Tuesday, October 25, 2022

पुण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ | Knowledge is Superior to Virtue

 



ज्ञानाने सर्व कर्मांचा नाश होत असेल तरी सुद्धा शास्त्रामध्ये पापांचा क्षय करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे सांगितलेली आहेत.  राजसूय यज्ञ, तसेच अग्निहोत्रादि अनेक यज्ञयागादि आणि शारीरिक, वाचिक व मानसिक तप याप्रकारची अनेक कर्मे आहेत.  त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रायश्चित्त कर्मे दिलेली आहेत.  या सर्व कर्मांचा उद्देश पापकर्माचा क्षय होऊन ऐहिक आणि पारलौकिक सुख आणि आनंद मिळावा, हाच आहे.

 

याउलट भगवान याठिकाणी सर्व विषयांचा, सर्व कर्मांचा त्याग करून शमदमादि साधनांच्या साहाय्याने आत्मज्ञान प्राप्त करावे असे सांगतात.  आनंद आणि सुख प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असेल तर, ते जर यज्ञयागादि सोप्या कर्मांच्या अनुष्ठानाने मिळत असेल तर इंद्रियसंयमन, विषयांचा त्याग, कर्माचा त्याग, मनःसंयमन आणि सतत विचार करून आत्मज्ञान प्राप्त करणे याप्रकारच्या अत्यंत कठीण आणि अवघड मार्गाने का जावे ?  हा मार्ग सामान्य मनुष्याला शक्य आहे का ?  यापेक्षा यज्ञयागादि कर्मांचा सरळ, सोपा मार्ग अनुसरण करून पापक्षालन करावे आणि सुख मिळवावे हे अधिक युक्तिसंगत नाही का ?

 

यावर भगवान म्हणतात की, जरी यज्ञयागादि कर्माने पापांचे क्षालन होते, तरी सर्व पापांचा निरास होत नाही.  तसेच आपण गृहीत धरले की पापांचा क्षय होतो, तरी सुद्धा पुण्यकर्म शिल्लक राहातेच.  पुण्याचा कधीही नाश होत नाही.  पुण्यकर्म सुद्धा पापकर्माप्रमाणे बंधनकारकच आहे.  ते सुद्धा जन्माला कारण आहे.  थोडक्यात, जीव संपूर्ण कर्म बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही, कारण कर्म, कर्तुत्व-भोक्तृत्व भावनेचा आणि अज्ञानाचा ध्वंस करू शकत नाही.  अज्ञानाचा नाश फक्त ज्ञानानेच होतो.  म्हणून ज्ञान हेच सर्व प्रकारच्या कर्मामध्ये अधिक श्रेष्ठ असून जीवाला संपूर्ण पावन करणारे आहे.  यासाठी प्रत्येक मुमुक्षूने प्रयत्नपूर्वक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्न करावा.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002



- हरी ॐ




Tuesday, October 18, 2022

आत्मोद्धाराची साधने – धर्म | Means of Self-Upliftment – Dharma

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.

नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II

(श्रीमद्  भागवत)

 

अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

ईश्वराने धर्म म्हणजे आचारधर्म निर्माण केले. मनुष्याला जीवन जगण्यासाठी काही नियम, काही मर्यादा घालून दिल्या.  मनुष्याने कसे जगावे, कोणते कर्म करावे व कोणते करू नये त्याचे ज्ञान दिले.  नीतिमूल्ये, जीवनमूल्ये यांचे महत्त्व सांगून सर्व वर्णाश्रमानुसार मनुष्याचे धर्म कथन केले.  जो धर्माचे रक्षण करतो त्याचेच धर्म रक्षण करतो आणि जो धर्माचे, सदाचाराचे, नीतीचे उल्लंघन करतो, त्याचे निश्चितच अधःपतन होते.

 

असे सांगून ईश्वराने मनुस्मृतीच्या माध्यमातून मनुष्याने कसे वागावे, याची घटना लिहून ठेवली.  ईश्वराने स्वतःच धर्माज्ञा दिलेल्या आहेत.  धर्मरक्षण व मनुष्याच्या कल्याणासाठी ईश्वर वारंवार अवतार घेत असतो.  भगवान सांगतात –  

ब्रह्मन् धर्मस्य वक्ताहं कर्ताहं तदनुमोदिता II                        (श्रीमद् भागवत)  

हे नारदा !  मी ईश्वरच धर्माचा वक्ता आहे, कर्ता व धर्माला अनुमोदन देणारा आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ




Tuesday, October 11, 2022

काम, विवाहसंस्था आणि श्रद्धा | Desire, Marriage & Trust

 



तिसरा पुरुषार्थ म्हणजेच काम.  भगवान सांगतात –

धर्माविरुद्धो भूतेषु कामोSस्मि भरतर्षभ |                (गीता अ. ७-११)

 

सर्व प्राणीमात्रांच्यामधील धर्म-अविरुद्ध असणारा काम हे माझेच स्वरूप आहे.  कामना वाईट नाही.  कामना ही निसर्गतःच प्रत्येक जीवामध्ये आहे.  विवाहसंस्था ही अत्यंत पवित्र आहे.  ही कामवासना पूर्ण करताना स्मृतिकार नियम देतात –

विवाहो न विलासार्थः प्रजार्थः एव केवलः |               (महाभारत)

 

विवाह हा केवळ भोगविलासासाठी नसून प्रजानिर्मितीसाठी आहे.  म्हणून विवाहामध्ये सुद्धा प्रतिज्ञा केल्या जातात –  धर्मे च नातिचरामि |  अर्थे च नातिचरामि |  कामे च नातिचरामि |  धर्म, अर्थ, काम यामध्ये कधीही पति व पत्नी या दोघांनी अतिक्रमण करू नये.

 

पति आणि पत्नी हे पवित्र असणारे बंधन आहे.  म्हणूनच पति आणि पत्नी यांच्यामध्ये एकमेकांच्याबद्दल नितांत श्रद्धा व विश्वास पाहिजे, तरच वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकते.  अन्यथा आज आपण समाजामध्ये अत्यंत विदारक चित्र पाहतो.  पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्याप्रमाणेच आपल्या राष्ट्रामध्येही घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे.  यामुळे कुटुंबसंस्था विस्कळीत होत आहे.

 

आपापसामध्ये असणारा विश्वास, श्रद्धा, प्रेम, आपुलकी, माणुसकी मनुष्य विसरत चालला आहे.  यामुळे मनुष्यजीवन पर्यायाने समाजजीवन अत्यंत अस्थिर, अशांत झालेले आहे.  म्हणून आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्थिरता, शांति, समाधान निर्माण करावयाचे असेल, तर श्रद्धा हा अत्यावश्यक घटक आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, March 2007



- हरी ॐ




Tuesday, October 4, 2022

आत्मोद्धाराची साधने – तप | Means of Self-Upliftment – Penance

 



ईश्वराचा अवतार हा केवळ आणि केवळ मनुष्यमात्रासाठीच आहे.

नृणां निःश्रेयसार्थाय व्यक्तिर्भगवतो नृप I   अव्ययस्याप्रमेयस्य निर्गुणस्य महात्मनः II

(श्रीमद्  भागवत)

 

अव्यय, अप्रमेय, निर्गुण, निर्विशेष असणारा परमात्मा केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी उपाधि धारण करून सगुण-साकार होतो.  पृथ्वीतलावर अनेक वेळेला अवतार घेतो.  केवळ अवतार घेत नाही, तर ईश्वर मनुष्याच्या उद्धारासाठी बरोबर तपादि साधने उत्पन्न करतो.  म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये तप-धर्म-दान-सत्य-तीर्थयात्रा या सर्वांचे महत्त्व असून ही सर्व साधने अर्थपूर्ण आहेत.

 

जीवनामध्ये तपश्चर्या म्हणजे शरीर, वाणी व मन यांच्यावर मनुष्याने संयमन केले पाहिजे.  यासाठीच अनेक उपवास, उपासना, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने सांगितली जातात.  श्रावण महिना, चातुर्मास, अधिक मास, विशेष पर्वकाळ यामध्ये व्रतस्थ राहिले जाते.  पूर्वीच्या काळी घराघरामधून पुराणे वाचली जात.  परंतु आज विज्ञानयुगात त्यांना व्यर्थ गोष्टी समजल्यामुळे त्या नाहीशा झाल्या आहेत.

 

परंतु या सर्वांचा निश्चित काहीतरी मथितार्थ आहे.  उपवास किंवा व्रतवैकल्ये ही देवासाठी केली जात नसून त्यामागे तपश्चर्या आणि इंद्रियसंयमनाचा उद्देश आहे.  शास्त्रामध्ये कृच्छ्रांद्रायणादि तपे सांगितली जातात.  नक्त म्हणजे एकभुक्त व्रत केले जाते.  पुरश्चरणे केली जातात.  मौनव्रत, अग्निहोत्र व्रत अशी कितीतरी तपे ईश्वराने निर्माण केली.  मनुष्याने या तपांचे आचरण करावे आणि एक अतिशय सुंदर व संयमित जीवन जगावे.  हाच त्यामागील उद्देश आहे. तपामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019



- हरी ॐ