Saturday, February 23, 2019

प्राणाची स्तुति | Praise of Life-Breath



हे प्राणा !  ज्या प्रजापतीचे श्रुतीने पूर्वी वर्णन केले तोच तू प्रजापतिरूप असून तू सर्व गर्भांच्यामधून संचार करतोस.  गर्भामध्ये प्राण प्रतिष्ठित असतो.  तू पित्याच्या गर्भात रेतरूपाने व मातेच्या गर्भात पुत्ररूपाने संचार करतोस.  त्या गर्भामधून तूच प्रतिरूपाने जन्माला येतोस.  तूच माता-पिता यांचे प्रतिरूप होतोस.  सर्व देहांच्यामधून एकच प्राण अनेक प्रकारचे वेष धारण करतो.  ब्रह्माजीपासून पिपीलिकापर्यंत सर्व देहांची या प्राणाला एकेक आकृति प्राप्त होते.  देहाकृति या भिन्न-भिन्न आहेत.  मात्र त्यामधील प्राण एकच असून तो सर्वात्मा, सर्वांतर्यामी आहे.  

यामुळेच हे प्राणा !  मनुष्यादि प्रजा आपल्या चक्षुरादि इंद्रियांच्या साहाय्याने तुलाच बलि अर्पण करतात, कारण तूच या कार्यकारणसंघातरूपी शरीरामध्ये निवास करतोस.  सर्व चक्षुरादि इंद्रिये आपल्या कक्षेत येणाऱ्या आपापल्या शब्दस्पर्शरूपरसगंधादि विषयांचे ग्रहण करतात आणि ते विषय प्राणाला उपहार म्हणून अर्पण करतात.  याचा अर्थच या सर्व विषयांच्या संवेदना प्राणाला पोहचवितात.  म्हणून प्रणालाच सर्व विश्वाची जाणीव होते.  

येथे श्रुति कल्पना करते की, सर्व इंद्रिये प्राणाची जणु काही पूजा करून त्यास सर्व अर्पण करतात, कारण पूर्वी कथा सांगितलेली होती की, सर्व इंद्रिये स्वतःलाच श्रेष्ठ समजत होती.  परंतु त्यांना नंतर अनुभवाने प्राणाचे श्रेष्ठत्व समजून त्यांनी प्राणाची स्तुति केली.  यासाठीच सर्व इंद्रिये प्राणाची पूजा करून त्यास बलि, सर्व विषयांचे ग्रहण केलेले ज्ञान संवेदना अर्पण करतात, कारण त्या सर्व इंद्रियांमध्ये, शरीरांच्यामध्ये प्राणच संनिविष्ट आहे.  “प्राण” हाच या विश्वामध्ये एकच भोक्ता असून अन्य सर्व भोग्य आहे.  त्यामुळे ते सर्व भोग्य भोक्ता असणाऱ्या प्राणाला अर्पण करणे, हेच योग्य आहे.  म्हणूनच हे प्राणा !  आम्ही हे सर्व तुलाच अर्पण करीत आहोत, असे इंद्रिये म्हणतात.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ


Tuesday, February 19, 2019

उत्तरायण मार्ग | Path of Solar Worship





सूर्य हा संपूर्ण जगताचा प्राण आहे.  सर्व प्राणिमात्रांचे आश्रयस्थान आहे.  तो प्राण अमृत म्हणजे अविनाशी स्वरूप आहे.  तो अभय म्हणजे भयरहित आहे, कारण त्याला चंद्रासारखी क्षय-वृद्धि नाही.  चंद्राला क्षयवृद्धीचे भय आहे.  परंतु सूर्यामध्ये क्षयवृद्धीचा अभाव असल्यामुळे सूर्य हा अमृतस्वरूप, अविनाशी, निर्भयस्वरूप आहे.  

तोच सूर्य-अग्नि-प्राण हा सर्व उपासकांचे परम आश्रयस्थान आहे.  कर्म-उपासनेचा समुच्चय करणाऱ्या उपासकांच्यासाठी सूर्यलोक ही सर्वश्रेष्ठ गति आहे.  सूर्यलोक प्राप्त झाल्यानंतर उपासक पुन्हा या मर्त्यलोकामध्ये येत नाहीत.  मात्र अविद्वान लोकांना या सूर्यलोकात येण्यास निरोध आहे.  अविद्वान, म्हणजेच फक्त कर्मामध्ये रत झालेल्या कर्मठ लोकांना सूर्यलोकाची प्राप्ति होत नाही.  कर्मठ लोकांना दक्षिणायन मार्गाने चंद्रलोकाची प्राप्ति होते.

म्हणून साधकाने दक्षिणायन मार्गाने न जाता कर्म-उपासनेचा समुच्चय करावा.  मन अधिकाधिक सात्त्विक व अंतर्मुख करावे.  त्यासाठी इंद्रियसंयमन, ब्रह्मचर्यव्रताचे पालन व श्रद्धापूर्वक ईश्वरआराधना, गुरुसेवा करावी.  मन सत्संगामध्ये न्यावे.  दुःसंगाचा, विषयसंगाचा त्याग करावा.

याप्रकारे उपासना करून श्रेष्ठ उपासक उत्तरायण मार्गाने तेजस्वी, प्रकाशस्वरूप सूर्यलोक प्राप्त करतात.  ते पुन्हा कधीही मर्त्य लोकाला येत नाहीत.  ते कल्पान्तापर्यंत ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजीबरोबर निवास करतात.  त्यांना क्रममुक्ति प्राप्त होते.  कल्पाच्या शेवटी ते मुक्त होतात.  मात्र ही उपासना अत्यंत कठीण आहे.  या उपासनेमध्ये द्वैतभाव नसून उपासक-उपास्य एकरूप होतात.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ


Tuesday, February 12, 2019

अध्यात्मविद्येमधील योग्य प्रश्न | Asking Right Questions




अध्यात्मविद्या ही प्रश्नोत्तर रूपानेच दिली जाते.  तो गुरुशिष्यांचा प्रश्नोत्तररूप संवाद असतो.  शिष्य प्रश्न विचारतो व गुरु त्यास यथार्थ व सम्यक् ज्ञान देतात.  त्यामुळे दुर्विज्ञेय, समजण्यास अत्यंत कठीण असणारे आत्मतत्त्व शिष्याला सुलभ, सुविज्ञेय होते.  मात्र शिष्याने अत्यंत नम्र भावाने व खऱ्या जिज्ञासेने प्रश्न विचारावेत.  प्रश्न विचारण्याचेही अनेक प्रकार किंवा अनेक प्रयोजने असतात.  

पुष्कळ वेळेला प्रश्न विचारायचे म्हणून सहज विचारले जातात.  काही वेळेला गुरूंना किती ज्ञान आहे, हे तपासण्यासाठी प्रश्न विचारतात.  तर काही वेळेला शिष्य स्वतःचे ज्ञान प्रदर्शित करण्यासाठी प्रश्न विचारतो.  सह-अध्ययन करताना काही वेळेला दुसऱ्या शिष्यांना कमी लेखून हिणवण्यासाठी प्रश्न विचारले जातात.  काही वेळेला दुसऱ्याचे मत खंडन करण्यासाठी तर काही वेळेला - हे असेच का ?  अशा दुराग्रहासाठी प्रश्न विचारले जातात.  

अशा प्रकारे विचारलेल्या प्रश्नांचा तसा काहीही उपयोग होत नाही.  कारण त्यामागे जिज्ञासा, जाणून घेण्याची इच्छाच नसते.  केवळ शब्दाला शब्द, तर्काला कुतर्क, वादाला प्रतिवाद होऊन त्यामुळे मन शांत न होता उलट अधिक अशांत, उद्विग्न व अस्वस्थ होते.  येथे पिप्पलाद मुनींनी सांगितले की, यथाकामं प्रश्नान् पृच्छत |  तुमच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा.  याचा अर्थ, मन मानेल तसे प्रश्न विचारा असा होत नाही.  तर येथे - यथाकामम् |  म्हणजे तुमची ज्या विषयाची जिज्ञासा असेल, जे काही तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारावेत.  

यानंतर ही पिप्पलाद मुनि नम्रतेने या शिष्यांना सांगतात की, तुम्ही विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे गुरूंनी दिलीच पाहिजेत, असे गुरूंच्यावर बंधन नाही.  एखाद्याने अहंकाराने किंवा वर सांगितलेल्या प्रकाराप्रमाणे प्रश्न विचारल्यास त्याची उत्तरे देण्यास गुरु बांधील नाहीत.  शास्त्राचा नियम आहे की, हे ज्ञान अनाधिकारी, उन्मत्त, उद्धट शिष्यास देऊ नये.  अधिकारी, नम्र, विनयशील साधकाला हे ज्ञान द्यावे.  


- "प्रश्नोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  एप्रिल २०१२ 
- Reference: "
Prashanopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand  Saraswati, 1st Edition, April 2012



- हरी ॐ

Tuesday, February 5, 2019

आत्मज्ञानाची आवश्यकता | Necessity of Self-Realization




सर्व संसारसागरामधून मुक्त व्हावयाचे असेल तर वरवरची दुःखे नाहीशी करून उपयोग नाही.  तर त्यासाठी संसारास कारण असणाऱ्या अध्यासाचा निरास केला पाहिजे.  अध्यासाचा निरास करावयाचा असेल तर अध्यासाला कारण असणाऱ्या स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा निरास केला पाहिजे आणि अज्ञानाचा निरास करण्यासाठी अज्ञानाच्या विरोधी घटक पाहिजे.  तमः प्रकाशवत् इति |  

जसे, अंधाराचा निरास करावयाचा असेल तर अंधाराच्या विरोधी असणाऱ्या घटकाची म्हणजेच प्रकाशाची आवश्यकता आहे.  प्रकाशाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनाने अंधार नाहीसा होत नाही.  तसेच, संसाराच्या निवृत्तीसाठी म्हणजेच अध्यासाच्या-अज्ञानाच्या निवृत्तीसाठी अज्ञानाच्या विरोधी असणारे ज्ञान हेच एकमेव साधन आहे.  ज्ञानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही साधन नाही.  

संसारनिवृत्ति होण्यासाठी जीवब्रह्मैक्यज्ञानाशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही.  याचे कारण  जीवब्रह्मैक्यज्ञानामध्येच अध्यासाची पूर्णतः निवृत्ति होते.  कर्तृकारकादि प्रत्यय निरास होतात.  कर्तृत्व-भोक्तृत्व बुद्धि संपते.  ब्रह्मज्ञानी पुरुष पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, जाणे, झोपणे, बोलणे, त्याग करणे, ग्रहण करणे, पापण्यांची उघडझाप करणे या शरीराच्या सर्व क्रिया चालू असताना इंद्रीयेच त्यांच्या त्यांच्या स्वव्यापारामध्ये प्रवृत्त झालेली असून ‘मी’ मात्र काहीही करत नाही, हे निःसंशयपणे जाणतो.  

‘मी’ शरीर-इंद्रिये-प्राण-मन-बुद्धि-चित्त-अहंकार-अज्ञान नाही.  ‘मी’ कोणत्याही कर्माचा कर्ता नाही.  ‘मी’ कोणत्याही कर्मफळाचा भोक्ता नाही.  शरीर शरीराचे काम करते.  ‘मी’ मात्र या सर्वांच्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूप आहे.  मला कोणतीही सुखदुःखे, विकार स्पर्श करीत नाहीत.  ‘मी’ सुखी-दुःखी, संसारी, मर्त्य नाही.  तर ‘मी’ स्वतःच आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, शांतस्वरूप आहे.  हीच खरी स्वस्वरूपाची, सहजस्वाभाविक, निरतिशय सुखाची स्थिति आहे.  यालाच ‘मोक्षावस्था’ असे म्हणतात.  ही अवस्था फक्त आत्मज्ञानानेच प्राप्त होते.  


- "कठोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,  मे २०११ 
- Reference: "
Kathopanishad" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2011



- हरी ॐ