Saturday, February 25, 2017

श्रीराम म्हणजे कोण ? | Who is Shree Rama ?


रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे.  प्रभु श्रीरामाला राज्याभिषेक झाल्यानंतर हनुमान प्रभु रामचंद्र व सीतामातेला नतमस्तक होतो.  त्यावेळी सीता हनुमंताला उपदेश देते –
रामं विद्धि परं ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम् |  सर्वोपाधिविनिर्मुक्तं सत्तामात्रमगोचरम् ||
हे हनुमंता !  ‘श्रीराम’ म्हणजे एखादी मर्त्य व्यक्ति नाही, एक शरीरही नाही, किंबहुना ‘श्रीराम’ हा माझा केवळ पति नाही.  तर ‘श्रीराम’ हा स्वतःच सच्चिदानंदस्वरूप असणारा, सर्व शरीरांच्याही अतीत आहे.  श्रीराम म्हणजे सर्वांच्यामध्ये सत्तास्वरूपाने अंतर्बाह्य अनुस्यूत असणारे तत्त्व आहे.  श्रीराम हा स्वतःच अंतर्यामी स्वरूप आत्माराम आहे.

श्री समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात –
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा |  नभाचे परी व्यापकू जाण तैसा ||
सदा संचला येत ना जात कांहीं |  तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ||
प्रभु श्रीराम हा सर्वव्यापी, सर्वांतर्यामी आहे.  परंतु राम सर्वांच्या आत असूनही दुर्दैवाने आपल्याला ‘तो’ अनुभवायला येत नाही.  म्हणू तरी आपण एकमेकांना आपल्या जीवनाचा अनुभव सांगत असतो – ‘सगळं काही आहे हो !  जीवनामध्ये मी सर्व काही प्राप्त केलेले आहे.  पण सगळं असूनही जीवनात काही राम नाही.’  आपल्या जीवनातून राम निघून गेलेला आहे.

राम म्हणजेच आनंद !  राम म्हणजेच जीवनामध्ये असणारा अर्थ, जीवनामध्ये असणारे सार किंवा रहस्य होय. आपल्या जीवनामध्ये बहिरंगाने अनेक विषय, उपभोग आहेत. आपण स्वकर्तृत्व आणि प्रयत्नाने सर्व काही प्राप्त करतो.  पैसा, संपत्ति, मान-सन्मान, प्रतिष्ठा, विषय, उपभोग आहेत, सभोवती पती, पत्नी, मुले, नातू, आप्तस्वकीय, बांधव, मित्रपरिवार सर्व काही आहे.  परंतु दुर्दैवाने जीवनामधील आनंद हरविल्यासारखा वाटतो.  म्हणजेच जीवनामधील ‘राम’ निघून गेल्यासारखा वाटतो.  वास्तविक ‘राम’ हा बाहेर नाही, तर आपल्याच आत, अंतरंगामध्ये आहे.

संत ज्ञानदेव सुद्धा म्हणतात – तैसा हृदयामध्ये मी रामु |  सर्व सुखाचा आरामु ||
सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये मी, हा ‘राम’ आनंदस्वरूपाने, चैतन्यस्वरूपाने सन्निविष्ट आहे.”  म्हणून राम हा स्वतःच आनंदस्वरूप आहे.


- "दाशरथी राम" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २००७   
- Reference: "Dasharathi Ram
" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2007



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, February 21, 2017

आहार नियमन आणि यज्ञ | Nutrition Best Practices and Yajna



काही साधक आहारावर नियमन करतात.  यामध्ये अनेक नियम आहेत.

१). आहार जिभेच्या सुखासाठी नसून शरीररक्षणासाठी व पोषणासाठी आहे हे लक्षात ठेवावे, ज्यामुळे साधना करता येईल.
२). मनामध्ये रजोगुण व तमोगुण उत्तेजित न होणारा, विकार निर्माण न होणारा आहार शुद्ध व सात्त्विक असावा.  असा आहार अधिकाधिक सात्त्विक वृत्ति होण्यास साहाय्यकारी होईल.
३). आहार योग्य प्रमाणात घ्यावा.  शास्त्रकार म्हणतात: पूरयेदशनेनार्धं तृतीयमुदकेन तु |  वायोः संचरणार्थाय चतुर्थमवशेषयेत्  ||  जठराचा १/२ भाग अन्नाने भरावा, १/४ पाण्याने भरावा आणि १/४ भाग वायूच्या संचरणासाठी मोकळा सोडावा.  अजिबात न खाणे किंवा अति खाणे योग्य नाही.  योग्य प्रमाणामध्ये आवश्यक तेवढाच आहार घ्यावा.  हे अत्यंत कठीण आहे.  यासाठी मनावर आणि इंद्रियांवर संयमाची जरुरी आहे.  तसेच सत्कर्माने मिळालेले अन्न खाणे. दुष्टाचाराने, अनीतीने मिळालेले अन्न खाऊ नये. सदाचाराने मिळवलेले अन्न संस्कारयुक्त असते.
४.) अन्न खाताना वेळेची बंधने पाळावीत.  अवेळी न खाता योग्य वेळीच खावे.
५). अन्न खाण्यापूर्वी भूतयज्ञ, अतिथियज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ असे पाच यज्ञ करावेत.  
याचे कारण आपल्याला जे अन्न मिळते त्यामध्ये अनेक दृष्ट आणि अदृष्ट घटक आहेत.  त्यांची कृतज्ञता म्हणून त्यांना त्यांचा भाग प्रेमाने अर्पण करणे आवश्यक आहे.  आपल्या अन्नातील एक भाग प्राणीमात्रांना, पशूपक्षांना द्यावा.  हा भूतयज्ञ आहे.  दुसरा भाग अतिथीला अर्पण करावा.  हा अतिथि यज्ञ होय.  तिसरा भाग देव देवतांना अर्पण करावा.  चौथा भाग पितरांना द्यावा.  हे देवयज्ञ आणि पितृयज्ञ आहेत आणि पाचवा भाग वैश्वदेव यज्ञामध्ये परमेश्वराला अर्पण करावा.  त्यानंतर राहिलेला भाग प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

अशा प्रकारे काही लोक आहारावर नियमन करून इंद्रियांच्यावर दमन करतात आणि शरीरशुद्धि, इंद्रियशुद्धि व चित्तशुद्धि करून घेतात.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



                                                                      - हरी ॐ –                  

Tuesday, February 14, 2017

स्वातंत्र्य आणि प्रकृतीचा स्वभाव | Freedom and Force of Own Nature


प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मानुरूप त्या त्या कर्माचे फळ – सुखदुःख अनुभवण्यासाठी जन्माला येतो.  यामुळे जीवन जगत असताना त्याला स्वातंत्र्य असेल तरी सर्व व्यवहार त्याच्या वासना नियमित करतात.  उदा.  एखादी गाय खुंटीला बांधली असेल तरी दोर जितका लांब आहे तितक्याच अंतरापर्यंत ती भ्रमण करू शकेल.  तितकेच तिला स्वातंत्र्य आहे.  परंतु नकळत तो दोर गायीच्या स्वातंत्र्यावर नियमन करीत असतो.  ती गाय एका ठराविक सीमेच्या पलीकडे जाऊ शकत नाही.

त्याचप्रमाणे प्रत्येक जीव आपापले संस्कार घेऊन जन्माला येतो आणि त्याप्रमाणे जीवन जगत असतो.  सर्व विश्व त्याचे परिभ्रमणाचे क्षेत्र आहे.  कोठे जावे आणि काय करावे याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.  परंतु नकळत त्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या स्वातंत्र्यावर नियमन करतो.  कोठे जावे किंवा जाऊ नये, काय करावे किंवा करू नये हे प्रत्येक मनुष्य त्याच्या विचाराने ठरवीत असेल तरी सुद्धा त्याचे जसे संस्कार असतील त्याप्रमाणे त्याच्या मनात इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणेच तो कर्म करतो.

म्हणून भगवान म्हणतात की, सर्व भूतमात्र अनेक प्रकारच्या कर्मांचे कारण असलेल्या रागद्वेषात्मक प्रकृतीला प्राप्त होतात आणि रागद्वेषांच्या संस्कारानुरूप अनेक प्रकारचा व्यापार-चेष्टा व्यवहार करतात.  यामुळे प्रकृतीच्या अधीन असलेले हे सर्व प्राणी एक क्षणभर सुद्धा तूष्णी म्हणजे शांत अवस्थेमध्ये राहू शकत नाहीत.  प्रत्येक जीव त्याच्या स्वभावाप्रमाणे जातो.  कितीही चांगल्या वातावरणामध्ये एखाद्याला ठेवले तरी सुद्धा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो.  कितीही समजावून सांगितले किंवा विनवण्या केल्या तरी त्याला समजत नाही. तो डोळ्याने पाहातो एक आणि समजतो फार वेगळेच !  यात कोणाचा दोष आहे ?  अन्य व्यक्तीला दोष देवून काय उपयोग ?  दोष असेल तर तो त्याच्या स्वतःच्या स्वभावाचा आहे.  त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा आहे.  तो त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागणार !  एकाच प्रसंगामध्ये दोन व्यक्ति असतील तरी दोघांच्या प्रतिक्रिया भिन्नभिन्न असतात, कारण प्रत्येकाची प्रकृति भिन्नभिन्न स्वभावाची आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, February 7, 2017

विद्वान पुरुष आणि लोककल्याण | Wise Man and Social Service


जो स्वतःच संसारी, दुःखी आहे तो दुसऱ्यांना सुखाचा आणि आत्मशांतीचा मार्ग कसा दाखवू शकेल ?  अन्धेन नियमाना यथान्धाः |  या वचनाप्रमाणे एखाद्या अंधाने दुसऱ्या अंधांना मार्ग दाखविल्याप्रमाणे होईल.  तो स्वतः वाट चुकेल आणि अन्य सर्वांनाही संकटामध्ये पाडेल.  म्हणून अविद्वान पुरुषाने कधीही लोककल्याण करू नये.  प्रथम स्वतःची उन्नति करून उद्धार करावा, त्यानंतरच दुसऱ्याचा उद्धार करावा.  लोककल्याण करण्यापूर्वी त्याला नित्य काय व अनित्य काय याची स्पष्ट दृष्टि असणे आवश्यक आहे.

अशा विद्वान पुरुषाने लोककल्याण करताना महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, बहुतांशी लोक अज्ञानी, अविद्वान आहेत.  जे इंद्रियांना दिसते ते सर्व सत्य आहे असे मानणारे आहेत.  त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या कामना असून त्या पूर्ण करण्यासाठी ते कर्मामध्ये रममाण झालेले असतात.  विषयोपभोगामध्ये आसक्त झालेले असतात.  अशा लोकांना जर सांगितले की जे जे दिसते ते असत्य आहे, स्वप्नाप्रमाणे भासात्मक आहे तर त्यांची कर्म आणि कर्मफळामध्ये असलेली श्रद्धा आणि निष्ठा नाहीशी होईल.  तसेच सर्व विषय दुःखवर्धन करणारे असल्यामुळे विषयांच्यामध्ये न रमता आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करावे, कारण आत्मा हाच सत्य असून निरतिशय आनंदस्वरूप आहे आणि अन्य सर्व नाशवान, क्षणभंगुर आहे.  याप्रकारे त्यांना उपदेश दिला तर त्यांची बुद्धि अपरिपक्व असल्यामुळे सत् आणि असत् चा, नित्यानित्याचा सूक्ष्म विवेक करण्यास अधिकारी नसते.  त्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होवून कर्मामधील श्रद्धा डळमळीत झाल्यामुळे उत्कर्षाऐवजी त्यांची अधोगतीच होते.  म्हणून अज्ञानी, स्थूल बुद्धीच्या लोकांना एकदम पारमार्थिक तत्त्वाचा उपदेश देवू नये.

याउलट, सर्व मिथ्या आहे हे माहीत असले तरी ज्ञानी पुरुषाने अज्ञानी लोकांच्यासाठी उत्साहाने कर्म करावे.  उदा. नाटकामध्ये अनेक प्रकारचे वेष घेणारा नट सर्व नाटकच आहे असे समजून सुद्धा आपली भूमिका सर्वस्व पणाला लावून वठवितो.  क्षणात हसतो तर क्षणात रडतो.  तसेच सर्वांनाही हसवितो किंवा रडवितो.  परंतु तो मात्र अंतरंगामधून संपूर्ण अलिप्त असतो.  त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने सुद्धा कर्मासक्त लोकांच्याबरोबर राहाताना तितक्याच उत्साहाने कार्मानुष्ठान करावे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ