Tuesday, May 26, 2020

सगुण उपासनेची आवश्यकता | Necessity of Form Worship
आपण सर्वजण प्रतिमेमधून चैतन्याची उपासना करतो.  आपण सर्वजण चैतन्याचेच उपासक आहोत.  चैतन्य हे तर निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक, निराकार आहे आणि माझे मन विषयासक्त, बहिर्मुख आहे.  असे मन विषयवृत्तीरहित करून चैतन्यस्वरूपापर्यंत नेण्यासाठी सगुण, साकार, सविशेष रूप मला साधन होते.  सगुण उपासनेच्या साहाय्याने मी माझे मन अत्यंत सहजपणाने विषयांपासून निवृत्त करू शकतो.  हा पहिला भाग.  दुसरे म्हणजे हे सगुण, साकार रूप परमेश्वराचे प्रतिक असल्यामुळे माझे मनही शुद्ध, सत्वगुणप्रधान होते.

विश्वामधील विषयही दृश्य, सगुण, साकार आहेत आणि परमेश्वराच्या विग्रहाचे रूपही सगुण, साकार आहे.  आजपर्यंत आपल्या मनाला अहोरात्र दृश्य विषय बघण्याचीच सवय लागलेली आहे.  डोळ्यांना दृश्य विषय दिसल्यानंतरच मी मनाने त्या विषयाचे चिंतन करतो.  त्याचप्रमाणे ईश्वराचे चिंतन करावयाचे असेल तर प्रथम सगुण, साकार, सविशेष रूपाची अत्यंत आवश्यकता आहे.  परमेश्वराचे सगुणरूप हे मनाला आलंबन होते.  सगुण उपासना परमेश्वरस्वरूपापर्यंत नेण्यासाठी साधकाला साहाय्यकारी साधन होते.  म्हणून उपासना हे साध्य नसून उपासना हे साधन आहे.  

ज्याप्रमाणे उंच उडीच्या खेळामध्ये एक आडवा बांबू बांधला जातो.  मला स्वतःला एकदम एवढी उंच उडी मारता येत नाही.  त्यासाठी मी हातात एक बांबू आधार, साधन म्हणून घेतो.  त्याच्या साहाय्याने एकदम उडी घेऊन आडव्या बारपर्यंत जातो.  तेथपर्यंत हातात बांबू असतो.  बारच्या पलीकडे जाताना तो आधार म्हणून घेतलेला बांबू सोडून देतो.  अगदी याचप्रमाणे मला निर्गुण, निर्विशेष, निरूपाधिक चैतन्यस्वरूपाची प्राप्ति करावयाची असेल तर त्यासाठी सगुण उपासना हे साधन होते.  सगुणोपासना हे फक्त मनासाठी आलंबन साधन आहे की ज्यामुळे बहिर्मुख, विषयासक्त असणारे मन अंतर्मुख बनू शकेल.  - "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ


Tuesday, May 19, 2020

प्रतिक आणि प्रतिमा उपासना | Symbol and Image Worship
निर्गुण, निराकार, निर्विशेष स्वरूपाची उपासना करण्यासाठी प्रथम सगुण, साकार रूपाची उपासना सांगितली जाते.  कोदंडधारी श्रीराम, शंखचक्रगदापद्मधारी श्रीविष्णु, मुरलीधर श्रीकृष्ण, डमरूत्रिशूलधारी शिव, गणेश, देवी कोणतीही देवता असेल, त्या त्या रूपामध्ये त्या देवतांच्यामधून मी ईश्वराचीच उपासना करतो.  ही सर्व सगुण, साकार रूपे ईश्वराची प्रतिके आहेत.  या विग्रह उपासना म्हणजेच प्रतिक उपासना होत.  

किंवा पंचधातु, चांदी, दगड या प्रतिमांच्यामधून मी परमेश्वराचीच उपासना करतो, या प्रतिमा उपासना होत.  येथे फोटो किंवा दगडाची उपासना नसून यामधून ईश्वराचीच उपासना आहे.  

जसे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी आम्ही राष्ट्राला वंदन करतो.  खरे तर आमचे राष्ट्र आसेतुहिमाचल आहे.  राष्ट्राला म्हणजेच राष्ट्रध्वजाला आम्ही वंदन करतो.  ध्वज म्हणजेच विशिष्ट पद्धतीने रंगविलेले कापड आहे, परंतु तेथे मी कापड न पाहता संपूर्ण राष्ट्र पाहतो.  कारण ध्वज हे राष्ट्राचे प्रतिक आहे.  आमच्या राष्ट्राचे ते श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहे.  यालाच “प्रतिक उपासना” म्हणतात.  

किंवा सर्वांच्या घरामध्ये आईवडिलांचे फोटो लावले जातात.  जयंति, पुण्यतिथीला आपण सर्व प्रतिमांना हार घालतो, नमस्कार करतो.  खरे तर फोटो म्हणजे आईवडिल नव्हेत.  तेथे मी फोटो पाहत नसून त्यामागे त्यांचे जीवन पाहतो.  त्यांच्या जीवनामधील अलौकिक गुण, तत्त्व, त्यांनी मला दिलेले संस्कार पाहतो.  ते जीवन मला आदर्श होते.  मला प्रेरणा देते.  त्यांच्या दिव्यत्वाला, महानतेला मी नमस्कार करतो.  त्यांच्या आदर्शांपुढे मी नतमस्तक होतो.  याला “प्रतिमा उपासना” म्हणतात.  

आपण आस्तिक असो व नास्तिक असो, तुम्ही मान्य करा अगर करू नका, आपण सर्वच जण प्रतिमा उपासना करतो, हे मान्य केलेच पाहिजे.  - "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ


Tuesday, May 12, 2020

ईश्वरोपासनेचे फलित | Result of Worshipping

सर्व जीवांची धाव पूर्णतेकडेच आहे.  पूर्णता, कृतकृत्यता निरतिशय आनंद आणि शांति प्राप्त करणे हेच सर्व जीवांचे अंतिम साध्य आहे.  आम्ही सर्वजण पूर्णतेचे उपासक आहोत.  मी जर पूर्णस्वरूप असणाऱ्या परमेश्वराची उपासना केली तर त्यामुळे मी स्वतःच परमेश्वरस्वरूप होईल.  याउलट विषयांची उपासना केली तर दुःखी होईल.  म्हणून अत्यंत शुद्ध, आनंदस्वरूप, शांतस्वरूप परमेश्वराचीच उपासना करावी.  

ईश्वराच्या उपासनेमुळे माझे मन शुद्ध, रागद्वेषरहित होऊन अंतर्मुख, ईश्वराभिमुख व्हायला लागते.  ईश्वराव्यतिरिक्त अन्य विषयांच्या वृत्ति संपतात.  कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी कमी होऊन मन विषयासक्तीपासून काही प्रमाणात निवृत्त होते.  विषयांचे आकर्षण कमी कमी होते.  विषयांची व्यर्थता, फोलपणा कळायला लागतो.  विषयांचे महत्व (value) कमी होऊन विषय मनाला विचलित करू शकत नाहीत आणि मनावर संयमन प्राप्त होते.  तेच मन ईश्वरचिंतनामध्ये तल्लीन, तन्मय, तद्रूप होते.  मन परमेश्वराच्या जवळ जायला लागते.  

ईश्वरोपसनेमुळे रजोगुण व तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन मन सत्वगुणप्रधान होते.  अंतःकरणामध्ये दैवीगुणसंपत्तीचा उत्कर्ष होतो.  मनामध्ये विवेकजन्य तीव्र वैराग्य निर्माण होते.  जितके वैराग्य अधिक, तितका आनंद अधिक.  थोडे वैराग्य थोडा आनंद, जास्त वैराग्य जास्त आनंद, पूर्ण वैराग्य पूर्ण आनंद !  याप्रमाणे साधकाला पूर्ण वैराग्य प्राप्त होते.  शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान ही षट्गुणसंपत्ति प्राप्त होते.  हीच खरी अंतरंग साधना आहे.  म्हणून आध्यात्मिक साधना ही बहिरंगाची नसून पूर्णतः मनावर केंद्रीभूत असणारी अंतरिक साधना आहे.  यासाठीच ईश्वरोपासना अत्यंत आवश्यक आहे.- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ

Tuesday, May 5, 2020

उपासनेचा विषय कसा असावा ? | How should be the object of Worship?
येथे प्रश्न निर्माण होईल की, उपासना कोणाची करावी ?  विश्वामध्ये दोनच पदार्थ आहेत – १) विषय आणि २) परमेश्वर.  विषय विश्वामध्ये अनंत, अगणित आहेत.  आपले मन सतत कोणत्या ना कोणत्यातरी विषयाचे चिंतन करीत असते.  विषयचिंतनाने मन कधीही शांत होऊ शकत नाही.  विषयकामना केल्यानंतर विषयप्राप्तीपर्यंत चिंता, व्यग्रता आहे आणि विषय मिळाल्यावर एक क्षणमात्र आनंद मिळतो.  मात्र लगेचच तो विषय कोणीतरी पळवून नेईल, हरवेल, नष्ट होईल याची भीति निर्माण होते.  वस्तु जितकी प्रिय तितकी भीति अधिक !  

जीवनभर कितीही विषयांचा संग्रह केला, विषयांचे उपभोग घेतले, तरीही त्यामधून कोणताही मनुष्य सुखी, आनंदी आणि यशस्वी झालेला नाही.  वस्तुतः हा दोष विषयांचा, व्यक्तींचा अथवा प्रसंगांचाही नाही.  जन्मतिथीचा, पत्रिकेचा, शनि-मंगल युतीचा, ईश्वराचाही नाही तर दोष आपल्याच अंतःकरणामध्ये आहे.  विश्वामध्ये कोणत्याही विषयामध्ये आनंद नाही.  किंवा आनंद हा विश्वामधील घट, पटादि विषयांप्रमाणे एखादा विषयही नाही.  

विषयांच्या चिंतनाने आजपर्यंत कोणीही सुखी, आनंदी झालेला नाही.  तर उलट विषयचिंतनाने मन अधिक बहिर्मुख, स्वैर, उच्छृंखल अशांत आणि अस्वस्थ होते.  जसा चिंतनाचा विषय असेल त्याप्रमाणेच ते मन होते.  म्हणूनच साधकाला कधीही असत्, अनित्य विषयांची उपासना सांगितली जात नाही.  तर साधकाने अशा एका शुद्ध, नित्य, शाश्वत, पूर्ण विषयाची उपासना करावी की, ज्यामुळे त्याचे मनही अत्यंत शुद्ध होऊन तो स्वतःच कृतकृत्य, परिपूर्ण होऊ शकेल.  मग उपासना कोणाची करावी ?  साधकासाठी ईश्वर हा एकच उपास्य होऊ शकतो.  साधकाने ईश्वराची उपासना करावी.  

सर्व जीवांची धाव पूर्णतेकडेच आहे.  पूर्णता, कृतकृत्यता निरतिशय आनंद आणि शांति प्राप्त करणे हेच सर्व जीवांचे अंतिम साध्य आहे.  मी जर पूर्णस्वरूप असणाऱ्या परमेश्वराची उपासना केली तर त्यामुळे मी स्वतःच परमेश्वरस्वरूप होईन.  याउलट विषयांची उपासना केली तर दुःखी होईन.  म्हणून अत्यंत शुद्ध, आनंदस्वरूप, शांतस्वरूप परमेश्वराचीच उपासना करावी.  - "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ