Tuesday, August 25, 2020

उपासना केव्हा करावी? | Ideal Time for Mind Practice
उपासना ही कधीही, केव्हाही करू नये.  काही साधक दुपारी बारा वाजता किंवा रात्री उपासना करतात.  परंतु ब्राह्ममुहुर्त ही उपासनेसाठी सर्वांत उत्कृष्ट वेळ आहे.  याचे कारण आपल्यामध्ये सत्व-रज-तम या गुणांचा प्रभाव आहे.  त्याचप्रमाणे विश्वामध्येही प्रकृतीचे हे तिन्हीही गुण अंतर्भूत आहेत.  

पहाटे ब्राह्ममुहुर्ताला संपूर्ण सृष्टि ही सत्वगुणप्रधान असते.  सूर्योदयापासून पुढे हळुहळू सृष्टीवर रजोगुणाचा प्रभाव असतो आणि सूर्यास्तानंतर रात्री पहाटेपर्यंत सृष्टि तमोगुणप्रधान असते.  रात्रीच्या वेळी नीरव शांतता असेल तरी रात्रीची शांतता, दुपारची शांतता आणि ब्राह्ममुहुर्ताची शांतता यात खूप फरक आहे.  सृष्टीच्या या गुणांचा परिणाम आपल्या मनावरही होत असतो.  

पहाटेच्या वेळी आपले मनही सत्वगुणप्रधान असते.  मनामधील रागद्वेष, कामक्रोधादि विकारांचा प्रभाव अत्यल्प असतो.  त्यामुळे मन प्रसन्न, शांत, आल्हाददायक असते व बाहेरील सृष्टि सुद्धा अत्यंत प्रसन्न असते.  त्याचवेळी उपासना करावी.  

याउलट सूर्योदयानंतर आपले मनही रजोगुणप्रधान होऊन शरीर, इंद्रिये अनेक प्रकारच्या कर्मांच्यामध्ये प्रवृत्त होतात.  मनामध्ये कामक्रोधादि विकार क्षणाक्षणाला उफाळून बाहेर येत असतात.  असे मन उपासनेमध्ये एकाग्र होत नाही.  

तसेच सूर्यास्तानंतर जसजशी रात्र होते, तसतसा तमोगुणाचा प्रभाव वाढतो.  जसे अंधारामध्ये हिंस्त्र श्वापदांची शक्ति वाढते, त्याचप्रमाणे तमोगुण वर्धन पावला असताना मनामधील राक्षसी प्रवृत्ति प्रबल होतात.  कामवासना उद्दीपित होते.  तसेच शरीर, इंद्रिये व्यापारशून्य होऊन सुंद होतात.  त्यावेळेस मनुष्य निद्रावश होतो.  त्यामुळे रात्रीच्या वेळी शरीर, इंद्रिये दिवसभराच्या श्रमामुळे थकलेली असताना, अशा जड, सुंद झालेल्या शरीराने मनही सुंद होते.  असे शरीर व मन उपासना करू शकत नाही.  यामुळे पहाटेच्या वेळी ब्राह्ममुहुर्तालाच उपासना करावी.   


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011- हरी ॐ


Tuesday, August 18, 2020

जपउपासनेची पूर्वतयारी | Preparation for Jap Upasana

 


गुरुगीतेमध्ये म्हटले आहे –

ध्यानमूलं गुरोमूर्तिः पूजामूलं गुरोःपादम् |

मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा ||           (गुरुगीता - ७६)

 

अध्यात्ममार्गामध्ये साधकाला गुरूंची नितांत आवश्यकता आहे.  गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच साधना, गुरु हीच निष्ठा असे गुरुमय जीवन साधकाने जगले पाहिजे.  गुरूंच्याकडून मिळालेल्या मंत्राची उपासना केली तर तो मंत्र सिद्ध होतो, कारण त्यामागे गुरूंची तेजस्वी, ओजस्वी शक्ति असते, गुरूंचा आशीर्वाद, अनुग्रह असतो.  म्हणून उपासना करण्यापूर्वी अंतःकरणामध्ये शरणागत भावाने गुरूंचे स्मरण करावे.  त्यामुळे उपासनेसाठी आवश्यक असणारे स्थिर, एकाग्र मन निर्माण होईल.  

 

शास्त्रकार मनाच्या संयमनासाठी साहाय्यकारी घटक सांगतात.  अध्यात्मविद्येचे अध्ययन, गुरूंचे सान्निध्य, वासानात्याग आणि प्राणायाम या चित्तावर विजय प्राप्त करण्यासाठी युक्ति आहेत.  जपउपासना अधिक फलद्रूप होण्यासाठी आणखी काही साहाय्यकारी घटक सांगितले जातात –  

 

१. मनाची प्रसन्नता – मनाची सतत प्रसन्न वृत्ति ठेवावी.  

२. शौचं – अंतरिक मनाची शुद्धि करावी.  बाह्य शुद्धि म्हणजेच शरीराची शुद्धि होय.  उपासना करताना स्नान करून, शुचिर्भूत होऊनच बसावे.  त्यामुळे शरीर, मन एकदम ताजेतवाने, प्रसन्न व पुलकीत होते.  

३. मौनम्व्यर्थ, वैषयिक गप्पा न मारणे, सत्य, प्रिय व हितकारक बोलणे, वाणीवर पूर्णतः संयमन, यालाच मौन म्हणतात.  

४. मान्त्रार्थ चिंतनम् – मंत्राच्या गूढार्थाचे चिंतन करणे.  

५. अव्यग्रत्वम् – चित्तामध्ये व्यग्रता, चिंता, काळजी यांचा अभाव असणे.  

६. अनिर्वेदः – चित्ताचा लय न होऊ देणे.  

 

ही सर्व साधने जप उपासनेला साहाय्यकारी आहेत.  अशी पूर्वतयारी करून जपउपासना पूर्णतः मनामध्ये करावी.  

 

- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011


- हरी ॐ
Tuesday, August 11, 2020

रूपउपासना | Form Worship

 


रूपउपासना म्हणजे नामाशिवाय रूपाची केलेली उपासना होय.  रूपउपासनेमध्ये प्रामुख्याने मानसपूजा येते.  जसे मी परमेश्वराच्या विग्रहाची पूजा करतो, त्याचप्रमाणे बाह्य पूजेच्या ऐवजी शांत बसून अंतरंगामध्ये विग्रहाच्या रूपाची वृत्ति निर्माण करून त्याची मानसपूजा करावी.  ज्या ज्या क्रिया बाहेर पूजा करताना करतो, त्या सर्व क्रियांची मनानेच मनामध्ये कल्पना करावी.  

 

रूपउपासना करीत असताना ज्या विग्रहाची मी पूजा केली, त्या विग्रहाकडे, रूपाकडे पाहत राहावे.  त्याचे नखशिखांत रूप निरखून पाहावे.  जितके तुम्ही पाहाल, तितक्या प्रमाणात परमेश्वराबद्दलचा भक्तीचा, प्रेमाचा भाव वर्धन पावेल.  त्या सुंदर, सगुण, साकार, सविशेष, नयनमनोहर रूपाची ओढ लागते.  मन त्याकडे आकर्षित होऊन तासन् तास त्यामध्येच रममाण होते.  यालाच ‘रूपासक्ति’ असे म्हणतात.  परमेश्वर म्हणजे केवळ एखादा विग्रह अथवा दगड नाही.  मृतिका अथवा धातु नसून तो साक्षात चैतन्याचा पुतळा दिसू लागतो.  त्या विग्रहामध्ये चैतन्याचा आविष्कार दिसतो.  या उत्कट भावामध्ये आपले डोळे आपोआप मिटले जातात.  डोळे मिटल्यानंतरही समोर साक्षात परमेश्वरच दिसतो.  

 

रूपउपासनेमध्ये रूपाची उपासना म्हणजे केवळ रूप नाही तर त्यामधून आम्ही तेजोमय चैतन्याचीच उपासना करीत असतो.  रूपाची उपासना म्हणजेच तेजाची उपासना होय.  त्यामुळे आपले मनही तेजस्वी, ओजस्वी, चैतन्यमय होते.  आपली वृत्तीही तेजोमय होते.  या उपासनेत मी त्या रूपाशी इतका तल्लीन, तन्मय होतो की तेथे नाम नाही, रूप नाही तर शुद्ध, चैतन्यस्वरूप राहते.  

 

याप्रमाणे रूपउपासनेच्या साहाय्याने साधक ध्यानाच्या, समाधीच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ति करतो.  तेथे तो त्या रूपाशी एकरूप होतो.  नव्हे, तो स्वतःच परमेश्वररूप होतो.  यालाच ‘निदिध्यासना’ असेही म्हणतात.                

 

 

- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011

 

- हरी ॐ
Tuesday, August 4, 2020

सत्वगुणवर्धनाचे १० घटक | 10 Components for Enhancing Virtues

सत्वगुणाच्या वर्धनासाठी शास्त्रकार दहा घटकांचे अनुसरण करावयास सांगतात.  
आगमोSपः प्रजा देशः कालः कर्म च जन्म च |
ध्यानं मन्त्रोSथ संस्कारः दशैते गुणहेतवः ||             (श्रीमद्भागवत ११-१३-४)    
आगम (शास्त्र), आप (पाणी), प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार हे दहा घटक तिन्हीही गुणांचा उत्कर्ष करण्यासाठी कारण होतात.  

जीवनामध्ये आपला अनेक गोष्टींशी संपर्क होत असतो.  त्यामधून मनावर सुप्त संस्कार होत असतात.  प्रामुख्याने उपरोक्त सांगितलेल्या दहा घटकांच्यामुळे तीन गुण वर्धन पावतात.  म्हणून राजोतमोगुणात्मक घटकांचा त्याग करून सात्विक आगमादि दहा घटकांचेच अनुसरण करावे.  त्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन काया-वाचा-मनसा अंतर्बाह्य शुद्धि होईल.  

१.  सात्विक शास्त्र म्हणजेच निवृत्तिपर असणारे अध्यात्मशास्त्र होय.  
२.  सात्विक पाणी म्हणजेच परमेश्वराचे अथवा गुरुचरणांचे तीर्थ होय.  
३.  सात्विक प्रजा म्हणजे सज्जनांचा संग किंवा सत्संगति.  
४.  सात्विक देश म्हणजे पवित्र, एकांत स्थान.  
५.  सात्विक काळ म्हणजे पहाटे ३:३० नंतर सूर्योदयापर्यंतचा ब्राह्ममुहुर्त.  
६.  सात्विक कर्म म्हणजेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान.  
७.  सात्विक जन्म म्हणजेच गुरुपदेश अथवा उपनयन संस्कार.  
८.  सात्विक ध्यान म्हणजेच परमेश्वराचे ध्यान.  
९.  सात्विक मंत्र म्हणजेच गायत्री मंत्र किंवा प्रणवोपासना.  
१०. सात्विक संस्कार म्हणजेच आत्मबोधाचा संस्कार.  

याप्रकारे सात्विक घटकांचेच अनुसरण करावे.  यामुळे भक्तिरूप धर्माचा उदय होऊन आत्मज्ञानाची प्राप्ति होते आणि जन्ममृत्युयुक्त संसाराचा ध्वंस होतो.  यालाच सत्वगुणाची उपासना असे म्हणतात.  याप्रमाणे सत्वगुणाचा उत्कर्ष करणे ही सुद्धा गुणउपासना आहे.        


- "उपासना" या परमपूज्य स्वामी स्थिताप्रज्ञानंद सरस्वती लिखित पुस्तकामधून, तृतीय आवृत्ति, जुलै २०११
- Reference: "
Upasana" by ParamPoojya Swami SthitapradnyanandSaraswati, 3rd Edition, July 2011

- हरी ॐ