Tuesday, February 25, 2014

जेथे ज्ञान तेथे आनंद | Happiness comes with Knowledge


गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः  (श्रीमद् भगवद्गीता २-११)

 या श्लोकामध्ये ज्ञान आणि अज्ञानाची दृष्टि व त्याचे फळ सांगितलेले आहे.  दोघांच्या दृष्टीत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.  एक अंधाराची तर दुसरी प्रकाशाची, एक अविद्येची आणि दुसरी विद्येची, एक नानात्वाची व दुसरी अखंडत्वाची, एक द्वैताची तर दुसरी अद्वैताची दृष्टि आहे.  म्हणून जेथे ज्ञान आहे तेथे आनंद आहे आणि जेथे अज्ञान आहे तेथे दुःख, संसार आहे.

उदा.  आजोबा नातवाबरोबर फुग्याचा खेळ खेळतात.  खेळताना फुगा फुटतो.  परंतु दोघांच्यावर भिन्न परिणाम होतो.  नातु फुगा फुटला म्हणून आक्रोश करतो, तर आजोबा फक्त हसतात.  याचे कारण फुगा नाशवान आहे.  तो फुटणारच.  हे फुग्याचे तत्त्व जाणून आजोबा खेळत असतात.  त्यामुळे फुगा फुटल्यानंतर त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.  ते फक्त हसतात !

परंतु नातु मात्र फुग्याचे तत्त्व जाणत नसल्यामुळे त्याला सत्यत्व देतो.  फुगा नित्य राहील अशी त्याची कल्पना असते.  परंतु फुग्याचे फुटणे थांबत नाही.  तो शोकाकुल होतो.  येथे वस्तु एकच, प्रसंग एकच, परंतु दोन भिन्न प्रकारच्या दृष्टि आहेत.  एक ज्ञानाची आणि दुसरी अज्ञानाची.  त्यामुळे ज्ञानी आजोबा हसतात आणि अज्ञानी नातु शोकाकुल होतो.

त्याचप्रमाणे जगामध्ये दोन प्रकारची दृष्टि दिसते. एक तत्त्वाच्या ज्ञानाची आणि दुसरी अज्ञानाची.  तत्त्व कधीही येत नाही आणि जातही नाही.  ते कधीही नाश पावत नाही.  जाणारे फक्त नाम आणि रूप आहे.  म्हणून ज्ञानी पुरुष नाशवान शरीरामधील अविनाशी तत्त्व जाणत असल्यामुळे गेलेल्या शारीराबद्दल किंवा जाणाऱ्या शरीराबद्दल कधीही शोकाकुल होत नाहीत.  ते शांत राहतात.  त्याउलट अज्ञानी पुरुष अविनाशी तत्त्व जाणत नसल्यामुळे अज्ञानाने शरीराला सत्यत्व देतात.  ते शरीर नाहीसे झाल्यावर अत्यंत शोकाकुल होतात.  निराश होतात.  

- "श्रीमद् भगवद्गीता" या परमपूज्य स्वामी स्वरूपानन्द सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति,  डिसेंबर २००२
- Reference: "Shreemad Bhagavad Geeta
" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 3rd Edition, December 2002


- हरी ॐ

Tuesday, February 18, 2014

भगवान कृष्ण – पालनकर्ता | Lord Krishna – The Guardian



आदि शंकराचार्य षट्पदी स्तोत्रात म्हणतात ‘ हे परमेश्वरा !  मत्स्य, कूर्म, वराह वगैरेदि अनेक अवतार धारण करून तू नित्य पृथ्वीचे रक्षण केलेस.  भगवंता !  तू याप्रमाणेच माझेही रक्षण करावेस, कारण मी संसारतापाने भयभीत झालो आहे. ’  

प्रत्येक जीव संसाराच्या त्रिविध तापामध्ये होरपळून निघतो.  आध्यात्मिक ताप म्हणजे शरीराचे असह्य रोग, यातना होय.  आधिभौतिक ताप म्हणजे सभोवतालची माणसे, आप्त, सगेसोयरे, बंधुबांधव, नातेवाईक यांच्यापासून प्राप्त होणारे दुःख होय.  तसेच, अतिवृष्टि, अनावृष्टि, भूकंप, ज्वालामुखी वगैरे नैसर्गिक आपत्ति म्हणजे आधिदैविक ताप होय.  याप्रकारच्या अनंत दुःखांनी मनुष्य सर्व बाजूंनी हतबल होतो.  त्याचे मन अस्वस्थ, उद्विग्न होते.  जन्म-मृत्यु-जरा-व्याधि यामुळे मनुष्य अतिशय भयभीत होतो.

ज्याप्रमाणे लहान मूल घाबरले की, आईवडील त्वरित त्याचे रक्षण करतात.  त्यावेळी आईवडील मुलाकडून कोणतीही अपेक्षा करीत नाहीत.  म्हणूनच आईवडिलांना ‘ पालक ’ असे म्हटले जाते.  म्हणून येथे आचार्य भगवंतालाच प्रार्थना करतात की, ‘ भगवंता !  तूच माझी आई–वडील, बहिण– बंधु, सखा सर्वकाही आहेस.  त्यामुळे मी कसा आहे ?  माझ्यामध्ये किती गुणदोष आहेत ?  किंवा मी तुला शरण आलो आहे की नाही ?  हे काहीही न पाहता तू माझे या भवतापापासून रक्षण करावेस.  परमेश्वरा, हेच तर तुझ्या अवताराचे प्रयोजन आहे.

‘ अवतार ’ म्हणजे खाली येणे होय. भगवंता !  माझ्या उद्धारासाठीच तर तू खाली आलास.  निर्गुणाचा सगुण झालास.  जसे मूल खड्ड्यात पडल्यानंतर आईवडील स्वतः खड्ड्यात उतरून, खाली जाऊन त्याला बाहेर काढतात.  म्हणूनच भगवंता, तू माझा मायबाप आहेस.  आमच्यासारख्या पातकांच्या राशी असणाऱ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी तू या पृथ्वीतलावर अनेक अवतार धारण केलेस.

 
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, २०१३
- Reference: "
Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013



- हरी ॐ

Tuesday, February 11, 2014

भगवान कृष्ण - उद्ध्रुतनग | Lord Krishna and Govardhan

 
आदि शंकराचार्यकृत षट्पदी स्तोत्रात ‘ उद्ध्रुतनग ’ याचा अर्थ, ज्याने पर्वताला उचलले तो परमेश्वर होय.
 
श्रीमद्भागवतामध्ये मोठी सुंदर कथा येते.  गोकुळवासियांनी एकदा दरवर्षीप्रमाणे इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा केल्यामुळे इंद्रदेव कोपतो व तो आपल्या मेघगणांना वृंदावनात अतिवृष्टि करण्याचा आदेश देतो.  व्रजामध्ये धो-धो पाऊस पडू लागतो.  हत्तीच्या सोंडेएवढी एक धार याप्रमाणे मुसळधार पाऊस पडून व्रजामध्ये सर्वत्र पाणीच पाणी होऊन हाहाःकार माजतो.  घरे, गोठे पाण्याने भरून जातात.  सर्व व्रजवासी आपल्या परिवारास, गाईगुरांना घेऊन भगवान श्रीकृष्णांना शरण येतात.
 
हे सर्व इंद्राचे कारस्थान आहे, हे भगवंताच्या लक्षात येते.  भगवान सर्वांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वताचा आश्रय घेतात.  आपल्या करांगुलीवर गोवर्धनाला धारण करतात व वर उचलतात.  भयभीत झालेले व्रजवासी, गोप-गोपी, गाई-गुरे सर्वजण गोवर्धनाखाली आश्रयाला येतात.  भक्तसहाय्यक भगवंताला साहाय्य करावे म्हणून आपापल्या काठ्या गोवर्धनाला लावतात.
 
याप्रकारे भगवंतांनी गोवर्धनाला उचलून सर्वांचे रक्षण केले, म्हणून त्याला ‘ उद्ध्रुतनग ’ असे म्हणतात.  भगवंतांनी शरण आलेल्या गोपगोपींचे तर रक्षण केलेच.  परंतु मुक्या गाईंचेही रक्षण केले.  गायींच्यामध्ये तर शरण येण्याची किंवा भगवंताला प्रार्थना करण्याचीही बुद्धि नव्हती.  परंतु त्या गायींच्या चेहेऱ्यावरील केवळ दीनभाव पाहूनच कृपाघन परमेश्वराने त्यांचे रक्षण केले.
 
इतकेच नव्हे, तर हे भगवंता !  तू अभिमानी असणाऱ्या इंद्राचेही रक्षण केलेस.  त्याच्यामधील अभिमानाचा नाश केलास.  एकाच गोवर्धनधारण लीलेमधून तू गाई-गोप-गोपी-वासरे-गोवर्धन व इंद्र या सर्वांचाच तू उद्धार केलास.  म्हणूनच तू ‘ उद्ध्रुतनग ’ आहेस !
 
- "शरणागती" या परमपूज्य स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, प्रथम आवृत्ति, २०१३
-
Reference: "Sharanagati" by Param Poojya Swami Sthitapradnyanand Saraswati, 1st Edition, 2013
 
 
 
 - हरी ॐ 
 
 
 
 

Tuesday, February 4, 2014

जीव आणि ईश्वर | Being and Supreme-Being

 
जीव हा जरी उपाधीशी तादात्म्य पावून सोपाधिक परिच्छिन्न, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, अल्पव्यापी, कर्ता, भोक्ता, सुखी-दुःखी, जन्ममृत्यू युक्त, संसारी भासत असला तरीही त्वंपदलक्ष्यार्थाने - स्वस्वरूपाने तो संवित् स्वरूप आहे.

परमेश्वर म्हणजेच मायाउपाधियुक्त ब्रह्म. जीवाच्या तुलनेने सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, ईशनशील, नियामक असला तरीही तत्पदलक्ष्यार्थाने तो मायाउपाधिरहित, त्रिगुणातीत, शुद्ध चैतन्यस्वरूप आहे.     

जीव
ईश्वर
अल्पज्ञ
सर्वज्ञ
अल्पशक्तिमान
सर्वशक्तिमान
अल्पव्यापी
सर्वव्यापी
मर्यादित
अमर्यादित
कार्य
कारण
नियम्य
नियामक
कर्ता – भोक्ता
अकर्ता – अभोक्ता
संसारी
असंसारी

 
याप्रमाणे जीव आणि परमेश्वर यामध्ये व्यवहारयोग्य भेद दिसत असले तरी सुद्धा ते केवळ उपाधिजन्य भेद आहेत. त्यांच्यात स्वस्वरूपाने भेद नाहीत. मायाउपाधिमध्ये म्हणजेच शुद्धसत्वगुणप्रधान मायेमध्ये पडलेले चित्प्रतिबिंब म्हणजे ईश्वर होय. अविद्याउपाधिमध्ये म्हणजेच अशुद्धसत्वगुणप्रधान मायेमध्ये पडलेले चित्प्रतिबिंब म्हणजे जीव होय.

परमेश्वर आणि जीव यांच्यामध्ये उपाधिजन्य भेद आहेत. स्वस्वरूपाने दोघांच्यामध्ये एकच अखंड वस्तु आहे.

 
 
- "मनीषा पञ्चकम्" या परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, चतुर्थ आवृत्ति, २०१२       
- Reference:  "Maneesha Panchakam" by Param Poojya Swami Swaroopanand  Saraswati, 4th Edition, 2012



- हरी ॐ