ज्ञान
हेच मोक्षाचे पुष्कल साधन आहे. मात्र हे
ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य व अधिकारी अंतःकरणाची आवश्यकता आहे. अंतःकरणामधील रागद्वेष, कामक्रोधादि विकार,
चंचलता वगैरेदि हे सर्व ज्ञानाला प्रतिबंधक आहे. म्हणून जोपर्यंत अंतःकरणामध्ये मल आणि
विक्षेप हे दोष आहेत, तोपर्यंत हे ज्ञान सप्रतिबंधक, संशयविपर्ययुक्त, केवळ
शाब्दिक ज्ञान आहे. याला ज्ञान असे
म्हणताच येणार नाही.
म्हणून
निष्प्रतिबंधक ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच आचार्य सगुणोपासना हे साधना देतात. सगुणोपासना म्हणजेच ईश्वराची उपासना आणि त्यास
साहाय्यकारी असणाऱ्या वेदविहित कर्मांचे अनुष्ठान होय. ही सगुणब्रह्मउपासना क्रमाने मोक्षप्राप्तीचे
साधन होते.
यानंतरच
निर्गुणउपासना सांगितली जाते. निर्गुणब्रह्मउपासना
म्हणजेच ब्रह्माभ्यास होय. ही उपासना
मोक्षाचे साक्षात कारण आहे. हाच संपूर्ण
शास्त्राचा तात्पर्यनिर्णय असून तोच ‘नमः शिवाय’ या मंत्राचाही गर्भितार्थ आहे.
तोच अर्थ तत्त्वदर्शी लोकांनी
निष्ठापूर्वक कथन केलेला आहे. त्यामध्ये
कोणतीही उणीव, शंका, गोंधळ किंवा विकल्प नसल्यामुळे निश्चितपणे मोक्षप्राप्तीसाठी
साधकांनी हाच अर्थ जाणावा. कारण ‘नमः
शिवाय’ या मंत्राची उपासना करीत असताना त्याचा शब्दार्थ, गुढार्थ आणि तत्त्वार्थ
समजणे आवश्यक आहे.
मंत्रार्थाच्या
बोधामुळे आपली उपासनेमध्ये दृढ श्रद्धा निर्माण होते. मनामधील अनेक शंका निरास होतात. जप का करावा ? त्याचे फळ काय ? हे समजते. शंका निरसन झाल्यामुळे तसेच उहापोह विचार
झाल्यामुळे सर्व विकल्प संपून त्या मंत्रामध्ये निष्ठा प्राप्त होते. मंत्रोपासनेमध्ये सातत्य निर्माण होऊन मन
दीर्घकाळ, तासन् तास जपामध्ये एकाग्र, तल्लीन,
तन्मय होते. यामुळे आपोआपच तत्त्वचिंतन
होते.
- "ॐ नमः
शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद
सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च
२०१५
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
- Reference: "Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015
-
हरी ॐ –