Tuesday, August 22, 2017

स्वादिष्ट अन्नाच्या समस्या | Problems with Tasty Food


स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |

जिज्ञासु साधकाने स्वादु अन्नाची याचना करू नये किंवा स्वादु अन्नप्राप्तीचे प्रयत्नही करू नयेत.  स्वादु म्हणजे मिष्टान्न किंवा चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत अन्नपदार्थ.  अशा अन्नाने जिभेला मिष्टान्न किंवा स्वादिष्ट अन्नाची चटक लागते व त्यामुळे अशा पदार्थांची रोज साधक याचना किंवा प्रार्थना करतो.  म्हणजेच साधक जिभेच्या आहारी जातो.  

दुसरे असे की नेहमी मन अशा चविष्ट व गोड पदार्थांचे चिंतन करू लागते कारण त्या पदार्थांबद्दल मनामध्ये विशिष्ट प्रकारचे प्रेम निर्माण झालेले असते.  त्या चिंतनातून पदार्थांची कामना निर्माण होते व साहजिकच मन बहिर्मुख होऊ लागते.  त्यातूनच विशिष्ट अन्नाची प्रीति निर्माण झाल्यावर, इतर पदार्थ असूनही त्यांचा स्वीकार करण्यास मन तयार होत नाही.  त्या इतर पदार्थाबद्दल मनात तिरस्कार व अव्हेराची भावना उद्भवते.  

यातूनच पुढे अन्नाने शरीराचे पोषण, वर्धन व रक्षण बाजूला राहून त्याऐवजी प्रीति-अप्रीति किंवा राग-द्वेष सतत मनात वास करतात.  त्यामुळे मनात क्रोध, क्षोभ, द्वेष अनावर होतात व अन्न ग्रहण करताना मन आनंदी व प्रसन्न राहू शकत नाही.  हे चमचमीत पदार्थ शरीरात जडत्व निर्माण करतात आणि रजोगुण व तमोगुण वृद्धिंगत होतात.  बुद्धीची सूक्ष्मता, तीक्ष्णता, तीव्रता कमी होते.  ज्ञानग्रहणशक्ति कमी होते.  अशा व्यक्तीला विवेक, वैराग्य व षटसंपत्ति प्राप्त होणे कधीही शक्य नाही.  

आत्मप्राप्तीच्या साधनेसाठी प्रचंड मोठे इंद्रियसंयमन, मनसंयमन सर्वप्रथम आवश्यक असते.  त्यामुळे अयोग्य प्रकारच्या आहारामुळे वृत्ति तमोगुणप्रधान झाल्याने श्रवण, मनानादि साधना शक्य होत नाही.  विशिष्ट प्रकारच्या मनाच्या धारणेसाठी उपयुक्त असलेला आहार आवश्यक असल्याने आचार्य - स्वाद्वन्नं न तु याच्यताम् |  ही साधना साधकाला करावयास सांगतात.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ


Tuesday, August 15, 2017

दयेची अपेक्षा | Expecting Empathy


जनकृपा उत्सृज्यताम् |  याचा दुसरा अर्थ म्हणजे लोकांच्याकडून साधकाने कृपेची, प्रेमाची, मदतीची अपेक्षा करू नये.  दुसऱ्याकडून दयेची अपेक्षा करणारा स्वतःजवळ शांतीने, समाधानाने राहू शकत नाही.  (I am not happy with myself, so I feel I am insecure.  Then I demand love and affection from others.)  असुरक्षिततेच्या भावनेतून मनुष्य सतत मदतीची व प्रेमाची याचना करतो.  साधकाने दुसऱ्याकडून सहकार्याची अपेक्षा केली, तर त्या अपेक्षाने त्याचे मन एकसारखे बहिर्मुख होते.  परिणामतः मनात रागद्वेष निर्माण होतात.  तसेच लोकांनी कितीही मदत अथवा प्रेम केले तरी त्याने मन संतुष्ट होत नाही.  सतत अपेक्षा वाढतच रहाते.  दुसऱ्यांकडून सदैव अपेक्षा करणारे मन नेहमी असंतुष्टच रहाते.  (Demanding mind is always dissatisfied mind.)  

तसेच लोकांनी प्रेम केले नाही तर त्यातून क्रोध व नैराश्य येते.  वैफल्याची व एकाकीपणाची भावना मनात दृढ होते.  असुरक्षिततेच्या भावनेमुळे आत्मविश्वास नाहीसा होतो.  लोकांकडून प्रेम व मदतीची अपेक्षा करताना आपण स्वतः लोकांना काय व किती दिले ? याचा विचार साधकाने प्रथम करावा.  

नद्या सदैव परोपकारार्थ वाहतात.  वृक्षांना रसाळ व मधुर फळे येतात.  ती फळे ते दुसऱ्यांना देतात. स्वतःच्या खाण्यासाठी ते कधीच फळांचा उपयोग करीत नाहीत.  गायी सुद्धा अमृततुल्य दुधाने सर्वांचे पोषण करतात.  संपूर्ण निसर्गातच ही निस्वार्थ बुद्धि दिसते.  साधुवृत्ति आढळते.  स्वतःसाठी न जगता साधु परोपकारासाठी जगतो.  त्याची त्यागाची वृत्ति हा त्याचा स्वभाव असतो.  साधुवृत्ति साधकाने अंगी बाणवावी.  

सर्वांच्यावर जीवनभर शुद्ध, निरतिशय प्रेम करत राहावे.  साधकाचा याने होणारा मोठा फायदा म्हणजे या निरतिशय, शुद्ध प्रेम करण्याने त्याचे स्वतःचे सर्व रागद्वेष नाहीसे होतात.  प्रेमाचा भावच इतका अत्युत्कट आहे, की त्यात स्वतःचे सगळे राग-द्वेष व अहंकार विरघळून जातात.  वृत्ति आपोआप शुद्ध होते.  प्रेमाच्या शुद्ध वृत्तीत अत्यानंद असतो.  Love is bliss because it is free from likes and dislikes.


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ
Tuesday, August 8, 2017

साधनेमध्ये दयेचा प्रतिबंध | Empathy as an Obstacle


जगात हजारो प्रकारचे दुःख आढळते.  दुसऱ्याचे दुःख आपण सहन करू शकत नाही.  त्याच्या निवारणार्थ दयावृत्ति अवश्य पाहिजे.  पण या दयावृत्तीमुळे “मी दुसऱ्यांचे दुःख दूर करतो, त्यांचे अश्रू पुसतो “ असा अहंकार हळुहळू साधकाच्या मनात निर्माण होतो.  तो अहंकार वाढत जातो.  अंतःकरणात खरोखरीच दयेचा भाव असेल तर त्या दयेने मनुष्य नम्र होतो.  दाखविलेल्या दयेची तो कधीच वाच्यता करत नाही.  

पण नेहमीच असे होत नाही.  दयावृत्तीने अहंकार पोसला गेल्यावर दयाभाव आपोआप नाहीसा होतो व साधकाची सर्व कर्मे अहंकारप्रेरित होतात.  दया दाखविण्याच्या कर्मात मन अपेक्षा बाळगते (Calculative Mind) व दयेची कृति पूर्वनियोजित होते.  सर्वांचे दुःख निवारण करणारा तू कोण ?  कारण दुःखाचे कधीच निवारण होत नाही.  आचार्य म्हणतात, “वातुल किं तव नास्ति नियंता ?विश्वाचा नियामक आणि रक्षक कोणी नाही असे तुला वाटते का ?  सर्वशक्तिमान परमेश्वर असताना त्याच्यापुढे तू कोण ?  तसेच संपूर्ण अफाट विश्वाच्या निर्मितीत तू कुणाच्या खिजगणतीतही नाहीस.  आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत साधकाने रागद्वेषात्मक असणारी कृपा करणे वर्ज्य करावे.

कृपा करणे हा साधूचा स्वभाव आहे.  त्यामुळे कोणीही असो, गरीब, श्रीमंत, शत्रु, मित्र, लहान, मोठा, कोणताही भेद न बाळगता साधु विशाल अंतःकरणाने समभावाने सर्वांवरच दयेचा वर्षाव करत असतात.  प्रत्येक कृति अथवा घटना परमेश्वराच्या इच्छेने घडत असते.  त्यामुळे परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमच्याकडून दुसऱ्याला मदत होते हा योग्य भाव साधकाच्या मनात असावा.  परमेश्वराच्या संकल्पाशिवाय तुम्ही दुसऱ्यावर दया दाखविणे अशक्य आहे.  “मी कृपा करतो“ ही अहंकारी वृत्ति वाढण्यास वेळ लागत नाही.  हा वृद्धिंगत होणारा अहंकार साधकाच्या अधःपाताचे कारण आहे.  अहंकाराने मन स्वस्थ व शांत राहू शकत नाही.  या कारणास्तव “जनकृपा उत्सृज्यताम् हे पथ्य पाळावयास आचार्य सांगतात.  

यासाठी सावधानतेची सूचना म्हणून लोकांवरील कृपा करण्याची वृत्ति, दयार्द्रभाव, तेसच निष्ठुरता या दोन्ही वृत्तींचा साधकाने प्रयत्नपूर्वक त्याग करावा.  


- "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ


Tuesday, August 1, 2017

मनाचे औदसीन्य – भाग २ | Composure of Mind – Part 2


औदासीन्य’ याचा दुसरा अर्थ – दोन पक्षात परस्परविरोधी मतप्रणाली असताना साधकाने पूर्ण औदासीन्य म्हणजे तटस्थ वृत्ति ठेवावी.  कोणत्याही वृत्तीच्या आहारी जाऊ नये.  म्हणजे कोणत्याच पक्षाची बाजू घेऊ नये.  वितंडवादात भाग घेऊ नये कारण कोणतीही गोष्ट पूर्ण योग्य किंवा पूर्ण अयोग्य आहे हे परमेश्वरालाही ठरविता येणे अशक्य आहे.  कोणत्या निकषावर योग्य अयोग्य ठरविणार ?  

स्थल, काल आणि व्यक्तिपरत्वे प्रत्येक गोष्टीबाबत योग्य अयोग्याच्या कल्पना बदलत जातात.  म्हणूनच आपले स्वतःचे मत प्रदर्शित केले, तर ते मत एका पक्षाला प्रिय तर दुसऱ्या पक्षाला अप्रिय होते.  त्यातून कधीही न संपणारा वितंडवाद चालू राहतो.  तेवढ्यासाठी तटस्थवृत्तीने Wait and watch हे ब्रीदवाक्य साधकाने डोळ्यासमोर ठेवावे.  Let it happen and allow things to happen या दृष्टिकोनातून उदासीन वृत्ति ठेवावी.  

अशी उदासीन वृत्ति ठेवली नाही, तर त्यातून साधकाच्या मनात रागद्वेष निर्माण होतात.  वादातून कोणताच बोघ न होता उलट वितंडवाद सुरु होतो व त्यातून क्रोध निर्माण होऊन त्याच्या मनाचा तोल सुटतो.  आपण कोणाला, कुठे, काय बोलत आहोत ?  याचे तारतम्य साधकाला राहणार नाही.  त्याहीपुढे काम, क्रोध इत्यादि विकारांबरोबर वाहात जाऊन विनाकारण मनाची चंचलता, क्षोभ वाढतात.  - "साधना पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून,  तृतीय आवृत्ति, सप्टेंबर २००५   
- Reference: "
Sadhana Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, September 2005- हरी ॐ