Tuesday, August 27, 2019

अतींद्रिय आत्मसुखाचे बुद्धिग्रहण | Grasping Extra-Sensory Bliss




आत्मसुख हे अतींद्रिय आहे.  ते विषयांच्यावर अवलंबून नसल्यामुळे इंद्रिय व विषयांच्या सन्निकर्षामधून निर्माण झालेले नाही.  म्हणून ते निर्विषयक सुख आहे.  यासाठी इंद्रियांची किंवा विषयांची जरुरी नाही.  विषय नसले तरी आत्मसुखाचा अनुभव येऊ शकतो.  मग ते अतींद्रिय, निर्विषयक सुख कसे अनुभवाला येते ?  त्यासाठी साधन कोणते ?  यावर भगवान स्वतःच सांगतात की, आत्मसुख अतींद्रिय असले तरी ते बुद्धिग्राह्य आहे.  बुद्धीनेच ग्रहण करता येते.

परंतु श्रुति म्हणते –
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् |            (केन. उप. १-५)
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह |         (तैत्ति. उप. २-४-९)

जे स्वरूप मनाने चिंतन करता येत नाही, परंतु ज्याच्यामुळे मनाला चिंतन करण्याची शक्ति मिळते, ते स्वरूप मनाला आकलन होत नाही.  तसेच सर्व वाचा ही मनासहित त्याचे स्वरूप प्रकट न करता परत फिरते.  ते अवर्णनीय, अनाकलनीय, मनाच्या अतीत असणारे तत्त्व आहे.  तो निरतिशय आत्मसुखाचा अनुभव मनाने घेता येत नाही.  याचे कारण आपली बुद्धि विषयासक्त असल्यामुळे रागद्वेषांनी मलीन झालेली आहे.  अशा बहिर्मुख, अशुद्ध बुद्धीने आत्मस्वरूपाचे दर्शन घेता येत नाही.  यामुळे निरतिशय आत्मसुखाचा अनुभव येऊ शकत नाही.  त्यासाठी सूक्ष्म, शुद्ध आणि अंतर्मुख मनाची आवश्यकता आहे.  

श्रुति म्हणते –
एष सर्वेषु भूतेषु गूढोSत्मा न प्रकाशते |
दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः |           (कठ. उप. १-३-१)

अत्यंत सूक्ष्म आणि गूढ असलेला आत्मा सर्व भूतमात्रांच्या अंतःकरणामध्ये असूनही तो प्रकट होत नाही.  परंतु तत्त्वदर्शी मात्र अत्यंत शुद्ध आणि एकाग्र बुद्धीने आत्मस्वरूप पाहातात.  आत्मानुभूति घेतात.  याचा अर्थ अत्यंत शुद्ध, सूक्ष्म आणि अंतर्मुख बुद्धीने म्हणजे वृत्तीने आत्मसंतुष्टरूपी निरतिशय सुखाची अनुभूति येते.  त्यासाठीच साधकांनी प्रयत्न करावा.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ


Tuesday, August 20, 2019

नियमित आणि संयमित जीवन | Regular and Disciplined Life




साधकाने निश्चित जाणून घ्यावे की, व्यावहारिक कर्तव्य हेच जीवनाचे अंतिम साध्य नाही.  तर ते प्रसंगानुरूप व अवस्थेनुरूप साधन आहे.  जीवनाचे साध्य आत्मशांति प्राप्त करणे हेच आहे.  आत्मकल्याणं एव कर्तव्यम् |  आत्मकल्याण हेच खरे कर्तव्य आहे. तोच जीवनाचा परमपुरुषार्थ आहे.  म्हणून शास्त्राचे श्रवण-मनन करून जीवनाचा उद्धार करून घ्यावा, कारण भगवान म्हणतात स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे.  स्वतःला कधीही कमी लेखू नये.  आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रु आहोत.  म्हणून – वाळूचे कण रगडीता तेलही गळे |  या न्यायाप्रमाणे स्वतःचा पुरुषार्थ कधीही टाकू नये.  त्यामध्ये चालढकल, टाळाटाळ करू नये.  व्यवहाराला फाजील महत्व देऊ नये.  

यासाठी व्यवहारामध्ये वाहत न जाता त्यावर संयम ठेवावा आणि आयुष्याचा उपयोग श्रवणमननादि साधना करण्यामध्ये घालवावा.  बाकी सर्व व्यवहार त्याला अनुरूप करावा.  हेच योग्य आहे.  आहारविहार, व्यावहारिक कर्म यावर संयमन आवश्यक आहे.  त्याचप्रमाणे झोप आणि जागण्यावर सुद्धा साधकाचा संयम पाहिजे.  म्हणजेच आवश्यक तेवढी झोप घ्यावी व आवश्यक तेवढे जागावे.  योग्य आणि आवश्यक तितक्या निद्रेने शरीर व मन अत्यंत उत्साही, प्रसन्न होते.  आळस वगैरे कमी होऊन मनाची व बुद्धीची अंतरिक सावधानता आणि एकाग्रता वाढते.  सूक्ष्म विचार करण्याची शक्ति वाढते.  त्यामुळे इंद्रियांचा सर्व व्यापार सुद्धा संयमित होतो.  गुणांचा उत्कर्ष होतो.  असे मन श्रवणमननादि साधनेला अनुकूल होते.  

अशा प्रकारे ज्या साधकाचे जीवन नियमित आणि संयमित आहे, आचार-विचार शुद्ध आहेत, त्याला योगाभ्यास करताना अडथळे येत नाहीत.  जरी आले तरी निराश न होता तो आत्मविश्वासाने आणि जिद्दीने प्रयत्न करून सहजपणे पार करतो.  हळूहळू मनाचे विक्षेप, व रागद्वेषांचा होणारा परिणाम कमी होतो आणि अभ्यासाने अप्रतिबद्ध स्वरूपाची सुस्थिति प्राप्त होते.  ज्ञाननिष्ठा प्राप्त होते.  सर्व मानसिक दुःखांचा निरास होऊन सहजस्वाभाविक असलेली आत्मशांति प्राप्त करतो.  थोडक्यात त्या साधकाला योगसिद्धि प्राप्त होते.  

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ



Tuesday, August 13, 2019

“ॐ नमः शिवाय” – ४ | Meaning of “Om Namah Shivay” – 4




आचार्य ‘अथवा’ या पदाने पक्षांतर करून पुन्हा एकदा सर्वसामान्य साधकांच्यासाठी ‘नमः’चा अर्थ सांगतात.  मागील श्लोकामध्ये नमः म्हणजेच ‘ध्यानम्असा अर्थ सांगितला.  ध्यानसाधना किंवा निदिध्यासना करणे सर्वच साधकांना शक्य नाही.  अधिकारिभेदात् |  साधकांच्यामध्ये मंद, मध्यम, अधम असे अनेक प्रकार असल्यामुळे जोपर्यंत अंतःकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव आहे, तोपर्यंत ध्यानसाधनेमध्ये मन कधीही एकाग्र होऊ शकत नाही.  इतकेच नव्हे, तर रागद्वेषादि दोषांच्यामुळे शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति किंवा आत्मप्रचीतीही शक्य नाही.  म्हणून निदिध्यासना ही फक्त उत्तम, सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख, विषयासक्तिरहित, वैराग्यशील असणाऱ्या साधकांच्यासाठीच सांगितलेली आहे.  यासाठीच आचार्य येथे मंद, मध्यम अधिकाऱ्यांच्यासाठी सूचित करतात – अथवा दास एवाहं अहं दास इतीरणम् |  

साधक प्रार्थना करतो की, “हे भगवंता !  मी तुझा दास आहे.  मी निश्चितपणे तुझा दासच आहे.  कारण मी अद्वैत ज्ञान जाणू शकत नाही.  तू आणि मी दोघेही एकरूप झालो तर मी सेवा कोणाची करावी ?  हा मला प्रश्न आहे.  सेवेशिवाय मी जीवन जगूच शकत नाही.  म्हणून तू माझा स्वामी आणि मी सेवक आहे.”  येथे ‘दासः’ या शब्दाची आचार्य मुद्दाम द्विरुक्ति करून साधकांच्या मनामध्ये दास्यत्वाचा भाव ठसवितात.  हाच ‘नमः’ या शब्दाचा अर्थ आहे.  हाच अर्थ वेदांच्यामधून, शास्त्रामधून, श्रीमद्भगवद्गीतेमधून सांगितलेला आहे.  

“भगवंता !  मी अत्यंत अज्ञानी, मर्यादित आहे.  माझ्या अंतःकरणामध्ये अनंत वासना थैमान घालीत आहेत.  मी भवसागरामध्ये पूर्ण बुडालो आहे.  त्यामधून पार जाण्यासाठीच मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे.  माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची साधना, उपासना, निदिध्यासना करण्याची शक्ति नाही.  अद्वैत ज्ञान तर माझ्यापासून फारच दूर आहे.  जपामध्ये माझे मन एकाग्र होत नाही.  भजन करावे तर ताल, सूर याचे ज्ञान नाही. भजनामध्ये, कीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तमोगुणाचे आवरण येऊन मी निद्राधीन होतो.  कोणतीच साधना जमत नसल्यामुळे मी निराश होतो.  म्हणूनच भगवंता !  मी तुझी फक्त सेवा करू शकतो.  मी तुझा सेवक आहे.”  



- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015



- हरी ॐ


Tuesday, August 6, 2019

तीन प्रमुख प्रचीति | Three Principal Self-Experiences





शास्त्रकार प्रामुख्याने तीन प्रचीति सांगतात.  त्यामधील पहिली शास्त्रप्रचीति आहे.  शास्त्रप्रचीति याचा अर्थच संपूर्ण शास्त्रअध्ययन करीत असताना शास्त्राचे नेमके सार काय आहे ?  नेमके शास्त्राला काय सांगावयाचे आहे ?  ही शास्त्राची, श्रुतींची, वेदांची दृष्टि, तात्पर्यनिर्णय, सार म्हणजे तत्त्वस्वरूप समजणे यालाच ‘शास्त्रप्रचीति’ म्हणतात.  

त्यानंतर दुसरी प्रचीति म्हणजेच ‘गुरुप्रचीति’.  याचे कारण शास्त्रामध्ये सर्व सांगितलेले आहे.  परंतु शंका येईल की, खरोखरच आजपर्यंत शास्त्रात जसे सांगितलेले आहे, तशी प्रचीति कोणाला आलेली आहे का ?  याला उत्तर एकच – माझे जे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असणारे गुरु आहेत, ते गुरु म्हणजेच मूर्तिमंत शास्त्र आहेत.  कारण स्वतःला अनुभूति आल्याशिवाय गुरु किंवा आचार्य कधीही शिष्याला प्रबोधन करू शकत नाही.  शास्त्रामध्ये सांगितले जाते की, गुरूंच्या आज्ञेनेच दुसऱ्यांना प्रबोधन करण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि जो गुरूंची आज्ञा न घेताच स्वतःच स्वतःची विद्वत्ता समाजाला दाखविण्यासाठी प्रबोधन करण्यास प्रारंभ करतो, कदाचित त्याच्याजवळ विद्वत्ता, वक्तृत्व, प्रसिद्धि असेल, परंतु त्याला स्वतःला मात्र कोणतीही अनुभूति येऊ शकत नाही.  

तिसरी महत्वाची प्रचीति म्हणजेच ‘आत्मप्रचीति’ होय.  सर्वप्रथम शास्त्राचे श्रवण करून शास्त्रावर, गुरुंच्यावर नितांत श्रद्धा ठेऊन, अनन्य भावाने सेवा करून ज्यावेळी गुरुमुखामधून साधक दीर्घकाळ शास्त्राचे श्रवण करतो, साधना, सेवा करतो, यानंतरच क्रमाने त्याच्या अंतःकरणामध्ये अन्य सर्व कलुषितता, मलविक्षेपादि सर्व दोष, रागद्वेषादि अशुद्धता, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव कमी कमी होऊन अंतःकरण शुद्ध, स्थिर, अंतर्मुख आणि एकाग्र होते.  त्यावेळी त्याच अंतःकरणामध्ये आपोआपच शेवटची सर्वात प्रमुख प्रचीति म्हणजेच ‘आत्मप्रचीति’ उदयाला येते.  प्रत्येक साधकाला ही आत्मप्रचीति आलीच पाहिजे, इतकेच नव्हे, तर प्रत्येकाची आत्मप्रचीति ही सारखीच असली पाहिजे – ती म्हणजेच “शिवोऽहं च |”  मी स्वतःच सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म आहे.  


- "ॐ नमः शिवाय" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, मार्च २०१  
- Reference: "
Om Namah Shivay" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 3rd Edition, March 2015




- हरी ॐ