Friday, September 6, 2013

श्रद्धा – आम्ही परमेश्वर जाणतो | Faith - We know God श्रद्धा प्रत्येक मनुष्याला जीवन जगण्यास शिकविते.  जीवन जगण्याची उमेद, उत्साह, धैर्य, आत्मविश्वास देते.  श्रद्धा मनुष्याला दुबळे बनवीत नाही.  काही लोक श्रद्धेलाच भोंगळ श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असे म्हणतात.  अशा लोकांना श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थच समजला नाही, असे म्हणावे लागेल.

शास्त्रामध्ये, वेदांच्यामध्ये गीतेमध्ये श्रद्धा हाच शब्द आहे.  कोठेही अंधश्रद्धा हा शब्दच नाही. अंधश्रद्धा हा चुकीचा शब्द आहे, कारण श्रद्धा कधीही अंध असू शकत नाही.  अंधश्रद्धेच्या ऐवजी त्यांनी अज्ञान हा शब्द वापरावा.  श्रद्धा ही श्राद्धाच आहे.  श्रद्धा हा बुद्धीचा धर्म असल्यामुळे तो ज्ञानवाचक शब्द आहे.  परमेश्वराचे अस्तित्व बुद्धीने जाणणे म्हणजे श्रद्धा आहे.

म्हणूनच हिंदू धर्म आणि अन्य पंथ यांच्या मूळ तत्वप्रणालीमध्ये फार मोठा फरक आहे.  बाकीचे धर्म म्हणजे सांप्रदाय सांगतात की, आम्ही ईश्वरावर विश्वास ठेवतो.  In God we trust.  फक्त हिंदू धर्माचे तत्वज्ञानच, वेद, गीता, उपनिषदे परमेश्वरावर विश्वास ठेवा, असे सांगत नाहीत तर अगदी विज्ञानाच्या युक्तिवादाने परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करतात.  म्हणून हिंदू तत्वज्ञान सांगते – We not only believe in God, but we also know that there is God !

परमेश्वर ही एखादी कल्पना नाही, विषय नाही किंवा तुमच्या-आमच्यामधील एखादी मर्त्य व्यक्ति नाही.  परमेश्वर ही कोण्या एखाद्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना नाही आणि परमेश्वर ही अंधश्रद्धा तर मुळीच नाही.  परमेश्वर हे विश्वामधील त्रिकालाबाधित सत्य आहे.  परमेश्वर ही सत्ता आहे.  अस्तित्व आहे.
 

- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011


- हरी ॐNo comments:

Post a Comment