Saturday, August 27, 2016

विवेकजन्य वैराग्य | Rational Renunciation


अनेक वर्षानुवर्षे नव्हे जन्मानुजन्म पुन्हा पुन्हा विषय उपभोगून जेव्हा वाट्याला दुःखच येते आणि जीवनामध्ये सुखाचा लेशमात्र किरण सुद्धा दिसत नाही, तेव्हा मनुष्य आपोआपच विषयांच्यापासून निवृत्त होतो.  या विश्वात आणि विषय उपभोगामध्ये काही अर्थ नाही, हे त्याला मनोमन पटते.  त्यामुळे त्याच्या मनामध्ये जीवनाविषयी नैराश्य आणि वैफल्य निर्माण होते.  आता काहीही नको अशी त्याची वृत्ति होते.  कशातच रस वाटत नाही.

परंतु ही अवस्था प्रसंगानुरूप निर्माण झालेली असल्यामुळे हे तात्कालिक वैराग्य आहे.  स्मशान वैराग्य आहे.  ते विवेकशून्य वैराग्य आहे.  असे निराश, उदास झालेले मन साधनेमध्ये एकाग्र होत नाही, काळाच्या ओघामध्ये परिस्थिति बदलली की मनुष्य दुःख, यातना विसरून पुन्हा विषयामध्येच रममाण होतो.  म्हणून या वैराग्यामुळे कधीही ज्ञाननिष्ठा किंवा श्रावणादि साधनेमधील निष्ठाही मिळत नाही.

म्हणून येथे भाष्यकार सांगतात दृढ वैराग्यप्राप्तीसाठी प्रथम गुरूंच्या मुखामधून विषयांचे जे खरे स्वरूप आहे त्याचे श्रावण करून विषयदोषदर्शन करावे आणि विवेकाने जाणीवपूर्वक विषयांच्या पासून म्हणजेच विषयासक्तीपासून मनाला निवृत्त करावे.  गुरु शिष्याला श्रुति, युक्ति आणि अनुभूति यांच्या साहाय्याने विषयांची मीमांसा करून विश्वाचे आणि विषयांचे खरे स्वरूप प्रकट करतात.  ज्याप्रमाणे कार्मामधून प्राप्त होणाऱ्या इहलोकातील उपभोगांचा क्षय होतो, त्याचप्रमाणे पुण्यकर्मामधून प्राप्त होणाऱ्या स्वर्गलोकामधील उपभोगांचा सुद्धा क्षय होतो.  म्हणजेच इहलोक आणि स्वर्गलोक हे दोन्हीही कर्मजन्य असल्यामुळे नाशवान, अनित्य स्वरूपाचेच आहेत.

इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग निःशंशय दुःखाचेच कारण होतात आणि ते आदि व अंत असणारे असल्यामुळे अनित्य आहेत.  बुद्धिवान विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ

Thursday, August 25, 2016

कल्पित विश्व निर्माण कसे झाले? | How Imaginary Cosmos was Created?


परब्रह्म हे प्रत्यक्षात निर्विकार, निर्विशेष स्वरूपाचे असल्यामुळे त्यामध्ये विश्वनिर्मिती हा विकार होऊच शकणार नाही.  मग हे अध्यस्त, कल्पित विश्व निर्माण झालेच कसे?
            
भगवान भाष्यकार म्हणतात – हे सर्व विश्व त्रिगुणात्मक अविद्येच्या साहाय्याने ‘मी’ च संवित् स्वरूप असलेल्या प्रत्यक् चैतन्यामध्ये कल्पित केलेले आहे. श्रुति म्हणते – इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते |  परमात्मा मायेच्या साहाय्याने बहुरूपला, विश्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजेच मायाउपाधियुक्त परब्रह्मानेच हे विश्व निर्माण केले.

निर्मितीसाठी दोन घटकांची आवश्यकता आहे – निमित्तकारण आणि उपादानकारण.  या दोन कारणांशिवाय विश्वामधील कोणत्याही वस्तूची निर्मिती होत नाही.  उदा. घटाच्या निर्मितीमध्ये घटाचा कर्ता कुंभार निमित्तकारण आहे आणि ज्याच्यामधून घट निर्माण केला ती माती त्या घटाचे उपादानकारण होते.  याचप्रमाणे विश्व सुद्धा घटाप्रमाणे कार्य असल्यामुळे विश्वनिर्मितीला सुद्धा या दोन कारणांची आवश्यकता आहे.  म्हणून शास्त्र म्हणते की, त्रिगुणात्मक माया हे विश्वाचे उपादानकारण आहे आणि परब्रह्म हे निमित्तकारण आहे.

घटपटादि निर्मितीमध्ये घटाचे उपादानकारण माती आणि घटाचा कर्ता निमित्तकारण कुंभार हे दोन्हीही घटक भिन्न आहेत, वेगळे आहेत परंतु विश्व निर्मितीमध्ये मात्र हे दोन्हीही घटक भिन्न असूच शकत नाहीत कारण विश्वनिर्मितीपूर्वी विश्वाचा अभाव असल्यामुळे निर्विशेष, निरवयव परब्रह्माशिवाय कशाचेच अस्तित्व नव्हते.  इतकेच नव्हे तर देश, कालावधी कल्पनाही नव्हती.  म्हणून कुंभार ज्याप्रमाणे एखाद्या बाह्यस्थानामध्ये उपलब्ध असलेली माती आणून घट निर्माण करतो, त्याप्रमाणे परब्रह्म विश्वाचे उपादानकारण बाहेरून आणू शकणार नाही कारण – वस्त्वन्तराभावात्परब्रह्माशिवाय अन्य कोणत्याही वस्तूचे अस्तित्वच नसते. त्यामुळे विश्वाचे उपादान कारण हे विश्वाच्या निमित्त कारणापासून – परब्रह्मापासून भिन्न असू शकणार नाही.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Tuesday, August 16, 2016

संवित् – विश्वाचे अधिष्ठान | Consciousness – Foundation of Cosmos


संवित् स्वरूप चैतन्यामध्ये नामरूपात्मक, नानात्व अनेकात्मक विश्वाचा अत्यंत अभाव असूनही या जगताची प्रचीति कशी येते ?  आणि प्रचीति जर येत असेल तर हे विश्व चैतन्यामधून निर्माण झाले कसे ?  निर्माण झाल्यानंतर चैतन्य आणि विश्व यांचा संबंध काय ?

हे सर्व जग चैतन्यामधून विस्तारित झालेले आहे.  म्हणजेच चैतन्यामध्ये अध्यस्त, कल्पित आहे.  जी अध्यस्त, कल्पित वस्तु असते तिला अधिष्ठानाच्या सत्तेशिवाय स्वतःची सत्ता नसते.  ज्याप्रमाणे तरंग, लाटा, बुडबुडे वगैरे पाण्याच्या सत्तेने सत्तावान होऊन पाण्यामध्ये अस्तित्वात असतात किंवा बाह्य नगरनिवासी वगैरेंचे प्रतिबिंब आरशाच्या सत्तेने सत्तावान होऊन आरशामध्ये अस्तित्वात असते.  येथे पाण्याच्या पृष्ठभागावर प्रचीतीला येणारे अनेक तरंग, बुडबुडे या नामरूपांना त्यांची स्वतःची सत्ता नसते तर त्यांच्यामध्ये अनुस्यूत असलेले पाणी त्यांना सत्ता देते.  पाणी आहे म्हणून तरंग, बुडबुडे आहेत. परंतु पाणी मात्र तरंग बुडबुड्याशिवाय अस्तित्वात आहे.

त्याचप्रमाणे द्रष्टा-दृश्यात्मक भासणाऱ्या नानाविध रूपाने प्रचीतीला येणाऱ्या या द्वैतप्रपंचाला तरंग, बुडबुड्याप्रमाणे स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून सच्चिदानन्दस्वरूप परमात्म्याच्या सद् अंशाच्या अधिष्ठानाने सत्तावान होऊन परमात्म्यामध्येच अस्तित्वात आहे.  तसेच द्रष्ट्याला सुद्धा स्वतःची स्वतंत्र सत्ता नसून सच्चिदानन्दस्वरूप परमात्म्याच्या अधिष्ठानाने सत्तावान होऊन परमात्म्यामध्येच तो अस्तित्वात आहे.  म्हणजेच संवित् स्वरूप असलेले प्रत्यक् चैतन्य हेच द्रष्टा – दृश्यात्मक भासणाऱ्या प्रपंचाचे अधिष्ठान आहे.  त्यामुळे सर्व विश्वाची प्रचीति संवित् स्वरूप चैतन्यामध्ये येते.

थोडक्यात सर्व विश्व चैतन्यामध्ये अध्यस्त, कल्पित आहे.  म्हणून विश्वाला दिसणारी सत्ता ही विश्वाची स्वतःची नसून त्याच्या अधिष्ठानाची म्हणजेच परब्रह्माचीच सत्ता आहे.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "
Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Tuesday, August 9, 2016

ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी | Attitude of Realized Soul




प्रारब्धकर्माचे फळ उपभोगत असताना ब्रह्मज्ञानी पुरुषाची दृष्टी कशी असते ?
आगते स्वागतं कुर्यात्  - जीवन जगत असताना जे काही चांगले वाईट आपल्या वाट्यास येईल, त्याचा आनंदाने स्वीकार करतो.
आगमापायिनोSनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत | या भगवंताच्या उक्तीप्रमाणे सर्वच सुख आणि दुःखात्मक प्रसंग तात्कालिक, अनित्य स्वरूपाचे आहेत.  त्यामुळे त्यांच्याविषयी हर्ष-विषाद न मानता ज्ञानी पुरुष सर्व आनंदाने सहन करतो.  तो कोणालाही दोष देत नाही किंवा तक्रार करीत नाही.
प्रारब्धवशात् शरीर प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे सर्व चांगले वाईट प्रसंग, इष्ट-अनिष्ट सुखदुःखात्मक प्रसंग प्रारब्धाचेच फळ आहे.  त्यामुळे ते कोणालाही टाळता येत नाही, थांबविता येत नाही किंवा बदलता येत नाही.  हे त्रिवार सत्य आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष हे यथार्थपणे समजून ते आनंदाने उपभोगतो.  म्हणजेच तो हे शरीर प्रारब्धालाच अर्पण करतो.  त्यामुळे दुःखामध्ये उद्वेगरहित आणि सुखाच्या प्रसंगामध्ये स्पृहारहित असतो.
मिथ्यास्वरूपत्वात् आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आत्मा हाच सत्य आणि अन्य सर्व मिथ्या ही दृष्टि प्राप्त झाल्यामुळे देह आणि त्याचे कारण प्रारब्ध हे सुद्धा मिथ्या स्वरूपाचे पाहात असल्यामुळे मिथ्या बुद्धीने तो स्वीकार करतो.  ज्याप्रमाणे एखादा नट नाटकामध्ये विविध वेष धारण करून अनेक भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे हुबेहूब वठवितो.  लोकांना ते वेष सत्य वाटतात. नटाला मात्र निश्चितपणे तो कोण आहे याची जाणीव सतत असते.  यामुळेच जोपर्यंत वेष घेऊन भूमिका करीत आहे तोपर्यंत हा सर्व भास आहे हे जाणूनही तो त्या भूमिका करीत असतो.  भूमिकेच्या सुखदुःखांनी तो व्यथित होत नाही.

त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरुष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जणू काही नाटकातील नटाप्रमाणे जीवन जगतो.  प्रारब्धानुसार आपल्या देहाच्या तो सर्व भूमिका हुबेहूब वठवितो.  देहपातापर्यंत तो प्रारब्धाचे नाटक स्वेच्छेने आणि आनंदाने पाहातो. मात्र त्याला स्वस्वरूपाची सतत जाणीव असते.


- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२     
- Reference:  "Maneesha Panchakam
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012


- हरी ॐ

Tuesday, August 2, 2016

श्रद्धा – जीवनाचा अविभाज्य घटक | Belief – Inseparable part of Life


जन्माला आल्यानंतर मनुष्य हे विश्व पाहतो.  विश्वामधील दृश्य विषयांना पाहतो.  मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले, असे मी म्हणतो आणि जे डोळ्यांनी पाहतो त्यालाच मी सत्य मानतो.  येथेच आपल्या हातून चूक झालेली आहे.

प्रत्येक मनुष्यामध्ये असलेल्या श्रद्धेमुळेच तो सर्व ठिकाणी विश्वास ठेवत जातो. अनंत विषयांच्यावर विश्वास ठेवला.  व्यक्तींच्यावर विश्वास ठेवला.  काही वेळेस आपल्या अपेक्षेप्रमाणे घडते.  आपण ठेवलेला विश्वास सार्थ ठरतो.  परंतु पुष्कळ वेळेला विश्वासाला तडे जातात.  माणसे आपला विश्वासघात करतात.  असे अनेक आघात सोसून सुद्धा मनुष्याला एक दुर्दम्य आशा असते.  आजच्यापेक्षा उद्याचा दिवस जरा चांगला उगवेल, मी उद्या पुन्हा जोमाने कामाला लागेन.  याच श्रद्धेने मनुष्य जीवन जगतो.

विश्वामधील आस्तिक, धार्मिक मनुष्य श्रद्धावान आहे.  तसेच नास्तिक मनुष्यही श्रद्धावान आहे.  विज्ञानवादी, बुद्धिनिष्ठ असणारा मनुष्यही श्रद्धावानच आहे.  मग फरक कोठे आहे?  या सर्वांच्या श्रद्धेमध्ये फरक नाही.  श्रद्धा ही श्रद्धाच आहे.  फक्त या सर्वांच्या श्रद्धेचे विषय भिन्न-भिन्न आहेत.  श्रद्धेचा आविष्कार भिन्न-भिन्न आहे.

एखाद्या मनुष्याची श्रद्धा स्वतःच्या आईवडिलांच्यावर असेल, एखाद्याची गुरूंच्यावर, परमेश्वरावर, शास्त्रावर, ज्ञानावर, संतपरंपरेवर, संप्रदायावर असेल तर एखाद्याची श्रद्धा पैशावर असेल, सत्तेवर असेल, एखाद्या प्रिय व्यक्तीवर असेल, काही वेळेस मित्र-मैत्रीण-आप्त यांच्यावर असेल, काही वेळेस एखाद्याची श्रद्धा स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर असेल.  त्यालाच आपण शब्द वापरतो – आत्मविश्वास !  आत्मविश्वास म्हणजेच स्वतःची स्वतःवर असलेली श्रद्धा होय.  याप्रमाणे श्रद्धेचे विषय बदलतील.  परंतु श्रद्धेचा भाव सर्वांच्यामध्ये स्थायी आहे.  सर्वांच्यामध्ये ‘श्रद्धा’ आहेच.


- "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून,  प्रथम आवृत्ति, नोव्हेंबर २०११   
- Reference: "
Shraddha Ani Andhashraddha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, November 2011





- हरी ॐ