Tuesday, July 25, 2023

शास्त्रविचार - नरकाचे वर्णन | Path Of Thinking - Description Of Hell

 



नरकामध्ये गेल्यानंतर अनेक भयंकर भोग भोगावे लागतात.  दगड खाणे,  तलवारीने कापले जाणे,  सर्व बाजूंनी दगडांचा वर्षाव होणे,  अग्नीमध्ये होरपळून निघणे,  अंगावर बर्फाचा वर्षाव होणे,  कुऱ्हाडी, करवती, सुरा, चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांनी शरीराचे तुकडे होणे,  चंदनाच्या खोडाप्रमाणे मोठ्या खडकावर वेगाने आदळणे,  घूण नावाचे कीटक किंवा वाळवी लाकडाला जशी पोखरून काढते, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या किड्यांनी शरीर पोखरले जाणे,  उकळत्या तेलाच्या कढईत पडणे,

 

मोठमोठ्या दोरखंडाने बांधले जाणे,  अग्नीचा वर्षाव करणाऱ्या बाणांनी शरीरावर प्रहार होणे,  भर उन्हात तापलेल्या जमिनीवर अनवाणी पायाने चालणे,  शिशिर ऋतूमधील कडाक्याच्या थंडीमध्ये अंगावर हिमवृष्टि होणे,  डोक्यावर सातत्याने शस्त्रांचे आघात होणे, कधीच सुखाची झोप न येणे,  तोंड बांधले जाऊन जीव गुदमरणे, उलटे टांगले जाणे,  या व अशा अनेक प्रकारच्या शिक्षा नरकामध्ये भोगायला लागतात.

 

यथा कर्म तथा श्रुतम् |                                                (कठ. उप.)

"जसे कर्म तसे फळ", या न्यायाने मनुष्याला आपल्या वाईट कर्मांची फळे भोगावीच लागतात.  किंबहुना येथे, या विश्वात आपण एखादे वाईट कर्म केले, तर त्याचे शेकडो पटीने अधिक वाईट फळ नरकलोकामध्ये भोगावे लागते.  म्हणून मनुष्याने निदान हे भयंकर वर्णन समजल्यानंतर तरी यामध्ये विचार करावा.  आपणंच आपल्या स्वतःच्या जीवनाची प्रतारणा करू नये.  हे दुर्लभ असणारे मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर केवळ वाईट कर्मांसाठी व भोगण्यासाठी याचा उपयोग न करता याचा उपयोग साधनेसाठी करावा.  त्यासाठीच शास्त्रविचार होणे अत्यंत आवश्यक आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ




Tuesday, July 18, 2023

विषयासक्त पुरुषाचा अधःपतन क्रम | Fall Sequence of an Ignorant Person

 



अज्ञानी पुरुष सतत सुख-दुःख या द्वंद्वांच्यामध्येच जीवन जगत असतो.  काही वेळेला सुखी तर पुष्कळ वेळेला मनुष्य दुःखीच असतो.  कारण अज्ञानी पुरुषाचे सुख-दुःख हे विषयांच्यावर, भोगांच्यावर तसेच बाह्य प्रसंग व परिस्थितीवर अवलंबून असते.  विषयासक्त, कामुक, भोगी पुरुषाला विषय क्षणाक्षणाला दुःखाच्या गर्तेत लोटून देतात.  एकामागून एक दुःखाचे प्रसंग, संकटांचे आघात झाल्यामुळे अशा अज्ञानी पुरुषाचे मन सतत दुःखी, निराश, उद्विग्न होत असते.  सतत द्वंद्वयुक्त व विक्षेपयुक्त होते.  याचे कारण मनामध्ये रात्रंदिवस विषयांचे चिंतन आहे.  डोळे उघडले तरी विषय दिसतात व डोळे बंद केले तरी विषय व भोगच दिसतात.  असा विषयलंपट व भोगासक्त पुरुष आयुष्यभर अतृप्त, अशांत व दुःखीच राहतो.

 

भगवान विषयासक्त पुरुषाच्या अधःपतनाचा क्रम सांगतात-

            ध्यायतो विषयान्पुसः सङ्स्तेषूपजायते |

            सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ||

            क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः |

            स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति ||           (गीता अ. २-६२, ६३)

 

विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ति निर्माण होते.  आसक्तीमधून विषयाची कामना निर्माण होते.  कामना पूर्ण न झाल्यास कामनेमधून क्रोध निर्माण होतो.  क्रोधामधून संमोह आणि त्यामुळे स्मृति भ्रष्ट होते.  सारासार विवेकबुद्धीचा नाश होतो.  मनुष्य त्याच्या परमपुरुषार्थापासून च्युत होतो.  हेच त्याचे अधःपतन आहे.  असा हा अधःपतित, विषयी, कामुक मनुष्य आपल्याच अंतरंगामध्ये असणाऱ्या शांतीचा व सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही.  मात्र ज्याचे मन सत्त्वगुणप्रधान, अंतर्मुख, विषयासक्तिरहित होऊन विवेकवैराग्यसंपन्न झालेले आहे, त्यालाच अंतरंगामध्ये निरतिशय शांतीचा व आनंदाचा अनुभव येतो.  त्याची शांतीची अवस्था कोणत्याही प्रसंगामध्ये नाश पावत नाही.  तर उलट जिथे-जिथे त्याचे मन जाते, तिथे तो नित्य आनंदस्वरूपामध्येच स्थित असतो.

 

 

- "भज गोविंदम् |” या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, एप्रिल २०१५   
- Reference: "
Bhaj Govindam" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st ध्यायतो Edition, April 2015



- हरी ॐ




Monday, July 10, 2023

ज्ञानाची सम्यक् दृष्टि - विनोद दृष्टिकोन | Elaborate Vision - Joke Perspective

 



वसिष्ठ मुनि येथे दृष्टांत देतात की, सापाची त्वचा ज्यावेळेस जुनी होते, त्यावेळेस तो प्रयत्नाने जुनी त्वचा त्याग करतो.  त्याचप्रमाणे विवेकी पुरुष सकल आधिपंजराचा म्हणजे सर्व मानसिक दुःखांचा त्याग करतो.  मानसिक व्याधीवर 'विचार' हाच एकमात्र उपाय आहे.  हा विचार शास्त्राधारे करावा.

 

जितके आपण मनामधील विचारांना सत्यत्व व महत्त्व देतो तितकी ती दुःखे वाढतच जातात.  म्हणून साधकाने मनामधील दुःखांच्यामध्ये विचार करावा.  दुःखांचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करावा.  आपण दुःखांचे मूळ शोधायला जाऊ त्यावेळी समजते की, अरे ज्याला मी दुःख असे म्हणत होतो, ते दुःख अस्तित्वामध्येच नाही.  दुःख हे प्रत्यक्ष डोळ्यांनाही दिसत नाही.  त्यामुळे वस्तुतः दुःखाला सत्ता नसून आपण दुःखाची फक्त एक कल्पना केली आहे.  त्यामुळे त्या कल्पनेचा शोध घ्यायला गेले की, आपोआपच दुःख नाहीसे होते.

 

जसे एकदा विनोद घडला की, आपण विनोद ऐकताच हसतो.  अतिशय सहजतेने सोडूनही देतो.  विनोदामध्ये कोणतीच समस्या येत नाही.  तसेच 'विनोद' या भावनेने पाहिल्यावर आपण त्या प्रसंगामध्ये एकदम तणावरहित होतो.  तसेच ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हा संसार म्हणजेच एक मोठा विनोद आहे.  त्यामुळे येथे काहीही घडले तरी ज्ञानी पुरुष फारसे मनावर घेत नाही.  प्रसंग येतात तसे निघूनही जातात.  त्यामुळे तो कोणत्याच प्रसंगाला सत्यत्व किंवा अतिमहत्त्व देत नाही.  म्हणून ज्ञानी पुरुष अज्ञानी माणसांच्याबरोबर या विश्वामध्ये राहून सर्व अनुभवून विनोदाप्रमाणे मनाने सर्व सोडूनही देतो.  सर्व व्यवहारापासून तो अलिप्त, अस्पर्शित व अपरिणामी राहतो.  हीच ज्ञानाची सम्यक् दृष्टि आहे.

 

याउलट अज्ञानी पुरुषाला मात्र सर्वत्र दुःखाचीच अनुभूति येते.  त्याला सर्व जग दुःखमय दिसते.  विश्व, विषय, माणसे, प्रसंग या सर्व ठिकाणी त्याला दुःखाचा अनुभव येतो.  याचे कारण हा अविवेकी मूढ, मनुष्य संसाराला, सर्व प्रसंगांना सत्यत्व देतो.  त्यामुळे ममत्वाने सर्वांच्यामध्ये बद्ध होऊन तो शोकमोहाने युक्त होतो.  म्हणून अज्ञानी पुरुषाला सर्व जग दुःखमय दिसते, तर ज्ञानी पुरुषाला सर्व जग आनंदमय दिसते.  हाच ज्ञान व अज्ञान यामधील फरक आहे.

 

 

- "योगवासिष्ठ" (द्वितीय मुमुक्षुव्यवहार प्रकरण) या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, मे २०१९   
- Reference: "
Yogavashishtha" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, May 2019


- हरी ॐ



Tuesday, July 4, 2023

मत्स्थानि | At My Place

 



अव्यक्तापासून स्थूलापर्यंत, नानात्व अनेकत्वाने युक्त, व्यष्टिसमष्ट्यात्मक असलेले हे विश्व कोठे आहे ?  तर भगवंतांनी ‘मत्स्थानि’ हा शब्द येथे वापरलेला आहे.  स्वप्न ज्याप्रमाणे आपल्या बाहेर आहे असे वाटत असेल तरी ते आपल्या आतच असते, त्याप्रमाणे हे सर्व विश्व आपल्याबाहेर आहे असे अनुभवाला येत असेल तरी माझ्यामध्ये म्हणजेच प्रत्यगात्मस्वरूप असलेल्या परमात्म्यामध्ये – चैतन्यस्वरूपामध्येच आहे.

 

सर्व विश्व परमात्म्यामध्ये आहे असे म्हणणे म्हणजे या आत्मचैतन्यामध्येच आहे असे जाणणे होय.  ‘मी’च या विश्वाचे अधिष्ठान आहे.  आत्मचैतन्यामध्येच सर्व विश्वाची स्थिति आहे.  सर्व क्रिया, व्यवहार, अनुभव, प्रचीति इतकेच नव्हे तर, सुखदुःखाचे अनुभव, सर्व सात्त्विक, राजसिक आणि तामसिक विकार आत्मचैतन्यामध्येच आहेत.  म्हणजेच मनाने निर्माण केलेले अंतर्विश्व आणि प्रचीतीला येणारे बहिर्विश्व हे आत्मचैतन्यामध्येच आहेत.  आकाश ज्याप्रमाणे वायूच्या कोणत्याही व्यापाराने किंवा विकाराने स्पर्शित होत नाही, विकारी होत नाही, तर ते आकाश नित्य, असंग, अलिप्त, अविकारी राहाते.  त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया होत नाही.  त्याचप्रमाणे आत्मचैतन्यामध्येच सर्व विश्व स्थित असल्यामुळे ते विश्वाचा आधार आहे.  त्याच्यामध्ये विश्वाचा सर्व व्यापार चालतो; परंतु आत्मचैतन्य मात्र शाश्वत, अचल, असंग, साक्षीरूपाने राहाते.

 

रथाचे चाक आऱ्यामधून रथाच्या नाभीमध्ये किंवा आसामध्ये जोडलेले असते.  त्यामुळे रथाची नाभीच आऱ्यांना आणि चाकाला सत्ता, सामर्थ्य आणि शक्ति देते.  नाभीभोवतीच रथचक्र अखंड फिरत असते.  परंतु रथनाभी मात्र स्थाणूप्रमाणे स्थिर, अचल राहाते.  स्वतः अचल राहून आपल्याभोवती सर्व फिरवते.  त्याचप्रमाणे विश्वचक्राचा केंद्रबिंदू प्रत्यगात्मस्वरूप असलेले आत्मचैतन्य हेच आहे.  म्हणून भगवान म्हणतात की, अर्जुना !  मी सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त असूनही – सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः |  मी सर्वांच्या हृदयामध्ये कूटस्थ-असंग-चिद्रूप-साक्षीचैतन्य-स्वरूपाने निवास करतो.  म्हणून सर्व विश्वाचा केंद्रबिंदू ‘मी’ आत्मचैतन्य आहे.

 

 

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "
Shreemad Bhagavad Geeta" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ