Tuesday, July 26, 2016

आस्तिक, नास्तिक व श्रद्धा | Believer, Non-Believer and Faith


विश्वामध्ये अनेक प्रकारची माणसे आहेत.  त्यामध्ये प्रामुख्याने आस्तिक व नास्तिक अशा दोन प्रवृत्ति दिसतात.  आस्तिक म्हणजेच श्रद्धावान, धार्मिक मनुष्य होय.  हा मनुष्य फार मोठी मीमांसा न करता अज्ञात ईश्वरी शक्तीचे अस्तित्व मान्य करतो.  याउलट दुसरा नास्तिक, भौतिकवादी मनुष्य आहे.  तो विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ असून प्रत्येक गोष्ट तर्काने पडताळून पाहतो.  असा हा मनुष्य ‘ईश्वर’ असा शब्द वापरत नाही.  परंतु तरीही तो सुद्धा श्रद्धावानच आहे.

याचे कारण आस्तिक-नास्तिक, गरीब-श्रीमंत, कोणताही मनुष्य असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले-वाईट, अनुकूल-प्रतिकूल, प्रिय-अप्रिय, इष्ट-अनिष्ट असे प्रसंग हे आहेतच.  त्यातुनच प्रत्येक मनुष्य सुख शोधण्याचा प्रयत्न करतो.  सुखप्राप्तीसाठी विषयांचा संग्रह करतो.  यथेच्छ व स्वैर इंद्रियभोग घेतो.  अनंत विषयांच्या कामना करतो.  कामनापूर्तीसाठी अनेक प्रकारची कर्मे करतो.  त्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे भोगतो.

आयुष्याच्या शेवटी मनुष्याला जाणीव होते की, आजपर्यंत बहिरंगाने मी सर्व मिळविले.  पैसा, सत्ता, यश, कीर्ति, प्रतिष्ठा, मान-सन्मान, विद्वत्ता, प्रसिद्धि, सर्व काही आहे.  सभोवती अनेक माणसे आहेत.  आप्त, सगे-सोयरे आहेत.  हे सर्व मिळूनही अजूनपर्यंत अंतरिक शांति व समाधान मात्र मिळालेले नाही.  मनुष्य हताश व निराश होतो. परंतु तरीही जीवन जगतो, कारण मनुष्य हा श्रद्धावान आहे.

श्रद्धा ठेवणे म्हणजे भोंगळपणा नाही, श्रद्धा ठेवणे म्हणजे अज्ञान नाही. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा मुळीच नाही.  तर ‘श्रद्धा’ हा ज्ञानाचा प्रारंभ आहे.  पुढे काहीतरी आहे, या श्रद्धेतच पुढील मार्गक्रमण करणे शक्य आहे.  श्रद्धेमुळेच ज्ञानजिज्ञासा व ज्ञानप्राप्ति शक्य आहे.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ

Tuesday, July 19, 2016

विज्ञानातील श्रद्धा | Faith in Science


विज्ञानाच्या भाषेतही “श्रद्धा” या शब्दाचा अर्थ पाहिला पाहिजे.  अनादि काळापासून सर्व शास्त्रज्ञ, संशोधक नवनवीन शोध लावण्यासाठी झटत आहेत.  प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करीत आहेत.  युक्तीच्या साहाय्याने पडताळून पाहात आहेत.  या सर्वांच्यामागे एकच जिज्ञासा आहे आणि ती म्हणजे – जे ज्ञात आहे, दृश्य आहे त्याच्यामागे काय आहे?  या दृश्य विश्वाच्या पलीकडे काय आहे?  विश्व कोठून निर्माण झाले?  विश्व कसे निर्माण झाले?  विश्वाचे कारण काय?  यालाच कार्यकारण सिद्धांत (Cause-Effect relationship) म्हणतात.

विज्ञान याचा अर्थच जे ज्ञात आहे, त्या माहीत असलेल्या वस्तुवरून अज्ञात वस्तु शोधणे.  जे दृश्य आहे त्यावरून अदृश्य वस्तु शोधणे, स्थूलाच्या साहाय्याने सूक्ष्म, सूक्ष्मतर वस्तूचा शोध घेणे.  यालाच ‘विज्ञान’ असे म्हणतात.  थोडक्यात कार्यावरून कारणाचा शोध घेणे म्हणजे ‘विज्ञान’ होय.

आज आपण विज्ञानामध्ये जे सिद्धांत पाहतो, ते विज्ञानाने सांगितलेले नाहीत किंवा सिद्ध केले नाहीत.  विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावलेला नाही.  तर सर्व सिद्धांत पूर्वीच अपौरुषेय वेदांच्यामध्ये प्रतिपादन केलेले आहेत.  विज्ञानाच्या मुळाशी, विज्ञानाच्याही अतीत अध्यात्माचे स्थान आहे.  जेथे विज्ञान संपते, विज्ञानाला मर्यादा येतात, तेथे अध्यात्माच्या सूक्ष्म जगाला प्रारंभ होतो.

काहीतरी आहे, असे मानणे, असा विश्वास ठेवणे, अशी श्रद्धा ठेवणे, हीच ज्ञानाची-विज्ञानाची सुरुवात आहे.  श्रद्धेशिवाय अज्ञातामध्ये शोध घेणे विज्ञानाला व अध्यात्मालाही शक्य नाही.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ

Tuesday, July 12, 2016

श्रद्धेचे आविष्कार | Manifestation of Faith


प्रत्येक मनुष्याचे अंतरंग जीवन हे अतिशय महत्वाचे आहे.  आपल्याला केवळ बुद्धीने जगता येत नाही.  प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ‘श्रद्धा’ आहेच, फक्त श्रद्धेचे आविष्कार भिन्न-भिन्न आहेत.  श्रद्धेचे विषय भिन्न आहेत.  श्रद्धास्थाने भिन्न आहेत.  श्रद्धेचे रूप भिन्न आहे.  म्हणून ‘श्रद्धा’ ही निर्माण करावयाची नाही.  तर श्रद्धा ही आहेच.

प्रत्येकाची आपले आई-वडील, मित्र-मैत्रीण, आप्त, नातेवाईक, पैसा, ऐश्वर्य, सत्ता यापैकी कशावर ना कशावरतरी श्रद्धा आहेच.  श्रद्धा ही दाखविता येत नाही, कारण श्रद्धा ही घटादि वस्तूंच्याप्रमाणे विषय नाही तर ‘श्रद्धा’ ही अन्तःकरणाची अवस्था आहे.  भगवान म्हणतात –
श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यत् श्रद्धा स एव सः |

प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान असून ज्याची जशी श्रद्धा असेल तसा तो होतो.  प्रत्येक मनुष्याच्या बहिरंग जीवनामध्ये पावलोपावली श्रद्धेचाच आविष्कार दिसतो.  मी उद्या उठणार हा विश्वास आहे, म्हणून उद्याचे नियोजन करतो.  मी अभ्यास केला की, परीक्षेत उत्तीर्ण होईन हा विश्वास, म्हणून अभ्यास करतो.  मी औषध घेतले तर रोग बरा होईल, म्हणून औषध घेतो.

अशी व्यवहारामध्ये अनेक उदाहरणे आहेत.  मनुष्याच्या अंतरंग जीवनामध्ये, प्रत्येक वृत्तीमध्ये, विचारामध्ये, भावनांच्यामध्ये श्रद्धेचा आविष्कार दिसतो.  इतकेच नव्हे तर अध्यात्ममार्गामध्ये तर श्रद्धा हाच पाया आहे.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ

Tuesday, July 5, 2016

प्रत्येक मनुष्य श्रद्धावान आहे | Every Human Being is a Believer


जीवनभर प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात असतो.  एखादा सामान्य मनुष्यही सुख शोधत असतो आणि एखादा प्रखर बुद्धिवादी, तर्कनिष्ठ शास्त्रज्ञही चिरंतन सुखाचाच शोध घेत असतो.  उद्या मी सुखी होईन, या आशेवरच सर्वजण जीवन जगत असतात.

एखादा श्रद्धाळु मनुष्य ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेऊनच जीवन जगत असतो.  परंतु बुद्धिनिष्ठ, शास्त्रज्ञ त्यावर लगेच विश्वास ठेवीत नाही.  त्यावर तो विचार करतो. मीमांसा करतो.  त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करतो.  यालाच ‘विज्ञान’ असे म्हणतात.

विज्ञानामध्ये सुद्धा शोध घेत असताना सतत कारणमीमांसा केली जाते.  कोणत्याही वस्तूचे, घटनेचे कारण शोधले जाते.  याचा अर्थच ‘कारण आहे’ हा विश्वास ठेऊनच कारणाचा शोध घेतला जातो.  जेव्हा विज्ञानामध्ये नवीन शोध लावला जातो, ते गृहीत धरणे, यालाच आचार्य येथे म्हणतात – अस्ति इति विश्वासः |

या विश्वामध्ये मनुष्याच्या इंद्रिये-मन-बुद्धीलाही अनाकलनीय असणारी एक अज्ञात शक्ति आहे.  या अज्ञात शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव होणे, तिच्या अस्तित्वाबद्दल, सत्तेबद्दल विश्वास निर्माण होणे, म्हणजे ‘श्रद्धा’ होय.

यावरून सिद्ध होते की, प्रत्येक मनुष्य हा श्रद्धावान आहे.  श्रद्धेशिवाय मनुष्य जगूच शकत नाही.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011




- हरी ॐ