Tuesday, February 25, 2020

जागृतावस्थेचे शास्त्र | Science of Awakeness





चैतन्याचे किरण म्हणजेच जीव किंवा चिदाभास होत.  ज्याप्रमाणे, एकाच सूर्याची अनेक बादल्यांच्यामधील पाण्यामध्ये अनेक प्रतिबिंबे निर्माण होतात.  ही प्रतिबिंबे म्हणजे केवळ सूर्याचा भास आहे.  त्याचप्रमाणे, सर्व जीव म्हणजे चैतन्याचे भास, चिदाभास आहेत.  किरणांचा विस्तार म्हणजे चिदाभासांचा विस्तार झालेला आहे.  म्हणजेच चिदाभासांनी सर्व उपाधींना, सर्व शरीरांना व्याप्त केले आहे.  यानंतर त्या चिदाभासांनी स्थिर असणाऱ्या वृक्षादि पदार्थांना व चर असणाऱ्या मनुष्यादि प्राणिमात्रांना, म्हणजेच सर्व जड विषय आणि सर्व मनुष्य-पशू-पक्षी या सर्वांच्या समूहाला व्याप्त केले आहे.  

चिदाभास या सर्वांना वृत्तिरूपाने व्याप्त करतात.  चिदाभास म्हणजेच मनाचे स्पंदन किंवा मनाचे स्फुरण होय.  चिदाभास या मनाच्या वृत्तीच्या साहाय्याने त्या त्या शरीरापर्यंत किंवा विषयापर्यंत जाऊन त्या त्या विषयाशी व शरीराशी तादात्म्य पावतो.  त्या त्या शरीराचे रूप धारण करतो.  तसेच दृश्य विषयांपर्यंत जाऊन त्या-त्या विषयाची विशिष्ठ तदाकार, विषयाकार वृत्ति निर्माण होते.  जितके विषय तितक्या वृत्ति निर्माण होतात.  याप्रमाणे, चिदाभास स्वतः एका शरीराशी तादात्म्य पावून, ती उपाधि धारण करून नंतर घट-पट-वृक्ष-डोंगर-सूर्य-चंद्र-नदी-हत्ती वगैरेदि अशा असंख्य, अगणित विषयांना, पदार्थांच्या समूहाला व्याप्त करतो.  

याप्रमाणे चिदाभासाने शरीर व विषयांना व्याप्त केल्यानंतर चिदाभासाचा शरीर व इंद्रिये यांचा बाह्य दृश्य विषयांशी संबंध येतो.  इंद्रिये व विषय यांचा संनिकर्ष झाला की, त्यामधून सुख-दुःखादि अनुभव निर्माण होतात.  चिदाभासाला हे सर्व सुखदुःखादि संमिश्र अनुभव अनुभवायला येतात.  थोडक्यात, ज्यावेळी चिदाभास स्थूल शरीराशी तादात्म्य पावून इंद्रियांच्या माध्यमामधून स्थूल विषयांचा अनुभव घेतो, त्यास ‘जागृतावस्था’ असे म्हणतात.  या अवस्थेमध्ये मन बाह्य विषयांना जागृत असते.  



- "माण्डूक्योपनिषत्” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, डिसेंबर २०
- Reference: "
Mandukyopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, December 2016



- हरी ॐ

Tuesday, February 18, 2020

अध्यात्मात चालणारा पाखंड | Fakeness in Spiritualism




अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश केल्यानंतर पुष्कळसे लोक स्वतःच अध्यात्माच्या अनेक कल्पना करतात.  एखादा महात्मा किंवा श्रेष्ठ साधु, संत पाहिले, त्यांना मिळत असलेला मान-सन्मान पाहिला की, असे पूजनीयत्व व आदर आपणासही मिळावा, अशी स्वप्ने ठेवून अध्यात्ममार्ग स्वीकारतात.  साधु झाले की, सर्वजण नमस्कार करतात, बर्फी-पेढे, फळे-फुले समोर आणून ठेवतात, गळ्यात हार घालतात, श्रद्धा ठेवतात, सल्ला ऐकतात.  शिवाय उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटतो.  हिंडायला भक्तांच्या गाड्या मिळतात.  असे सर्व बहिरंग पाहून “ आपणही साधु व्हावे.  व्यवहार जमला नाही.  निदान अध्यात्म करून बघावे.  मग आपल्यालाही सर्वजण नमस्कार करतील.  आपणही दुसऱ्यांच्या समस्या सोडवू व मोठे होऊ ”.  अशी विचित्र व भयंकर स्वप्ने उराशी बाळगून लोक अध्यात्मामध्ये प्रवेश करतात.  

सद्य समाजामध्ये तर अध्यात्मात प्रवेश करणाऱ्या अशा लोकांच्यामध्ये तरुण पिढीचाही समावेश आहे.  दोन-चार आध्यात्मिक पुस्तके वाचून त्यांचे मर्कट वैराग्य उफाळून येते व ही मुले सर्वसंगपरित्याग करण्याची भाषा बोलतात. आध्यात्मिक ज्ञान कशासाठी घ्यावयाचे आहे ?  असे विचारले तर उत्तरही ठरलेले असते की, हे ज्ञान घेऊन समाजाचा, जगाचा उद्धार करावयाचा आहे.  अध्यात्ममार्गाबद्दल अशा खूप चुकीच्या कल्पना करून लोक बहिरंगाने जीवनामध्ये खूप बदल करतात.  परंतु त्यांच्या अंतरंगामध्ये विषयांच्या अनेक कामना व भोगवासना दडलेल्या असतात.  

या मानसन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या वासना स्वकर्तृत्वाने व्यावहारिक जीवनामध्ये त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत तर असे लोक स्वार्थाने, अहंकाराने प्रेरित होऊन अध्यात्ममार्गामध्ये प्रवेश करतात व दांभिकतेचा आश्रय घेतात.  समाजाला फसवितात.  सामान्य, श्रद्धावान लोकांना फसवितात.  स्वतः साधक आहे, ब्रह्मचारी आहे, साधु आहे, असे भासवितात.  

परंतु दुर्दैवाने हे लोक सर्वात जास्त स्वतःलाच फसवीत असतात.  स्वतःचीच प्रतारणा करीत असतात.  बाहेरून रामनामाचा महिमा जगाला सांगतात.  हातात रुद्राक्षाची माळ धरतात.  परंतु त्यांचे स्वतःचे मन मात्र रामनामामध्ये तल्लीन, तन्मय होत नाही.  त्यांचे मन भोग, विषयासक्ति, अनेक विचार यांनी कलुषित, अशुद्ध असते.  यामुळे बहिरंगाने अध्यात्माचे आचरण करूनही अशा दांभिक पुरुषाला सुख व शांतीचा अनुभव येत नाही.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, February 11, 2020

गर्व आणि वस्तुस्थिति | False Pride & Reality




अभिमानाने प्रेरित झालेले जीवन जगत असताना जोपर्यंत सर्व सुरळीत चालते, सर्वकाही मनाप्रमाणे घडते, तोपर्यंत मनुष्याचा अहंकार, गर्व वाढतच जातो.  परंतु जेव्हा विपरीत घडायला लागते, अपेक्षाभंग होतो, तेव्हा मात्र मनुष्य उद्विग्न होतो.  आपण ठरवितो एक व घडते मात्र निराळेच !  नियतीने काहीतरी वेगळे ठरविले असते.  आपल्या मनाप्रमाणे फार क्वचितच घडते.  परंतु बाकी पुष्कळ वेळेला जीवन अपेक्षेपेक्षा वेगळेच दिसते.  आपण प्रयत्न करतो.  परिश्रम करतो.  परंतु त्याचे फळ विपरीत मिळते.  जीवनामध्ये असे संकटांचे प्रसंग एकामागून एक येत राहतात.  

अशा वेळी विचारी मनुष्य विचार करतो की, माझ्या जीवनात कोणतीतरी एक अज्ञात शक्ति आहे की, जी माझ्या जीवनावर नियमन करते.  म्हणूनच संकट आले की बुद्धिमान, नास्तिक माणसे सुद्धा ज्योतिषाकडे जातात.  आजकाल तरुण पिढीसुद्धा त्या अदृश्य, अज्ञान, अनाकलनीय शक्तीचे अस्तित्व मान्य करते.  ज्यावेळी मनुष्य जीवन जगतो, अनेक अपेक्षा करतो तेव्हा त्याने ईश्वरी सत्तेची जाणीव ठेवली पाहिजे.  संपूर्ण विश्वावर, सर्व प्राणिमात्रांच्यावर तसेच माझ्याही जीवनावर नियमन करणारी कोणीतरी एक अज्ञात शक्ति आहे, हे मान्य करावेच लागते.  आचार्य म्हणतात – “हे मनुष्या !  तू व्यर्थ चिंता का करतोस ?  या विश्वात तू मुख्य नाहीस.  तुझ्यावर नियमन करणारे कोणी नाही, असे तुला वाटते का ?  तू कोणत्या गर्वाने उन्मत्त झाला आहेस ?  थोडासा विचार कर.”  

ज्या परमेश्वराने या विश्वाला निर्माण केले, ज्याने सर्वांना जन्म दिला, तोच विश्वाची काळजी घेतो.  तोच विश्वाचा उत्पत्तिस्थितिलयकर्ता आहे.  तोच विश्वाचे पालन-पोषण-वर्धन करतो.  तोच विश्वंभर आहे.  त्याच्याशिवाय झाडाचे पानही हालत नाही.  त्याच्याशिवाय पापण्यांची उघडझापही होऊ शकत नाही.  त्यानेच आपल्या सर्वांना जन्माला घातले.  जन्मल्यापासून या क्षणापर्यंत त्यानेच आपल्याला अन्न दिले, पाणी दिले, राहायला आकाश दिले, जिवंत राहण्यासाठी प्राणवायू दिला, आपल्याला इतकी सुंदर सृष्टि दिली.  त्याने वरून कधी याची बिले पाठविली नाहीत.  आपण कधीतरी विचार करतो का की, त्याची कृपा, करुणा किती अपरंपार आहे.  तो करुणेचा सागर आहे.  त्याच्या दयेला सीमा नाहीत.  त्याने निर्माण केलेल्या या जगड्व्याळ विश्वामध्ये माझे अस्तित्व अगदीच नगण्य आहे.  आपण एक यःकश्चित् क्षुद्र जीव आहोत.  अथांग सागरामधील एखाद्या थेंबाप्रमाणे आहोत.   



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ

Tuesday, February 4, 2020

नाण्याची दुसरी बाजू | Other Side of the Coin




काम एष क्रोध एषः रजोगुणसमुद्भवः |
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिहवैरिणम् ||              (गीता अ. ३-३७)   

“हे अर्जुना ! महाखादाड असणारा काम व महापापी असणारा क्रोध हे रजोगुणामधून निर्माण झालेले असून तेच मनुष्याचे खरे शत्रू आहेत.” कामनाच मनुष्याला सतत अतृप्त व अशांत ठेवून अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कर्मामध्ये प्रवृत्त करते. कामनापूर्तीमध्ये एखादा प्रतिबंध आला तर त्याच कामनेचे रूपांतर क्रोधामध्ये होऊन मनुष्याचे मन क्रोधाविष्ट, संतप्त व उद्विग्न होते. याप्रकारे रागद्वेष, कामक्रोधादि विकार यामुळे मनुष्याचे जीवन उध्वस्त व अधःपतित होते. यासाठीच मनुष्याने विचार करणे आवश्यक आहे. ज्या विषयांमुळे मनामध्ये कामना व अन्य सर्व विकार निर्माण होतात, त्या विषयाचे खरे, वास्तविक स्वरूप काय आहे, याचा निरपेक्ष विचार करावा.

ज्याप्रमाणे आपण व्यवहारात म्हणतो की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला दिसताना एकच बाजू दिसते. दुसरी बाजू नेहमीच अदृश्य असते. त्याचप्रमाणे खरे तर सर्व दृश्य विषयांना दोन बाजू आहेत. परंतु व्यवहारामध्ये आपण विषयांची सतत व सहजपणे डोळ्यांना समोर दिसणारी एकच बाजू पाहतो व ती बाजू म्हणजेच विषयांचे सौंदर्य, आकर्षण व मोहकात्व ! बाह्य सौंदर्यालाच आपण भुलतो व सुखासाठी विषयांच्या मागे धावतो.

परंतु, विवेकी पुरुषाने विवेकाच्या साहाय्याने विषयांची बाजू म्हणजेच विषयांचे दोष, मर्यादा जाणणे आवश्यक आहे. विषयांच्यामध्ये प्रामुख्याने – अनित्यत्व, दुःखित्व, बद्धत्व व मिथ्यात्व असे चार प्रकारचे दोष आहेत. हे दोष जाणणे यालाच ‘विषयदोषदर्शन’ असे म्हणतात. शास्त्रामध्ये विषयदोषदर्शन हा शाब्दिक अभ्यास नसून एक फार मोठी अंतरिक साधना आहे. साधकाने याचा सखोल विचार करावा. विषयदोषदर्शन हा आचार्यांच्या ‘भज गोविन्दम् | या ग्रंथाचा प्रमुख विषय आहे. कारण विषयांच्यामधील दोष समजले तर मनुष्य आपोआपच त्यामधून निवृत्त होऊ शकतो.  



- "भज गोविंदम् |”या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५
- Reference: "
BhajGovindam" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, April 2015



- हरी ॐ