Tuesday, June 24, 2014

दोन पक्षी | Two Birds

भगवान म्हणतात -
 उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः | (गीता अ. १३-२२)
तो परमपुरुष सर्वांच्या अंतरंगामध्ये उपद्रष्टा स्वरूपाने राहूनही उपाधीपासून अत्यंत अस्पर्शित, अलिप्त आणि अपरिणामी राहतो.  श्रुति सुंदर दृष्टांत देते –
 
जसे, एकाच झाडावर दोन पक्षी राहतात.  एक पक्षी खालच्या फांदीवर बसतो आणि वरचा पक्षी वरच्या फांदीवर बसतो.  खालचा पक्षी कडू, गोड, तुरट, आंबट फळांचा आस्वाद घेतो, त्यामुळे सुखी-दु:खी होतो आणि वरचा पक्षी मात्र काहीही न करता, न उपभोगता खालच्या पक्षाकडे साक्षीस्वरूपाने पाहतो.  म्हणून खालचा पक्षी बद्ध, संसारी आहे आणि वरचा पक्षी मात्र त्याच झाडावर राहूनही मुक्त आहे.
 
याप्रमाणेच शरीररूपी एकाच झाडामध्ये खालच्या पक्षाप्रमाणे अज्ञानी, स्वतःला कर्ता – भोक्ता म्हणविणारा जीव राहतो, तो या संसाराची सर्व प्रकारची सुख-दु:खात्मक फळे भोगतो आणि त्यामुळे सुखी-दु:खी, उद्विग्न, निराश, द्वंद्वयुक्त, विक्षेपयुक्त, अस्थिर होतो.  त्याला संसाराचे विविध प्रकारचे अनुभव येतात.  त्यामुळे त्याचे मन सतत हेलकावे खाते.  तो शोकमोहयुक्त होतो.
 
याउलट या शरीरामध्ये जीवाबरोबरच आत्मचैतन्यस्वरूप राहते.  मात्र ते वरील पक्षाप्रमाणे साक्षी, कूटस्थस्वरूपाने राहात असल्यामुळे ते खालच्या पक्षाप्रमाणे भोगांच्यामध्ये कधीही आसक्त होत नाही.  अकर्ता, अभोक्ता म्हणजेच काहीही न करता, न खाता, असंग, अलिप्त स्वरूपाने राहते.  खालच्या पक्ष्याच्या सुखदु:खांशी ते तादात्म्य पावत नाही.  तर उलट जीवाच्या सर्व संसाराकडे ते साक्षीभावाने पाहते.  म्हणूनच तर त्या स्वरूपामध्ये सुखदु:खादि, शोकमोहादि संसाराचा अत्यंत अभाव आहे.
 
- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009
 
 
- हरी ॐ
 

Tuesday, June 17, 2014

आत्म्याचा नाश होतो का ? | Can “Soul” be Destroyed ?


विश्व हे ब्रह्माचे कार्य होऊ शकत नाही, कारण निर्गुण, निराकार, निर्विकार ब्रह्म सगुण, साकार, विकारयुक्त विश्वाला कधीही निर्माण करू शकत नाही. विश्व हे ब्रह्मामध्ये अज्ञानाने निर्माण केलेला भास आहे. त्यामुळे ब्रह्म आणि विश्व किंवा शरीर यांच्यामध्ये कार्य-कारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे.

शास्त्रामध्ये रज्जु आणि सर्पाची उपमा प्रचलित आहे. अंधारामुळे रज्जुमध्ये सर्पाचा भास होतो. रज्जु हे सर्पाचे कारण असेल तर सर्पाचा नाश केला की, रज्जुचाही नाश होईल. परंतु वास्तविक स्वरूपाने रज्जूने सर्प कधीच निर्माण केलेला नाही. त्यामुळे रज्जूसर्पामध्ये तंतूपटाप्रमाणे कार्यकारणाचा संबंध कधीच निर्माण होत नाही.

मग रज्जूमधून सर्पाची निर्मिती का झाली ? तर सर्प हा रज्जूच्या अज्ञानामधून निर्माण झालेला असल्यामुळे तो अज्ञानकल्पित आहे. तो रज्जूमध्ये झालेला भास आहे. त्यामुळे रज्जु आणि सर्पामध्ये कार्यकारणाचा संबंध नसून अध्यस्त संबंध आहे. सर्प हा कल्पित असून रज्जु हे अधिष्ठान आहे. कल्पित वस्तूने अधिष्ठान कधीही स्पर्शित होत नाही. त्याच्यात कोणताही परिणाम होत नाही. या न्यायानुसार सर्प निर्माण झाला किंवा नाश झाला तरीही रज्जूमध्ये कोणताही विकार होत नाही.

म्हणून विश्वाचा, शरीराचा नाश केला की, ब्रह्माचा नाश होत नाही. नाश फक्त सावयव वस्तूचा होतो. त्याप्रमाणे विश्वाचा किंवा शरीराचा नाश शक्य आहे. परंतु आत्मा – ब्रह्म निरवयव असल्यामुळे तो हननक्रियेचा विषय होऊ शकत नाही. म्हणून त्याचा नाश शक्य नाही. इतकेच नव्हे तर, परमेश्वर सुद्धा नाश करू शकत नाही.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Wednesday, June 11, 2014

मम धर्मः कः ? | What is my ‘Dharma’ ?महाभारतामध्ये भीष्मपर्वात २५व्या अध्यायात श्रीमद्भगवद्गीता अंतर्भूत आहे.  गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते.  गीतेचे वैशिष्ट्य पाहिले तर आरंभ ‘धर्म’ या शब्दाने होतो आणि शेवट ‘मम’ या शब्दाने होतो.  हे दोन शब्द एकत्र आणले तर ‘ममधर्मः’ हे विधान होते.  हाच अर्जुनाचा प्रश्न असल्यामुळे – मम धर्मः कः ? माझा धर्म कोणता ?  या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच संपूर्ण गीता होय. 

येथे धर्म म्हणजे हिंदु, मुसलमान वगैरे हा प्रचलित अर्थ अभिप्रेत नाही.  तर धर्म म्हणजे कर्तव्य हा एक अर्थ आहे.  हा अर्थ घेतला तर, माझे कर्तव्य कोणते ?  हा सतत प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो.  याचे कारण जीवनामध्ये अनेक प्रसंगांच्यामधून जात असताना प्रत्येक प्रसंगांमध्ये आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचा बुद्धीने कितीही साधकबाधक विचार केला तरी निर्णय होत नाही आणि जो निर्णय घेतला जातो तो रागद्वेषांनी प्रेरित होऊन स्वार्थ आणि लोभाने घेतला जातो.

ज्यामुळे आपला स्वार्थ पूर्ण होत असेल तेच कर्तव्य आहे असा विचार असतो.  परंतु निर्णय घेऊन सुद्धा मानसिक द्वंद्व राहातेच.  मानसिक संभ्रम राहातोच.  म्हणून याच कारणामुळे अर्जुनाने – मम धर्मः कः ?  हा प्रश्न विचारून रागद्वेष, द्वंद्वरहित कर्म कसे करता येईल ?  हा प्रश्न विचारला.  याचे सांगोपांग उत्तर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सूत्रबद्ध प्रतिपादित केलेले आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ

Tuesday, June 3, 2014

भगवद्गीतेचे माहात्म्य | Importance of Bhagvad Geeta

 

विश्वाचे आणि जीवनाचे गूढ रहस्य आणि पारमार्थिक तत्त्वाचे स्वरूप भगवद्गीतेमधून प्रकट केलेले आहे.  तेच भगवंताचे स्वरूप आहे.  यामुळे गीता अन्य ग्रंथांच्याप्रमाणे नसून भगवान श्रीकृष्णांची वाड़्ग्मयीन मूर्तीच आहे.

भगवद्गीता सर्व शास्त्रांचे सार असून त्यामध्ये सर्व शास्त्रे अंतर्भूत आहेत.  ज्याप्रमाणे अमर्याद समुद्र सर्व नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो.  हे सामर्थ्य फक्त सागरामध्ये आहे.  नदीमध्ये नाही. त्याचप्रमाणे अन्य सर्व ग्रंथ किंवा शास्त्रे एकदेशीय, मर्यादित असून त्या सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे, कारण भगवद्गीता हा परिपूर्ण स्वरूपाचा ग्रंथ आहे.

भगवद्गीता हे महाभारताचे अमृतरूपी सार असून प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या मुखकमलामधून उद्घोषित झालेले आहे.  असे हे गीतारूपी गंगोदक प्राशन करून जीवाला पुन्हा कधीही जन्म प्राप्त होत नाही.

गीता हा स्मृतिग्रंथ असूनही त्यामध्ये केवळ धर्माधर्माचा किंवा विधिनिषेधाचा विचार केलेला नसून “तत्त्वमसि” महावाक्यामधून प्रतिपादित केलेले जीवाचे आणि परमेश्वराचे पारमार्थिक स्वरूप प्रकट करून त्यांच्यामधील ऐक्य सिद्ध केलेले आहे.

गीता ही सर्व जीवांना एकात्मतेचा, विश्वबंधुत्वाचा, अद्वैताचा संदेश देणारी आहे.  हीच परमोच्च अखंडत्वाची दृष्टि जीवाचा अज्ञानजन्य संसार नाहीसा करून अत्यंत दुःखनिवृत्ति करते आणि निरतिशय आनंदाची प्राप्ति करून देते.  म्हणून गीता मोक्षदायिनी असल्यामुळे धर्मशास्त्र नसून मोक्षशास्त्र आहे.  हेच गीतेचे माहात्म्य आहे 

  
- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

 
- हरी ॐ