतु हे दोन्हीही मार्ग मिश्र स्वरूपाने आल्यानंतर विवेकाच्या साहाय्याने ते एकमेकांच्यापासून भिन्न केले पाहिजे.  


 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ
Tuesday, June 1, 2021

श्रेयस आणि प्रेयस मार्ग | Paths of Liberation & Preference

 श्रेयस् व प्रेयस् हे दोन मार्ग परस्परांच्यापासून अत्यंत भिन्न स्वरूपाचे आहेत.  श्रेयस् म्हणजे मोक्ष होय आणि प्रेयस् म्हणजे इंद्रियांना, शरीराला, मनाला जे प्रिय वाटते, ते सर्व विषय, भोग होय.  काही ठिकाणी प्रेयस्लाच अभ्युदय व श्रेयस्ला निःश्रेयस असे म्हटले जाते.  

 

प्रेयस् हा अविद्याजन्य मार्ग असून अविद्येमधून विश्वाबद्दल सत्यत्व बुद्धि निर्माण होते.  त्यामुळे अनेक प्रकारच्या भोगवासना निर्माण होतात.  अज्ञानी पुरुष अनंत कामना निर्माण करतो.  कामनापूर्तीसाठी अनेक चांगल्या-वाईट कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतो.  त्यानंतर कर्मफळ भोगतो, पुन्हा दुसरी कामना, याप्रमाणे जीवनभर भोगतो.  प्रारब्धाचा क्षय झाला की, मृत्यु पावतो.  पुन्हा दुसरा जन्म, याप्रमाणे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये बद्ध होऊन सुखी-दुःखी, संसारी, शोकमोहग्रस्त होतो.  कामना निर्माण करणे आणि इंद्रिय, शरीर व मन यांच्या साहाय्याने येथेच्छ उपभोग घेणे, हेच प्रेयस् मार्गाचे प्रयोजन आहे.  

 

याउलट श्रेयस् मार्ग मात्र विवेकजन्य आहे.  आत्मअज्ञानाचा निरास करून अविद्याकामकर्मग्रंथीचा नाश करणे व अमृतत्त्वाची प्राप्ति करवून घेणे, हेच श्रेयस् मार्गाचे प्रयोजन आहे.  सर्व प्रकारच्या दुःखांची निवृत्ति करून निरतिशय, शाश्वत, चिरंतन आनंदाची प्राप्ति करवून घेणे, म्हणजेच मोक्ष होय.  श्रेयस् मार्गामध्ये मनुष्याचे मन सत्वगुणप्रधान होऊन सर्व प्रकारच्या विकारांच्या प्रभावापासून मुक्त होते.  अज्ञानकल्पित संसाराचा ध्वंस होऊन जीवाला प्रत्यगात्मस्वरूपाची प्राप्ति होते.  

 

  श्रेयस् मार्ग                           प्रेयस् मार्ग

- उर्ध्वगामी                           - अधोगामी

- ज्ञानस्वरूप                         - अज्ञानस्वरूप

- प्रकाशस्वरूप                     - अंधारस्वरूप

- विकास                               - अधःपतन

- निवृत्ति                                - प्रवृत्ति

 

 

- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011- हरी ॐ