Tuesday, July 29, 2014

ध्यान, मन आणि आत्मा | Meditation, Mind & Soul



ध्यान’ हे आत्म्याचे स्वरूप किंवा अवस्था नसून ‘ध्यान’ ही मनाची अवस्था आहे.  ‘ध्यान’ ही पूर्णतः मानसिक प्रक्रिया आहे.  जशी चंचलता ही मनाची अवस्था आहे, तशीच ध्यानावस्थाही मनाचीच अवस्था आहे.  आत्म्याला कोणतेही ध्यान करण्याची आवश्यकता नाही.  अज्ञानी लोक ज्ञानी पुरुषांना, संतांना प्रश्न विचारतात – “ तुमची ध्यानाची वेळ काय ? तुम्ही कसे व कोणाचे ध्यान करता ? ”

ध्यानावस्था हीदेखील आत्म्यामध्ये कल्पित अवस्था आहे.  मन संकल्पमात्राने विषयापर्यंत जाते.  संकल्पाला सुरुवात व शेवट आहे.  संकल्प म्हणजेच वृत्ति होय.  प्रत्येक वृत्ति मनामध्ये निर्माण होते, क्षणमात्र टिकते आणि लय पावते.  वृत्ति येतात आणि जातात, मन कोठेही येत किंवा जात नाही.  परंतु मला मात्र मनच बाहेर जाताना भासते आणि या अशा या मनाचे आत्मा जणु काही अनुसरण करतो. म्हणजेच तादात्म्य अध्यासाने मनाच्या उपाधीशी तादात्म्य पावतो.

यामुळेच आत्माही गतिमान झाल्यासारखा भासतो.  आत्मा बाहेर जातो, विषयांना व्याप्त करतो, तसेच आत्मा हा मनापेक्षाही गतिमान आहे.  क्रमाने पाहिले तर स्थूल शरीरापेक्षा मन गतिमान आहे आणि मनापेक्षाही आत्मा गतिमान आहे.  माझ्या शरीराच्या पुढे पुढे माझे मन धावत असते.  परंतु मन ज्यावेळी एखाद्या विषयपर्यंत पोहोचते, त्यावेळी त्या मनालाच जाणीव होते की, माझ्यापूर्वीच येथे आत्मचैतन्य जाऊन पोहोचले आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, July 22, 2014

शोभनाध्यास आणि अशोभनाध्यास | Bondage of Likes and Dislikes


 
अहंकार आणि ममकार या दोन वृत्तींच्यामुळे जीवाला अनादि काळापासून अनंत काळापर्यंत संसाराची प्राप्ति झालेली आहे.  साधे सहवासाने २-४ वर्षे एखाद्या घरात राहिल्यामुळे जर, अचेतन असणाऱ्या वीटामातीला सुद्धा मनुष्य माझे-माझे म्हणतो.  माझे शरीर, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहिण, माझी पत्नी, माझा पती, माझे घर, माझे मित्र, माझे सगे-सोयरे, माझे आप्त अशा कित्येक ठिकाणी मनुष्य ममत्वाचा भाव निर्माण करतो.  जेथे जेथे ममत्व निर्माण होते, त्या सर्वांना पकडण्याचा मी प्रयत्न करतो.
 
सर्वांच्याबद्दलच ममत्व निर्माण झाले असते तर काहीही समस्या नव्हती, परंतु मनुष्य विश्व, विषय, व्यक्ति यांचे प्रिय व अप्रिय असे दोन विभाग पाडतो.  जे जे मला इष्ट, अनुकूल असते, ते मला प्रिय होते आणि जे जे मला अनिष्ट, प्रतिकूल असते, ते मला अप्रिय होते.  म्हणून तरी एखादी वस्तु किंवा एखादी व्यक्ति दिसली रे दिसली की, आपण तिच्यावर माझ्या आवडी – नावडीच्या, राग-द्वेषांच्या कल्पना आरोपित करतो. “ वाह !  काय सुंदर आहे ! ”  किंवा  “ शी ! काय वाईट आहे ! ” या दोन प्रतिक्रिया क्षणाक्षणाला निर्माण होतात.
 
यालाच म्हणतात “शोभनाध्यास” आणि “अशोभनाध्यास” !  शोभानाध्यास म्हणजे विषय, वस्तु किंवा व्यक्ति यांमध्ये सौंदर्य पाहणे आणि अशोभानाध्यास म्हणजे विषय, व्यक्ति यांमध्ये कुरूपता पाहून तिरस्काराची वृत्ति निर्माण करणे.  याप्रमाणे संपूर्ण जीवनभर प्रथम संसर्गअध्यास आणि नंतर तादात्म्यअध्यास होतो.  हाच अध्यास माझ्या सर्व दुःखांना, यातनांना, असह्य असणाऱ्या वेदनांना, संसाराला कारण आहे. 
 
 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009

- हरी ॐ

Tuesday, July 15, 2014

मन आणि आत्मा - अध्यास | Mind & Soul - Imputation




मन आणि आत्मा यांमध्ये प्रथम संसर्गअध्यास होतो.  म्हणजेच मन हे आत्म्याच्या अत्यंत नजीक, समीप असल्यामुळे कळत-नकळत एकमेकांचे गुणधर्म एकमेकांवर आरोपित होतात.

शास्त्रातील दृष्टांत -
तप्तायः पिण्डवत् इति |

लोखंडाचा गोळा आणि अग्नि हे एकमेकांच्या संपर्कात आणले तर त्यांच्यामध्ये प्रथम संसर्ग अध्यास होतो म्हणजेच लोखंडाच्या गोळ्यामध्ये अग्नीचे धर्म यायला लागतात आणि अग्नीमध्ये लोखंडाच्या गोळ्याचे गुणधर्म येऊ लागतात आणि नंतर त्यांच्यात तादात्म्यअध्यास होतो.  म्हणजेच लोखंडाचा गोळा आणि अग्नि दोन भिन्न न राहता त्यांच्यामध्ये बेमालूम तादात्म्य होते आणि आपण वाक्यप्रयोग करतो – तप्त लालबुंद लोखंडाचा गोळा.

याप्रमाणेच मन आणि आत्मा यांच्यात संसर्ग अध्यास झाल्यामुळे मनामध्ये आत्म्याचे चेतनत्वादि गुणधर्म येतात आणि आत्म्यामध्ये मनाचे सुख-दुःखादि, शोकमोहदि, सत्वरजतमोगुणादि असे अनेक विकार येतात.  त्यामुळे नकळत तादात्म्य अध्यास होऊन मला मनच चेतनमय भासते आणि मी स्वतः अंतःकरण उपाधीशी इतका तादात्म्य पावतो की, मीच सुखी, दुःखी, संसारी, बिचारा, मर्त्य होतो.  मीच विक्षेपयुक्त, अस्थिर, अस्वस्थ, चंचल होतो.


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ

Tuesday, July 8, 2014

मागे काहीही राहिलेले नाही | There is Nothing Left Behind


एका नगरीमध्ये एक साधु पुरुष राहायला येतात.  ते अत्यंत विरक्त व एकांतप्रिय असतात.  राजा रोज नियमितपणे साधूंच्याकडे जात राहतो.  सेवा करतो आणि उपदेश ग्रहण करीत असतो.  त्याची श्रद्धा वृद्धिंगत होते.  तो त्या साधूंसाठी सर्व काही करतो.  चांगले राहायला, खायला-प्यायला देतो.  साधूंचेही जीवन व्यास्थित चाललेले असते.

हे सर्व चालू असताना हळुहळू राजाच्याच मनात विकल्प येऊ लागतो.  “मी सर्व काही या साधूंना देत आहे, पण साधु या सर्वांना नको न म्हणता सर्व उपभोगत आहेत.  वस्तुतः हे साधु असतील तर मी जरी सर्व दिले तरी त्यांनी भोगांचा त्याग केला पाहिजे.  परंतु साधु सुद्धा या भोगांमध्ये रमलेले दिसतात.”  एक दिवस असह्य होऊन तो साधूंना स्पष्टपणे विचारतो “आपण स्वतःला ज्ञानी, साधु म्हणविता परंतु आपण सुद्धा आमच्याप्रमाणे भोगासक्त झालेले दिसता.  मग तुमच्यात आणि आमच्यात काय फरक आहे ?” साधूंना काय समजायचे ते समजते.  ते शांतच राहतात.

दुसऱ्या दिवशी सकाळीच येण्यास ते राजाला सांगतात.  राजा आल्यानंतर ते राजाला फिरायला घेऊन जातात.  एक तास, दोन तास गप्पा मारीत चालत राहतात.  शेवटी त्या राज्याची सीमा येते.  मग मात्र राजा असह्य होतो.  तो सांगतो – “साधु महाराज ! आपण खूप दूरवर आलेलो आहोत, आता परतायला हवे.”

साधु विचारतात “ अरे ! कशासाठी मागे परतायचे ? ” त्यावेळी राजा उत्तर देतो की, “ मला माझे राज्य आहे, माझी बायको, मुले, मंत्री, प्रधान माझी वाट बघत असतील. ”  त्यावेळी साधु त्या राजाला शांतपणे सांगात “ आता तू मागे जा.  परंतु मी साधु आहे, मी पुढे जातो.  कारण माझे असे मागे काहीही राहिलेले नाही.  मी सर्व भोग भोगत असलो, बहिरांगाने तुझ्यासारखे व्यावहारिक जीवन जगलो तरीही तू आणि मी यांत फार फरक आहे. ”


- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009


- हरी ॐ

Tuesday, July 1, 2014

अस्तित्वाचे सूत्र | Thread of Existence




रमणमहर्षि प्रश्न विचारतात –

            सत्प्रत्यया: किन्नु विहाय सन्तम् ?       (सद्दर्शन)

खरोखरच सत् प्रत्ययाव्यतिरिक्त या विश्वामध्ये एकतरी विषय अस्तित्वामध्ये आहे का ?’ विश्वामध्ये सत् प्रत्ययाव्यतिरिक्त कोणतीही वस्तूच अस्तित्वात नाही.  सत् प्रत्यय धाग्याप्रमाणे सर्व विश्वामध्ये अनुस्यूत आहे.

जसे, सूत्र एकच असते.  मणि मात्र संख्येने अनेक आणि प्रकारानेही अनेक असतात.  एक छोटा, एक मोठा, एक काचेचा, एक मोत्याचा, एक सोन्याचा, एक रुद्राक्षाचा असे अनेक प्रकारचे मणी आहेत.  मणि अत्यंत सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत आहेत.  या विविध मण्यांना सुसूत्रपणे एकत्र आणावयाचे असेल, तर त्यासाठी सूत्राचीच आवश्यकता आहे.  मण्यांमध्ये भेदभाव आहेत.  मात्र सूत्र या सर्व मण्यांना सूत्रबद्ध करते.

त्याप्रमाणेच विश्वामध्ये मणी म्हणजेच उपाधि अनेक आहेत.  उपाधींच्यामध्ये लहान-मोठा, उच्च-नीच, स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, धर्म, वर्ण, आश्रम, पंथ, देश असे अनेक भेदभाव आहेत.  मात्र या उपाधींच्यामधून आरपार जाणारे, अनुस्यूत असणारे चैतन्य मात्र एकच आहे.  तेच चैतन्य सर्व भूतामात्रांना अंतर्बाह्य व्याप्त करते.  भगवान म्हणतात –

            ईश्वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति |     ( गीता अ. १८-६१)

‘हे अर्जुना ! परमेश्वर सर्वांच्या हृदयामध्ये सन्निविष्ट आहे.’  असे ते चैतन्य सर्व उपाधींच्या आत आहे.  आत म्हणजेच सर्व उपाधींचे अधिष्ठानस्वरूप आहे.  स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराच्याही आत, पंचकोशांच्याही आत, म्हणूनच अत्यंत गुह्य, अत्यंत सूक्ष्म स्वरूपाने ते चैतन्य आहे.

 

- "ईशावास्योपनिषत्" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २००९
- Reference: "
Ishavasya Upanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, April 2009



- हरी ॐ