Tuesday, November 30, 2021

अपरोक्षस्वरूपाचे ज्ञान | Direct Knowledge

 शिष्य प्रश्न विचारेल की, तुम्ही जे अक्षरस्वरूप असणारे सत्य सांगता, ते सत्य या विश्वाचे कारण आहे, अधिष्ठान आहे.  पण ते सत्य कधीही डोळ्यांना अनुभवायला येत नाही.  ते सत्य अत्यंत अदृश्य आहे. म्हणजेच मला प्रत्यक्ष दिसत नाही.  परंतु येथे श्रुतीने शब्द वापरला – तद् एतद् सत्यम् |  - “ते हे सत्य प्रत्यक्ष दृश्य असणारे सत्य आहे.”  उदा. “हा घट” याचा अर्थ प्रत्यक्ष दिसणारा इंद्रियगोचर घट आणि “तो घट” म्हणजे इंद्रियांना अगोचर, इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे, अप्रत्यक्ष असणारा घट होय.  येथे खरे तर श्रुतीने सत्याबद्दल सांगताना “ते सत्य” असे म्हणावयास पाहिजे होते.  पण तसे न सांगता श्रुति “तद् एतद् सत्यम् |” असे दोन्हीही शब्द वापरते.  कारण केवळ “हे सत्य” असे म्हटले असते तर ते सत्य घटाप्रमाणे इंद्रियगोचर झाले असते, आणि केवळ “ते सत्य” म्हटले असते, तर त्याचे ज्ञान घेणेच संभवत नाही.  म्हणून श्रुतीने येथे दोन सर्वनामे वापरलेली आहेत – ते हे सत्य आहे.

 

मग आम्ही या सत्याचे ज्ञान कसे घेणार ?  सत्यस्वरूप म्हणजे काय ?  दोन सर्वनामे वापरल्यामुळे शंका येईल की, मग ते सत्य प्रत्यक्ष आहे की अप्रत्यक्ष आहे ?  म्हणून याठिकाणी सर्व साधकांना सुलभतेने समजावे, आकलन व्हावे, यासाठी श्रुति स्वतःच दृष्टांत देऊन हे ज्ञान देते.  याचे कारण त्या सत्याचे ज्ञान अपरोक्षस्वरूपाने होणे आवश्यक आहे.

 

समजा, व्यवहारामध्ये “हा घट आहे” हे ज्ञान झाले, या ज्ञानामध्ये घट ही ज्ञेय वस्तु ज्ञात्यापासून भिन्न आहे.  मी घट पाहतो आणि म्हणतो की “हा घट आहे.”  त्या घटाचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही.  सत्याचे, चैतन्याचे, आत्मस्वरूपाचे ज्ञान मात्र घटाप्रमाणे नाही.  आत्मा सच्चिदानंदस्वरूप आहे.  आत्म्याचा आणि माझा काही संबंध नाही, असे ज्ञान नसून आत्म्याचे ज्ञान अपरोक्षस्वरूपाने प्राप्त करणे हेच कर्तव्य आहे. “तो आनंदस्वरूप आत्मा मी आहे”, म्हणजेच ज्ञेय आणि ज्ञाता हे अभेद स्वरूपाचे आहेत, हे ज्ञान अभेदत्वाने प्राप्त होणे आवश्यक आहे.  म्हणून आत्मा समजणे फार सोपे आहे पण “तो आत्मा मी आहे” हे समजणे अत्यंत अवघड आहे.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007- हरी ॐ
Wednesday, November 24, 2021

सत् म्हणजे काय ? | What is ‘Sat’ ?

 ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ भिन्न-भिन्न आहे.  जो अपरा विद्येचा विषय कर्मफळाचे लक्षण सत्य सांगितले, ते सत्य पारमार्थिक सत्य नसून सापेक्षित सत्य आहे.  सत्य जरी म्हटले असेल, तरी सुद्धा ते सर्व कर्मफळ नाशवान आणि अनित्य आहे.  मग त्याला सत्य का म्हटले ?  अशी शंका येईल.  यावर आचार्य सांगतात की, अविद्यावान पुरुषाच्या दृष्टीने ते फळ सत्य आहे.  त्याला ते फळ सत्य वाटते.  त्याच्याशिवाय दुसरे काहीही सत्य नाही.  ऐहिक भोग आणि पारलौकिक भोगांनाच तो सत्य मानतो.

 

याठिकाणी सत्य हा शब्द परा विद्येचा विषय आहे.  ते पारमार्थिक, निरतिशय स्वरूपाचे सत्य आहे.  मग सत्य म्हणजे काय ?  त्रिकाले अपि तिष्ठति इति सत् |  - भूत, भविष्य, वर्तमान या तीन्हीही काळांच्यामध्ये जे अस्तित्वामध्ये असते, ज्याचा कधीही, कोणत्याही कारणाने निरास होऊ शकत नाही, त्याला ‘सत्’ म्हणतात.  याउलट जे विचाराने निरास होते, जे विवेकाने निरास होते, त्याला ‘असत्’ असे म्हणतात.  म्हणून इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हणतात – That which cannot stand for enquiry is unreal.  ज्याचा ज्याचा निरास होतो, ती प्रत्येक वस्तु मिथ्या आहे.

 

भगवान गीतेमध्ये सिद्धान्त मांडतात -

नासतो विद्यते भावो नाभवो विद्यते सतः |

उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ||         (गीता अ. २-१६)

असतः भावः न विद्यते |  हा पहिला सिद्धान्त आहे आणि दुसरा सिद्धान्त – सतः अभावः न विद्यते

 | जी वस्तु असत्, मिथ्या आहे, त्या वस्तूला कधीही सत्ता, वस्तुस्तिथि, अस्तित्व नसते आणि जी वस्तु सत् आहे, त्या वस्तूचा कधीही अभाव नसतो.  म्हणजेच सत्य वस्तु ही नित्य अस्तित्वामध्ये असते आणि असत्य वस्तु कधीही अस्तित्वामध्ये नसते.  म्हणून ती दिसली, भासली तरी सुद्धा ती सत्य असेलच असे सांगता येत नाही.  तर उलट जे जे दिसते, इंद्रियांना अनुभवायला येते, मनाला, बुद्धीला जाणता येते, ते सर्वच विवेकाने निरास होते.

 

 

- "मुण्डकोपनिषत् " या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति,मार्च २००७
- Reference: "
Mundakopanishad" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 1st Edition, March 2007- हरी ॐ
Tuesday, November 16, 2021

प्रत्यगात्मस्वरूप आणि जगत्कारण | Primal Nature & Cause of The World

 ब्रह्मज्ञानी पुरुष सर्वत्र ‘मी’ ने निर्देशित केलेलेच प्रत्यगात्मस्वरूप पाहात असेल तर प्रत्यागातम्याचा जगत्कारण ब्रह्माशी काय संबंध आहे ?

 

श्रुति म्हणते –

सोSकामयत |  बहुस्यां प्रजायेयेति |  स तपोSतप्यत |

स तपस्तप्त्वा |  इद्ँ सर्वमसृजत |  यदिदं किञ्च |

तत्सृष्ट्वा |  तदेवानुप्राविशत् |                        (तैत्ति. उप. आनंदवल्ली)

परब्रह्माने “अनेक रूपाने मी जन्माला यावे” अशी इच्छा केली.  त्याप्रमाणे त्यावर चिंतन करून हे सर्व नामरूपात्मक विश्व निर्माण केले आणि ते परब्रह्म सर्वांच्यामध्ये प्रत्यगात्मस्वरूपाने उपलब्ध आहे.

 

श्रुति म्हणते –

तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः |  आकाशाद्वायुः |

वायोरग्निः |  अग्नेरापः |  अद्भ्यः पृथिवी |  पृथिव्या ओषधयः |

ओषधीभ्योSन्नम् |  अन्नात्पुरुषः |  स वा एष पुरुषोSन्नरसमयः |

अन्योSन्तर आत्मा प्राणमयः |  अन्योSन्तर आत्मा मनोमयः |

अन्योSन्तर आत्मा विज्ञानमयः |  अन्योSन्तर आत्माSSनन्दमयः |     (तैत्ति. उप. ब्रह्मवल्ली)

 

या जगत्कारण परब्रह्मापासून क्रमाने आकाश, वायु, अग्नि, पाणी आणि पृथिवी निर्माण झाली.  त्यानंतर औषधे, वनस्पति आणि धान्य निर्माण झाले.  अन्नापासून पुरुष जन्माला आला.  तो अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय यांच्या अगदी आत असून सर्वांचा प्रत्यगात्मस्वरूप आहे.  याचा अर्थ जगत्कारण सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म हेच अभेद स्वरूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्यगात्मस्वरूप आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002

- हरी ॐ
Tuesday, November 9, 2021

एकत्वाची दृष्टी | Seeing One-ness

 सर्व भूतमात्रे अज्ञानकल्पित असून परब्रह्माच्या अधिष्ठानामध्येच अस्तित्वात असतात.  या सर्वांच्यामध्ये तत्त्वज्ञानी पुरुष सन्मात्रस्वरूपाने एकत्व पाहातो.  यासाठी दृष्टांत देतात – ब्रह्मांडे सूर्यवत् |  गृहेषु दीपवत् |  घटादिषु आकाशवत् |

 

१) ब्रह्मांडे सूर्यवत् – सर्व विश्वाला प्रकाशमान करणारा सूर्य आहे.  तो विश्वामधील अंधारच नाहीसा करून एकाच वेळी सर्व विषयांना प्रकाशमान करतो.  त्याच्या प्रकाशामध्ये उच्चनीचादि, श्रेष्ठकनिष्ठ वगैरे कोणत्याही प्रकारचा भेद नसतो. सर्वांना सारखाच प्रकाश देतो.

 

२) गृहेषु दीपवत् – घरामध्ये ठेवलेला दीप सुद्धा स्वतःच्या प्रकाशाने घरातील अंधार नाहीसा करून जे विषय त्याच्या सान्निध्यामध्ये येतात त्या सर्वांना तो प्रकाशमान करतो.  त्याच्यामध्येही भेद नाही.  सूर्याचा तेजःपुंज प्रकाश आणि दिव्याचा लुकलुकणारा प्रकाश या दोन्हींच्या प्रकाशामध्ये कोणताही भेद नाही.  दोघेही प्रकाशमान करणारे आहेत.

 

३) घटादिषु आकाशवत् – वास्तविक स्वरूपाने आकाश सर्वत्र असून सर्वव्यापी आहे.  त्यामध्ये कोणतेही भेद नाहीत.  आकाशच सर्वांना जागा देते, आकाशामध्येच घटाची निर्मिति होते आणि तेच आकाश घटाला जो जो आकार मिळेल त्याप्रमाणे आकार देते.  घटाकाश, मठाकाश, करकाकाश वगैरे. किंवा ५, १०, २५, ५० किलोचा डबा, पिंप वगैरे आकार घेते.  परंतु आकाश कोणत्याही नामरूपाशी तादात्म्य न होता अखंड, सर्वव्यापी राहाते.  ते एक असूनही अनेक झाल्यासारखे भासते आणि अनेकत्व येऊनही एकच राहाते.

 

त्याचप्रमाणे सम्यक विज्ञानवान योगी शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार, अज्ञान यापासून भिन्न असलेले, पंचकोशातीत आणि तीन्हीही अवस्थांचे साक्षीस्वरूप असलेले निरुपाधिक, निर्गुण, निर्विशेष, कूटस्थअसंगचिद्रूपसाक्षीचैतन्यस्वरूप हेच ‘अहं’ या शब्दाने निर्देशित केलेले खरे तत्त्व आहे.  तेच माझे स्वरूप आहे.  नव्हे सर्वांचे स्वरूप आहे असे नि:संशयपणे जाणतो.  त्यामुळे त्या स्वरूपामध्ये उपाधींनी निर्माण केलेले भेद गळून पडतात आणि तो योगी स्वतःचे आत्मतत्त्व सर्व भूतमात्रांच्यामध्ये आणि सर्व भूतमात्रे अभेद, अद्वय आत्मतत्त्वामध्ये पाहातो.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ
Tuesday, November 2, 2021

आत्मप्राप्तीच्या सात अवस्था | Seven Stages Towards Realization

 १) जीव कृमीकीटकाप्रमाणे अत्यंत कामुक, भोगवादी, विषयासक्त असतो.  तापत्रयाने होरपळून, पश्चात्तापाने आपण जन्मभर अत्यंत अधर्माने, अनीतीने वागलो, आता तरी चांगली कर्मे व्हावीत असा विचार येतो.  धर्मकार्य करण्याची प्रवृत्ति होऊन ती वाढत जाऊन शेवटी तो धार्मिक होतो.

 

२) त्याच्या स्वैर जीवनावर आपोआपच धर्माचे नियमन होऊन त्याची पशुतुल्य वृत्ति कमी कमी होते.  इंद्रियांच्यावर काही प्रमाणामध्ये संयमन होऊन धर्मकर्मामध्ये निष्ठा प्राप्त होते.  परंतु तो धार्मिक असला तरी सकामच असतो.

 

३) सर्व विषयभोग भोगल्यानंतर आणखी काही मिळवावे असे वाटतच नाही.  त्याच्यामध्ये काहीही न मागण्याची वृत्ति निर्माण होते.  हळूहळू निष्कामतेने परमेश्वराची मनोभावे सेवा करतो.  अनेक जन्म निष्काम अनुष्ठान केल्यामुळे ईश्वराच्या कृपेने चित्तप्रसाद - चित्तशुद्धी मिळते.

 

४) वैराग्यवृत्ति निर्माण होते.  हे वैराग्य केवळ बुद्धीच्या तर्काने मिळत नसून चित्तशुद्धीचा सहज-स्वाभाविक परिपाक आहे.  विषयांच्या मर्यादा, क्षणभंगुरत्व, तसेच फोलपणा समजतो.  विषयभोगामध्ये यत्किंचित लेशमात्र सुद्धा सुख, आनंद नाही हे पुरेपूर समजते, उमजते.

 

५) विवेकजन्य वैराग्यामुळे सर्वच तुच्छ, नाशवान आहे हे समजल्यामुळे आपोआपच बुद्धिच बुद्धीला प्रश्न विचारते की, मग या विश्वामध्ये नित्य, शाश्वत, सत्य आहे का ?  असल्यास ते काय आहे ?  ते मला मिळेल का ?  त्याला अंतःकरणामध्ये शाश्वत सत्य जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते.

 

६) आत्मजिज्ञासा निर्माण झाली की ती पूर्ण कशी होईल, यासाठी तो साधक प्रयत्न करतो.  परमेश्वराच्या कृपेने आणि आणि सर्व साधनेचा परिपाक होऊन त्याला गुरुप्राप्ति होते.  मागच्या जन्मामधील सर्व संस्कार जागृत होऊन गुरूंना तो नितांत श्रद्धेने अनन्यभावाने शरण जातो.

 

७) गुरुप्राप्तीनंतर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला दिशा, प्रेरणा मिळते.  गुरुमुखामधून शास्त्राचे श्रवण, मनन आणि अखंड निदिध्यासना करतो आणि शेवटी त्याला सम्यक ज्ञानप्राप्ति होऊन तो स्वस्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त करतो.  त्याचे मन स्थिर होते.  त्याला सहजावस्था प्राप्त होते.

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002- हरी ॐ