Tuesday, June 9, 2026

अज्ञानाच्या सात भूमिका | Seven States Of Ignorance

 



येथे श्रीवसिष्ठ मुनींनी अज्ञानाच्या सात भूमिका म्हणजे अज्ञानाच्या सात अवस्था सांगितल्या आहेत.  यामध्ये सर्व जीवांच्या बीजावस्थेला - अव्यक्तावस्थेला 'बीजजाग्रत्' असे म्हटले आहे.  यानंतर जन्माला आल्याबरोबर पूर्वजन्मातील अज्ञानाच्या संस्कारांच्यामुळे जीव देहाशी तादात्म्य पावतो व "मी देह आहे" अशी कल्पना करतो.  यालाच येथे 'जाग्रत्' असे म्हटले आहे.  "मी जन्माला आलो व मी देह आहे" अशी कल्पना दृढ झाली की, स्वतःभोवती तो जीव अनेक कल्पना करतो.  मागील जन्मामधील जो मी होतो, तोच मी आता आहे, तसेच "हा माझा पुत्र, हे माझे घर" याप्रमाणे जड व चेतन विषयांच्यामध्ये तो जीव ममत्व निर्माण करतो.  मागील जन्मामधील अशी स्मृति म्हणजे 'महाजाग्रत्' अवस्था आहे.

 

हा अज्ञानी जीव जागृत असताना मनोराज्ये रंगवितो.  ही अज्ञानाची 'जाग्रत् स्वप्न' भूमिका आहे.  काही वेळेस जागृतावस्थेमध्येच जीवाला भ्रांतीमुळे अनेक भास होतात.  शिंपल्यावर चांदीचा, वाळूवर मृगजळाचा, दोरीवर सापाचा, हे भास पुन्हा पुन्हा होत राहिले की, जीवाच्या चित्ताला भास होण्याची सवय लागते आणि या सवयीमुळे जेव्हा जीवाला झोपेत काही क्षण असे भास होऊन कसलातरी अनुभव येतो, ही अज्ञानाची 'स्वप्न' भूमिका आहे.  एखादी स्वप्नस्थिति दीर्घकाळ टिकली तर ते स्वप्नही जागृतावस्थेप्रमाणे वाटू लागते.  यालाच अज्ञानाची महाजाग्रत् किंवा 'स्वप्नजाग्रत्' भूमिका सुद्धा म्हटले जाते.

 

यानंतर सर्वात शेवटची भूमिका म्हणजे सुषुप्ति आहे.  जेथे चित्त जागृतही नसते. कोणते स्वप्नही अनुभवत नसते.  कोणती मनोराज्येही नसतात. दीर्घस्वप्नही नसते.  अहंकार, ममकारही नसतात. म्हणजेच जेथे अज्ञानाच्या पूर्वीच्या सहाही अवस्था लय पावतात, ती अज्ञानाची सर्वात शेवटची 'सुषुप्ति' नावाची भूमिका आहे.  या अवस्थेत बीजरूपाने सर्व सुखदुःखात्मक अनुभव तसेच, सर्व पदार्थ स्थित असतात.  हीच करणावस्था आहे.

 

अशा या अज्ञानाच्या सात विशेष अवस्था आहेत.  येथे केवळ आणि केवळ दृश्य पदार्थांचा आणि अज्ञानाचा अनुभव येतो.  या अज्ञानाच्या भूमिका असून या केवळ चित्ताच्या अवस्था आहेत.  या सात अवस्थांच्या एकमेकांच्या परस्परसंयोगामधून अजूनही अज्ञानाच्या असंख्य अवस्था उत्पन्न होतात.  एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, याप्रकारे जीव या अज्ञानाच्या अवस्थांच्यामध्ये गटांगळ्या खात असतो.  या सर्व अज्ञानभूमिका जीवाला भयंकर दुःखे देऊन संसारबद्ध करीत असल्यामुळे या अतिशय निकृष्ट व त्याज्य आहेत.  विवेकाच्या व ज्ञानाच्या साहायाने या अज्ञानभूमिकांच्यामधून बाहेर पडता येते.  या अवस्थांच्यामधून बाहेर काढणारे आत्मज्ञान हेच अत्यंत श्रेष्ठ, पवित्र व परमकल्याणकारक साधन आहे.

 


- "योगवासिष्ठ" (तृतीय उत्पत्ति प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, आदि शंकराचार्य जयंती २०२२   
- Reference: "Yogavashishtha
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, Adi Shankaracharya Jayanti 2022



- हरी ॐ