Thursday, September 25, 2014

कर्मशून्यतेचे परिणाम | Results of Inaction


जिज्ञासु साधकाने शास्त्रप्रमाणानुसार आपापल्या अधिकाराप्रमाणे श्रौतस्मार्तादि कर्मे करावीत, असा आदेश देताना त्याचवेळी भगवान सांगतात – कर्म ज्यायो ह्यकर्मणः |  कर्म न करण्यापेक्षा किंवा कर्मशून्यतेपेक्षा कर्म करणे हे निश्चितच श्रेयस्कर, कल्याणकारक आहे.

कर्म न करण्यामुळे अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात.
१) स्वकर्तव्य न करण्यामुळे प्रत्यवाय दोष निर्माण होतो.
२) शरीरामध्ये तमोगुण प्रबल होवून जडत्व वाढते.

तसेच, अंतःकरणामध्येही तमोगुणवृत्तीचा उत्कर्ष होवून आलस्य, निद्रा, प्रमाद, निष्काळजीपणा, कर्म न करण्याची वृत्ति निर्माण होते. इतकेच नव्हे तर, अंतरिक सावधानता आणि एकाग्रता नाहीशी होते. मन अत्यंत सुंद होते आणि तामोगुण जितका वाढतो तितक्या प्रमाणात विवेक-वैराग्य-शमदमादिषट्संपत्ति किंवा सत्त्वगुण तसेच, मनाची सूक्ष्मता, ग्रहणशक्ति नाहीशी होते आणि मन अधःपतित होते. तसेच, रागद्वेषादि विकारांचा उत्कर्ष होतो.  

यामुळे मनुष्य परमपुरुषार्थापासून च्युत होतो. शरीरपातानंतरही त्याला सुखप्राप्ति होत नाही. उलट, अनेक प्रकारच्या प्रत्यवाय दोषांच्यामुळे आणि तमोगुणाच्या प्राबल्यामुळे नरकप्राप्ति आणि अधोयोनिप्राप्त होते. स्वधर्म व स्वकर्तव्यापासून मनुष्य च्युत होवून अधर्माचरणामध्ये प्रवृत्त होतो. असे कर्म चित्तशुद्धीचे साधन होणार नाही.

म्हणून असे कर्म करावे की, ज्यामुळे अहंकार, रागद्वेष, स्वार्थ, लोभ वगैरेदि दोष हळुहळू कमी होतील आणि मन शुद्ध व निर्मळ होवून सत्त्वगुणप्रधान होईल.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, September 23, 2014

कर्म अपरिहार्य आहेत | Actions are Indispensable

 
अज्ञानी जीव कधीच कर्मरहित राहू शकत नाही. कर्मरहित राहाणे म्हणजेच स्वस्वरूपात राहाणे होय. त्यामुळे ज्ञानी हाच फक्त स्वस्वरूपात नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकतो. त्याव्यतिरिक्त असणारे अज्ञानी, अविवेकी जीव कर्मरहित राहू शकत नाहीत.
 
याचे कारण, स्वस्वरूपाच्या अज्ञानाच्या आवरणामुळे शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार यांच्याशी तादात्म्य पावून सर्व जीव बहिर्मुख होतात आणि त्यामुळे त्यांच्या मनात विषयभोगवासना निर्माण होते. भोगवासनेमुळे ते अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त होतात. तसेच हट्टाने किंवा स्वच्छेने जरी कर्मरहित राहाण्याचा प्रयत्न केला तरीही मनुष्य कर्मरहित राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणप्राबल्यामुळे सर्व जीव प्रकृतीचे गुलाम होवून कर्मामध्ये प्रवृत्त होतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही. म्हणजेच कर्म करावयाचे किंवा करावयाचे नाही, हे जीव ठरवीत नसून प्रकृतीचे गुण ठरवितात.
 
सत्त्व, रज आणि तम हे तीन प्रकृतीचे सहजस्वाभाविक गुणधर्म आहेत. अनेक संकल्प, कामना यांच्यामुळे द्रव्य, गुण, कर्म, जातिवासना तसेच रागद्वेषादि विकार निर्माण होतात. हे सर्व प्रकृतिगुणांच्या अंतःप्रेरणेने जीवाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असल्यामुळे सर्व जीव अगतिक होवून त्या त्या संकल्पाच्या आहारी जातात. इतकेच नव्हे तर, कर्म करावे की करू नये हे स्वातंत्र्यही त्यांना राहात नाही. तो प्रबल संकल्प किंवा कामना जीवाला अनेक प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त करते. मग ते कर्म अंतरिक असो व बाह्य असो. जीव त्यामध्ये प्रवृत्त होतात.
 
याप्रकारे अज्ञानी जीव प्रकृतीच्या गुणांनी मोहीत झाल्यामुळे प्रकृतीच्या अधीन होतात आणि ती प्रकृति त्यांना कर्म करावयाला भाग पाडते. त्यामुळे ते सर्व जीव एक क्षणभरही कर्मरहित, नैष्कर्म्यावस्थेमध्ये राहू शकत नाहीत.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
- हरी ॐ

Tuesday, September 16, 2014

अनुसरण कर्मयोगाचे की ज्ञानमार्गाचे ? | Path of Action or Knowledge ?



कर्मांचा आरंभ न करता मनुष्याला नैष्कर्म्यावस्था प्राप्त होत नाही.  तसेच, कर्मांचा केवळ त्याग केल्याने सुद्धा आत्मसिद्धि प्राप्त होत नाही. 

रागद्वेषात्मक पापांचा क्षय कर्माच्या अनुष्ठानाशिवाय होत नाही.  पापांचा क्षय झाल्याशिवाय चित्तशुद्धि नाही.  चित्तशुद्धीशिवाय मनाची एकाग्रता होत नाही आणि त्याशिवाय ज्ञानोदय व ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही.  ज्ञाननिष्ठा म्हणजेच नैष्कर्म्यावस्था होय.  थोडक्यात ज्ञाननिष्ठेसाठी चित्तशुद्धि, चित्तशुद्धीसाठी पापक्षय आणि पापक्षयासाठी कर्म अनुष्ठान हा क्रमाने हेतु आहे.  कर्म हे जरी मोक्षाचे साक्षात साधन नसले तरी सुद्धा अंतःकरणशुद्धीद्वारा ज्ञानप्राप्तीसाठी पूरक, साहाय्यकारी साधन आहे.

अर्जुन किंवा कोणताही साधक जर म्हणेल की मी अखंड श्रवण-मननादि साधना करून ज्ञाननिष्ठा प्राप्त करेन, तर भगवान म्हणतात की , हे अर्जुना !  तू जरी मुमुक्षु असशील तरी ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी चित्तशुद्धि व विरक्त मन तुला प्राप्त झालेले नाही.  त्यामुळे हट्टाने तू कर्मसंन्यास घेतलास तर नैष्कर्म्यावस्था तर मिळणारच नाही.  याउलट पापक्षय सुद्धा होणार नाही. कर्मानुष्ठानाशिवाय चित्तशुद्धि कशी मिळेल ?  म्हणून नैष्कर्म्यावस्था प्राप्त करण्यामध्ये कर्माचे ज्ञानाइतकेच महत्व आहे.  शास्त्रामध्ये सुद्धा चित्तशुद्धि हेच कर्माचे प्रयोजन सांगितलेले आहे.

अज्ञानी पुरुषाने कर्मसंन्यास न घेता निष्काम वृत्तीने कर्माचे अनुष्ठान करावे, कारण कर्मफळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म ज्ञानप्राप्तीसाठी साहाय्यकारी साधन होते.  त्यामुळे हे अर्जुना !  तू कर्मयोगाचे अनुसरण करावयाचे की ज्ञानमार्गाचे ?  हा प्रश्नच उद्भवत नाही कर्मयोगनिष्ठेशिवाय चित्तशुद्धि नाही आणि चित्तशुद्धीशिवाय ज्ञाननिष्ठा कधीही प्राप्त होत नाही.  म्हणून प्रत्येक साधकाने चित्तशुद्धीसाठी कर्मयोगाचे अनुष्ठान करावे, हाच भगवंताचा अभिप्राय आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ