- कुंभमहापर्व -
संपूर्ण विश्वामधील
सर्वात श्रेष्ठ, विराट, विशाल मेळावा म्हणजे 'कुंभमेळा' होय. 'कुंभ' म्हणजे घट. 'कुंभ' म्हणजेच ब्रह्मांड होय. ज्या
ब्रह्मांडामध्ये सर्व जात-धर्म-वंश-पंथ-परंपरा-संप्रदाय इत्यादींचे लोक समाविष्ट
होतात. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये
कोणत्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, वर्णाश्रमाचे, स्त्री-पुरुष,
श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, गृहस्थी-ब्रह्मचारी-वानप्रस्थी-संन्यासी असे सर्वच
लोक समाविष्ट होतात.
वेद सांगतात - धर्मो
विश्वस्य जगत: प्रतिष्ठा | धर्माच्या सहाय्याने संपूर्ण विश्वाची प्रतिष्ठा
होते. धर्म हाच संपूर्ण विश्वाचा आधार
आहे. 'धर्म' याचा अर्थ -
हिंदू-मुस्लिम-ईसाई असा संकुचित नाही. तर धर्माची व्याख्या केली जाते - धर्मो
धारयते प्रजा: | जो सर्व
प्राणिमात्रांना धारण करतो, त्यास धर्म असे म्हणतात. प्रत्येक धर्माचे विशिष्ठ नियम, आचार, आदर्श
असतात. बहिरांगाने सर्व धर्म भिन्न-भिन्न वाटत असतील तरी अखिल मानावजातीच्या
दृष्टीने विचार केला तर समजते की, मनुष्याच्या जीवनाला परिपूर्णता देणे, हेच सर्व
धर्मांचे अंतिम साध्य आहे. स्वामी विदयारण्य
एके ठिकाणी सांगतात -
अंत:पूर्ण:
बही:पूर्ण: पुर्णकुम्भ इवार्णवे | (पंचदशी)
एखाद्या जलाशयातील पाण्याने भरलेला घट त्या पाण्यामध्येच
बुडवला तर त्या घटाच्या आत, घटाच्या बाहेर, घटाच्या वर, घटाच्या खाली, घटाच्या
सर्व बाजूंनी पाणीच असते. पाणी त्या घटाला अंतर्बाह्य व्याप्त करते. त्यालाच
पूर्णकुंभ असे म्हणतात. याप्रमाणेच
मनुष्याला आपल्याच अंतरंगामधील आनंदसागराचा शोध लागला की, त्याचे जीवन पुर्णकुंभाप्रमाणे
कृतार्थ व परिपूर्ण होते. मानवी जीवनाला
ही परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी हिंदू संस्कृतीच्या शिरोभागी असणाऱ्या तसेच सर्व
ज्ञानाचा सागर असणाऱ्या वेदांच्यामधून ज्ञानसाधना सांगितलेली आहे. वेदांचा
उपदेश समाजाच्या एखाद्या विशिष्ठ जातीधर्मापुरता मर्यादित नसून अखिल मानवजातीसाठी
आहे. म्हणूनच सर्व विश्वामध्ये शांतता
व सुव्यवस्था स्थापन करावयाची असेल तर हिंदू धर्माची उदात्त व सर्वसमावेशक मुलतत्त्वे
हीच जगाला दीपस्तंभाप्रमाणे अनंत काळपर्यंत मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही.
- परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, २४
जानेवारी २०१३
- By P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 24 January 2013
- By P.P. Swami Sthitapradnyanand Saraswati, 24 January 2013
'कुंभमेळा' या विषयावरील इतर लेख कुंभमेळा २०१३ - भाग २' आणि 'कुंभमेळा २०१३ - भाग ३' हेही आपणास आवडतील. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया खाली द्यायला विसरू नका. तसेच आपल्या सोशल नेट्वर्किंग वेबसाईटवर मित्रांना लिंक पाठवून आम्हाला मदत करावी ही विनंती. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया Sadhak@ShrutisagarAshram.org या email वरही कळवू शकता - धन्यवाद.
- हरी ॐ –
No comments:
Post a Comment