Tuesday, April 24, 2018

दंभ म्हणजे काय ? | What is Pretence ?




दंभ म्हणजे काय ?  स्वस्य अन्यथाप्रदर्शनं इति दम्भः |  जीवन जगत असताना मी जसा आहे तसा न दाखविता मी जो नाही तो जगाला दाखविणे, भासविणे म्हणजेच ‘दंभ’ होय.  थोडक्यात आत एक आणि बाहेर एक अशा दुटप्पी वृत्तीला दंभ असे म्हणतात. मनुष्यामध्ये ही दंभित्वाची वृत्ति का निर्माण होते ?  याचे निरीक्षण केले तर समजते की, प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी आहे.  त्यामुळे १) पूजा, २) लाभ, ३) ख्याती किंवा प्रसिद्धि या तीन गोष्टींच्या प्राप्तीसाठी मनुष्य दांभिकतेने वागतो.  

१) पूजा – प्रत्येक मनुष्य लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच कोणीही असो, त्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा यांची सहजस्वाभाविक इच्छा असते.  जगाने, समाजाने मला मान, आदर देऊन पूजा करावी, अशी इच्छा असते.  

२) लाभ – कोणतेही कर्म करीत असताना मनुष्याच्या मनामध्ये काहीना काहीतरी स्वार्थ असतोच.  स्वार्थापोटी तो कर्मप्रवृत्त होतो.  मात्र बाहेरून तो आपण निःस्वार्थपणे कर्म करीत आहोत, असे जगाला भासवितो.  

३) प्रसिद्धि – प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव असते.  अनेक लोकांनी मला ओळखावे, सर्वांच्या मुखी माझे नाव असावे, मला मान द्यावा, वर्तमानपत्रामध्ये माझे नाव झळकावे, हीच मनोमन इच्छा असते.  

थोडक्यात पूजा-मानसन्मान, लाभ-स्वार्थकामना, ख्याती-प्रसिद्धि या तीन गोष्टींच्या पूर्तीसाठी मनुष्याच्या मनामध्ये दंभित्वाची वृत्ति निर्माण होते.  ज्यावेळी या तीन इच्छा स्वतःच्या पुरुषार्थाने, स्वकर्तृत्वाने खूप प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीत, त्यावेळी मनुष्य दांभिकतेचा अवलंब करतो.  स्वकर्तृत्वाने मोठे झाले तर जगाला दाखविण्याची गरजच नाही.  सूर्याला मी प्रकाशक आहे, हे सांगण्याची वेळ येत नाही.  परंतु स्वतःमध्ये गुण नसताना दुसऱ्याने आपल्याला मोठे म्हणावे ही इच्छाच दंभाला कारण आहे.  दंभाच्या वृत्तीमुळे तो वाममार्गाचेही अनुसरण करतो.    
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ

Tuesday, April 17, 2018

मानित्वाचे दुष्परिणाम | Adverse Effects of Pride



मानित्वाचा आपल्या मनावर कोणता परिणाम होतो ?

१) मानित्वाच्या वृत्तीमुळे आपल्या मनामध्ये अपेक्षा वाढतात.  महत्त्वाकांक्षा वाढतात.  दुसऱ्यापेक्षा मी मोठा होईन, हा एकच ध्यास असतो.  त्यामुळे मन जास्तीत जास्त बहिर्मुख होऊन विषयासक्त होते.  जितके विषय अधिक तितका मी मोठा, या कल्पनेमुळे तो सतत विषयांचेच चिंतन करतो.  असे कामुक मन मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही.  असा मनुष्य वर्तमानकाळात न जगता भविष्यकाळात जगत असतो.  एक अपेक्षा पूर्ण झाली की, त्यामधून पुन्हा दुसरी, तिसरी अपेक्षा याप्रमाणे असंख्य अपेक्षा निर्माण होतात.  त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनुष्य रात्रंदिवस धडपडतो.  जीवाचे रान करतो.  अनेक स्वप्ने रंगवून त्यामध्येच रममाण होतो.  पूर्वायुष्यामध्ये आपण सर्वजण उज्ज्वल भवितव्याचे दिवास्वप्न पाहातो.  परंतु वास्तवातील प्रत्यक्ष जीवन मात्र फार वेगळे असते.  

२) सतत भविष्यकाळाचा विचार करीत असल्यामुळे मनुष्य वर्तमानकाळाचा आनंद उपभोगू शकत नाही.  अपेक्षा जास्त असल्यामुळे आज मला जे मिळाले त्या परिस्थितीमध्ये मी कधीही आनंदाने, सुखाने, समाधानाने जगू शकत नाही.  आजचा दिवस मी मनाने मान्यच करीत नाही.  त्यामुळे माझे मन सतत अशांत, अतृप्त, असमाधानी, वखवखलेले असते.  

३) आपले स्वतःचे घरकूल असावे.  सुंदर पत्नी असावी.  घरामध्ये सर्व सुखसोयी असाव्यात, या अपेक्षा केल्यामुळे या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मन दुःखी, निराश होते.  आपल्या मनात अपेक्षा निर्माण झाली की, ती लगेचच पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा असते.  त्याबाबतीत आपण लहान मुलापेक्षाही उतावीळ होतो.  वय वाढले, अगदी मृत्यु समोर दिसत असेल तरीही आपण आपल्या अपेक्षा, वासना यांचा त्याग करू शकत नाही.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ

Tuesday, April 10, 2018

मानित्व | Pride




जीवनामध्ये मी अनेक विषयांची प्राप्ति करतो.  जसजसा विषयांचा संपर्क, संग्रह वाढतो त्याप्रमाणात मानित्वाची वृत्ति वर्धन पावते.  आपल्याजवळ असणाऱ्या प्रत्येक विषयाबद्दल, वस्तुबद्दल आपल्याला अभिमान असतो.  सौंदर्य, शरीरस्वास्थ्य, सामर्थ्य, बल, वीर्य, गुण, त्याग, दान, साधना या सर्व गोष्टींच्याबद्दल आपल्याला अभिमान असतो.  

सौंदर्याचा, विशेषतः स्त्रियांना खूप अभिमान असतो.  दुसऱ्यापेक्षा मी किती सुंदर आहे, हेच आपण आपल्या मनावर बिंबवितो.  म्हणून सतत आरशासमोर उभे राहून आपण आपल्या चेहऱ्यामध्ये corrections करीत असतो.  शरीरस्वास्थ्याचा सुद्धा अहंकार असतो.  “आज मी सत्तर वर्षाचा तरुण आहे.  मी अत्यंत निरोगी आहे.  व्यायामाने मी माझे शरीर अत्यंत सुदृढ, सशक्त ठेवले आहे.  डोळ्यांना अजूनही चष्मा नाही.”  याप्रकारच्या वाक्यांच्यामधून आरोग्याविषयीचा अभिमान सूचित होतो.  

सामर्थ्य, धन, संपत्तीचाही अभिमान असतो.  दुसऱ्यापेक्षा मी अधिक श्रीमंत आहे.  तसेच ‘मी’ दुसऱ्यापेक्षा हुशार, बुद्धिमान आहे.  यासाठीच आपण अनेक वेळेला आपल्या पदव्यांचा, शिक्षणाचा अनावश्यक ठिकाणी उच्चार करीत असतो.  मी श्रेष्ठ ब्राह्मण वर्णाचा आहे.  श्रेष्ठ जात, कुल, धर्माचा आहे, याचा ही अभिमान असतो.  स्वतःला दानशूर समजणाऱ्या व्यक्तीला स्वतःमधील दातृत्वाचा, त्यागवृत्तीचा अभिमान असतो.  आपल्याला सर्वांनी मोठे म्हणावे, आपणास प्रसिद्धि मिळावी, वर्तमानपत्रात आपले नाव झळकावे, यासाठीच आपले सर्व प्रयत्न असतात.  

यानंतर सर्वात सूक्ष्म अहंकार म्हणजेच – “मी साधक आहे, मी खूप साधना करतो.  मी अन्य लोकांच्यापेक्षा कोणीतरी वेगळा महान आहे”, अशा माझ्या कल्पना असतात.  त्यामुळे आपले प्रत्येक कर्म अभिमानाच्या वृत्तीनेच प्रेरित झालेले असते.  काया-वाचा-मनसा सर्व व्यवहार अहंकारानेच प्रेरित झालेला असतो.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ

Tuesday, April 3, 2018

साधनेची पुनरावृत्ति | Need of Repeated Cleansing




आपल्या अंतःकरणामध्ये गुह्य ज्ञानाचे बीज पेरायचे असल्यास प्रथम अंतःकरणाची मशागत केली पाहिजे.  आज आपले मन अशुद्ध आहे, कारण अनेक जन्मांचे आपल्या मनावर चांगले-वाईट संस्कार झालेले आहेत.  आपण आपल्या पुरुषार्थाने सतत रागद्वेषांचे, कामक्रोधादि विकारांचे पोषण करीत असतो.  ही सर्व अशुद्धता नाहीशी करण्यासाठीच सर्व साधना आहे.  ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.  पूर्वतयारीसाठीच जन्मानुजन्मे लागतात.  

यासाठी भगवंतांनी अर्जुनाला गीतेमध्ये अनेक ठिकाणी एकच साधना पुन्हा-पुन्हा सांगितलेली आहे.  आपल्याला वाटते की, भगवान पुन्हा-पुन्हा तेच-तेच का सांगतात ?  याचे कारण आपल्याला एकदा सांगून समजत नाही.  तो उपदेश मनावर ठसण्यासाठी पुनरावृत्तीची आवश्यकता आहे.  

सूत्रकार म्हणतात –
आवृत्तिरसकृत् उपदेशात् |   (ब्रह्मसूत्र ४-१-१)
किंवा
पौनः पुन्येन श्रवणं कुर्यात् | (शांकरभाष्य)
आपण सर्व साधक थोडीशी साधना करतो आणि लगेचच आत्मसाक्षात्काराची अपेक्षा करतो.  हे कसे शक्य आहे.  गुरूंनी साधना सांगितल्यावर, ही साधना किती वेळ करू ?  किती दिवस करू ?  असे प्रश्न विचारतो.  बिचारे गुरु यावर काय उत्तर देणार ?  

जसे, आपण रोज स्वयंपाक करतो.  स्वयंपाकासाठी वापरलेली भांडी आपण स्वच्छ करतो आणि पुन्हा वापरतो.  ते भांडे स्वच्छ झाल्याशिवाय वापरता येत नाही.  त्याप्रमाणेच आपले मन आहे.  व्यवहारामध्ये मनाचा सतत वापर होत असल्यामुळे ते चांगल्या-वाईट विचारांनी अशुद्ध, कलुषित होत असते.  रात्रंदिवस मन कार्यरत असते.  तसेच मागील जन्मांच्यामधील संस्कारांच्यामुळे ते अशुद्ध झालेले असते.  त्यामुळे अंतःकरणशुद्धीची साधना ही एक दिवस, दोन दिवस नसून अनेक जन्मांची साधना आहे.  
   

- "दिव्यत्वाचा मार्ग" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, २०१०
- Reference: "
Divyatwacha Marg" by Param Poojya Swami Swaroopanand Saraswati, 3rd Edition, 2010



- हरी ॐ