Tuesday, February 23, 2016

मिथ्या मृत्युशोक | Futile Grief in Death


अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः || ११ ||  (भगवद्गीता २-११)

पारमार्थिक दृष्टीने जर पहिले तर प्रत्येक जीव नित्य, शाश्वत, चिरंतन, जन्ममृत्युरहित परब्रह्मस्वरूप आहेत.  ते कधी आलेले नाहीत व कधी जाणारही नाहीत.  मग ज्यांना जन्ममृत्यु नाही त्यांच्याबद्दल तू कसा शोक करणार ?  कारण त्या तत्त्वाला तू कधीही मारू शकत नाहीस.

ज्याप्रमाणे सोन्यामधून अनेक प्रकारचे अलंकार निर्माण झाले असले तरी सोनाराची दृष्टि सोन्याची असते.  त्या तत्त्वाच्या दृष्टीमध्ये सर्व भेद नाहीसे होतात.  सोनार सर्व अलंकार एकत्वाच्या दृष्टीने पाहतो.  त्याप्रमाणे पारमार्थिक दृष्टीमध्ये जिवांमधील भेद नसून एकच अखंड तत्त्व आहे.  अशा प्रकारे कोणत्याही दृष्टीने त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही.

तसेच मृत्यू आपल्या शोकाचे कारण होत नाही.  मृत्यु जर कारण होत असेल तर कोणत्याही अज्ञात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूदेखील शोकाचे कारण झाला पाहिजे.  पण तसे दिसत नाही.  तेथे आपण मृत्यु ही एक सत्य घटना म्हणून पाहतो.  त्याठिकाणी स्वतःच्या भावना येत नाहीत.  तर उलट जो जो जन्माला आला तो मृत्यु पावणारच अशी भावना असते.

परंतु तोच मृत्यु ज्यावेळी अत्यंत प्रिय व्यक्तीचा नाश करतो तेव्हा मृत्यूची घटना तीच आहे.  तर मग विशिष्ट व्यक्तीच्या मृत्यूने आपण शोकाकुल का होतो ?  त्याला मृत्यु हे कारण नाही तर त्या व्यक्तीमध्ये असलेला ममत्वभाव हे कारण आहे.  ती प्रिय व्यक्ति नाश पावू नये असे वाटत असते तरी सुद्धा त्या कल्पनेला धक्का बसतो आणि दुःख होते.  थोडक्यात अनेक शरीरामध्ये निरनिराळी नाती निर्माण करून ममत्व-भाव निर्माण करतो.  ममत्वाच्या मागे अहंकार असतो.  हा अहंकार – ममकार अज्ञानकल्पित असून शोकाला कारण होतो.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, February 16, 2016

शोक-मोहातून मुक्तता | Freedom from Grief & Enticement


अहंकार-ममकाराच्या प्रत्ययाने निर्माण झालेला शोक-मोहरूपी संसार प्रत्येक जीवाला अनुभवायला येतो.  तो शोक इंद्रियांना घटादि विषयाप्रमाणे अनुभवायला येत नसून तो प्रत्येकाला आपल्या मनामध्ये प्रचीतीला येतो, कारण तो इंद्रियांचा विषय नसून मनाचा आहे.  या शोकाचे कारण विश्व, बाह्य प्रसंग किंवा विषय नसून मन हेच कारण आहे.

याच मनामध्ये अहंकार असून त्याभोवती आपण स्वतःबद्दलच्या कल्पनांचे वलय निर्माण करतो आणि नंतर ‘मी’ सोडून अन्य व्यक्ति, विषय, स्थावर-जंगम यांच्या अनुषंगाने ममत्व निर्माण करतो.  जेथे जेथे हा ममत्व प्रत्यय निर्माण होईल त्याठिकाणी आपले प्रेम, आसक्ति निर्माण होते आणि आपोआपच अनेक प्रकारच्या अपेक्षा निर्माण होतात.  हाच प्रत्यय सर्वांना बद्ध करतो.  यातुनच मोह आणि शोक म्हणजेच संसार अनुभवायला येतो.

थोडक्यात संसाराला कारण मोह आणि शोक, त्याला कारण अहंकार-ममकार आणि त्याचे मूळ कारण स्वस्वरूपाचे अज्ञान !  म्हणून सर्व संसारच अज्ञानकल्पित आहे.  यामुळे संसारातून मुक्त होणे म्हणजे विषयांचा, लोकांचा, विश्वाचा त्याग करणे नसून सुख-दुःखात्मक असलेल्या द्वन्द्वात्मक कल्पनांमधून मुक्तता होय.  शोकातून मुक्तता म्हणजे मोहातून मुक्तता म्हणजे पर्यायाने अहंकारामधून मुक्तता होय.  अहंकारापासून मुक्तता अज्ञाननिवृत्तीने होते आणि ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होतो व संसाराचा समूळ निरास होतो.

गुरूंच्या उपदेशाने अज्ञानाचा निरास होऊन ज्ञानप्राप्ति होते आणि अज्ञानकल्पित संसाराचा ध्वंस होतो.  म्हणून सर्व शास्त्राचे आणि उपदेशाचे प्रयोजन संसारनिवृत्ति म्हणजेच अज्ञाननिवृत्ति आणि अज्ञाननिवृत्ति म्हणजेच ज्ञानप्राप्ति होय.  थोडक्यात अज्ञानाचा निरास करून संसारनिवृत्ति करणे हेच ज्ञानाचे प्रयोजन आहे.  त्यामुळे ज्ञान हे जरी positive असले तरी त्याचे कार्य अज्ञानकल्पित संसाराचा निरास करणे हेच आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ

Tuesday, February 9, 2016

कुलाचाराचे महत्त्व | Importance of Family Values


मनुष्यामध्ये विषयांचा संग्रह करण्याची आणि उपभोगण्याची स्वाभाविक प्रवृत्ति आहे.  यामधूनच विषयांची कामना निर्माण होते.  आणि कामनापूर्ती व उपभोग हेच जीवनाचे अंतिम ध्येय झाले तर मनुष्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपल्या कामना पूर्ण करतो.  यामुळेच तो नियम, नीतिमुल्ये, आचारधर्म यांना झुगारून देतो आणि हळूहळू स्वैर, उच्छृंखल होऊन पापाचरणामध्ये प्रवृत्त होतो.

या स्वैर, वैषयिक, पशुतुल्य जीवनापासून निवृत्त करण्यासाठी, त्याच्या कामुक प्रवृत्तीवर नियमन घालण्यासाठी, इंद्रियांच्यावर संयमन करण्यासाठी, उदात्त आचार-विचारांचे जीवन जगण्यासाठी, त्याच्या जीवनाला निश्चित दिशा देण्यासाठी या सर्व कुलधर्म, जातीधर्मांचे प्रयोजन आहे.  ते मनुष्याच्या मनात श्रद्धा, भक्ति, सेवा, त्याग, स्वकर्तव्यपरायणता, प्रेम वगैरे श्रेष्ठ सात्विक गुणांची जोपासना करतात.  मानसिक विक्षेप, द्वंद्व कमी करून मन शांत, अंतर्मुख करण्याचे साधन होतात.

हे सर्व शिकविणार कोण ?  कुटुंबसंस्था जर संकारयुक्त असेल, तर त्यातल्या प्रत्येक मनुष्याचे सामाजिक जीवनही या मूल्यांच्यावर आधारित असल्यामुळे आपोआपच समाजातही ही नीतिमूल्ये जोपासली जातील, समाज सुसंस्कृत, समृद्ध, कर्तव्यपरायण होईल.  नाहीतर नीतिमूल्ये, जीवनमूल्यांच्याशिवाय व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन स्वैर होऊन माणसातली माणुसकी नाहीशी होऊन माणूस पशू बनेल.  म्हणून जीवनमूल्यांची जपणूक आणि संवर्धन करणारी उत्कृष्ट संस्कारक्षम कुटुंबसंस्था आवश्यक आहे.  पर्यायाने तीच समाजातील जीवनमूल्ये ठरविते.

म्हणून प्रत्येक पिढीचे एक महत्वाचे कार्य आहे – अनादिकाळापासून चालत आलेले आचारधर्म, कुलधर्म मागच्या पिढीकडून घेऊन आत्मसात करावेत आणि पुढच्या पिढीला आपल्या आचार-विचारामधून द्यावेत.  आजपर्यंत ही अखंड परंपरा चालू आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002




- हरी ॐ

Tuesday, February 2, 2016

ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण | Knowledge – The Mark of Renunciation



आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानाचा ध्वंस होऊन त्यातून निर्माण झालेला कर्तृत्व- भोक्तृत्वाचा अध्यास, त्याचप्रमाणे कर्ता-कर्म-क्रिया-करण-कारकादि प्रत्ययांचा आणि देहात्मबुद्धीचा निरास झाल्यामुळे आपोआपच सर्व कर्म आणि कर्मफळ तसेच संसाराचा अत्यंत अभाव होतो.  ज्ञानामुळे कर्तृत्वाचा अभाव झाल्यामुळे शास्त्र त्या विद्वान पुरुषाला कोणत्याही कर्माचा आदेश देऊ शकत नाही, कारण आदेश देण्यासाठी किंवा विधि-निषेध देण्यासाठी कर्त्याची आवश्यकता असते.

सर्व आदेश जीवाच्या मनात चोदना-प्रवृत्ति निर्माण करून काही कर्मामध्ये प्रवृत्त करतात. तर काही कर्मापासून निवृत्त करतात.  अशी विधि-निषेधपर वचने आहेत.  हे सर्व आदेश कर्त्याला केंद्रीभूत ठेवून केलेले आहेत.  त्यामुळे त्यामागे कर्तृत्व-भोक्तृत्वाचा अध्यास आणि अज्ञान हे गृहीत आहे.

परंतु आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे ज्याला ‘मी’ अकर्ता-अभोक्ता आहे, असे ज्ञान झाले आहे त्याला कोणताही विधि-निषेधपर आदेश संभवत नाही.  ज्ञान हे अकर्तृ-अभोक्तृ स्वरूपाचे आहे.  त्यामुळे तो कर्म संन्यासाला अधिकारी होतो.  नव्हे, तोच फक्त सर्वकर्मसंन्यासी आहे.  म्हणून म्हटले आहे ज्ञानं संन्यासलक्षणम् |  ज्ञान हेच संन्यासाचे लक्षण आहे. जो ज्ञानी तोच संन्यासी आणि जो संन्यासी तोच ज्ञानी होय.

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी |
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ||        ( गीता. अ. ५-२३ )

मनाने सर्व कर्मांचा संन्यास घेऊन नवद्वाररूपी देहामध्ये काहीही न करता आणि करविता हा आत्मसंयमी पुरुष अनायासाने स्वस्वरूपामध्ये राहतो.  यावरून सिद्ध होते की, ज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारचे कर्म शक्य नाही.  तसेच त्याला कोणताही विधि-निषेध नाही.  म्हणून हा संन्यास शरीराचा किंवा कर्माचा नसून ‘ज्ञान’ हेच संन्यासाचे लक्षण आहे.


- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ