Sunday, March 30, 2014

गुढीपाडवा जय संवत्सर (Gudhipadwa - Shree Shalivahan New Year 1936)गुडीपाडव्याच्या शुभेच्छा !!!


गुडीपाडव्याची पारंपारिक  माहिती  व महत्व जाणून घेण्यासाठी  आमचा मागील वर्षीचा ब्लॉग पाहा.

Tuesday, March 25, 2014

मी प्राण नाही | Prana and ‘Me’

 
सर्व इंद्रियांना शक्ति देणारा प्राण आहे.  प्राणामुळे सर्व इंद्रिये कार्य करतात.  तसेच प्राण जोपर्यंत शरीरात आहे, तोपर्यंत शरीर जिवंत असते.  शरीरातून प्राण गेला की, शरीर मृतवत होते.  या संदर्भात छांदोग्योपनिषदामध्ये प्राण – इंद्रियांचा संवाद आहे.
 
एकदा प्रत्येक इंद्रिय इतर इंद्रियांवर आपापले वर्चस्व सिद्ध करीत होते.  एक इंद्रिय काही काळ रजेवर गेले.  त्याच्या गैरहजेरीत इतर सर्व व्यापार व्यवस्थित चालू होते.  याप्रमाणे कोणालाही आपले वर्चस्व सिद्ध करता आले नाही.  त्यांना वाटले की, सर्व इंद्रिये मिळून शरीराचे व्यापार चालवितात.
 
त्यावेळी प्राण सांगतो, ‘बाबांनो, तुम्ही कोणीही श्रेष्ठ नाहीत.  तुमच्यामागे मी आहे म्हणून तुम्हा सर्वांना कार्य करण्याची शक्ति, सामर्थ्य मिळते.  यावर इंद्रियांनी प्राणाचे वर्चस्व आणि सर्वोत्तमत्व मान्य केले नाही.  म्हणून आपले सामर्थ्य दाखविण्यासाठी प्राण शरीरातून बाहेर जाण्यास निघाला. त्याक्षणी सर्व इंद्रिये आणि शरीर गलितगात्र झाले.  सर्व मृतवत् झाले.  यावेळी सर्व इंद्रियांनी प्राणाचे श्रेष्ठत्व कबूल केले.
 
म्हणून कोणी म्हणेल की ‘प्राण’ म्हणजे ‘मी’ आहे.  परंतु प्राण ‘मी’ नाही, कारण प्राण शरीराबरोबर निर्माण झालेला असल्यामुळे तो अनुभवायला येतो.  तसेच प्राणाला स्वतःची चेतना किंवा जाणीव नाही. तर ‘मी’ ला प्राणाची जाणीव आहे.  त्याप्रमाणे प्राणामध्ये भूक आणि तहान यासारखे विकार होत असतात.  म्हणून या सर्वांची जाणीव असणारा ‘मी’ प्राणांपासून भिन्न असला पाहिजे.  म्हणजेच ‘मी’ प्राण नाही.
 
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 - हरी ॐ
 

Monday, March 17, 2014

इंद्रिये म्हणजे ‘मी’ नव्हे | Senses and ‘Me’

 
आपल्याला पाच इंद्रिये आहेत.  कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा, आणि घ्राणेन्द्रिय.  बाह्य विषयांचा अनुभव आणि ज्ञान घेण्यासाठी या इंद्रियांची आवश्यकता आहे.  मी बघतो, मी ऐकतो वगैरे अनुभवांमध्ये बघणे, ऐकणे या क्रिया चक्षु किंवा कर्णामुळे आहेत.  त्याशिवाय कोणताच अनुभव घेता येत नाही. इंद्रिये आहेत तर अनुभव आहेत आणि इंद्रिये नाहीत तर अनुभव नाहीत.  इंद्रियांचे अतिशय महत्व असल्यामुळे, जणू काही इंद्रिये म्हणजेच ‘मी’ असे समजून कोणी म्हणेल ‘इंद्रियेच मी आहे’.
 
परंतु इंद्रिये ‘मी’ होऊ शकत नाही.  इंद्रिये बाह्य विषयांचा अनुभव घेण्यासाठी साधने (Instrument) आहेत.  उदा.  चक्षु हे इंद्रिय बाह्य विषयांचे रूप आणि रंग पाहाण्याचे साधन आहे.  साधन किंवा करण (Instrument) हे स्वतः अचेतन असल्यामुळे, कार्यान्वित होण्यासाठी त्यामागे चेतनशक्तीची आवश्यकता आहे, जिच्या अस्तित्वामुळे चेतना मिळून इंद्रिय कार्यान्वित होते, ती चेतनशक्ति इंद्रियांपासून भिन्न असली पाहिजे.
 
तसेच चक्षु हे इंद्रिय शरीराप्रमाणे दृश्य विषय आहे.  त्यामध्ये आंध्यत्व, मांद्यत्व व पटुत्व हे विकार आहेत ते सर्व विकार ‘मी’ पाहातो आणि जाणतो.  म्हणजेच या सर्व विकारांचा द्रष्टा ‘मी’ डोळ्यापासून भिन्न आहे.  तसेच काही व्याधींमुळे दोन्ही डोळे काढले तरी ‘मी’ चे अस्तित्व नाहीसे होत नाही.  डोळे ‘मी’ वर अवलंबून आहेत.  परंतु ‘मी’ डोळ्यांवर अवलंबून नाही.  हाच नियम इतर सर्व इंद्रियांना लागू आहे.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


 
 
- हरी ॐ
 

Tuesday, March 11, 2014

भिन्न शरीरावस्था | Stages of the Body

 
बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था या शरीराच्या तीन अवस्था आहेत.  या तीन्हीही अवस्था एकमेकापासून भिन्न असून एक अवस्था संपल्यानंतर दुसरी सुरु होते.  या तीन्हीही अवस्थांना पाहाणारा आणि अनुभवणारा ‘मी’ तीन नसून एकच आहे.  म्हणजेच अवस्था येते आणि जाते, दुसरी सुरु होते.  परंतु ‘मी’ न बदलता एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो.  त्यामुळे आपल्याला बाल्यावस्थेचे किंवा तारूण्यावस्थेचे संस्काररूपाने असलेले अनुभव स्मृतिरुपाने वृद्धावस्थेत सांगता येतात.
 
जर बाल्यावस्थेमधील ‘मी’, तारूण्यावस्थेमधील ‘मी’ आणि सध्याच्या वृद्धावस्थेमधील ‘मी’, तीन भिन्न असतील तर, वृद्धावस्थेमध्ये मागील अवस्थांचे अनुभव सांगता येणार नाहीत.  परंतु असे होत नाही.  याचाच अर्थ तीन्हीही अवस्थांच्यामध्ये ‘मी’ हा एकच आहे व तो न बदलता एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो.  तो ‘मी’ दृश्य शरीराच्या अवस्थेपासून भिन्न आहे.
 
ज्याप्रमाणे मिस्टर रावांनी नाटकामध्ये तीन वेष घेतले  -  एक राजाचा, एक मंत्र्याचा आणि एक भिकाऱ्याचा.  हे तीन्हीही वेष एकमेकांपासून अतिशय भिन्न आहेत.  तसेच त्यांचे अनुभव सुद्धा भिन्न आहेत.  ते वेष धारण करणारे ‘राव’ प्रत्येक वेषामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न होता प्रवेश करतात.  म्हणजे तीन्हीही वेषांमधील मिस्टर ‘राव’ तीन भिन्न व्यक्ति नसून एकच राव आहेत, कारण ते वेषधारी असल्यामुळे वेषांपासून अत्यंत भिन्न आहेत.
थोडक्यात शरीर हे दृश्य, विकारयुक्त आहे आणि ते पाहाणारा ‘मी’ द्रष्टा शरीरापासून भिन्न आहे.  म्हणून शरीर ‘मी’ नाही.
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 
 
- हरी ॐ

Wednesday, March 5, 2014

विकारयुक्त शरीर | Changing Body

 
शीर्यमाणस्वभावत्वात् इति शरीरम् |
 जे सतत विकारयुक्त आहे त्याला शरीर असे म्हणतात.  म्हणजे विकार पावणे हा शरीराचा धर्म आहे.  शरीराला सहा प्रकारचे विकार आहेत –
 
१) अस्ति - ‘अस्ति’ म्हणजे अस्तित्व. शरीराचा जन्म होण्यापूर्वी शरीर गर्भाशयात अस्तित्वात असते.  ही पहिली अवस्था.
२) जायते - ‘जायते’ जन्माला येणे.  गर्भावस्थेमधून बाह्य विश्वात जन्माला येते.
३) वर्धते - ‘वर्धते’ जन्म झाल्यानंतर अन्नाने शरीराची वाढ होणे.
४) विपरिणमते - ‘विपरिणमते’ शरीराची वाढ होत ते पूर्णावस्थेला पोहोचते.  त्यानंतर वाढ संपते.
५) अपक्षीयते - ‘अपक्षीयते’ शरीराचा स्वभावतः हळूहळू क्षय होण्यास सुरुवात होते.
६) विनश्यति - ‘विनश्यति’ आणि एक दिवस शरीराचा नाश होतो.
 
म्हणजेच जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत शरीर सतत बदलत असते.  हे सर्व बदल किंवा विकार कोण पाहातो ?
 
 अविकारी द्रष्टा: |
 
शरीर शरीराचे विकार पाहू शकत नाही.  पाहाणारा द्रष्टा शरीराच्या विकारापासून भिन्न असला पाहिजे. तो द्रष्टा ‘मी’ आहे.  सर्व विकार ‘मी’ पाहात असून त्याचे सर्व अनुभव आणि ज्ञान ‘मी’ ला होते.  शरीर बदलत असले तरी द्रष्टा ‘मी’ मात्र बदलत नाही.  म्हणून ‘मी’ नित्य, अविकारी शरीरापासून भिन्न आहे.
 
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002
 


- हरी ॐ